सौर चूल आदिमानवाने अग्नीचा शोध लावून अन्नाव्यतिरिक्त दुसऱ्या ऊर्जा संस्कृतीचा पाया घातला. मानवी विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध पारंपरिक ऊर्जा स्रोत जसे कोळसा, नैसर्गिक वायू,  पेट्रोलजन्य पदार्थ, विद्युत ऊर्जा इत्यादींचा अमर्याद वापर करण्यात आला आहे व याचा वापर भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा साठा मर्यादित असून भविष्यामध्ये यांचा प्रचंड तुटवडा जाणविणार आहे. पारंपरिक ऊर्जेच्या तुलनेमध्ये अपांपरिक ऊर्जा स्रोत (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, जैव ऊर्जा, समुद्र ऊर्जा इत्यादी) हे पुन:निर्मित होणारे, स्वच्छ व निसर्ग जपून ठेवणारे स्रोत आहेत. ही नवीन विकसित होणारी साधने/ स्रोत दिवसेंदिवस किफायतशीर आणि स्पर्धात्मक होत आहेत.
सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत असूनही प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा प्रामुख्याने विद्युत चुंबकीय लहरींद्वारे पृथ्वीवर उपलब्ध होते. भारताच्या विस्तीर्ण भूभागावर वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी जवळपास २८० दिवस भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असून प्रत्येक चौरस मीटर भूमीवर १५ ते २० मेगा ज्युल इतकी ऊर्जा दिवसभरात उपलब्ध होते. दैनंदिन ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जेचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो. सौर ऊर्जा आधारित विविध साधनांचा विकास करण्यात आला असून त्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणे आवश्यक आहे. या सौर ऊर्जेचे रूपांतर, इतर ऊर्जामध्ये होऊ शकते. त्यापैकी सौर थर्मल -औष्णिक ऊर्जा हा एक प्रकार आहे. सौर ऊर्जेचे रुपांतर उष्णता ऊर्जेमध्ये करण्याच्या प्रक्रियेला सौर थर्मल – औष्णिक ऊर्जा असे म्हणतात. सौर उष्णता ऊर्जेचा उपयोग दैनंदिन वापरासाठी मोठय़ा प्रमाणात केला जाऊ शकतो. सौर ऊष्णतेचा उपयोग स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी केला जाऊ शकतो. पारंपरिक ऊर्जा स्रोतांची टंचाई त्याचप्रमाणे पारंपरिक इंधनांची किंमत सारखी वाढते आहे. ह्य़ा गोष्टी लक्षात घेत आपण दैनंदिन वापरासाठी सौर उष्णतेचा उपयोग स्वयंपाकासाठी कसा करता येईल, हेबघणार आपण या सौर चुलींवरील लेखमालेत बघमार आहोत. सौर उष्णतेचा (ऊजेचा) उपयोग स्वयंपाकासाठी करण्यासाठी सौर चुलीचा  उपयोग आपण करू शकतो.    सौरचूल ही स्वस्तात मिळणारी, वापरण्यास सोपी व सुटसुटीत असल्याने देशभरात मोठय़ा प्रमाणावर वापरली जात आहे. सौर चूल ही घरगुती स्वयंपाकासाठी त्याचप्रमाणे हॉटेल, मेस, कँटीन इत्यादी ठिकाणी स्वयंपाकासाठी वापरता येऊ शकते.
अनंत ताम्हणे