१९८८ ते १९९९ या कालावधीतील लाँच िवडोत एकूण १० मंगळ मोहिमा पाठवण्यात आल्या. त्यातील सात अयशस्वी ठरल्या तर एका मोहिमेला अंशत: यश मिळालं,  तर ७ नोव्हेंबर १९९६ रोजी पाठवण्यात आलेले मार्स ग्लोबल सर्वेअर आणि त्यानंतर एक महिन्यापेक्षा कमी कालावधी नंतर पाठवण्यात आलेल्या मार्स पाथफाइंडर  मोहिमा मात्र यशस्वी ठरल्या. मार्स पाथफाइंडर मंगळावर उतरलं होतं आणि त्याने ८४  दिवस काम केलं, तर मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेअरने पूर्ण सात वर्षे काम केलं
मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेअरने आपली प्राथमिक मोहीम जानेवारी २००१ मध्ये पूर्ण केली, पण यानाची एकूण स्थिती बघता मोहिमेचा कालावधी दोनदा वाढवण्यात आला. तिसऱ्या कालावधीत २ नोव्हेंबर २००६ रोजी यानाचा पृथ्वीशी संपर्क बंद झाला होता. मग तीन दिवसांनी अगदी मंद असा सिग्नल मिळाला होता, पण तो यानाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पुरेसा नव्हता. शेवटी जानेवारी २००७ मध्ये ही मोहीम बंद करण्याची घोषणा करण्यात आली.
सव्‍‌र्हेअर यान एकूण ७५ कोटी किलोमीटरचा प्रवास ३०० दिवसात पूर्ण करून ११ सप्टेंबर १९९७ रोजी मंगळाजवळ पोचले. या मोहिमेच्या उद्दिष्टांपकी मंगळाच्या वातावरणाचा सखोल अभ्यास, मंगळावर सजीव कधी होते किंवा नाही आणि असले तर त्याची उत्क्रांती झाली होती का, मंगळाच्या भौगोलिक बदलांचा अभ्यास आणि मंगळावरील पाण्याचा इतिहास शोधणे हे प्रमुख होते.
या संशोधनासाठी जी वेगवेगळी उपकरणे पाठवण्यात आली होती त्यातील मार्स ऑरबयटर कॅमेरा (एम ओ सी) हे मुख्य उपकरण म्हणता येईल. या कॅमेऱ्याचे  तीन भाग होते. एक कॅमेरा कृष्णधवल चित्र घेण्यासाठी होता. हा हायरिझोलुशनचा कॅमेरा होता. या कॅमेऱ्यातून मंगळाच्या ३ कि.मी. पर्यंतच्या भागाचे चित्र घेता येत होते, तर दुसरा कॅमेरा लाल आणि निळ्या रंगात छायाचित्र घेणारा होता. तिसरा कॅमेरा मंगळाच्या मोठय़ा भागाचे छायाचित्र घेत होता. या कॅमेऱ्याने आपल्या कारकिर्दीत दोन लाख चाळीस हजार चित्र पाठवली. या कालावधीत मंगळाने सूर्याच्या ४.८ परिक्रमा पूर्ण केल्या होत्या. म्हणजे या चित्रांवरून सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत मंगळाच्या वातावरणात कसे बदल घडतात याची माहिती आपल्याला मिळाली होती.
दुसरे उपकरण होते मार्स ऑरबायटर लेझर अल्टिमीटर – या उपकरणाचा वापर यान मंगळाच्या पृष्ठभागापासून किती दूर आहे याची नोंद ठेवण्याकरिता करण्यात आला होता. त्यासाठी हे उपकरण मंगळाच्या दिशेने दर सेकंदाला १० अधोरक्त किरणांची स्पंदने पाठवत आणि परावíतत झालेल्या स्पंदनांना परत यानापर्यंत येण्यास किती वेळ लागला हे मोजत. मंगळाच्या पृष्ठभागापासून यानाच्या अंतराचे अचूक अंतर मिळाल्याने मंगळाच्या पृष्ठभागावरील डोंगरदऱ्यांच्या उंची आणि खोलीचे मोजमाप मिळण्यास ही माहिती महत्त्वाची होती.
थर्मल एमिशन स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाच्या मदतीने आपल्याला मंगळावरच्या वायू, द्रव आणि घन अवस्थेतील रेणूंची माहिती मिळण्यास मदत झाली. त्याचा मुख्य शोध म्हणजे मंगळावर मोठय़ा प्रमाणात ऑलिव्हन खनिज सापडल्याचा. ऑलिव्हन हे मॅग्नेशियम, लोह आणि सिलिकेटचे संयुग आहे.  ऑलिव्ह सारख्या हिरव्या रंगामुळे याचे नाव ऑलिव्हन पडले आहे. खगोलशास्त्रात हे एक महत्त्वाचे खनिज आहे. हे खनिज उल्का पाषाणात, चंद्राच्या मातीत, तर धूमकेतूंमध्ये पण सापडत. तसेच याची उपस्थिती बिटा पिक्टोरिस या ताऱ्याच्या भोवतालच्या धूलीकणात सापडली आहे.
मॅग्नेटोमीटर – इलेक्ट्रॉन रिफ्लेक्टोमीटर हे उपकरण मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास आणि सौरवायूचा यावर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करण्यासाठी होते. हे अत्यंत संवेदनशील उपकरण होते.
या मोहिमेच्या अंती जे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले त्यातील काही प्रमुख असे होते- मंगळाच्या पृष्ठभागावर अनेक पापुद्य्रांचे थर आहेत आणि त्यांची जाडी सुमारे १० कि.मी. इतकी आहे. हे असेल तर हवामानाच्या बदलांमुळे शक्य झाले आहेत. मंगळाच्या दोन्ही गोलार्धावर समान प्रमाणात विवरे आहेत ती वाळू खाली गाडली गेली आहेत, तर काही विवरे वरही आली आहेत. मंगळावर अनेकदा वादळे येतात. मंगळावर अनेक ठिकाणी वाहून गेलेल्या पाण्याची स्पष्ट चिन्हे दिसली आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर हेमेटाइट हे खनिज सापडलं आहे. हेमेटाइट हे लोह आणि प्राणवायूचे संयुग आहे (याला आपण गंज म्हणूनही ओळखतो) हे त्याच्या पृष्ठ भागावर वाहत्या पाण्याने आणलं असणार आहे. थर्मल एमिशन स्पेक्ट्रोमीटरने मंगळाच्या जवळ जवळ सर्व पृष्ठभागावर ज्वालामुखीतून आलेल्या दगडमातीची उपस्थिती असल्याचे दाखवले. काही खूप मोठय़ा आकाराचे दगड दिसून आले ज्याचा अर्थ असा निघतो की मंगळावर नुसती ठिसूळ माती नाही तर अनेक दगड पण आहेत. एकूण ही मोहीम फार यशस्वी ठरली आणि पुढच्या मोहिमांसाठी या अनुभवाचा मोठा उपयोग झाला.