मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेयरच्या पाठोपाठ पाठवण्यात आलेल्या मार्स पाथफाइंडरच्या प्रमुख उद्दिष्टात वेगवान, चांगल्या प्रतीचे आणि ते ही किफायतशीर असे यान मंगळावर पाठवणे शक्य आहे आणि अनेक शास्त्रीय उपकरणे सोप्या आणि कमी खर्चात पाठवणे शक्य आहे, हे सिद्ध करणे हा प्रमुख हेतू होता. ही मोहीम व्हायकिंगला लागलेल्या खर्चाच्या एक पंचमांश खर्चात करण्यात आली. तसेच मंगळावर उतरून त्या वरून एक रोव्हर बग्गी फिरवण्याचा हेतूही यात होता. या बग्गीला सोजर्नर नाव देण्यात आलं होतं.
पाथफाइंडरचा साधारण अर्थ वाटाडय़ा आणि सोजर्नरचा अर्थ आगंतुक किंवा तात्पुरता मुक्काम असा होतो. पाथफाइंडरने ४ डिसेंबर १९९६ रोजी पृथ्वीवरून उड्डाण करून ते ४ जुल १९९७ रोजी मंगळावर उतरलं.
या यानाला मंगळावर उतरवण्याकरिता एका नवीन पद्धतीचा विकास करण्यात आला होता. यात सर्वप्रथम एका विशिष्ट पद्धतीचे पॅराशूट वापरण्यात आले होते. जेव्हा अंतराळ यानाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याची गती सुमारे सेकंदाला ६००० मी (किंवा एक सेकंदाला ६ किलोमीटर) इतकी होती. आपल्या ध्वनीची गती सेकंदाला सुमारे ३४० मी असते. मग यानाच्या ऊर्जा कवचाने त्याची गती सेकंदाला सुमारे ३७० मीटर इतकी कमी केली आणि त्याच बरोबर या विशिष्ट पॅराशूटला उघडण्यात आलं. त्याने मग यानाची गती ६८ मी दर सेकंद इतकी कमी केली.  म्हणजे अजून सुद्धा यानाची गती सुमारे २४० कि.मी दर तासाला इतकी होती. या नंतर यानाची गती कमी करण्यासाठी वापरण्यात आलेले ऊर्जा कवच दूर फेकण्यात आलं. आणि जेव्हा यानाची मंगळाच्या पृष्ठभागावर उंची फक्त ३५५ मीटर राहिली तेव्हा त्याच्या भोवती मोठय़ा मोठय़ा फुग्यांच्या कवचाने यानाला वेढण्यात आलं.
आणि या फुग्यांनी वेढलेलं पाथफाइंडर आणि त्याच्या बरोबरीचे सोजर्नर मंगळावर उतरलं तेव्हा त्याचा वेग १४ मीटर दर सेकंदाला होता. एका चेंडूसारखा टप्पा खाऊन यानाने पहिली उंच उडी घेतली त्याची उंचीच मुळी १५.७ मीटर इतकी होती. असे आणखी १५ टप्पे घेऊन शेवटी या फुग्यांनी वेढलेले यान स्थिरावले. आणि गंमत म्हणजे हे सर्व (म्हणजे यानाचा मंगळाच्या वातावरणात प्रवेश आणि त्याचे मंगळावर उतरणं) फक्त ४ मिनिटांत पूर्ण झाले होते.
या फुग्यांनी वेढलेल्या यानाला मंगळावर उतरल्यावर अशी सोय होती की जेव्हा हे स्थिरावेल तेव्हा ते बरोबर स्थितीत म्हणजे पाय खाली आणि डोक वर अशा स्थितीतच स्थिरावेल. मग या फुग्यातील हवा काढून टाकून यानाला बाहेर आणण्यात आलं. जेव्हा यान मंगळावर उतरलं तेव्हा तिथली म्हणजे मंगळावरची स्थानिक वेळ होती सकाळचे २ वाचून ५७ मिनिटे. यानाला सूर्योदय बघण्यास अवकाश होता. यानातील सोलर सेल सूर्याचा प्रकाश वापरून त्यातील बॅटरी चार्ज करणार होता. सूर्योदयाबरोबरच यानाने पहिली चित्रे पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की, एका फुग्यातील हवा संपूर्ण काढली गेलेली नाही आणि त्यामुळे सोजर्नरला धोका होऊ शकतो. मग एक दिवसाच्या प्रयत्नांनंतर या फुग्यातील पूर्ण हवा काढण्यात यश आले. मंगळावर अशा प्रकारे यानाला यशस्वीरीत्या उतरवण्यात तब्बल वीस वर्षांनंतर यश आले होते.
एकदा सोजर्नर रोव्हर कार्यान्वित करता येईल अशी खात्री पटल्यावर मग दुसऱ्या दिवशी त्याला मंगळावर फिरायला मोकळं करण्यात आलं. सोजर्नर रोव्हरने तीन मोठय़ा खडकांना भेट दिली. या खडकांना शास्त्रज्ञानी बान्रेकल बिल, योगी आणि स्कूबी डू अशी इंग्रजी कार्टूनमधल्या पात्रांची नावं दिली. या रोव्हरने या खडकांच्या आणि मंगळावरच्या मातीतल्या घटकांची मोजणी केली तर पाथफाइंडरने रोव्हरच्या मंगळावर फिरण्याच्या प्रत्येक चालीचे छायाचित्र पाठवले.
या रोव्हरची लांबी रूंदी क्रमश ६५ आणि ४८ सें.मी. होती तर याची उंची ३० से.मी. आणि याला फिरण्या करता ६ चाकं होती.  कागदाच्या पुठ्ठय़ाचा ६५ बाय ४८ बाय ३० से.मी असा डबा करून बघा म्हणजे तुम्हाला याच्या आकाराची पूर्ण कल्पना येईल. या छोटय़ाशा रोव्हरला मंगळावर फिरवायचे आहे आणि ते सुद्धा कुठली ही दुर्घटना न होऊ देता. म्हणून त्याची गती सेकंदाला फक्त एक से.मी. इतकीच ठेवण्यात आली होती. मंगळावर त्याने ८३ मंगळ दिवस काम केले. आणि या कालावधीत त्याने फक्त १०० मीटर प्रवास केला होता आणि एकूण १६ जागांवरून त्या जागांच्या रासायनिक गुणधर्माची माहिती आपल्याला पाठवली व तसेच त्याने आपल्याला ५५० छायाचित्र पाठवली.
मंगळाच्या वातावरणातील धुलीकणांच्या चुंबकीय गुणधर्माची माहिती घेण्याकरता वेगवेगळ्या शक्तींचे चुंबक पाठवण्यात आले होते. त्यातील सर्वच शक्तिशाली चुंबकांवर बारीक धुलीकणांचा थर बसला होता. यात मंगळातील मातीत चुंबकीय गुण नाहीत ही नवीन माहिती मिळाली होती.
पाथफाईंडर आणि रोव्हर यांचं आयुष्य एकूण एक आठवडा ते एक महिना आखण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात त्यांनी जवळ जवळ तीन महिने काम केलेलं होतं. त्यांचं काम करणं बंद होण्यामागचं कारण पुन्हा पुन्हा चार्ज केल्यामुळे निकामी झालेल्या बॅटऱ्या हे देण्यात आलं. मंगळावर रात्री सर्व यंत्रणा ठीक रहावी म्हणून त्यांचे तापमान वाढवण्यात येत होतं त्यामुळे बॅटऱ्या सातत्याने डिस्चार्ज होत गेल्याने निकामी झाल्या होत्या. एकूण ही मोहीम यशस्वीच ठरली होती.