आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय जीवशास्त्रज्ञ ओबेद सिद्दीकी यांचे अलिकडेच २६ जुलै, २०१३ रोजी अपघाती निधन झाले. जागतिक वैज्ञानिक वर्तुळात अत्यंत मानाचे समजले जाणाऱ्या लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सदस्य होतेच शिवाय अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचेही ते सदस्य होते. अमेरिकेबाहेरील फारच थोडय़ा शास्त्रज्ञांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बस्ती गावामध्ये ७ जानेवारी १९३२ रोजी जन्मलेलेओबेद सिद्दीकी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले व तेथेच अधिव्याख्यात्याच्या पदावर रुजू झाले. खरे तर त्यांना व्यावसायिक छायाचित्रकार व्हावयाचे होते. परंतु, त्यांच्या काकांच्या आग्रहामुळे त्यांनी विज्ञान शाखेत अध्ययन केले व पुढे छायाचित्रे काढण्याऐवजी निसर्गातील गूढ उकलण्याचे काम त्यांनी केले.
१९५०-६० या दशकाच्या उत्तरार्धात जीवशासा्त्रातील संशोधनास एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते. जनुकशास्त्रातील (जेनेटिक्स) संशोधनामुळे सजीवांचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे मानवाला आकलन व्हायला लागले होते व डी.एन.ए.च्या रचनेविषयीचे संशोधनही खूप चर्चेत होते. रेणवीय जीवशास्त्र (मॉलेक्युलर बायॉलम्ॉजी) ही आधुनिक शाखा उदयास येत होती, अशा काळात सिद्दीकी यांचे शिक्षक व नंतरचे सहकारी रेयायत खान यांनी सिद्दीकी यांचा रेण्वीय जीवशास्त्राकडील ओढा लक्षात घेतला व सिद्दीकी यांना गव्हावरील कीडरोधी जनुकांविषयी संशोधनासाठी इंडियन  अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट, दिल्ली येथे जाण्यास प्रवृत्त केले. तेथेच त्यांनी लावलेले गव्हाचे पीक गारांच्या पावसात नष्ट झाले व पुन्हा संशोधन करण्यासाठी पुढील वर्षांच्या हंगामापर्यंत त्यांना थांबावे लागणार होते. त्याऐवजी त्यांनी अमेरिकेतील ग्लासगो विद्यापीठाचे संशोधक पॉन्टे काव्हरे यांच्याशी पत्र्यवहार केला. पॉन्टे काव्हरे यांनी त्यांना मुलाखतीस बोलावले. त्यानुसार सिद्दीकी १९५८ मध्ये ग्लासगो विद्यापीठात मुलाखतीसाठी गेले. परंतु, मुलाखतीशिवायच त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. त्याविषयी सिद्दीकी यांनी विचारले असता पॉन्टे काव्हरे यांनी सांगितले की, मुलाखतीत यशस्वी होण्याची एवढी खात्री असल्याशिवाय भारतातून अमेरिकेत कोणी आले असते का? त्यांची या तऱ्हेने निवड झाल्यानंतर ते ग्लासगो विद्यापीठाच्या जनुकशास्त्र विभागात दाखल  झाले व पीएच.डी.साठी आपले संशोधन सुरू केले. पीएच.डी. पदवी संपादन करण्यापूर्वीच त्यांना पुढील संशोधनासाठी निवडले गेले होते. परंतु, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करावयाचे होते त्यांनी ग्लासगो विद्यापीठ सोडले व पेनसिल्व्हानिया विद्यापीठात दाखल झाले. जाताना त्यांनी सिद्दीकी यांना सोबत नेले. ते संशोधक म्हणजेच प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ अ‍ॅलन गॅरेन! दोघांनी पुढे सूक्ष्मजीवांच्या जनुकशास्त्राचा (मायक्रोबियल जेनेटिक्स) अभ्यास सुरू केला. या अभ्यासामध्ये ‘पी.ए.बी.ए. (पॅरा अमिनो बेंझोएट) या जनुकाच्या रचनेचा अभ्यास समाविष्ट होता. १९६१ मध्ये सिद्दीकी आणि गॅरेन यांनी या जनुकातील अनपेक्षित बदल किंवा विचित्र बदल (नॉनसेन्स म्युटेशन्स) दाबून टाकणारा घटक शोधला. संशोधनामुळे जनुकीय संकेतामध्ये ‘स्टॉप कोडॉन’ (एखादी प्रक्रिया थांबविण्याविषयीचे संकेत) शोधले व प्रथिन संश्लेषणाची शृंखला कशी बंद होते, याविषयीचे मानवाला आकलन झाले.
पुढे सिद्दीकी यांनी ‘ड्रासोफिला मेलॅनोगास्टर’ असे शास्त्रीय परिभाषेतील नाव असेलल्या फळमाशीवर विपुल संशोधन केले. फळमाशीच्या शरीरातील स्नायू व चेतासंस्था यांच्या कार्याविषयी त्यांनी १९७० च्या दशकात अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले. तापमान बदलास संवेदनक्षम असणारा व रचनेत बदल झाल्यामुळे बनलेला जनुक (म्युटंट) त्यांनी शोधला व या जनुकामुळे फळमाशीच्या शरीरातील स्नायूंचे व चेतातंतूचे कमी बाधित होते, असे त्यांना आढळून आले. सिद्दीकी यांच्या संशोधनामुळेच फळमाशीच्या शरीरातील संदेशांचे कसे वहन होते हे समजण्यास मदत झाली. फळमाशीवरील अशा विपुल व महत्त्वपूर्ण संशोधनामुळे त्यांचे नाव जागतिक स्तरावर अगदी आदराने घेतले जाते. असे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन अमेरिकेत चालू असतानाच त्यांना भारतात जाऊन संशोधन चालू ठेवायची मनीषा स्वस्थ बसू देत नव्हती. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मित्रासोबत चर्चा करताना आपले विचार स्पष्ट केले होते. त्यांच्या मित्रांपैकी एक व होमी भाभांचेही मित्र असलेल प्रख्यात अणुशास्त्रज्ञ झिलाड यांनी भाभांना त्याविषयी पत्र लिहिलेच शिवाय त्याकाळातील दिग्गज जीवशास्त्रज्ञ गॅरेज व पोंटे काव्हरे यांची शिफारस पत्रेही सोबत पाठविली होती. हे पत्र मिळाल्यानंतर कार्यालयीन पद्धतीनुसार भाभांनी सिद्दीकी यांची वैयक्तिक माहिती )बायोडेटा) मागवून घेतला. शिफारस प्रथम व अर्ज व बायोडाटा नंतर. अशा विचित्र पद्धतीने निवड होऊन सिद्दीकी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये दाखल झाले व तेथे रेणवीय जीवशास्त्राचे संशोधन केंद्र उभारले. त्याकाळी अशा प्रकारचे संशोधन करणारे ते देशातील एकमेव केंद्र होते. त्या केंद्राच्या जडणघडणीची जबाबदारी संपूर्णपणे सिद्दीकी यांनी समर्थपणे पेलली व एक जागतिक दर्जाचे रेणवीय जीवशास्त्र संशोधन केंद्र म्हणून नावारूपास आणले. पुढे त्यांनी अशाच प्रकारचे संशोधन केंद्र- टी.आय.एफ.आर. नॅशनल सेंटर फॉर बायॉलम्ॉजिकल सायन्सेस, बंगळुरू येथे उभारले व तेही जगभरात नावारूपास आणले.
 रॉयल सोसायटी (लंडन) चे सदस्यत्व, अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व , थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी, ट्रिस्टीचे सदस्यत्व, दोनवेळा शेरमॅन फेअरचाईल्ड डिस्टिंगविश्ड स्कॉलर, कॅल-टेक व केम्ब्रिजमधील क्लेअर हॉलचे आजीव सदस्यत्व हे विशेष उल्लेखनीय त्यांना मिळाले. त्यांच्या असामान्य वैज्ञानिक कर्तृत्त्वाची योग्य ती दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण किताबांनी सन्मानित केले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली होती. निवासस्थानाजवळच फिरायला गेले असताना शेजारी राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाच्या दुचाकीच्या धडकेमुळे मेंदूस इजा पोहोचली व त्यामुळे त्यांचे निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहताना भारतीय वंशाचे केम्ब्रिजमधील शास्त्रज्ञ व २००९ मधील रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते व्यंकटरामन रामकृष्णन म्हणतात, ‘प्रथम दर्जाचे संशोधन केम्ब्रिज’मध्ये करणे फारसे अवघड नाही. परंतु, त्याच प्रकारचे संशोधन भारतात राहून व तेही संशोधन संस्था उभारत करणे हे खरोखर विशेष आहे. तर दुसरे नोबेल पारितोषिक विजेते इ. बी. लेवीस यांनी त्यांच्या (सिद्दीकी यांच्या) विद्यार्थ्यांपुढे, ‘एखादी व्यक्ती अ‍ॅस्परजिलस, इ.कोलाय व फळमाशी इ. विषयी इतके महत्त्वपूर्ण संशोधन कसे करू शकते?’ असा प्रश्न केला होता. पुढे ते असेही म्हणाले होते, ‘मी तर माझ्या आयुष्यात एकाच जनुकाविषयी कसे बसे संशोधन करू शकतो!’ यापेक्षा चांगली श्रद्धांजली काय असू शकते?