दर आठ तासांनी नववर्ष साजरे होत असेल तर.. हे शक्य आहे. संशोधकांनी ७०० प्रकाशवर्षे दूर असलेला एक बाहय़ग्रह शोधून काढला असून तो त्याच्या मातृताऱ्याभोवती ८.५ तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे दर साडेआठ तासांनी नवीन वर्ष सुरू होते. एखाद्या ग्रहाचा ताऱ्याभोवती फिरण्याचा हा सर्वात कमी कालावधी आहे. हा सर्वात कमी कक्षीय काळ आहे. केप्लर ७८ बी हा ग्रह ताऱ्यापासून खूप जवळ असून त्याची कक्षीय त्रिज्या ताऱ्यापेक्षा तीनपट अधिक आहे.
वैज्ञानिकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की त्याचे पृष्ठीय तापमान २७६० अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक असावे. अशा तप्त वातावरणात ग्रहाचा वरचा थर हा वितळलेला असतो व लाव्हारसाचा महासागरच तिथे तयार होतो, असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी म्हटले आहे. काही दिवसांची कक्षा असलेले ग्रह आम्हाला यापूर्वी सापडले आहेत, पण काही तासांची कक्षा असलेला ग्रह प्रथमच सापडला आहे, पण खचितच असे ग्रह असावेत असे मत एमआयटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक जोश विन यांनी व्यक्त केले आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने उत्कंठावर्धक बाब अशी, की या ग्रहांपासून बाहेर पडलेला प्रकाश टिपण्यात यश आले आहे. केप्लर ७८ बी या बाहय़ग्रहाइतका छोटा ग्रह यापूर्वी कधीच सापडलेला नाही.
या ग्रहापासून आलेल्या प्रकाशाचे विश्लेषण विविध दुर्बिणींनी केले तर ग्रहाच्या पृष्ठभागाची रचना व परावर्तन गुणधर्म यावर अधिक माहिती मिळू शकेल. केप्लर ७८ बी हा त्याच्या मातृताऱ्याच्या इतका जवळ आहे, की त्याचा ताऱ्यावरील गुरुत्वीय प्रभाव मोजणे आवश्यक आहे.