स्वयंपाकघराचे एलपीजीवरील अवलंबित्व ७०-७५ टक्क्य़ांनी कमी करता येऊ शकते. आपल्या स्वयंपाकाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य साधनांची निवड केली व वेगवेगळी स्वयंपाक साधने त्यांच्या मर्यादा व बलस्थाने समजून घेऊन हुशारीने वापरली, तर कोणतीही गैरसोय होत नाही.
घरगुती स्वयंपाकासाठी सबसिडीखाली एलपीजी मिळण्यावर मर्यादा आल्यामुळे बऱ्याच कुटुंबांचे स्वयंपाकाच्या ऊर्जेच्या खर्चाचे गणित बिघडले आहे. पण कुटुंबापेक्षा जास्त पंचाईत झाली आहे, ती सेवाभावी संस्थांची. केवळ देणग्यांवर अवलंबून असणाऱ्या वृद्धाश्रम, अनाथालये, वसतिगृहे, देवस्थाने इ. संस्थांना आता सबसिडी नाही, तर व्यावसायिक किमतीनेच एलपीजी सिलेंडर घ्यावे लागतात.
ज्या ठिकाणी रोज हजार माणसांसाठी स्वयंपाक होतो (मुख्यत: धार्मिक संस्थानांची अन्नछत्रे) अशा ठिकाणी सौर ऊजेचा वापर फायद्याचा ठरतो. पॅराबोलिक कलेक्टर्सच्या मदतीने सूर्याची उष्णता एकत्र करून वाफ तयार केली जाते, आणि वाफेची उष्णता स्वयंपाकासाठी वापरली जाते. अशा यंत्रणा माउंट अबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय किंवा शिर्डीतील साईबाबांचे संस्थान अशा ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र याचा भांडवली खर्च खूप जास्त आहे आणि खूप मोठय़ा प्रमाणावर रोज स्वयंपाक होत असेल, तरच हे फायद्याचे ठरते.
सर्वसाधारणत: सेवाभावी संस्थांमध्ये रोज जेवणाऱ्यांची संख्या काहीशेपेक्षा जास्त असत नाही. स्वयंपाकासाठी ऊर्जासाधनांची निवड करताना काय शिजवायचे आहे, ही बाबही महत्त्वाची ठरते. समजा, आपल्या स्वयंपाकघरात रोज एक व्यावसायिक सिलेंडर (१९ किलो) इतका गॅस लागतो. (साधारण पन्नास ते शंभर माणसांचा स्वयंपाक) आणि चहा-नाश्ता व दोन वेळचे जेवण (पोळी, भाजी, डाळ, भात) असा स्वयंपाक होतो, तर आपण पुढील पर्यायांचा विचार करू शकता.
आपण सौरबंब किंवा मागच्या लेखात उल्लेखिलेला सरपणावर आणि काडीकचऱ्यावर चालणारा आधुनिक कार्यक्षम बंब बसवून घेतलात, तर स्वयंपाकासाठी गरम पाणी मिळेल. या साध्या उपायानेही आपण एलपीजीची काही प्रमाणात बचत करू शकाल.
आपल्या स्वयंपाकघरात रोज साधारण ३० किलो ओला कचरा (चहाचा चोथा, भाज्यांची देठे, फळांची साले, खरकटे अन्न इ.) असणार आहे. यापासून आपल्याला रोज ४ किलो एलपीजी समतुल्य बायोगॅस मिळू शकतो. स्वयंपाकातील एखादे काम बायोगॅसच्या शेगडीवर होईल. अशा संयंत्रासाठी आपल्याला रु. ३ लाख इतका खर्च येईल. यासाठी स्वयंपाकघराजवळ मोकळी जागा साधारण ३ मीटर x ३ मीटर असणे आवश्यक आहे. या संयंत्रात ओला कचरा बारीक करून घालावा लागत असल्याने याला रोज एक युनिट वीजही लागणार आहे.  हे संयंत्र पूर्णत: आपल्या स्वत:च्या ओल्या कचऱ्यावरच चालणार आहे. म्हणजेच आपण भविष्यातही आपल्या स्वयंपाकघरात किमान एक प्रकारचे इंधन खात्रीशीररीत्या आणि मोफत मिळत राहील, याची व्यवस्था करत आहात. खर्चाचा मेळ बसवण्याच्या सेवाभावी संस्थांच्या धडपडीत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या संयंत्रातून आपली वार्षिक बचत सुमारे रु. १ लाख इतकी होईल. याशिवाय ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी येणारा खर्चही वाचेल.
टनावारी ओला कचरा एका ठिकाणी आणून त्यापासून वीज बनवून ती विकण्याचा पर्याय महानगरपालिकांना जास्त फायद्याचा आहे. पण सेवाभावी किंवा व्यावसायिक संस्था म्हणून आपल्या कचऱ्यापासून इतरांचा फायदा करून देण्यापेक्षा स्वत:चीच एक खर्चिक पण अत्यावश्यक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपला कचरा वापरणे जास्त शहाणपणाचे आहे.
बायोगॅस निर्मिती ही जैव यंत्रणा असल्यामुळे ती काळजीपूर्वक चालवावी लागते. यासाठी एक नवा उपक्रम सध्या पुण्यात सुरू झाला आहे. अर्दन लाइफ असे या सेवेचे नाव असून. या मार्फत आपले बायोगॅस संयंत्र चालवून आपल्याला कचरा व्यवस्थापन व खात्रीशीर गॅसपुरवठा अशी दुहेरी सेवा पुरवली जाते.
संस्थांत्मक किंवा व्यावसायिक स्वयंपाकघराच्या दृष्टीने उपयुक्त असे आणखी एक तंत्रज्ञान म्हणजे निर्धूर गॅसिफायर शेगडय़ा. या शेगडय़ांमध्ये लाकडाच्या ढलप्या किंवा बायोमास ब्रिकेट्स इंधन म्हणून वापरल्या जातात. नारळाच्या करवंटय़ांसारखा जैव कचराही आपण या शेगडीत जाळू शकतो. शेगडीमध्ये एक ब्लोअर किंवा पंखा बसवलेला असून, त्याला सिंगल फेज विजेच्या कनेक्शनची गरज आहे. एकदम पंधरा-वीस पोळ्या करता येतील, असा चपाती स्टँडही शेगडीला जोडून घेता येतो.
या शेगडीमध्ये लाकूड किंवा ब्रिकेट्स वुडगॅसमध्ये रूपांतरित होऊन गॅस जळत असल्यामुळे धूर होत नाही व एलपीजीच्या दर्जाचीच ऊर्जा मिळते.  १ किलो एलपीजीचे काम ३ किलो लाकूड किंवा ब्रिकेट्समध्ये होते. बायोमास ब्रिकेट्स साधारण रु. १०,००० प्रति टन किंवा रु. १० प्रति किलो या दराने उपलब्ध आहेत. एक शेगडी दिवसातून चार तास वापरल्यास साधारण १२ किलो ब्रिकेट्स लागतात व ४ किलो एलपीजीची बचत होते, वर्षांला रु. ७०,००० वाचतात. शेगडीचा खर्च (आकार व प्रकारानुसार) साधारण रु. २५,००० ते ५०,००० इतका येतो. आपल्या स्वयंपाकघरात एक एलपीजी सिलिंडर व शेगडी, एक बायोगॅस संयंत्र व शेगडी आणि दोन गॅसिफायर शेगडय़ा (एक चपाती स्टँडसह) असतील, तर सकाळ व दुपारचा चहा व नाश्ता, आणि दुपारचे व संध्याकाळचे चपाती, भाजी, डाळ, भात असे जेवण कोणतीही अडचण न येता माफक इंधनखर्चात शिजवता येईल. बायोगॅसच्या साहाय्याने ४ किलो व गॅसिफायर शेगडय़ांच्या साहाय्याने प्रत्येकी ४ किलो अशी रोज एकूण १२ किलो एलपीजीची बचत होईल. म्हणजेच एक व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दोन दिवसांपेक्षा जास्त जाईल. साधारण रु. ४ लाख इतक्या भांडवली खर्चात आपण आपल्या स्वयंपाकघराचे एलपीजीवरील अवलंबित्व ६० टक्क्य़ांनी कमी करू शकता. हे करत असतानाच आपण आपल्या ओल्या कचऱ्याचीही पर्यावरणपूरक विल्हेवाट लावता. आमच्या अनुभवानुसार कोणत्याही संस्थात्मक स्वयंपाकघराचे एलपीजीवरील अवलंबित्व ७०-७५ टक्क्य़ांनी कमी करता येऊ शकते. आपल्या स्वयंपाकाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य साधनांची निवड केली व वेगवेगळी स्वयंपाक साधने त्यांच्या मर्यादा व बलस्थाने समजून घेऊन हुशारीने वापरली, तर कोणतीही गैरसोय होत नाही, उलट आपण वेगवेगळी इंधने वापरत असल्यामुळे अनिश्चितता कमी होते. साधारण दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्ण भांडवली खर्च वसूल होतो. (समाप्त)