डेका प्रॉडक्ट्स या कंपनीचा डीन काम्रेन काम करता करताच शिकून तयार झालेला डिझायनर होता. त्याच्याकडे कुठलीही पदवी नव्हती. पोर्टेबल डायलॅसिस मशीन, ड्रग् डिफ्युजन पंप च्या विकासकामात याचा मोठा सहभाग होता. याचीच कंपनी जिना चढू शकणाऱ्या सहा चाकी व्हीलचेअर्सचे उत्पादन करत होती. त्याच व्हीलचेअर्सवरून पर्यावरण स्नेही दोन चाकी ट्रान्सपोर्टरची कल्पना त्याला सुचली. कंपनीतील अभियंत्यांची टीम या प्रकल्पावर काम करू लागली. अ‍ॅपलचे स्टीव्ह जॉब्स व अमेझॉनचे जेफ बेझोज या उद्योजकांनी ही कल्पना उचलून धरली. काम्रेनच्या मते या शतकाचे हे महत्त्वाचे वाहन ठरणार होते.
सेगवे स्कूटरमध्ये (सेगवेला स्कूटर असे म्हणणे काम्रेनला अजिबात आवडत नव्हते!) लहान मुलांच्या सायकलीत असलेल्या चाकासारखे दोन चाकं असून या चाकांच्या मधल्याजागेत उभे राहण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर उभे राहून हँडलचे नियंत्रण करत स्कूटरला वेगाने पळवता येते. या ट्रान्सपोर्टरच्या पेटंटमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यात दहा मायक्रोप्रोसेसर्स, कित्येक गायरोस्कोप्स, बॅटरी, मायक्रोचिप्स, इत्यादींचा समावेश आहे. ही स्कूटर ताशी २० किमी वेगाने धावू शकते. शरीर ताठ ठेऊन गाडी चालवताना शरीर थोडेसे मागे पुढे केल्यास वेग नियंत्रित करता येते. पेटंटधारकाच्या मते ही गाडी माणसाच्या हालचालींची हुबेहूब नक्कल करू शकते व त्यासाठी गायरोस्कोप्स कानासारखे , यातील संगणक मानवी मेंदूसारखे व चाके पायासारखे काम करू शकतात.
अशा प्रकारचे वाहन भर रस्त्यावर आणण्यासाठी भरपूर अडथळे आहेत. वेग कमी असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पादचारी मार्गावर चालविण्यास अनुमती दिल्यास पादचारऱ्यांना अडथळा येऊ शकतो. याच्यासाठी स्वतंत्र ट्रॅक फार खíचक होणार. या सगळ्या अडचणीमुळे या  ट्रान्सपोर्टरचा वापर एअरपोर्ट, मिलिटरी डेपो, इत्यादी प्रकारच्या बंदिस्त जागेतील सुरक्षा रक्षकांच्या टेहळणीसाठी वपरले जात आहे. गोल्फ क्लबच्या मदानावरील वाहकासाठी हे ट्रान्सपोर्टर वरदान ठरत आहे.