साधारण १६.१० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरणाऱ्या मांसभक्षक छोटय़ा डायनॉसॉरचे जीवाश्म सांगाडे वैज्ञानिकांना सापडले आहेत. ज्युरासिक काळातील हा अखेरचा कालखंड मानला जातो.
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ जेम्स क्लार्क यांना वायव्य चीनमध्ये हे डायनॉसॉरचे जीवाश्म सापडले आहेत. क्लार्क व त्यांचे विद्यार्थी जोना चॉइनर तसेच आंतरराष्ट्रीय संशोधकांचा चमू यांना डायनॉसॉरच्या जातीचे हे जीवाश्म चीनमधील शिनजियांग येथे २००६ मध्ये सापडले होते. त्याबाबतचा शोधनिबंध हा सिस्टीमॅटिक पॅलेन्टॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे, क्लार्क व चॉइनर यांनी या डायनॉसॉरची कवटी व इतर अवशेष सांगाडय़ाच्या रूपात सापडल्याचे म्हटले आहे. थेरोपॉडची ही नवीन जात तीन फूट लांब व तीन पौंड वजनाची होती. त्याची कवटी खडकात गाडली गेली होती हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले व वरच्या भागात पायाचा थोडा भाग दिसत होता. या डायनॉसॉरचे नामकरण ‘ऑरन झाओई’ असे करण्यात आले आहे.  १६.१० कोटी वर्षांपूर्वी तो पृथ्वीवर वास्तव्यास होता. त्याचे छोटे व संख्येने कमी असलेले दात बघता तो सरडे किंवा सस्तन प्राणी किंवा सुसरी यांना आपले भक्ष्य बनवित असावा असे दिसते. क्लार्क व चीनच्या विज्ञान अकादमीचे डॉ. झू झिंग यांनी वुकेवान भागात हा पाचवा थेरोपॉड शोधून काढला आहे.