महाराष्ट्रातील खेडेगावात भाकरी हेच मुख्य अन्न आहे. पश्चिम आणि उत्तर भारतात; गव्हाची रोटी खातात. भाकरी, रोटी भाजण्यासाठी तापमान ३५० डिग्री सेल्सिअस इतके लागते आणि हे तापमान सूर्यकिरण केंद्रित करूनच मिळते. आतापर्यंत निर्माण झालेल्या केंद्रित कुकरच्या रचना व त्यातील त्रुटी याचा अभ्यास करून एक सुधारित मॉडेल बनविण्यात आले आहे. त्याची रचना अशी आहे. सूर्यकिरण केंद्रित करण्यासाठी मोठा अंतर्गोल आरसा लागतो. हा अंतर्गोल आकार अॅस्बेसटॉस-सिमेंटमधून बनविलेल्या १३५० मिलिमीटर व्यासाच्या बशीला दिला असतो. या बशीवर ५x५ सेंटिमीटर आकाराचे पाचशे लहान आरशांचे तुकडे चिकटविले असतात. या मोठय़ा अंतर्गोल आरश्यांवर (केंद्रक) पडणारे सूर्यकिरण साधारण १०० मिमी. व्यासाच्या वर्तुळात एकत्रित होतात व तेथे तापमान ४५० डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते आणि कागद, लाकूड दहा-वीस सेकंदात पेटतात. एका आसावर फिरू शकणारा हा मोठा आरसा ट्रॉलीवर ठेवलेला असतो आणि तो सूर्य कलेल तसा वळविण्यासाठी पुलीने तार ओढण्याची सोय केलेली असते. त्यामुळे आरसा सूर्याकडे सहज वळविता येतो आणि लोखंडी चौकटीत ठेवलेल्या डब्यावर अथवा तव्यावर सूर्यकिरण केंद्रित करता येतात. यासाठी सतत उन्हात उभे राहून ठराविक काळानंतर तबकडी पुलीने तार ओढून फिरवावी लागते. हे टाळण्यासाठी सूर्याचा माग काढण्याची यंत्रणा अत्यावश्यक आहे. यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा लावता येते. या यंत्रणेमध्ये पडणाऱ्या सूर्यकिरणांचा माग घेऊन, सोबत जोडलेले फोटोव्होल्टाईक सौर पॅनलमध्ये निर्माण होणाऱ्या विजेच्या साहाय्याने मोटरद्वारे संपूर्ण तबकडी फिरेल अशी यंत्रणा कार्यान्वित होते. संपूर्ण तबकडी वजनाने हलकी व धातूच्या सांगाडय़ावर बसवण्यात आलेली असल्याने, चेन, एक लहानशी डी.सी. मोटर  काही छोटे गियर्स; इलेक्ट्रॉनिक सर्किट; छोटा सोलर बॅटरी चार्जर व रीचार्जेबल सोलर बॅटरी या द्वारे हव्या त्या कोनात फिरवता येऊ शकते व सूर्यकिरणांचे परावर्तन भांडय़ावर सतत होईल याची काळजी घेतली जाते. ऋतुमानाप्रमाणे सूर्याची मार्गभ्रमण कक्षा बदलत असते. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करीत असतो. त्यामुळे दररोज सकाळी एकदा तबकडी व्यवस्थित पूर्व दिशेला फिरवून ठेवली की नंतर स्वयंचलित पद्धतीने सूर्यास्तापर्यंत सूर्यकिरणांचा माग घेत ती तबकडी फिरते व जास्तीत जास्त उष्णता संकलित होईल याची काळजी घेते. या प्रकारच्या कुकरमुळे ४५० ते ६५० अंश सेल्सिअस तापमान गाठता येते. ही यंत्रणा न लावल्यास खर्च बराचसा कमी येतो. तबकडी पुलीवरील तार ओढून जरी फिरविली तरी भागते. फक्त त्यासाठी सतत उन्हात उभे राहून काही ठराविक काळानंतर तबकडी फिरवावी लागते. अन्न शिजविण्यासाठी एका लोखंडी चौकटीत एक डबा अथवा तवा ठेवलेला असतो. डब्याला बाहेरून काळा रंग लावलेला असतो. त्यामुळे तो उष्णता शोशून घेतो. या डब्यावर अथवा तव्यावर सूर्यकिरण केंद्रित करता येतात. या डब्याला वारा लागू नये म्हणून चारी बाजूला आवरण असते डबा काढून त्याच ठिकाणी तवा अथवा कडई ठेवण्याची सोय असते. हा कुकर सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरता येतो. सहा माणसांच्या कुटुंबासाठी डाळ, भात-भाजी एकाच वेळी ५० मिनिटात होतात. भाकरी, पोळी होते तसेच पदार्थ उकळता भाजता व तळता येतात. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हा कुकर ९-१० महिने वापरता येतो. या कुकरमध्ये ९०० वॉट एवढी ऊर्जा वापरली जाते. केंद्रित किरणांच्या कुकरच्या उपयोगातील एक अडचण अशी- सूर्य कलेल तसा आरसा १२-१५ मिनिटांनी फिरवावा लागतो.    
– अनंत ताम्हणे
(अभियंता व ऊर्जा अभ्यासक)

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
April 2024 Bank Holidays List in Marathi
April 2024 Bank Holidays: ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ ८ दिवस महाराष्ट्रात बँक असणार बंद; पाहा सुट्ट्यांचा तक्ता
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?