खगोलशास्त्राच्या संदर्भात आपण असे म्हणतो, की इथे शास्त्रज्ञ फक्त निरीक्षक असतो. तो प्रयोग करू शकत नाही. जे निसर्ग देतो तेच तो बघू शकतो. त्यात इतर शास्त्रांसारखे त्याला बदल करता येत नाहीत. याला काही फार थोडे अपवाद म्हणजे उल्का पाषाण. ज्यांची निर्मिती सूर्यमालेच्या निर्मितीबरोबर झाली. चंद्रावरून आणलेले तिथल्या मातीचे नमुने आणि इतर काही ग्रहांवर उतरलेल्या अंतराळयानांनी तिथल्या परिस्थितीची पाठवलेली माहिती, याव्यतिरिक्त सूर्यावरून येणारे विद्युतभारित कण म्हणजे सौरवायू. या सर्व मिळालेल्या माहितीची टक्केवारी इतर निरीक्षणांच्या म्हणजेच विद्युतचुंबकीय लहरींच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या तुलनेत नगण्य आहे आणि तरीही काही वेळा छोटी माहितीसुद्धा महत्त्वाची ठरते आणि अशीच माहिती गेली ३५ वर्षे व्हॉयेजर एक आणि दोन ही याने आपल्याला पाठवत होती आणि आज व्हॉयेजर- १ आपल्या प्रवासाच्या अशा टप्प्यावर पोहोचले आहे की ते अंतराळात आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करत आहे. म्हणजे ते आता सूर्याच्या गुरुत्वीय प्रभावातून बाहेर पडत आहे. इतकेच नव्हेतर ते आपल्याबरोबर पृथ्वीबद्दलची माहितीही घेऊन जात आहेत.
व्हॉयेजर- २ ने २० ऑगस्ट  तर व्हॉयेजर-१ ने ५ सप्टेंबर १९७७ रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले. पण व्हॉयेजर-१ ची गती जास्त आणि कक्षा थोडी असल्यामुळे ते व्हॉयेजर-२च्या पुढे गेले आणि आज ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर ही याने पृथ्वीच्या संपर्कात आहेत. या दोन्ही यानांचे वजन ७२२ किलोग्रॅम आहे.
या दोन्ही यानांच्या उद्दिष्टात वायूच्या मोठय़ा ग्रहांना आणि त्यांच्या उपग्रहांना भेट देऊन त्यांच्याबद्दलची माहिती पाठवण्याचे होते आणि तसेच या यानांनी आपल्याला गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांबद्दल मोठय़ा प्रमाणात नवीन माहिती पाठवली. पण त्यानंतर त्यांना सूर्यापासून दूर आंतरतारकीय अवकाशाच्या दिशेने वळवण्यात आले.
नुकतेच नासाने जाहीर केले की गेल्या वर्षी व्हॉयेजर-१ हिलिओस्फियरमधूनसुद्धा बाहेर पडले आहे आणि त्याचा प्रवास आता आंतरतारकीय अवकाशात सुरू झाला आहे. सूर्याची एक सीमा आहे. सूर्यातून पडलेले सौरवायू एका ठराविक अंतरावर पोचल्यावर त्यांना आंतरतारकीय वायू रोखतो. सौरवायू हा सर्व दिशांना फेकला जात असल्यामुळे याला हिलिओस्फियर म्हणतात तर सीमेला हिलियोपॉज म्हणतात आणि तिथली परिस्थिती कशी आहे, त्या भागाचे गुणधर्म काय आहेत याची माहिती व्हॉयेजरने पाठवली आहे. सुमारे २००९ ते २०१२ पर्यंत व्हॉयेजर-१ ला वैश्विक किरणात वाढ होत असल्याचे जाणवले. या कालावधीत ही वाढ २५ टक्क्यांनी जास्त झाली होती तर मे २०१२ मध्ये ही वाढ फक्त एकाच महिन्यात ९ टक्क्यांनी जास्त होती. याचा अर्थ शास्त्रज्ञांनी आता व्हॉयेजर सूर्यमालेची सीमा सोडत आहे असा काढला व २५ ऑगस्ट २०१२रोजी या यानाने सूर्यमालेची सीमा ओलांडली हे जाहीर केले. इतर शास्त्रीय उपकरणांबरोबर ही दोन्ही याने आपल्याबरोबर पृथ्वीवरून एक संदेशाची तबकडी घेऊन जात आहेत. ही तबकडी सोन्याची बनवलेली आहे. कल्पना अशी आहे की जर समजा या यानांना कुठल्या एखाद्या प्रगत जिवांनी पकडले तर त्यांना पृथ्वीबद्दलची माहिती मिळावी.
जुन्या काळात एखाद्या बेटावर अडकलेले नाविक आपल्या जागेची माहिती एका बाटलीत सीलबंद करून समुद्रात सोडत असत. कल्पना अशी की जर कुणाला ही बाटली सापडली तर त्यांना आपल्याबद्दल माहिती मिळावी, ज्यामुळे ते आपल्याशी संपर्क साधू शकतील. याच भावनेने ही तबकडी पाठवण्यात आली आहे. या तबकडीवर पृथ्वी आणि आपल्याबद्दलच्या माहितीचा मोठा साठा आहे. ही तबकडी प्रसिद्ध शास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारक कार्ल सागान यांच्या नेतृत्वाखाली एका समितीने तयार केली होती. यावर एकूण पृथ्वीवरची ११६ चित्रे आहेत, ज्यात शास्त्रीय माहिती- सूर्याच्या तुलनेत पृथ्वीचे स्थान, गणितीय रचना, डीएनएची रचना, त्यांचा तुलनेत आकार, तसेच वेगवेगळय़ा प्रकारचे नसíगक ध्वनी- लाटांचे, वायूचे, प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आणि व्हेल माशाचे आवाज आहेत. याशिवाय वेगवेगळय़ा देशांतील संगीतकारांच्या रचना आहेत. अनेक आवाजांबरोबर या तबकडीवर चुंबनाचा आवाज पण घालण्यात आला होता. ज्याचे रेकॉíडंग सर्वात अवघड ठरले होते. जेव्हा अनेक प्रयत्न करूनसुद्धा संगीत दिग्दर्शक जिमी आयोवीन यांना कुठलाच आवाज पसंत पडला नाही तेव्हा त्यांनी स्वत:च्या बाहूवर चुंबनाचा आवाज केला, पण तोही कुणाला आवडला नाही आणि मग या तबकडीचे प्रोडय़ुसर टिमोथी फेरीस यांनी हळूच कार्ल सगान यांच्या पत्नी एँन ड्रएन यांच्या गालाचे चुंबन घेतले तेव्हा रेकॉìडग चालू होते आणि हा आवाज सर्वाना ‘परफेक्ट’ वाटला. यावर स्त्री-पुरुषाचे नसíगक रूपातील चित्र टाकण्याचे या समितीने ठरवले होते. हा निर्णय फार वादग्रस्त ठराला होता. शेवटी त्याचे रेखांकृत चित्र टाकण्यात आहे. यावर त्या वेळचेअमेरिकेचे राष्ट्रपती जिमी कार्टर आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष कुर्ट वॉल्डाहेम यांचे संदेश आहेत. याचबरोबर जगातील जुन्या आणि नवीन अशा ५५ भाषांतून शुभसंदेश पाठवण्यात आले आहेत. यात दक्षिण आशियातील १२ भाषांचा समावेश आहे. त्या बंगाली, गुजराती, िहदी, कन्नड, मराठी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी आणि तेलुगू या भारतीय भाषांमधून संदेश आहेत. मराठीतून ‘‘नमस्कार! ह्या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या जन्मी धन्य व्हा.’’ तर िहदीतून ‘‘धरती के वासियों की ओर से नमस्कार’’ असे संदेश आहेत. शास्त्रीय संगीतात बेथोवन, मोझार्टसारख्या दिग्गजांच्या रचनांबरोबर केसरबाई केरकर यांच्या आवाजात भरवी रागात ‘जात कहां हो..’  ही साडेतीन मिनिटांची रचना पण आहे. केसरबाईंनी अनेक गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. त्या अब्दुल करीम खाँ, रामकृष्णबुवा वझे आणि उस्ताद अल्लादिया खाँ हे प्रमुख आहेत. तुम्हाला हे आवाज नासाच्या या संकेतस्थळावर ऐकायला मिळतील http://voyager.jpl.nasa.gov/spacecraft/sounds.html
व्हॉयेजर हे सेकंदाला १७ किलोमीटर म्हणजेच तासाला ६१ हजार किलोमीटर या वेगाने प्रवास करत आहे.  आणि ते आपल्यापासून १८७कोटी किलोमीटर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या १२५ पट आहे. या अंतरावरून रेडिओ संदेश आपल्यापर्यंत येण्यास सुमारे १७ तास आणि २० मिनिटे लागतात. नासाच्या शास्त्रज्ञांना खात्री आहे की व्हॉयेजरचा विद्युतपुरवठा त्याला अजून ७ वर्षे काम करण्यास म्हणजे २०२० साला पर्यंत- निरीक्षणांसाठी आणि पृथ्वीवर संदेश पाठवण्यास पुरेल. पण त्यानंतर त्याची एक-एक उपकरणे बंद करण्यात येतील आणि यानाशी पृथ्वीचा शेवटचा संपर्क २०२५ साली होईल.
paranjpye.arvind@gmail.com