१९७० च्या दशकाच्या सुरूवातीला रशियाच्या मंगळ मोहिमांना मिळालेल्या यशानंतर अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेचे असेच प्रयत्न चालू होते. नासाने १९६२ ते १९७३ या कालावधीत मंगळ, शुक्र आणि बुध या ग्रहांच्या दिशेने १० कृत्रिम उपग्रह पाठवले होते, त्यातील सात मोहिमा यशस्वी ठरल्या होत्या.
मरिनर मोहिमेच्या अंतर्गत असलेले सर्व कृत्रिम उपग्रह षटकोनी किंवा अष्टकोनी आकाराचे होते. त्यांना ‘बस’ असे म्हणत. या बसमध्ये मोहिमेशी निगडित सर्व यंत्रणा म्हणजे दळणवळणासाठीचे अँटेना, कॅमेरा, विद्युत पुरवठय़ासाठी लागणारे सेल आणि सौर पट्टिका (सोलर पॅनेल) इत्यादी ठेवलेले असत.  मरिनर-१, २ आणि ५ यांना शुक्राच्या दिशेने पाठवण्यात आले होते, तर मरिनर -10 ला शुक्र आणि बुध ग्रहांच्या दिशेने पाठवण्यात आले. याशिवाय मरिनर-११ आणि १२ यानांना गुरू आणि शनीकडे पाठवण्याचे ठरले होते. पण त्यांना अर्थसंकल्पाचा फटका बसला.  नंतर हा कार्यक्रम ‘व्हॉयेजर’ नावाने परत सुरू करण्यात आला. इतर मरिनर याने मात्र मंगळाच्या दिशेने पाठवण्यात आली होती.
मरिनर-३ ची मोहीम यंत्रणा नादुरुस्त झाल्याने यशस्वी झाली नाही. मरिनर -४ ने मंगळापासून १४ जुल १९६५ मध्ये ‘फ्लाय बाय’ केले.आज आपण किती सहजरीत्या एखादी व्हिडियो क्लिप डाऊनलोड करतो; पण जेव्हा मरिनर -४ ने मंगळाजवळून फ्लायबाय केलं तेव्हा सर्वप्रथम त्याने घेतलेली मंगळाची छायाचित्रे एका टेपवर रेकॉर्ड करण्यात आली. आणि मग ती पृथ्वीकडे पाठवण्यात आली. या छायाचित्रात अशनीच्या माऱ्यामुळे मंगळावर तयार झालेल्या विवराचे पण एक छायाचित्र होते.  मरिनर -४ ने पाठवलेल्या माहितीत एक महत्त्वाची माहिती ही पण  होती, की मंगळाच्या पृष्ठभागावर मंगळाच्या वातावरणाचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या वातावरणाच्या दाबाच्या फक्त १ टक्का आहे. याच बरोबर मंगळावर दिवसा म्हणजे मंगळाचा जो भाग सूर्याच्या दिशेने आहे तो, त्यावर दिवसा तापमान उणे १०० अंश सेल्सियस होतं आणि मंगळावर चुंबकीय क्षेत्र नाही. या माहितीमुळे पुढच्या सर्व योजनांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली. तसेच या परिस्थितीत इथे सजीवांचे वास्तव्यसुद्धा अवघड दिसू लागले.
मरिनर – ६ आणि ७, यांना १९६९ च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाठवण्यात आले होते. त्यांनी मंगळाच्या विषुववृत्त आणि दक्षिण ध्रुवीय भागावरून प्रवास केला. मरिनर – ६ ने  ३१ जुल ६९ रोजी मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे ३४३० कि.मी. उंचीवरून प्रवास केला. मरिनर- ७ चा पृथ्वीशी संपर्क मंगळाजवळ पोचायला एक आठवडा असताना तुटला होता पण नंतर नासाच्या अभियंत्यांनी मरिनर-७ शी परत संपर्क करण्यात यश मिळवले.  आणि मग मरिनर- ६  ने पाठवलेली माहिती वापरून मरिनर- ७  च्या संगणाकामधील आज्ञावलीमध्ये काही परिवर्तन करून त्याला मार्गस्थ करण्यात आले.  
गंमत म्हणजे योगायोग असा झाला, की ही दोन्ही याने मंगळाच्या जास्त विवरे असलेल्या भागावरून गेली आणि आज सर्वाच्या परिचयाची मंगळावरची दोन ठिकाणे – मंगळाच्या विषुववृत्तावरचा मोठय़ा दऱ्यांचा भाग आणि त्याच्या उत्तर गोलार्धातील ज्वालामुखी पठार या दोन्हींचे चित्रण या यानांच्या हातून निसटले. हाच तो भाग होता ज्याला एके काळी पर्सव्हिल लॉवेलने मंगळावरील मानवापेक्षा प्रगत सजीवांनी तयार केलेलं कॅनॉल मानलं होतं. मरिनर -७ च्या संदेशवहनाच्या यंत्रणेत जरी बिघाड झाला असला तरी नंतर त्याने मरिनर- ६ पेक्षाही जास्त माहिती पाठवली. या दोन्ही यानांनी मंगळाच्या पृष्ठभागाचे जवळजवळ २० टक्के चित्रण केले होते. या पुढच्या लॉंच िवडोत म्हणजे १९७१ मध्ये मरिनर- ८ आणि ९ या मोहिमा होत्या. त्यातील मरिनर -८ मध्ये उड्डाणाच्या वेळीच बिघाड होऊन ती रद्द झाली. मरिनर -९ चे उड्डाण ३० मे १९७१ रोजी झाले आणि ते जेव्हा १४ नोव्हेंबर रोजी मंगळाजवळ पोचले तेव्हा त्याने एक आश्चर्य चकित बातमी आपल्याला पाठवली. अख्ख्या मंगळावर एक प्रचंड मोठं वादळं आलेलं होतं. आणि या वादळाच्या धुळीखाली मंगळाची पृष्ठभूमी पूर्णपणे झाकली गेली होती. मंगळाचे चित्रीकरण पृथ्वीवरून संदेश देऊन थांबवण्यात आले आणि जानेवारी ७२ च्या दुसऱ्या आठवडय़ानंतर जेव्हा हे वादळ शमलं तेव्हा चित्रीकरण पुन्हा सुरू करण्यात आलं.  हे यान मंगळाच्या कक्षेत ३४९ दिवस आपल्याला मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्रं पाठवत होते. एकूण ७३२९ छायाचित्रातून त्याने संपूर्ण पृष्ठभागाचे चित्रण केले.  या छायाचित्रातून आपल्याला मंगळाच्या आता वाळलेल्या नद्यांची, विवरांची आणि सध्या सुप्त असलेल्या मोठय़ा ज्वालामुखीची माहिती मिळाली.
मरिनर-९ ला २७ ऑक्टोबर १९७२ रोजी बंद करण्यात आलं. सध्या हे यान मंगळाच्या भोवती परिक्रमा करत आहे. आणि २०२२ मध्ये कधीतरी हे मंगळाच्या वातावरणात पडेल. पण त्यापूर्वी मरिनर-९ ने पाठवलेली ही माहिती पुढच्या म्हणजे व्हायकिंग मोहिमेस खूप उपयोगी पडली.