आकाश, तारे, ग्रह याबद्दल केवळ लहानग्यांनाचा नाही तर मोठय़ांनाही आकर्षण असते. केवळ कोजागरी पौर्णिमेलाच नाही तर इतर वेळीदेखील चांदण्यांच्या प्रकाशात गप्पा मारण्याचा मोह जसा अनेकांना होतो तसेच तारे बघण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आकाशातील ताऱ्यांची बदलती जागा, त्यांची प्रकाशमानता याबाबत अनेकांना आकर्षण असते. ताऱ्यांवरून रूढ असणारी ‘दिवसा तारे दिसणे’ सारखी म्हणदेखील आपल्याला माहीत आहे. पण केवळ रात्रीच नाही तर दिवसादेखील ताऱ्यांचा अभ्यास करता येऊ शकतो ही कल्पनाच अनेकांना नसते.
  दिवसा तारे बघण्याची संधी पुणेकर मात्र मागील अनेक वर्षांपासून गमावून बसले होते. पण मागील दोन वर्षांपासून असे तारे बघण्यास इच्छुक असणाऱ्या आणि अभ्यासूंसाठी, विशेषत: विद्याथ्र्यीवर्गासाठी दिवसा तारे बघण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे.  टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल येथे १९५४ मध्ये सुरू झालेल्या तारांगणातील यंत्रात काही वर्षांपूर्वी बिघाड झाला होता, आता हे तारांगण पुन्हा सुरू झाले आहे.
इ. स. १९५४ मध्ये नानावाडय़ामधून ‘न्यू इंग्लिश स्कूल’ चे स्थलांतर टिळक रस्त्यावर झाले. त्यावेळी आपल्या देशात तारांगण (प्लॅनेटोरियम) नव्हतेच. तेव्हा शाळेच्या गच्चीवर यासाठी गोल घुमट बांधून जिज्ञासूंना तसेच विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षणाचा आनंद घेण्याबरोबरच अभ्यास करता यावा असे ठरले. आपले आकाश घुमटासारखे आहे, म्हणून घुमटाकार वास्तूमध्ये हे तारांगण साकारले आहे
 आकाश आपल्याला बाराही महिने पाहता येत नाही. पाऊस, धुके, ढग आकाशात आले की ताऱ्यांचा अभ्यास कसा करणार? कोणत्याही वेळी आकाश पाहता यावे अशा दुर्दम्य इच्छेमधून तयार झालेले हे यंत्र तयार करण्यात आले आहे. युरोप खंडातील बेभरवशाच्या हवामानासाठी तर हे यंत्र वरदानच ठरले आहे. हे यंत्र न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जेव्हा बसविण्यात आले, तेव्हा ५५ हजार रुपये किंमत असलेले यंत्र आता लाखांच्या घरामध्ये पोहोचले आहे.
न्यू इंग्लिश स्कूलमधील हे तारांगण आशिया खंडातील पहिले तारांगण म्हणून ओळखले जाते. या शाळेतील तारांगणाचे यंत्र हे फिलाडेल्फिया (अमेरिका) येथील स्पीट्झ लॅबोरेटरीने तयार केलेले असून १९५४ पासून हे यंत्र या शाळेमध्ये कार्यान्वित होते. मध्यंतरी अनेक वर्ष ते बंद होते. पण २००८ साली आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष साजरे करण्यात आले, या निमित्ताने या यंत्राची दुरुस्ती कराण्याचे ठरले. त्यानुसार खगोलशास्त्रज्ञ पराग महाजनी, प्रा. एस. जी. कुलकर्णी, न्यू इंग्लिश स्कूलमधील गणित शिक्षक विनायक रामदासी आदींनी या यंत्राच्या दुरुस्तीसाठी, सुटे भाग मिळविण्यासाठी आणि मुळात ते स्वस्तात मिळावेत यासाठी भरपूर खटपट केली आणि १८ सप्टेंबर २०१० रोजी पहिला कार्यक्रम शाळेतील तारांगणात करण्यात आला. या सगळ्यासाठी तारांगण समितीचे अध्यक्ष दिलीप कोटीभास्कर यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनदेखील मिळाले. या यंत्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सर्व सुटे भाग पुण्यातच तयार करण्यात आले. या दुरुस्तीसाठी सुटय़ा भागांच्या बरोबरच यंत्राची माहिती देणाऱ्या कागदपत्रांचीदेखील आवश्यकता होती. या सगळ्यासाठीदेखील अनेक हात पुढे आले आणि सर्वाच्या सहकार्याने या तारांगणाचा फायदा आजची पिढी घेऊ शकते आहे. फग्र्युसन महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील सहायक हरिभाऊ पवार यांनी या यंत्राच्या दुरुस्तीमध्ये मुख्य सहभाग घेतला. या सगळ्यांच्या बरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील यामध्ये उत्साह दाखवला आणि मदतीलादेखील ते पुढे आले. दुरुस्तीच्या काळात तारांगणाचे पहिले प्रमुख प्रा. गिझरे,  प्रा. मोहन पाटील, डॉ. विजय भटकर आदींनी वारंवार भेट दिली आणि मार्गदर्शनदेखील केले.
मागील दोन वर्षांमध्ये १५ हजार विद्यार्थ्यांनी तारांगणास भेट दिली असून आजपर्यंत सुमारे दोनशे कार्यक्रम सादर झाले आहेत. या तारांगणाद्वारे जगातील कोणत्याही देशातील व शहरातील आकाश आपल्याला पाहता येते.
मागील आणि पुढील कित्येक वर्षांचे आकाशदेखील आपण या यंत्राच्या मदतीने बघू शकतो. या यंत्राचा मुख्य भाग
म्हणजे बारा बाजू आणि प्रत्येक बाजू पंचकोनी अशी असलेली बंद पेटीच आहे. त्यावर सुमारे सहा हजार लहान-मोठी छिद्रे आहेत. काही छिद्रे इतकी लहान आहेत की, सहज दिसत नाहीत. आत एक प्रखर दिवा असतो. तो लावला की पेटीच्या छिद्रातून बाहेर पडणारी प्रकाश किरणे घुमटाच्या आतील सर्व भागावर पडतात आणि आपल्याला खऱ्याखुऱ्या आकाशाचा भास होतो. जे तारे लहान आहेत, त्यांच्यासाठी लहान तर मोठय़ा ताऱ्यांसाठी मोठी छिद्रे तयार केली आहेत. रात्रीच्या वेळी एखाद्या टेकडीवरून, गच्चीवरून दुर्बीणीच्या मदतीने तारे, तारकासमूह, नक्षत्र यांचा अभ्यास करताना तेही दिवसा बघण्याचा आनंद या तारांगणाच्या मदतीने घेता येऊ शकेल. सुमारे ४०-४५ मिनिटांचा हा तारांगणाचा कार्यक्रम बघताना आणि विनायक रामदासी यांच्याकडून मिळणारी माहिती घेताना ताऱ्यांची आवड असणारी मोठी मंडळी तर अचंबित होतातच पण विद्यार्थ्यांनादेखील पुस्तकाच्या बाहेर अशा रीतीने दिसणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करताना आनंद झाल्याशिवाय राहात नाही.
हे तारांगण अत्यल्प शुल्कामध्ये बघण्याचा आनंद घेता येऊ शकतो. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या माहितीचा खजिना पोहचावा अशी तारांगण समितीच्या सर्वाचीच इच्छा आहे, ज्या शाळांना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन हे तारांगण बघण्याची इच्छा आहे, त्या शाळा (०२०) ६५६०३२३५ या क्रमांकावर अथवा ramdasivv@gmail.com या ईमेलद्वारे संपर्क करू शकतात.
तारांगणाचे फायदे
*    आकाश निरीक्षण करताना आकाशातील बदलानुसार आणि गतीनुसार निरीक्षणकर्त्यांला   हालचाली कराव्या लागतात. पण इथले आकाश हवा तेवढा वेळ स्थिर ठेवता येते किंवा  पाहिजे  तेव्हा त्याला गती देता येते.
*    येथे बसल्या-बसल्या जगातील कोणत्याही देशातील व शहरातील आकाश आपण पाहू शकतो.
*    ढग, धुके यांचा कोणताही परिणाम होत नसल्यामुळे वर्षभर हे आकाश आपल्याला पाहता येते.
*    कित्येक वर्षांपूर्वीचे किंवा वर्षांनंतरचे आकाशदेखील आपल्याला येथे बघता येते.
*    यंत्राशिवाय आकाश बघायचे असेल तर रात्र होण्याची वाट बघावी लागते, पण या यंत्राद्वारे दिवसादेखील आकाश बघणे शक्य आहे.