पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षे दूर अर्थात कोटय़वधी कि.मी. अंतरावर घडणाऱ्या बदलांमध्ये ताऱ्यांची निर्मिती, त्यांच्यात घडणारे स्फोट आणि तारे नष्ट कसे होतात, म्हणजेच ताऱ्यांच्या जन्ममृत्यूची प्रक्रिया संशोधकांना ज्ञात झालेली आहे. हे सगळे हबल दुर्बीणीमुळे शक्य झाले, पण आता या दुर्बीणीची क्षमता संपत आली असून तिची जागा लवकरच सोडण्यात येणारी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप घेणार आहे.
मानवी मन १९५५पासून अंतराळ संशोधनाकडे आकर्षित झाले. अथांग पसरलेला अंतराळाचा पसारा अनेक प्रकाशवर्षे दूर असलेले ग्रह, तारे, आकाशगंगा, धूमकेतू यांचा धांडोळा घ्यावा आणि अंतराळ विज्ञानात भर पडावी या हेतूने अनेक प्रगत राष्ट्रांनी, विविध मोहिमा आखल्या. १९६९मध्ये चंद्रावर प्रथम मानवाचे यशस्वी पदार्पण झाले आणि एका नवीन दालनाचा श्रीगणेशा झाला.
अंतराळ वसाहत आणि अंतराळ प्रयोगशाळा, विविध स्वरूपाचे शास्त्रीय उपग्रह इत्यादी कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागल्या. विविध मोहिमांमार्फत पृथ्वीवर वातावरणापासून साधारणत: चारशे कि.मी. दूरवरून भ्रमण करणारे अंतराळ स्थानक आणि अंतराळ प्रयोगशाळा यांचा उपयोग अनेक राष्ट्रांमधील अंतराळवीर करून घेऊ लागले. काही अंतराळवीर चार-पाच महिने अंतराळात मुक्काम करून वजनविरहित गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेत मानवी शरीरावर कोणकोणते परिणाम घडतात याची माहिती नोंदवू लागले.
अंतराळ संशोधन ही बाब अत्यंत खर्चिक, असंख्य निरीक्षणे आणि कालमर्यादेचे उल्लंघन करणारी असल्याने विविध राष्ट्रांचे संशोधक एकत्रितपणे मानवाच्या भविष्यातील वाटचालीस सुसंगत अशी आखणी करू लागले. प्रत्यक्षपणे मंगळ, गुरू, शनी इ. ग्रहांवर पोहोचण्यापूर्वी जास्तीत जास्त छायाचित्रे मिळविण्याचा, त्यांचा अभ्यास करण्याचा एकमेकांशी विचारविनिमय करण्याचा प्रघात सुरू झाला.
अंतराळात विविध उंचीवरून वेगवेगळय़ा दिशेन, कोनाकोनांतून छायाचित्रण करणे, छायाचित्रे पृथ्वीवरील प्रयोगशाळांकडे अभ्यासाकरिता पाठविणे यासाठी अतिभव्य ‘हबल टेलिस्कोप’ची यंत्रणा १९९०मध्ये कार्यान्वित करण्यात यश मिळाले. अत्यंत कार्यक्षम असे कॅमेरे, इन्फ्रारेड, लेसर यांसारख्या शक्तिमान किरणांचा वापर करणे, सौरऊर्जेमार्फत ती यंत्रणा कार्यरत ठेवणे अशा प्रकारे हबलची यंत्रणा अव्याहतपणे कार्यक्षम ठरली आहे. सातत्याने भ्रमणअवस्थेत असल्याने अंतराळातील ज्ञात, अज्ञात किरणांचे परिणाम, छायाचित्रण अचूकपणे करून ती माहिती क्षणोक्षणी पृथ्वीवरील प्रयोगशाळांकडे पाठवून देणे यामुळे ‘हबल’मध्ये काही दोष निर्माण झाले. गेल्या दहा वर्षांत विविध मोहिमांमार्फत अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हबलची दुरुस्ती केलेली आहे.
‘हबल’मार्फत केलेल्या छायाचित्रणांमुळे अति उंचीवर हायड्रोजन वायूची निर्मिती, सौरवादळे, अतिशक्तिवान किरण यांचे परिणाम धूलिकण बाष्प यांवर घडून कशा प्रकारे नवनवीन घटक तयार होतात, अनेक अज्ञात स्वरूपात असलेल्या आकाशगंगा, तारे, तारका यांचे प्रत्यक्ष छायाचित्रण करण्यात यश मिळाले आहे.
अल्ट्राव्हायोलेट आणि क्ष-किरणांच्या शक्तीची खूप माहिती संकलित झालेली आहे. अंतरराळात घडणाऱ्या असंख्य घडामोडींचा प्रचंड ज्ञानसाठा संशोधकांकडे उपलब्ध आहे.
पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षे दूर अर्थात कोटय़वधी कि.मी. अंतरावर घडणाऱ्या बदलांमध्ये ताऱ्यांची निर्मिती, त्यांच्यात घडणारे स्फोट आणि तारे नष्ट कसे होतात, म्हणजेच ताऱ्यांच्या जन्ममृत्यूची मालिका संशोधकांना ज्ञात झालेली आहे. प्रत्यक्ष छायाचित्रणाच्या साहाय्याने त्याचे दर्शन घडले आहे.
‘हबल टेलिस्कोपमधील सौर पॅनेल्स, पृथ्वीकडे छायाचित्रे पाठविण्याची प्रक्रिया यात आतापर्यंत चार वेळा बिघाड झालेला होता. अंतराळवीरांनी प्रत्यक्ष तेथे पोहोचून किंवा काही अंतरावरून त्या कमतरता यशस्वीपणे दुरुस्त केल्या. २००९च्या अखेरीस पाचव्यांदा मोहीम आखून सौरऊर्जेचे पॅनेल्स बदलून टाकण्यात आले.
त्या वेळी अंतराळवीरांनी केलेल्या पहाणीनुसार ‘हबलची कार्यक्षमता’ जवळजवळ संपुष्टात आलेली आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. हबलकडून २०१२मध्ये आलेल्या छायाचित्रांचा दर्जा खूपच घसरल्याचे मत डॉ. स्टुअर्ट क्लर्क या अंतराळशास्त्रज्ञाने दिलेले आहे.
डॉ. क्लर्क  हेअंतराळातील छायाचित्रण आणि त्यानुसार घडणाऱ्या बदलांचे विश्लेषण करणारे जागतिक दर्जाचे संशोधक आहेत. साधारणत: २०१३च्या अखेरीस हबलचे कार्य संपूर्णपणे थांबेल आणि हळूहळू त्याच्या भागांचे विघटन सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, अंतराळ छायाचित्रण थांबविले जाणार नाही. २०१४च्या ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ फ्रेंच गियाना येथून अंतराळात रवाना होणार आहे.