क्युरिऑसिटी मोहीम ही आतापर्यंत मंगळावर पाठवण्यात आलेल्या मोहिमेमधील सर्वात शेवटची आणि यशस्वी मोहीम आहे. गेल्या
५ ऑगस्ट रोजी लँडरने मंगळावर उतरण्याचा आपला पहिला वाढदिवस साजरा केला.
या मोहिमेत यानाला मंगळावर उतरवण्यासाठी नवीन पद्धतीची यशस्वी चाचणी झाली. यात बसवलेल्या नवीन आणि आधुनिक उपकरणांनी योग्य पद्धतीने कार्य केले. या कालावधीत क्युरिऑसिटीने सुमारे
१.६ किलोमीटरचा प्रवास केला, त्यात त्याने दोन दगडांवर परीक्षण केले. त्याने आतापर्यंत आपल्याला १९० गिगा बाईट पेक्षा जास्त माहिती पाठवली आहे. या रोव्हरमध्ये खुद्द सजीवांची लक्षणे ओळखण्यासाठी जरी यंत्रणा नसली तरी या माहितीतून मंगळावर कधीकाळी सजीवांना पोषक वातावरण होते याचे पुरावे मिळाले आहेत.
आपल्यापकी ज्यांनी ही मालिका सुरवातीपासून वाचली आहे त्यांना असे वाटेल की अनेकदा त्याच त्याच गोष्टींचीच माहिती आपल्याला या मोहिमेतून मिळत आहे. विशेषत मंगळाच्या इतिहासात सजीवांना पोषक वातावरणाच्या पुराव्यांचा वारंवार उल्लेख झाला आहे.  
इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की या यानांचा आकार बघता त्यांनी गोळा केलेले पुरावे म्हणजे क्रिकेटच्या मदानावर सुईच्या टोकावर मातीचा नमुना घेऊन सांगायचं की मदान खेळण्यालायक आहे की नाही. आणि म्हणून मंगळावरच्या वेगवेगळ्या भागातून घेतलेले पुरावे एकमेकांस पूरक आहेत किंवा कसे हे जाणून घेणे गरजेचे आहे.  तसेच तंत्रज्ञानाच्या नव्या आविष्कारांचा उपयोग करून न उलगडलेली कोडी सोडवणे आवश्यक आहे.
हे यान ‘गेल’ विवरात उतरलं होतं आणि आता त्याचा प्रवास
८ किलोमीटर दूरवर असलेल्या शार्प पर्वताच्या दिशेने होत आहे. हा पर्वत या विवरातच आहे आणि तळापासून याची उंची ५ किलोमीटर आहे.
नासाने क्युरिऑसिटीच्या या एक वर्षांच्या कारकीर्दीत लागलेले
५ मुख्य शोध किंवा नवीन मिळालेली माहिती यांची यादी जाहीर केली आहे आणि ती अशी आहे.
१.     यलो नाईफ नावाच्या खाडीत  मंगळाच्या इतिसातील एका टप्प्यावर गोड्या पाण्याचा तलाव होता,आणि सजीवांसाठी पोषक असे खनिजही तिथे सापडले आहे. इथल्या चिकणमातीचे रासायनिक गुणधर्म उदासीन आहेत – म्हणजे आम्ल पण नाहीत, आम्लारी पण नाही. ही माहिती सर्वथा नवीन होती. मार्स ऑर्बायटरनी घेतलेल्या कुठल्याच निरिक्षणात असे दिसून आले नव्हते.
२. मंगळावर कंग्लोमरेट प्रकारचे दगड सापडले. हे दगड म्हणजे अनके लहान गोल दगडांचा एकत्रित गोळा. आपल्याला असे गोटे नदीच्या पात्रात दिसतात. याच असा अर्थ निघतो, की कधीकाळी मंगळाच्या या भागात  वाहतं पाणी होतं. त्या वाहत्या पाण्यात हे गोटे तयार झाले असावेत.
३.     या यानाने पृथ्वी सोडल्यापासून यानाच्या आत वैश्विक आणि सूर्याच्या प्रारणाची नोंद अशा पद्धतीने घेतली होती, की जर मानवाला हा प्रवास करायचा असेल तर त्याला कुठल्या प्रारणाला सामोरे जावे लागेल.  सुरुवातीचे निष्कर्ष हे सांगतात की मानव मोहिमांसाठी वैश्विक आणि सूर्याचे प्रारण हे एक मोठे आव्हान असेल.
    एखादा अंतराळवीर त्याच्या संपूर्ण करियरमध्ये किती प्रारणाला सहन करू शकेल याचे नासाने काही प्रमाण ठरवले आहे. यानाच्या नऊ महिन्यांच्या प्रवासात क्युरिऑसिटीने घेतलेल्या प्रारणाच्या प्रमाणाची नोंद या प्रमाणापेक्षा जास्त आहे.
४.     हे यान ज्या गेल विवरात उतरवण्यात आले होते त्या भागात मिथेन वायूचा अभाव ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे.  पृथ्वीवरून घेतलेल्या आणि मार्स ऑरबायटरनी घेतलेल्या निरीक्षणात मंगळावर मिथेन वायू असल्याचे लक्षात आले होते. हा वायू जैविक क्रियेतून आला असेल किंवा  नसíगक असेल, पण क्युरिऑसिटीने नोंद घेतलेले मंगळावरच्या मिथेन वायूचे प्रमाण पृथ्वीच्या वातावरणातील प्रमाणाच्या ६०० पट कमी आहे. म्हणजे जरी कधीकाळी मंगळावर सजीवांसाठी वातावरण पोषक असलं तरी आज ते अत्यंत असह्य़ आहे.
५.     क्युरिऑसिटी यानाच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा शार्प पर्वत आहे. पण तिथे पोहोचायच्या अगोदरच विविध प्रकारचे दगड सापडले आहेत. यात ज्वालामुखीतील दगडांपासून चिखलासारख्या दगडांचा समावेश आहे. या निरीक्षणांनी शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केलं आहे, कारण अशा प्रत्येक प्रकारच्या दगडाचा वेगळा इतिहास असतो.  दगडांचे हे वैविध्यपूर्ण प्रकार बघून शास्त्रज्ञांना खात्री आहे की येत्या काळात त्याना आणखीन वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील.
सध्या चर्चा आहे मंगळावर जाण्यासाठी नो रिटर्न तिकिटाची. अनेकांनी मंगळावरून परत न येण्याची तयारी दाखवली आहे. हे सर्व शक्य होईल का – प्रश्न अनेक आहेत. आणि प्रत्येक उत्तराबरोबर नवीन प्रश्न पण तयार होतात. येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात इस्रोचे ‘मंगलयान’ मंगळाच्या दिशेने जाणार आहे – ही ऑरबायटर मोहीम असेल. या सर्वाची पाश्र्वभूमी लक्षात घेऊन गेल्या १५-१६ भागात आपण मंगळ मोहिमांची चर्चा केली. तसेच, या संदर्भात  जेव्हा काही नवीन शोध किंवा माहिती समोर येईल त्याची चर्चा आपण करूच; पण तोपर्यंत मंगळ मोहिमांना विराम देऊन आपण इतर खगोलीय प्रश्नांकडे वळू या. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांचेही स्वागत आहे.