News Flash

पृथ्वीच्या अंतरंगाचे संशोधन

मानवाच्या संशोधक आणि चिकित्सक वृत्तीचा वापर सर्वव्यापी आहे. काही संशोधकांनी दूरवर पसरलेल्या अंतराळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. फिरते वैज्ञानिक उपग्रह, त्यातील यंत्रणा, कार्यक्षम दुर्बिणी,

| August 6, 2013 09:26 am

मानवाच्या संशोधक आणि चिकित्सक वृत्तीचा वापर सर्वव्यापी आहे. काही संशोधकांनी दूरवर पसरलेल्या अंतराळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. फिरते वैज्ञानिक उपग्रह, त्यातील यंत्रणा, कार्यक्षम दुर्बिणी, कॅमेरे यांच्या साहाय्याने चंद्राचा पृष्ठभाग, पृथ्वीपासूनचे अंतर इ. माहिती संकलित करून चंद्रावर यशस्वी पदार्पण १९६९ जुलैमध्ये केले. फिरत्या अंतराळ प्रयोगशाळांमध्ये अंतराळ संशोधकांनी वास्तव्य करून असंख्य निरीक्षणे नोंदविली. मंगळ, शुक्र आणि इतर ग्रहांबद्दल माहिती संकलित करण्याचे वैज्ञानिक कार्य सुरू आहे. भविष्यकाळात त्या दूरस्थ अंतराळाचाही वेध घेतला जाईल.
अंतराळाच्या आधीपासून पृथ्वी, पृथ्वीचा पृष्ठभाग आणि पृथ्वीचे अंतरंग यांकडे भूशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागांवरील जंगले, सागर, सागरी तळ, खाणींच्या निमित्ताने पृथ्वीच्या अंतरंगाची जडणघडण याबद्दल माहिती उपलब्ध होऊ लागली. परंतु पृथ्वीच्या अंतरंगातील वाढते तापमान, वाढणारा प्रचंड दाब याकारणास्तव प्रत्यक्ष आतपर्यंत पोचणे केवळ अशक्य ठरले. रिमोट सेन्सिंग, लेसर किरण आणि कांही विशेष यंत्रे यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या अंतरंगाची थोडीफार झलक संशोधकांनी आत्मसात केली आहे.
ज्याप्रमाणे कांद्याची रचना पाकळ्यांची मिळून तयार झालेली असते, त्याचप्रमाणे सर्वसाधारणत: पृथ्वीची रचना असल्याचे संशोधकांनी मान्य केली आहे. पृष्ठभागापासून सुमारे पस्तीस किलोमीटर्सच्या बाह्य़थराला ‘क्रस्ट’ असे संबोधले जाते. यात जास्त प्रमाणांत वाळूच्या संचयाने निर्माण झालेल्या संयुगांचा समावेश असतो. सर्व महासागर, समुद्र, जंगले, पर्वत, डोंगर यांचा समावेश यात आहे. सागरी तळांपेक्षा वाळूचे प्रमाण जमिनीच्या थरांमध्ये जास्त असते. पुढील शंभर किलोमीटर्सच्या भागाला ‘लिथोस्पिअर’ असे नामकरण आहे. या थरांतील वरच्या भागात ‘टेक्टॉनिक प्लेटस्’चा समावेश असतो. त्यानंतरच्या भागाला ‘अस्थेनोस्पिअर’ या नावाने संबोधले जाते. तो भाग दोनशे कि.मी. इतक्या रुंदीचा असतो. यातील खालचा थर अतीउष्णतेमुळे अर्धद्राव अवस्थेत असल्याने त्यावरील ‘प्लेटस्’ तरंगत असतात.
यानंतरच्या साधारणत: तीन हजार किमीच्या भागाला ‘मँटल’ असे संबोधतात. यामध्ये अतीतप्त वालूकामय भाग असतो. त्यात मॅग्नेशिअम, लोह यांचे प्रमाण भरपूर असते. मॅंटलमध्ये प्रवाह निर्माण होतात, त्यामुळे वरच्या प्लेटस्मध्ये हालचाल होते. त्यानंतरच्या सुमारे पाचहजार किमीच्या भागाला ‘आऊटर कोअर’ असे संबोधतात. या भागांत लोह, निकेल धातू द्रवरुप अवस्थेत जास्त प्रमाणांत असतात. या धातूंच्या उपस्थितीमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) निर्माण होते. त्यानंतरच्या ६३७८ किमी पर्यंतच्या भागाला ‘इनर कोअर’ असे संबोधतात. तेथील तापमान सुमारे साडेपाच हजार डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड असते. अशा अतीप्रचंड तापमानामुळे लोह, निकेल द्रवरुप अवस्थेत असले तरी वरच्या प्रचंड दाबामुळे त्यांचे रुपांतर घनगोळ्यात झालेले असते.
पृथ्वीच्या गर्भातील किरणोत्सारी मूलद्रव्यांवर होणाऱ्या क्रियांमुळे जास्त तापमान सदैव कायम राहते. पृथ्वीच्या अंतरंगातील घटक वजनदार असल्याने, पृथ्वीच्या गर्भावर एकूण पडणारा दाब बाह्य़ वातावरणापेक्षा पस्तीस दशलक्ष पट जास्त असतो. पृथ्वीच्या गोलाकाराचा व्यास सुमारे सातहजार किमी रुंदाचा असून पृथ्वीला ठराविक गती प्राप्त झालेली आहे. पृथ्वी स्वत:भोवती संथ गतीने २४ तासांत प्रदक्षिणा पूर्ण  करते. सूर्य स्थिर असल्याने पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे दोन परिणाम घडतात. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड असल्याने पृथ्वी फिरत असूनही कोणतीही वस्तू पडत नाही.
अशा प्रकारे अतिप्रचंड दाब आणि जबरदस्त तापमान या दोन अडचणींमुळे पृथ्वीच्या गर्भात प्रत्यक्ष प्रवेश करणे किंवा कोणतेही साहित्य खोलवर पाठवून शास्त्रीय माहिती गोळा करणे केवळ स्वप्नवत ठरणार आहे. कल्पनाशक्ती आणि आधुनिक चित्रीकरण, तंत्रज्ञान वापरून हॉलीवूडच्या निर्मात्यांनी २००३ मध्ये ‘द कोअर’ सिनेमा तयार करून प्रेक्षकांना आकर्षित केले होते.
अफलातून काल्पनिकशक्तीचा वापर करून, ‘कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या जागतिक संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा. डेव्हिड स्टिव्हन्सन यांनी पृथ्वीच्या अंतरंगाचा वेध घेण्याची संकल्पना जाहीर केलेली आहे. त्यांच्या प्रबंधानुसार आण्विक, शक्तिवान किरणांचा वापर करून पृथ्वीच्या अंतरंगाचा भेद घेत घेत संत्र्याच्या आकाराचा उपग्रह पृथ्वीच्या गर्भापर्यंत पोहचू शकेल. या वाटचालीस साधारणत: आठ दिवस प्रवास करावा लागेल. त्या उपग्रहात असलेल्या यंत्रणेमार्फत अंतरंगातील बदलत जाणारे तापमान, वृद्धिंगत होणारा दाब, आजूबाजूच्या द्रवरुपांत होणारे बदल यांची खात्रीपूर्वक निरीक्षणे नोंदविता येतील. ती निरीक्षणे पृथ्वीवरील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये नोंदविली जातील. अर्थात या प्रकल्पाला येणारा खर्च मात्र जगाचे अंदाजपत्रक कोलमडून टाकेल. प्रकल्पाला आवश्यक असणारा उपग्रह टिकू शकेल, परंतुअंतरंगात छेद घेतांना थरांमध्ये निर्माण केलेली पोकळी किती काळ टिकू शकेल याची शाश्वती नाही. त्यामुळे उपग्रह आत कायमचा अडकण्याची शक्यता असल्याने हा प्रयोग आशादायक नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 9:26 am

Web Title: the research of earths interior
टॅग : Science 2
Next Stories
1 ‘यूमी बेबी बॉटल्’
2 फिनिक्स लँडर
3 ‘वासूनाका’
Just Now!
X