साध्या पावसाळी छत्रीचा सौरकिरण संकलक म्हणून उपयोग करता येऊ शकतो. छत्रीच्या आतील भागास सूर्यकिरण परावर्तित होतील अशी अॅल्युमिनिअमची फॉईल किंवा कागद लावल्यास त्या छत्रीचे रूपांतर पॅराबोलिक सौर कुकरमध्ये होते. सूर्य किरणांचे परावर्तन केंद्रकाच्या जागेवर होते. त्यामुळे केंद्रकाच्या ठिकाणी बाह्य़ांगास काळा रंग दिलेली अॅल्युमिनिअमची भांडी ठेवण्यात आली तर येथील तापमानामुळे भांडय़ातील अन्नपदार्थ शिजू शकतात. साधारण एक ते दीड तास कालावधीमध्ये सूर्य प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार १ लिटर अन्न पदार्थ शिजवता येतो. अशा प्रकारच्या कुकरद्वारे १३५ ते १४० अंशसेल्सिअस तापमान गाठता येणे शक्य आहे. सूर्याच्या आकाशातील मार्गक्रमण कक्षेप्रमाणे छत्रीचा कोन बदलण्याची यंत्रणा केलेली असून त्याद्वारे सूर्यकिरणांची उष्णता जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध राहील
याची काळजी घेण्यात येते. छत्रीचा उपयोग इतर वेळी ऊन किंवा पावसापासून संरक्षण करण्याकरिता होतो तसेच छत्री घडी करून कोठेही नेता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे वापरण्यास हा कुकर अत्यंत सुलभ व स्वस्त देखील आहे. मात्र वेगवान वारा वाहत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अन्नपदार्थ सांडण्याची शक्यता आहे. या कुकरद्वारे प्रवासात; शिबिरांमध्ये सहलीद्वारे किंवा शेतात काम करताना अन्न शिजवणे शक्य आहे.
घडी करण्यायोग्य पृष्ठाच्या
कागदाची सौर चूल –
सौर पेटीचूल वजनाला जड असल्यामुळे व त्याकरिता लागणारे साहित्य महाग व दुर्गम प्रदेशामध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे अत्यंत स्वस्त पर्याय म्हणून पृष्ठाच्या कागदाची म्हणजेच पृष्ठाच्या खोक्याचीसौर चूल ही संकल्पना पुढे आली. या प्रकाराचा कुकर आवश्यकतेनुसार घडी घालून इतरत्र नेण्यास सुलभ आहे. या कुकरचे आलेखन सोपे असून हा कुकर पृष्ठापासून बनविण्यात येतो. अन्न शिजवण्याकरिता बनवलेल्या पेटीच्या अंतर्भागास काळा रंग दिलेला असतो. त्याद्वारे सूर्यकिरणे शोषली जातात. पेटीवर पॉलिथिनच्या कागदापासून बनविलेले झाकण लावण्यात येते, ज्यामुळे पेटीतील उष्णता जास्त काळ टिकवून ठेवता येते व अन्न शिजविण्यास लागणारे तापमान गाठता येते. सूर्यकिरण संकलित करण्यासाठी परावर्तकांचा वापर करण्यात येतो. त्याकरिता कागदी पृष्ठांवर अॅल्युमिनिअमची धातूची फॉईल चिकटविण्यात येते. पृष्ठांच्या परावर्तकांची रचना योग्य प्रकारे करून सूर्यकिरणे पेटीवर पडतील अशी योजना केलेली असते. पेटीमध्ये बाह्य़ांग काळ्या रंगाने रंगविण्यात आलेले अॅल्युमिनिअमचे दोन डबे बसतात. ह्य़ा डब्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवता येतात. या कुकरचा वापर करून २ ते ३ माणसांचा स्वयंपाक करता येतो. हा कुकर वजनास हलका, वापरण्यास सोपा, सुटसुटीत व किमतीस अत्यंत स्वस्त असून ग्रामीण भागात अत्यंत उपयुक्त आहे. अन्नपदार्थ ठेवताना डब्यातील पाणी कुकरमध्ये सांडणार नाही, तसेच हा कुकर पावसात भिजणार नाही याची योग्य ती दक्षता घेतल्यास हा कुकर दीर्घकालापर्यंत सेवा देऊ शकतो. पर्यटकांकरिता तसेच शेतक ऱ्यांकरिता, ट्रेकिंग करण्यास जाणाऱ्यांना हा कुकर अत्यंत उपयुक्त आहे.    
– अनंत ताम्हणे
लेखक अभियंता व उर्जा अभ्यासक आहेत