‘मेर्स’ विषाणूच्या उगमाचे कोडे होते. मात्र नुकत्याच ‘लॅन्सेट इन्फेक्चियस डिझिजेस’ या संशोधन पत्रिकेत बारा विद्यापीठाच्या संशोधन चमूने ओमान आणि कॅनरी बेटावरील ड्रोमडेरी जातीच्या उंटात या विषाणूच्या संसर्गाचा पुरावा शोधला आहे. उंटात संसर्गाची लक्षणे नव्हती, मात्र रक्तात विषाणूविरुद्धची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) होती. त्या तुलनेने बकरी, मेंढी, साधे उंट आणि इतर प्राण्यात संसर्ग नव्हता.ू
गेल्या काही वर्षांंत निरनिराळ्या देशांत कुठल्या ना कुठल्या विषाणूचा प्रसार चालूच आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत स्वाइन फ्लूची साथ आली. त्याचा इतर देशासह भारताला फटका बसला. अजूनही स्वाइन फ्लूचा संसर्ग गेलेला नाही. या वर्षांच्या सुरुवातीला चीनला एच७ ए९ या बर्ड फ्लूने सतावले. आता तो थंडावल्यासारखा वाटतो आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००३ ला एका करोना वर्गाच्या विषाणूने जगभर थैमान घातले होते. ‘सार्स’ नावाने तो ओळखला जायचा. त्याच्या साथीत जवळजवळ आठशे रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता दहा वर्षांनंतर असाच एक नवा करोना विषाणू सौदी अरेबियात पाय रोवतो आहे. सार्स विषाणूपासून तो वेगळा असल्याने त्याला नाव दिले आहे ‘मिडल ईस्ट रिस्पायरेटरी सिंड्रोम करोना व्हायरस.’ थोडक्यात एमईआरएससीओव्ही. सार्स सारखाच हा श्वसनसंस्थेला गंभीर धोका पोचवतो. सध्या तो सौदी अरेबियात सीमाबद्ध असला तरी त्या विषाणुबाधेचे काही रुग्ण जॉर्डन, कतार, युनायटेड अरब इमिरेट्समध्ये आढळले आहेत. तर काही फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या युरोपियन देशात विखुरले आहेत. सौदी अरेबियातील धार्मिक यात्रेनिमित्त वर्षभर जगभरच्या प्रवाशांचे येणे-जाणे तिथे होत असल्याने त्याला काबूत ठेवणे प्राधान्याचे ठरते आहे.
सार्सच्या तुलनेत ‘मेर्स’ च्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पन्नास टक्क्य़ाहून अधिक आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे तसेच विषाणूसंसर्ग आधीच ज्यांना मधुमेह, रक्तदाबासारख्या व्याधी आहेत त्यांना प्रामुख्याने होतो आहे. ‘सार्स’ आणि ‘मेर्स’ या करोना विषाणूंचा तपशीलवार तुलनात्मक अभ्यास नुकताच ‘लॅन्सेट इन्फेक्चियस डिसिझेज’ या वैद्यकीय शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे.
सार्स आणि मेर्समधील लक्षणात जरी पुष्कळसे साम्य असले तरी मेर्समध्ये श्वसनाचा त्रास लवकर जाणवतो. त्यामुळे त्याचा गंभीरपणा सार्सहून अधिक आहे. सार्स हा निरोगी आणि तरुणांनाही होत होता तर मेर्सचे बहुतांश रुग्ण काही व्याधीने आधीच त्रस्त होते. अर्थात मेर्सचा सीमित संसर्ग झालेले आणि काही लक्षण न दाखवणाऱ्या व्यक्तींची यात दखल घेतली गेली नाही हेही तितकेच खरे.
हाच मुद्दा स्पष्ट करताना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्रोफेसर अली झुम्ला म्हणतात की वैद्यकीय कर्मचारी, लहान मुले आणि विषाणुसंसर्गात येणाऱ्या इतर व्यक्ती या सर्वाना लक्षणे नसल्यामुळे किंवा त्यांना सौम्य त्रास झाल्यामुळे त्यांची कुठलीच वैद्यकीय दखल घेतली जात नाही. त्यामुळे करोना विषाणूच्या फैलावाची काहीच कल्पना करता येत नाही. तसे म्हटले तर करोना विषाणूचे नोंद झालेले रुग्ण हे हिमनगाच्या वरच्या टोकासारखे आहेत. त्यांच्याहून कित्येक पट व्यक्ती अव्यक्तपणे संसर्ग बाळगून आहेत. त्याखेरीज सध्या करोना विषाणुसंसर्गाचा नक्की उगम निश्चित करता आलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधक कारवाई करणेही कठीण जात आहे.
करोना विषाणूचे ‘करोना’हे नाव त्याचा आकार सूर्य किंवा चंद्राच्या खग्रास ग्रहणात तो जसा दिसतो, त्यांच्या प्रकाशमान कडा जशा दिसतात, तशाच त्याच्या कडा दिसत असल्याने त्याला दिले आहे. विषाणूच्या अचूक चाचण्या अभावानेच आहेत. त्या त्वरेने उपलब्ध होणे आवश्यक आहे. असे जर्मनीतील बॉन युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरमधील क्रिस्टीयन ड्रोस्टेन यांना वाटते. संसर्ग नियंत्रणासाठी रक्ताच्या योग्य चाचण्या हाताशी असणे आणि त्याच्या मदतीने रुग्ण व नातेवाईक यांची एकत्र वेळेस तपासणी करणे संसर्गाची व्याप्ती निश्चित करायला आवश्यक आहे. करोना विषाणू तुलनेने नवीन आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून तो सौदी अरेबियात आढळतो आहे. पण वर्षभरात त्याचा युरोप आणि आफ्रिकेतील देशात प्रसार झाला आहे. आत्तापर्यंत अधिकृतरीत्या ऐंशी रुग्णांची नोंद आहे. त्यातील बेचाळीस जण दगावले आहेत. मेर्सने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. सार्सचे प्रमाण १० टक्के इतके होते. हा विषाणू मुख्यत: सौदी अरेबियात सीमाबद्ध असला तरी तेथील मक्का व मदिना या पवित्र धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी जगातल्या निरनिराळ्या देशातील जनतेचे मोठय़ा प्रमाणावर येणे-जाणे असल्याने विषाणू संसर्ग पसरणार नाही याची अधिक काळजी घेणे जरुरीचे ठरते. तसा इशारा ‘प्लॉस करंटस’ या विज्ञानपत्रिकेत कॅनडातील टोरंटो येथील सेंट मायकेल हॉस्पिटलमधील संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. कामरान खान यांनी दिला आहे.
मुस्लिम समाजाच्या वर्षांत उमराह व हाज या दोन पवित्र धार्मिक यात्रा असतात. त्यासाठी जगभरातून लाखो श्रद्धाळू सौदी अरेबियातील मक्का व मदिना शहरात एकत्र येतात. उमराहची यात्रा वर्षांतून केव्हाही करता येते. पण बहुसंख्य यात्री रमजानचा महिना निवडतात. जो ९ जुलैला सुरू झाला आणि ७ ऑगस्टला संपला. हाजची पवित्र यात्रा या वर्षी १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. त्यावेळेस ३० ते ४० लाख यात्रेकरू एकत्र येणार आहेत.
या पाश्र्वभूमीवर डॉ. खान यांनी सौदी अरेबियाच्या आरोग्य खात्याला दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००३ साली आलेल्या ‘सार्स’च्या साथीची आठवण करून दिली आहे. आणि यात्रेकरू एकत्र येत असताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यावेळच्या सार्स साथीत टोरंटो शहरातील चव्वेचाळीस व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. संसर्गाला पायबंद घालण्यासाठी केलेल्या उपायांसाठी कॅनडा सरकारला दोन बिलियन डॉलर्स खर्च करावे लागले होते. यावरूनच जगभराच्या इतर देशांना किती आर्थिक भार पडला असेल याची कल्पना येईल.
डॉ. खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाज यात्रेच्या दरम्यान सौदी अरेबियात किती प्रवासी वाहतूक असेल याचा अंदाज येण्यासाठी ‘बायो डायस्पोरा’ नावाचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग जागतिक आरोग्य संघटना तसेच अमेरिका व युरोपियन राष्ट्रेही करतात. त्याच्या २०१२ च्या अंदाजानुसार रमजान महिन्यात सतरा लाख यात्रेकरू यात्रा करून परतले. त्यातले ५० टक्के केवळ आठ देशातील होते आणि त्यात सर्वाधिक भारताचे होते. भारतात येताना हे सर्व मुंबई व केरळमधील कोझिकोडे या दोन विमानतळावर उतरले.
नवीन करोना विषाणूची चाचणी भारतात करायची झाल्यास पुण्यात नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी व दिल्लीत नॅशनल सेंटर फॉर डिझिज प्रिव्हेन्शन या ठिकाणीच होऊ शकते. त्यामुळे संशयास्पद रुग्णांची चाचणी दक्षतेने करावी लागणार आहे. भारतात केंद्र सरकारने मुंबई व कोझिकोडे पालिका प्रशासनांना तशा सूचना दिल्या आहेत. सौदी अरेबियाचे प्रशासन प्रथम म्हणजे वृद्ध व्यक्तींना तसेच व्याधी असलेल्या व्यक्तींना यात्रा न करण्याचा सल्ला देत आहे. येणाऱ्या यात्रेकरूंना मास्क लावून फिरण्याच्या, हाताची स्वच्छता राखण्याच्या आणि खोकताना किंवा शिंकताना आपल्या जवळचा पेपर नॅपकीन वापरायच्या सूचना देत आहे.
तसेच योग्य ते लसीकरण करूनच यायचा निर्देश देत आहे. आत्तापर्यंत ‘मेर्स’ विषाणूच्या उगमाचे कोडे होते. मात्र नुकत्याच ‘लॅन्सेट इन्फेक्चियस डिझिजेस’ या संशोधन पत्रिकेत बारा विद्यापीठाच्या संशोधन चमूने ओमान आणि कॅनरी बेटावरील ड्रोमडेरी जातीच्या उंटात या विषाणूच्या संसर्गाचा पुरावा शोधला आहे. उंटात संसर्गाची लक्षणे नव्हती, मात्र रक्तात विषाणूविरुद्धची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) होती. त्या तुलनेने बकरी, मेंढी, साधे उंट आणि इतर प्राण्यात संसर्ग नव्हता.
एकंदरीत सौदी अरेबियाच्या करोना विषाणूच्या गनिमी काव्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह इतर देशांच्या आरोग्य प्रशासनांपुढे नव्या समस्या निर्माण केल्या आहेत.