ल्युसीच्या ‘जन्मा’ चे स्वागत सुरुवातीला दबक्या स्वरातच झाले, पण २००३ मध्ये लुइसने आपली पंचविशी गाठली. एवढेच नव्हे, पुढे जाऊन तिला मुलगा झाला. अर्थात तो मात्र ‘टेस्ट टय़ूब’ बेबी नव्हता! या उदाहरणाने सर्व शंकांना उत्तर मिळाले आणि डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या संशोधनाविषयी साशंक असणाऱ्यांनाही चपखल उत्तर मिळाले.
टेस्ट टय़ूब बेबीचे जनक डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने, एरवी निपुत्रिक राहण्याची शक्यता असणाऱ्या पण मातृत्वाची आस असणाऱ्या लक्षावधी स्त्रियांच्या आयुष्यात आनंदाच्या फुलबागा फुलविणारे तंत्रज्ञान विकसित करणारा महान संशोधक- शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. एडवर्ड्स निधनसमयी ८७ वर्षांचे होते.प्रदीर्घ काळ ते आजारीही होते. तथापि उल्लेखनीय भाग हा की, ज्या तंत्राचा शोध त्यांनी १९८० च्या दशकात लावला. त्याचा गौरव करणारे नोबेल पारितोषिक त्यांना २०१० मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या ८४ व्या वर्षी मिळाले. मात्र आजारपणाने ग्रासलेल्या एडवर्ड्स यांना या पुरस्काराविषयी प्रतिक्रिया देण्याएवढीही शक्ती नव्हती आणि त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नीने आनंद व समाधान व्यक्त केले होते. आता तो पुरस्कार आणि केलेले संशोधन मागे राहिले आहे.
२७ सप्टेंबर १९२५ रोजी मँचेस्टर येथे जन्मलेले रॉबर्ट एडवर्ड्स यांनी काही काळ सैन्यातही काम केले नि त्यावेळी त्यांच्या शिक्षणात खंड पडला. अर्थात नंतर ते प्रथम कृषी शास्त्राकडे वळले. मात्र, तेथे त्यांचे मन रमेना आणि दोनच वर्षांंनी त्यांनी प्राणिशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. आश्चर्याची बाब ही की, तेथे ते उत्तीर्ण तर झाले पण अगदी कसेबसे. साहजिकच त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रगतीला खीळ बसण्याचीही पूर्ण शक्यता होती. मात्र, या विद्यार्थ्यांचा जीवशास्त्राकडे असलेला ओढा प्राध्यापक कॉनरॅड व्ॉडिंग्टन यांनी ओळखला आणि प्रथम पदवी आणि नंतर जनुकशास्त्रात पीएच डीसाठी त्यांनी एडवर्ड्स यांना विद्यार्थी म्हणून स्वीकारले. डॉ. एडवर्ड्स यांच्या आयुष्याला येथूनच कलाटणी मिळाली. काही काळ ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत, त्यानंतर उत्तर लंडनमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रीसर्च मध्ये आणि ग्लास्गो विद्यापीठात दोनएक वर्षे ते कार्यरत होते. १९६३ मध्ये ते केंब्रिजमध्ये रुजू झाले नि मग तीच त्यांची कर्मभूमी बनली व पुढील तीनएक दशके राहिली!
डॉ. एडवर्ड्स यांचे प्रारंभिक संशोधन होते ते नवजात अर्भकांमध्ये असणाऱ्या व्यंगांविषयी. बीजांडाचे विकसन वा फलन होत असताना गुणसूत्रांच्या सरमिसळीत राहणाऱ्या दोषांचा परिणाम म्हणजे जन्माच्या वेळी उद्भवणारी शारीरिक व्यंगे असावीत असा  डॉ. एडवर्ड्स यांचा युक्तिवाद होता. रूथ फॉलर यांच्याबरोबर त्यांनी यावर अधिक संशोधन केले. याच फॉलर यांच्याशी पुढे १९५४ मध्ये डॉ. एडवर्ड्स यांनी विवाहही केला. अर्थात, ज्यासाठी डॉ. एडवर्ड्स यांना जग ओळखते, ते तंत्र म्हणजे ‘टेस्ट टय़ूब’ बेबीचे. या संशोधनाला तशी सुरुवात झाली ती १९५० च्या दशकातच आणि सुरुवातीचे प्रयोग सशांवर करण्यात आले. ते प्रयोग उत्साहवर्धक होते. तोच नियम मानवी शरीरालाही लाग पडेल, असा डॉ. एडवर्ड्स यांचा सुरुवातीला कयास होता. मात्र, जसजसे अधिकाधिक संशोधन झाले, तसतसे उघड हे झाले की, ससा आणि मानव यांच्या जीवनक्रमातच मूळ फरक आहे .त्यामुळे सशांवर झालेले प्रयोग जसेच्या तसे मानवाला लागू पडणार नाहीत. साहजिकच अगदी मूलभूत संशोधन डॉ. एड्वर्डस यांना करावे लागले.
मानवी बीजांडाचा विकास कसा होतो, त्यास विविध संप्रेरके कशी कारणीभूत असतात. शरीरबाह्य़ फलन झाल्यानंतर त्या बीजांडाचे प्रत्यारोपण संबंधित महिलेच्या गर्भाशयात नेमके कोणत्या टप्प्यावर करावयाचे आदी मूलभूत संशोधन डॉ. एडवर्ड्स करीत होते. त्यांनी १९६९ च्या सुमारास प्रयोगशाळेत याचा यशस्वी प्रयोग सिद्धही करून दाखविला होता. येथे डॉ. एडवर्ड्सबरोबर या सर्व प्रयोगात सहकारी होते. लँकेशायरच्या ओल्डहॅमधील प्रसूतितज्ज्ञ व निष्णात शल्यचिकित्सक पॅट्रिक स्टेपटो हे दोघे आणि नर्स तंत्रज्ञ जीन पूर्डी आणि अनेक रुग्ण या सर्वानी ज्याला ‘इन व्ह्रिटो फर्टिलायझेशन’ किंवा ‘शरीरबाह्य़ फलन’ तंत्र म्हणतात ते विकसित केले, असेच म्हटले पाहिजे. अर्थात, या सर्व प्रयोगांच्या संकल्पनेचे अग्रदूत होते अर्थातच डॉ. एडवर्ड्स आणि स्टेपटो. एका काचपात्रात एका बीजांडाचे फलन सिद्ध करून या संशोधकांनी मोठाच पल्ला गाठला होता. मात्र, ते बीजांड आपल्या विकासाचा दुसरा टप्पा गाठेना. केवळ बीजांडाचे फलन म्हणजे मानवी जीव नव्हे, तर फलन झाल्यापासून ठराविक दिवसांच्या आत पेशीचे विभाजन व्हायला सुरुवात होणे आवश्यक असते. एका पेशीच्या दोन-दोनाच्या चार, अशा पेशी तयार झाल्या की, विभाजनाचा दुसरा टप्पा गाठला गेला असे म्हणता येते. त्या ‘गर्भा’ त चेतासंस्था विकसित होत असल्याचे ते द्योतक असते. हा टप्पा गाठला की त्या ‘गर्भा’ चे प्रत्यारोपण संबंधित महिलेच्या गर्भाशयात करता येते, पण पहिल्या प्रयोगात यातील काहीच झाले नाही. तेव्हा ही सर्व प्रक्रिया काचपात्रात होणार नाही, तर बीजांडाचा पुढचा विकास गर्भाशयातच होऊ शकेल असे त्यांना वाटले. याबाबतीत डॉ. स्टेप्टो यांचे योगदान मोठे होते. लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असणाऱ्यांपैकी ते एक होते. डॉ. एडवर्ड्स ओल्ड हॅममधून बीजांड ‘टेस्ट टय़ूब’ मधून पुढील संशोधन व प्रयोगांसाठी केंब्रिजला नेत असत. यातूनच पुढे ‘टेस्ट टय़ूब बेबी’ हे नामाभिधान या तंत्राला प्राप्त झाले.
‘आयव्हीएफ’ तंत्राच्या विकासात अनेक अडथळे होते. इंग्लंडच्या आर्थिक संस्था या संशोधनासाठी निधी देण्यास राजी नव्हत्या. धार्मिक नेते या प्रयोगावर सबबीखाली टीकेची झोड उठवत होते की, हे सगळे देवाला आव्हान देण्यासारखे आहे आणि जीवन ‘कृत्रिमरीत्या’ निर्माण करणे अनुचित आहे. माध्यमांनीही या प्रयोगांना लक्ष्य बनविले होते. एवढेच काय, प्रत्यक्ष शास्त्रीय वर्तुळातूनही पाठिंब्याचे, प्रोत्साहनाचे सूर ठसठशीत नव्हते. मात्र, डॉ. एडवर्ड्स व स्टेप्टो बधले नाहीत. त्यांनी प्रयोग सुरूच ठेवले आणि या प्रयोगांची प्रत्यक्ष फलश्रुती सिद्ध करण्याची संधी १९७८ मध्ये आली. लेस्ली ब्राऊन आणि तिचे पती जॉन यांना लग्नानंतर नऊ वर्षांनीही मूल झाले नव्हते. त्यांनी अनेक उपचार करून घेतले, पण ते व्यर्थ ठरले होते. त्यांच्यावर ‘आयव्हीएफ’ तंत्राचा उपाय करण्याचे निश्चित झाले. २५जुलै १९७८ रोजी लुइस ब्राऊनचा जन्म लेस्ली-जॉनच्या ‘पोटी’ झाला! ती पहिली ‘टेस्ट टय़ूब बेबी’ ठरली. ब्राऊन दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचे झरे वाहू लागले. त्या ‘जन्मा’ चे स्वागत सुरुवातीला दबक्या स्वरातच झाले, पण २००३ मध्ये लुइसने आपली पंचविशी गाठली. एवढेच नव्हे, पुढे जाऊन तिला मुलगा झाला. अर्थात तो मात्र ‘टेस्ट टय़ूब’ बेबी नव्हता! या उदाहरणाने सर्व शंकांना उत्तर मिळाले आणि डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या संशोधनाविषयी साशंक असणाऱ्यांनाही चपखल उत्तर मिळाले. तेव्हापासून आजतागायत जगभर सुमारे पंचेचाळीस लाख बालके या तंत्राने जन्माला आली आहेत.
डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स हे लेखनवेडे होते; त्याप्रमाणेच जगजागरण, सामान्यांमध्ये विज्ञानाविषयी सजगता निर्माण करणे हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. मानवतावाद, समाजवाद यावर त्यांचा विश्वास होता नि त्यातूनच ते पाच वर्षे स्थानिक लोकप्रतिनिधीही झाले होते. २०१० मध्ये म्हणजे पहिल्या ‘टेस्ट टय़ूब’ बेबीच्या जन्मानंतर तब्बल तीन दशकांनंतर डॉ. एडवर्ड्स यांना वैद्यक वा शरीरशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. डॉ. स्टेप्टो हेही या पुरस्काराचे हकदार होते, पण त्यांचे अगोदरच निधन झाल्याने व मरणोत्तर पुरस्काराची व्यवस्था ‘नोबेल’ मध्ये नसल्याने त्यांना तो देता आला नाही. आता डॉ. एडवर्ड्स यांचेही निधन झाले आहे. मात्र, एरवी निपुत्रिक राहण्याची भीती असणाऱ्या लक्षावधी दाम्पत्याच्या जीवनात सुखाची पहाट उजाडण्यासाठी केलेल्या संशोधनामुळे डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांचे नाव विज्ञानेतिहासाच्या पानावर ठळकपणे नोंदले गेले आहे व त्यांची स्मृती ‘टेस्ट टय़ूब बेबी’ तंत्राच्या रूपाने कायम राहील यात शंका नाही!