दिवसेंदिवस उर्जासंकट तीव्र होत चालले आहे. वीज मिळाली तरी तिचे जर वाढत जाणार आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सौरदीप यंत्रणा हा एक रामबाण उपाय आहे. यात सुरवातीला खर्च जास्त दिसत असला तरी नंतर खूप पैसे वाचू शकतात.
आजकाल वीजकपात सर्वत्र व सर्रास होऊ लागली आहे. शहरे आणि महानगरातूनच नव्हे तर खेडय़ात व दूरवर पसरलेल्या  वस्त्यासुद्धा वीज कपातीच्या जोडीला आहेत. दरवर्षी होणारी वीज दरवाढ अशा अनिश्चित वीजपुरवठय़ाच्या परिस्थितीशी सामना करण्यास ‘सोलर होम लायटिंग सिस्टिम’ एक भरवशाची आणि सर्वोत्तम दर्जाची ऊर्जा पुरवठा करणारी यंत्रणा आहे. ही यंत्रणा स्वतंत्र असल्याने राज्य विद्युत मंडळाच्या वीजपुरवठय़ातील त्रुटी व इतर बाबींचा हिच्यावर विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे ही यंत्रणा बसवून आपण वारंवार होणाऱ्या वीजपुरवठय़ातील त्रासदायक त्रुटीपासून मुक्तता मिळवू शकतो. या यंत्रणेच्या साह्य़ाने आपणास हवे तेवढे दिवे योग्य क्षमता वापरून लावू शकता येतात.
ही यंत्रणा लावण्यासाठी घराचे छप्पर कौलारू घरासारखे उतरत्या स्लॅबचे बनवावे लागते. सूर्याच्या उन्हात सौर सेलचे संच ठेवून ती विद्युतभारीत करून घेऊन त्याद्वारे वीज मिळविता येते. हे तत्त्व वापरून सोलरहोम लायटिंग सिस्टिम करता येते. घराच्या उतरत्या स्लॅबवर सोलर पॅनल्स म्हणजे ‘सोलर संच’उत्तर-दक्षिण लावावे लागतात. सोलर पॅनल्स योग्य क्षमतेची घ्यावी लागतात. योग्य क्षमता म्हणजे आपणास घरात किती दिवे, पंखे, टीव्ही, संगणक इत्यादी सौरऊर्जेवर चालवायची आहेत ते ठरवावे लागते त्यांच्या व्ॉटेजची बेरीज करून एकूण व्ॉटेज वापर ठरवावा लागतो. त्या व्ॉटेजला योग्य असे सोलर मॉडय़ुल्स (सोलर पॅनल्स) घ्यावे लागते. रात्री सूर्य नसताना सौरऊर्जा राहणार नाही. त्यावेळी दिवे, पंखे, टीव्ही इत्यादी लागायला हवेत. त्यासाठी वरील सोलर
मॉडय़ुल्सला सूटेबल बॅटरी घ्यावी लागते. त्याला सूटेबल (योग्य) असे एक इन्वर्टर घ्यावे लागते. दिवसा सौर ऊर्जेने बॅटरी चार्ज होईल व रात्री इन्वर्टरमुळे बॅटरीच्या
डी.सी. व्होल्टेजचे रूपांतर ए. सी. व्होल्टेजमध्ये होऊन घरातील दिवे, पंखे, टीव्ही, संगणक इत्यादींचा वापर करता येईल. सुरुवातीला हा खर्च खूप वाटतो, पण जसाजसा
वीज बिलाचा खर्च वाचेल तसा तसा केलेला खर्च वळता होईल व शेवटी काही वर्षांत सर्व खर्च वळता झाल्यावर
ही सिस्टिम, ही योजना फुकटात पडेल. बॅटरीचा योग्य मेन्टेनन्स केल्यास बॅटरी तीन ते पाच वर्ष चालू शकते. त्यानंतर मात्र ती बदलावी लागते.
सौरसेल म्हणजेच फोटोव्होल्टाईक सेलबद्दलसुद्धा खूप चर्चा चालू आहे. या मार्गाने मिळविलेली ऊर्जा महाग आहे. हे म्हणताना, डिझेल जनरेटर वापरून मिळविलेल्या विजेपेक्षा ही वीज २० ते २५ टक्के स्वस्त असते, हे विसरून चालणार नाही. या मार्गाने मिळणाऱ्या विजेच्या किमती कमी होतील, तेव्हा प्रत्येकाला ही वीज हवी असे वाटेल. पृथ्वीवर तीन तासात सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सर्व जगाची एक वर्षांची गरज भागवू शकेल. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने तयार केलेल्या सौरसेल संचासारखेच संच इतर खासगी कंपन्यांनीही आता विक्रीला आणले आहेत. सरकारी संचाला सवलत मिळते, पण तशी सवलत (सबसिडी) काही खासगी कंपन्याही देतात. सरकारी सवलत मिळवायला बरेच अर्ज-विनंत्या कराव्या लागतात. मात्र, खासगी कंपन्यांचे संच मिळवताना बाजारातून एखादी वस्तू जितक्या सहजपणे आपण आणू शकतो, तशी ती अशा खासगी कंपन्यांकडून सवलत मिळवूनही विकत घेता येते आणि तीसुद्धा कोणतेही अर्ज विनंत्या न करता. शिवाय यातील काही कंपन्यांचे संच सरकारी संचापेक्षा ३० टक्के अधिक वीज देणारे आहेत.
दिवसा वीज सौरऊर्जेने बनवून ती वापरत असताना जास्तीची वीज बॅटरीत साठविता येते आणि रात्री ती  वापरता येते. पुन्हा दिवस सुरू झाला की बॅटरी आपोआप मंडळाच्या बाहेर जाते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्यही वाढते. ही सोय सरकारी संचात नाही. सरकारी पॅनलपेक्षा जास्त व्ॉटेजही काही खासगी कंपन्यांच्या संचात मिळते.आणि आजच्या स्पर्धेच्या एकावर एक फुकटच्या जमान्यात पंखा, सी.एफ.एलचे दिवे वगैरे ही फुकट मिळू शकतात. महाराष्ट्र शासनही आता या योजनेत उतरले आहे.
लोणावळ्याजवळ टी.सी.एस. (टाटा कन्सलन्टन्सी सव्‍‌र्हिसेस) ह्य़ा कंपनीने, फरीयास हॉलीडे रीसोर्टच्याजवळ ‘रहेजा कॉटेज’ नावाचा बंगला टी.सी.एस.च्या टॉप मॅनेजमेंटसाठी बांधला आहे. येथे सर्वकाही सौरऊर्जेवर चालण्याची सोय आहे. वीज मंडळाची वीज गेल्यास बंगल्याला लागणारी वीज सौरऊर्जेवर आपोआप टाकली जाते. रात्र असल्यास सौर ऊर्जेवर चार्ज झालेल्या बॅटरीमधून इनव्हर्टरद्वारे विजेचा पुरवठा आपोआप, संपूर्ण रहेज्या बंगल्याला होतो. त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना वीज गेल्याचे कळतच नाही. वीज मंडळाची वीज परत आल्यास सौरऊर्जेवरील वीज तसेच बॅटरी, इन्वर्टरवर चालणारी वीज आपोआप बंद होऊन बंगल्यामधील उपकरणे वीज मंडळाच्या विजेवर चालू होतात. त्यामुळे ह्य़ा बंगल्यात वीज नाही असे कधीच होत नाही. वरील सिस्टिममुळे टी.सी.एस.चे ३६०० युनिट एका दिवसाला वाचतात. रहेजा बंगल्याची एका वर्षांची बचत सौरऊर्जेच्या वापरामुळे रु. ७९,०००/- इतकी आहे.  वीज मंडळाची वीज गेल्यास इथे कधीच डिझेल किंवा पेट्रोल जनरेटर वापरावे लागत नाहीत. त्यामुळे प्रदूषण तसेच आवाज नाही. त्यामुळे आपल्या गरजेनुसार व बजेटनुसार संच घ्यावा  संच कोणताही घ्या, पण आता जर काळाबरोबर राहायचे असेल, पर्यावरण आणखी बिघडू द्यायचे नसेल, भारनियमनातून स्वत:ला मुक्त करून घ्यायचे असेल, तर सौरऊर्जेवाचून आपल्याला पर्याय नाही हे नक्की.