जिम शेख व त्याची पत्नी फरह, मूल होण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु काही कारणामुळे पूर्ण दिवस भरायच्या आतच बाळ झाल्यामुळे पती-पत्नींना फार काळजी वाटू लागली. डॉक्टरांनी  आईच्या दुधाऐवजी या मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला बाटलीतून दूध पाजण्याचा सल्ला दिला. मात्र दूध फार थंड किंवा गरम असता कामा नये व दुधाचे तपमान आईच्या दुधाइतकेच – म्हणजे ३२ – ३४ अंश सेल्सिअस – असावे अशी अटही घातली. फरह कायम बाळापाशी असल्यामुळे जिमलाच दूध तापवून आणण्यासाठी पळापळ करावी लागत असे. दूध तापवून आणण्यासाठी वर खाली करावे लागत असे. कितीही गरम केले तरी योग्य उष्णतेचे दूध बाळाला पाजले जात आहे की नाही याची दोघांना खात्री नव्हती. दूध जास्त गरम असल्यास थंड पाण्याखाली काही वेळ धरून दूध कोमट करावे लागत असे. तू अभियंता (इंजिनीयर)असून काही उपयोगाचा नाहीस. आपोआपच अपेक्षित तपमानापर्यंत गरम होऊ शकणाऱ्या बाटलीचा शोध घेऊ शकत नाहीस. बायकोचा हा टोमणा ऐकल्यानंतर जिम खरोखरच अशा बाटलीच्या शोधाच्या मागे लागला. पुढील ४-५ वर्ष अशा बाटलीचे पूर्वरूप तयार करण्यासाठी तो धडपडत होता, काही वेळा मित्रांची मदत घेत यूमी बेबी बॉटलचा शोध लावला.
या बाटलीच्या बाहेरच्या आवरणात उष्णद्रव असून तो पदार्थाला घन पदार्थात बदलू शकणाऱ्या पदार्थापासून बनवण्यात आलेला आहे. घनपदार्थातून उष्णता उत्पन्न होऊन बाटलीतील दूध गरम होऊ शकते. बाटलीच्या वरच्या बाजूचे बटन ऑन केल्यावर निदर्शकावरील एलइडीचा रंग काही वेळात बदलतो व दूध योग्य उष्णतेपर्यंत तापल्याची  सूचना मिळते. दूध पिऊन संपल्यानंतर यूमी बाटलीला तापलेल्या पाण्यात किंवा इलेक्ट्रॉनिक स्टीम स्टेरिलायझर (जंतूमारक) मध्ये काही वेळ ठेवून बाहेर काढल्यानंतर उष्णता टिकवून ठेवणारे आवरण पुन्हा एकदा वापरण्यास तयार होते. अशा प्रकारे ही बाटली १०० वेळा तरी वापरता येऊ शकते. शेखच्या या तंत्रज्ञानाला २००८ मध्ये साली लंडन तंत्रज्ञान निधी संस्थेचे संरचना व अभियांत्रिकीचे पारितोषक मिळाले आहे.