सायकलचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर

कुठल्याही सायकलचे स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करणारे यंत्र अमेरिकेतील एका कंपनीने शोधून काढले आहे.

कुठल्याही सायकलचे स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करणारे यंत्र अमेरिकेतील एका कंपनीने शोधून काढले आहे. या यंत्राचे नाव कोपनहेगन व्हील असे असून ते सायकलच्या मागच्या भागात बसवले जाते व त्यात संगणक, बॅटरी, संवेदक यांचा समावेश आहे. सायकलस्वार कसे पायडल मारतो किंवा त्याला ते किती जड जाते हे संवेदकाने समजते. या सायकलवरील मोटार जेव्हा मदत लागेल तेव्हा सुरू करता येते. हे यंत्र बिनतारी असून ते सायकलस्वाराच्या स्मार्टफोनला जोडलेले असते. त्यात सायकल किती अंतर प्रवास करून गेली आहे हे समजते, तसेच किती उष्मांक म्हणजे कॅलरी तुम्ही जाळल्या ते तुमच्या मित्रालाही तुम्ही कळवू शकता. चालकाला सायकल ठेवायची असेल तर दूरनियंत्रणाने चाक लॉक करता येते. सायकलची मोटार ही सायकलस्वाराच्या गतीशी मेळ घालणारी असते असे मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सेन्सेबल सिटी लॅबचे असाफ बिडरमन यांनी सांगितले.
तुमच्या बरोबरीने हे यंत्र प्रवास करील व तुम्हाला सायकल चालवणे चढाच्या ठिकाणी सोपे जाईल. कोपनहेगन व्हील व सायकलस्वाराची ऊर्जा यांच्या मदतीने सायकल पुढे जाईल. बिडरमन यांनी सुपरपेडेस्ट्रियन इनकार्पोरेशन ही संस्था सुरू केली असून त्यांनी एमआयटीकडून या तंत्रज्ञानाचा परवानाही घेतला आहे. कोपनहेगन व्हील तुमची सायकल ताशी ६० किलोमीटर वेगाने नेऊ शकते पण सॉफ्टवेअरच्या मदतीने स्थानिक वेगाच्या मर्यादा यात लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे युरोपात ही सायकल ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने जाईल. सायकल वापरण्याकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे बिडरमन यांनी सांगितले. या प्रकल्पाला इटलीच्या पर्यावरण मंत्रालयाने मदत दिली आहे.
डेन्मार्क देशातील कोपनहेगन या सायकलस्नेही शहराच्या महापौरांनीही त्याला मदत दिली आहे. तेथे ५५ टक्के लोक सायकली वापरतात व रोज १.२ दशलक्ष कि.मी अंतर कापतात. कोपनहेगन व्हील वापरलेल्या १००० सायकली ऑर्डर दिल्यास उपलब्ध होत्या. सुपरपेडेस्ट्रियनच्या संकेतस्थळावरून यातील ८१० सायकली प्रत्येकी ६९९ डॉलरला खरेदी केल्या गेल्या. त्यातील अनेक ग्राहक अमेरिकेतील आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया, केनिया, मादागास्कर व इतर ठिकाणचेही काही ग्राहक या सायकलीला मिळाले आहेत. त्या पुढील उन्हाळ्यात नोंदणी केलेल्या लोकांना मिळतील. यात तुमची सायकल तशीच राहते, त्यावर लावण्यासाठी फक्त हे उपकरण मागच्या चाकासह दिले जाते ते तुम्ही तुमच्या सायकलमध्ये वापरायचे असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bicycle turned as electric vehicle