नव्वद वर्षांपूर्वी शोधलेली बीसीजी लस वापरत आहोत. त्यामुळे लहानपणी क्षयापासून संरक्षण मिळत असले तर तिचा परिणाम आयुष्यभर टिकत नाही. नव्या लसीसाठी सध्या जगभर अकरा वैद्यकीय चाचण्या चालू आहेत. त्यातून एखादी प्रभावी लस निर्माण झाली तर उपचाराच्या खर्चाची कोंडी सुटणार आहे. तोपर्यंत क्षयाच्या बॅक्टेरियाला काबूत ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे.
संसर्गजन्य रोगांत जगभर आपले अधिपत्य गाजवणारा रोग म्हणजे क्षय रोग. हा असा पाहुणा आहे की येतो चोरपावलाने पण त्याची जेव्हा ओळख पटते तेव्हा तो बाहेर जायचे नावच काढत नाही! तसे म्हटले तर क्षय रोगाच्या मायकोबॅक्टेरियमचे गनिमी कावे आदिम कालापासून चालू आहेत. त्याच्या अस्तित्वाचे पुरावे अगदी वेदकालीन आहेत. त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी क्षयरोगावरील उपचार तावून-सुलाखून आणि कालबद्ध केलेले आहेत. पण तो काळ काही महिन्यांचा असल्याने उपचार घेणारे रुग्ण नियमितपणे गळत आहेत. असे अपुरे उपचार घेऊन परत समाज प्रवाहात सामील होणाऱ्या रुग्णांमुळे क्षयरोगजंतूंच्या प्रतिजैवकास दाद न देणाऱ्या नव्या जातकुळी निर्माण होत आहेत. वर्गीकरण करायचे झाले तर नेहमीच्या प्रतिजैवकांना दाद देणारे मवाळ क्षयजंतू, विशिष्ट प्रतिजैवकांना विरोध करणारे टऊफ-ळइ जंतू आणि पुढे जाऊन अनेक प्रतिजैवकांना दाद न देणारे ऊफ-ळइ जंतू असे हे तीन वर्ग सध्या तुमच्या आमच्यात वावरत आहेत! नव्या क्षयरोगजंतूंच्या निर्मितीची कल्पना यावी म्हणून आकृती दिली आहे.
क्षयरोगाच्या बॅक्टेरियाचे असे तीन प्रकार झाल्यामुळे रोगाच्या पहिल्याच निदानात बॅक्टेरियाच्या प्रकाराचे निर्धारण निकडीचे बनले. एकाच चाचणीत हे पार पाडण्याची क्षमता मायकोबॅक्टेरियमचा डीएनए क्रम पहाण्याने साधणार होती. सध्या क्षयरोगाच्या तीनही बॅक्टेरियांचा ‘मानक’ (standard) डीएनए क्रम हाती असल्याने रुग्णाच्या थुंकीत असणाऱ्या बॅक्टेरियाच्या डीएनए क्रमाशी तो पडताळून पाहून क्षयाचा प्रकार ठरवता येतो.
अशा प्रकारची चाचणी अमेरिकेतील न्यू जर्सी विद्यापीठातील संशोधक आणि ‘सेफेइड’ कंपनीच्या सहकार्याने विकसित झाली आणि त्याला नाव दिले गेले Genexpert/ MTB/ RIF चाचणी. या चाचणीत प्रथम ‘पीसीआर’ तंत्राने क्षयाच्या बॅक्टेरियाचा डीएनए अंश वाढवला जातो. नंतर त्यातील डीएनए क्रम मानक बॅक्टेरियाच्या क्रमाशी पडताळला जातो आणि त्याचबरोबर रिफांपिसिन प्रतिजैवकाला बॅक्टेरिया दाद देतात की नाही हेही निश्चित केले जाते. क्षयरोग निदानाच्या या पद्धतीची शहानिशा डिसेंबर २०१० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आणि त्याला अधिकृत मान्यता मिळाली. तसेच या पद्धतीचा वापर जगभरातील रुग्णांसाठी करण्यासाठी सुरुवातीला एकवीस देशात ही यंत्रे व लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला. भारतातही अठरा ठिकाणी ही यंत्रे काम करू लागली आहेत.
वरच्या चाचणीखेरीज क्षयरुग्णाच्या उच्छवासातील (exhaled air) वायुरुप सेंद्रिय घटकांची तपासणी करून त्यानुसार बॅक्टेरियाच्या प्रकाराची निश्चिती करण्याची चाचणी अमेरिकेच्या व्हरमाँट विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. त्यातील प्रमुख संशोधक जेन हिल यांच्यामते ही चाचणी जलद व अचूक निष्कर्ष देईल. मात्र प्राण्यांमधील चाचणीचे निष्कर्ष रुग्णावर तपासायला काही काळ जावा लागणार आहे. जानेवारीच्या ‘जर्नल ऑफ ब्रेथ रिसर्च’ मधे तपशील प्रकाशित करण्यात आला आहे. याखेरीज क्षय बॅक्टेरियाच्या पृष्ठभागी असलेल्या ट्रेहॅलोज या शर्करेशी फ्ल्युओरेसंट रंग जोडून ‘प्रकाशित’ बॅक्टेरियांची हालचाल फुफ्फुसात पहाता येणार आहे. ही चाचणी शोधली आहे अमेरिकेतील बेथेस्डाच्या क्लिफटेन बॅरी आणि इंग्लंडमधील ऑक्सफोर्डच्या बेन डेव्हिस यांनी. मात्र याचा उपयोग मुख्यत्वे संशोधनासाठी होणार आहे.
क्षयरोगाच्या नव्या चाचणीमुळे वेळेवरच औषधोपचाराची दिशा निश्चित होत असल्याने परिणामकारक उपचाराला मदत होणार आहे. आत्तापर्यंतच्या निदानाला काही आठवडय़ाचा काळ लागत असल्याने क्षयरुग्णांच्या तपासणीला वेग मिळत नव्हता. तपासणीचा ‘बॅकलॉग’ मोठा होता. डीएनए चाचणीने निदान झालेल्या रुग्णांची संख्या वाढणार आहे. त्याबरोबरच उपचार केंद्रेही वाढवायला लागणार आहेत. या सर्व खर्चाचा मेळ कसा घालायचा हा नवीन प्रश्न देशोदेशींच्या सरकारापुढे आहे. दीर्घ व महागडा उपचार टाळायचा असेल तर दुसरा मार्ग म्हणजे परिणामकारक लस निर्मितीचा ठरतो. मात्र या दिशेने अत्यल्प प्रगती आहे. अजूनही आपण जवळजवळ नव्वद वर्षांपूर्वी शोधलेली बीसीजी लस वापरत आहोत. त्यामुळे लहानपणी क्षयापासून संरक्षण मिळत असले तर तिचा परिणाम आयुष्यभर टिकत नाही. नव्या लसीसाठी सध्या जगभर अकरा वैद्यकीय चाचण्या चालू आहेत. त्यातून एखादी प्रभावी लस निर्माण झाली तर उपचाराच्या खर्चाची कोंडी सुटणार आहे. तोपर्यंत क्षयाच्या बॅक्टेरियाला काबूत ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे.
एका बाजूने क्षयनिदानाची चाचणी उपचारांना वेग देत असताना दुसरीकडे त्या प्रयत्नांना धक्का देणारे संशोधन प्रकाशित झाले आहे.
क्षयापासून अपाय न होताही असंख्य लोकांत क्षयाचे बॅक्टेरिया अनेक वर्षे सुप्तावस्थेत रहातात हे आत्तापर्यंत माहित होते. पण त्याची नक्की जागा कुठली हे निश्चित होत नव्हते. त्याबाबत नुकतेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बिकुल दास, फेलशेर आणि इतर संशोधकांनी हे बॅक्टेरिया अस्थिमगजातील (बोन मॅरो) मूळ पेशीत आसरा घेत असल्याचे दाखवले. संशोधनाचे निष्कर्ष जानेवारीच्या ‘सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीन’ या पत्रिकेत नमूद करण्यात आले आहेत.
संशोधनात भूतानचे काही रुग्ण सामील होते. मजा अशी, की हे रुग्ण ‘डॉटस’चा नियमित उपचार घेऊन बरे झाले होते. मूळ पेशीतील आश्रयामुळे क्षयाचे बॅक्टेरिया आतून शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून, तर बाहेरून प्रतिजैवकांपासून सुरक्षित रहात होते. आता या ‘वेडय़ा’ मूळपेशींना ‘वळणावर’ कसे आणायचे हा नवीन प्रश्न संशोधकांपुढे आहे. कदाचित त्याच्यातच क्षयनिर्मूलनाचा प्रभावी उपाय दडलेला असेल. क्षयाचे नियंत्रण करताना नवीन आव्हाने निर्माण होत असली तरी उपचाराच्या नवीन प्रभावी पद्धतीही उपयोगी पडत आहेत हे निश्चित!