सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या लेटय़ूस या वनस्पतीपासून स्वत:हून वाढणाऱ्या विजेच्या तारा तयार करणे भविष्यात शक्य होणार असून त्यामुळे जैविक संगणक व जैविक यंत्रमानव (रोबोट) तयार करणे शक्य होणार आहे.
पश्चिम इंग्लंड विद्यापीठामधील अँड्रय़ू अडमाटझकी यांनी चार दिवसांच्या लेटय़ूसच्या रोपांवर प्रयोग करून त्यात विद्युतवहन होत असल्याचे सिद्ध केले आहे. जैविक वायर्स तयार करण्यासाठी त्यांनी अ‍ॅल्युमिनियम फॉइलचे दोन इलेक्ट्रोड लेटय़ूसच्या रोपाला जोडल्यानंतर तो सर्व संच उध्र्वपातित पाण्यात ठेवला, त्यानंतर दोन इलेक्ट्रोडमध्ये २ ते १२ व्होल्ट इतके व्होल्टेज देण्यात आले, त्यात पुरवलेल्या ऊर्जेइतकीच उर्जा निर्माणही झाली. लेटय़ूसच्या रोपाचा प्रतिरोध हा वेळोवेळी बदलत होता.
उत्पादित व्होल्टेज हे दिलेल्या व्होल्टेजपेक्षा दीड ते दोन व्होल्टने कमी होते त्यामुळे १२ व्होल्ट देऊन १० व्होल्टची निर्मिती करण्यात आली. व्होल्टेजमध्ये विशिष्ट कालांतराने स्पंदने दिसून आली व वायरमधून काहीसा आवाजही येऊ लागला. असा आवाज सेन्सर तयार करण्यासाठी योग्य नाही कारण त्यामुळे ऊर्जा वाया जाते असे त्यांनी मान्य केले. पण काही नवीन पद्धती विकसित केल्या तर वनस्पतींची मुळे व सिलिकॉन कंपोनंट यांच्यात जोडण्या करणे शक्य आहे.
जैव संकरित स्वविकसित मंडलांमध्ये वनस्पतीयुक्त वायर्सचा वापर शक्य आहे. त्यासाठी वैज्ञानिकांना वेडय़ावाकडय़ा मुळांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढणे आवश्यक आहे, असे अ‍ॅडमटझकी यांनी सांगितले.माणूस किंवा कुठलाही सजीव विद्युतवहन करू शकतो त्यामुळे त्यांचा वावर विद्युतवाहक तारांसारखा करता येतो. अनेक प्राणी गतिहीन राहत नाहीत व कालांतराने त्यांचा मृत्यू होतो, पण वनस्पती बराच काळ टिकून राहतात. फक्त त्यांना प्रकाश, पाणी व खनिजे मिळणे आवश्यक असते. लेटय़ूस आधारित जैविक वायर्सचे हे प्रारूप तयार करण्यात यश आले असले तरी ते फारच प्राथमिक आहे. त्याचा व्यावसायिक वापर योग्य प्रकारे करता आला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.