विज्ञान आणि संशोधन जगताचा  वेध  ‘दॅट्स इट’च्या माध्यमातून पुढील वर्षभर घेण्यात येईल. अघिकाधिक ज्ञानरंजक मजकूर देण्याचा प्रयत्न या नव्या पानाद्वारे केला जाईल. या पानाबाबत आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि अपेक्षांचे स्वागत आहे..
नववर्षांच्या आठवडाअखेरीपर्यंत संकल्पमित्रांची संकल्पशत्रुत्वाकडे वाटचाल झाली असेलच. काहींनी नववर्षांच्या पहिल्या-दुसऱ्या दिवसांपासूनच संकल्पमोड प्रक्रियेचा अनुभव घेतला असेल, तर काही चिवट ‘गोल’पटू लवकरच संकल्पमार्गाच्या निसरडय़ा टप्प्यानजीक पोहोचले असतील. नववर्ष संकल्प आणि संकल्पमोडीमागेही विज्ञान दडले आहे. संशोधनांच्या दाखलेसद्दीमध्ये म्हणे २० टक्के संकल्पमित्र पहिल्याच आठवडय़ात ढेपाळनिवासी होतात, तर पुढल्या वर्षभरामध्ये इतर ८० टक्क्य़ांची तेथे टप्प्याटप्प्याने रवानगी होते. संकल्प संशोधकांच्या हेकट प्रजातीच्या मते ७८ टक्के संकल्प मोडले जातात, तर आठ टक्के संकल्पसिद्धीचा खडतर मार्ग चोखाळून दाखवितात. (राहिलेल्या १४ टक्क्य़ांचा हिशेब त्यांना देता येत नाही) तुम्ही कोणत्या टक्क्य़ांमध्ये आहात, त्यानुसार  संकल्प प्रकाराच्या विज्ञानाकडे पाहा. या गावचेच नसलात, तर मग या ‘गोल’ कारभाराची गंमत अनुभवा..
‘गोल’ बच्चन!
उदारीकरणाच्या रेटय़ात जी कैक ‘फॅड्स’ आपल्यावर लादली गेली आणि नकळत आपल्या आयुष्याला चिकटली, त्यात सालाबादी येणाऱ्या ‘डे’ साजऱ्या संस्कृतीपासून ते दूरच्या नवमूल्यांचा स्वीकार करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. ‘थर्टी फर्स्ट’नामे दिवसाचा अतिउत्साह साजरी झाल्यानंतर नवीन वर्षांच्या संकल्प प्रकल्पांना म्हणजे सोप्या मऱ्हाटीत ‘रेझोल्यूशन्स’ना उत्साहाचा ‘दिखाऊ’ चेहरा दिला जातो. अतिरिक्त वजनक्षती कार्यक्रम (डाएट), चिवटबुऱ्या सवयींशी काडीमोड, व्यसनांचा नायनाट आदी गटांत अभिनव वाटतील इतक्या याद्यांची निर्मिती ‘रेझोल्यूशन्स’च्या, ‘गोल’ सेटिंगच्या गोंडस नावाने तयार केली जाते. प्रत्यक्षात आखलेले प्रकल्प, केलेल्या याद्या, ठरविलेला मनोव्यापार आणि आखलेले संकल्पचित्र यांची आठवडय़ाच्या काही दिवसांतच विल्हेवाट लागते. पुढच्या दिवसांत ठरविलेल्या ‘गोल्स’ना शून्यरूपी ‘गोल’ करून झाल्यानंतर आधीच्याच ध्येयरहीत रोजरडीचे जगणे पुन्हा सुरू होते. अपूर्ण मनोकामनांच्या पश्चात्तापात ‘नवे वर्ष नवे संकल्प’ मोडण्याचे सातत्य कायम राहते. सध्याच्या सतत ‘अपडेट’ होत राहणाऱ्या तंत्रज्ञान राक्षसाच्या बाह्य़ आक्रमणाने जगण्यावर इतके राज्य करायला सुरुवात केली आहे, की मनशक्तींना, विचार शक्तींना, निर्णय क्षमतांना ठिसूळ करण्याचे कार्य जोमाने होत आहे. त्यामुळे या आक्रमणाच्या आधी आलेले संकल्पांचे, ‘गोल सेटिंग’चे आणि रेझोल्यूशनचे नियम आणि पारंपरिक पद्धती कालबाह्य़ होण्याची भीती आहे. डेल कार्नेगी आणि ब्रायन ट्रेसी किंवा दीपक चोप्रा ते रॉबिन शर्मा या ‘सेल्फ हेल्प’ महागुरूंची सल्लातत्त्वे पुस्तकी चौकटीत पाहायलाच आकर्षक वाटत असून, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी अव्यवहार्य बनत चालली आहे. गोलसेटिंग आणि वर्षनियोजनाच्या सगळ्याच घटकांना मारक अडथळ्यांना टाळण्यासाठी त्यांच्या जुन्या नियमांची पुनर्बाधणी करावी लागेल. तशी गरजच आज निर्माण झाली आहे. गोलसेटिंग किंवा संकल्पचित्र सध्याच्या वेगापुढे पळणाऱ्या आयुष्यात अव्यवहार्य गोष्टी बनत चालल्या असल्या तरी अशक्य नाहीत. मात्र तरीही वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात ठरविलेली गोल्स ‘गोल’ का होतात त्याचा विचार करू या.
बदलविरोधी मन : शेकडो विद्यापीठांतील संशोधनाअंती काढण्यात आलेल्या निष्कर्षांवरून आपल्या सवयी आणि रोजच्या जगण्याच्या पद्धती सातत्यामुळे बदलबंद (लॉक) झालेल्या असतात. नव्या बदलांना स्वीकारायला मन तयार नसते. हार्वर्ड स्कूल ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक रॉबर्ट केगान यांच्या मते एखादी सतत सवयीने तयार झालेली गोष्ट मन मोडायला सहज तयार होत नाही. काही दिवसांचा थांबा घेतल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी जशाच्या तशा केल्या जातात. त्यामुळे रेझोल्यूशन, संकल्पांचा आठवडय़ाच्या पहिल्याच दिवसांत बोऱ्या वाजतो. सर्वच सेल्फ हेल्प गुरू ते आपल्याकडच्या पुराणांचा दाखला देऊन २१ दिवसांच्या बदलांचा कार्यक्रम आखतात. वाईट सवयी, व्यसन यांना २१ दिवसांची विश्रांती देऊन चांगल्या गोष्टी २१ दिवस केल्यास म्हणे जुन्या सवयी नष्ट होतात. पण आधीच त्या वाईट सवयींची, व्यसनांची २१ दिवसांची चक्रे लोटून तपे लोटली असल्यास त्यांना बदलणे कठीण असल्याचे विसरतात. काही प्रमाणात या २१ दिवसीय कार्यक्रमांना यश येते. नंतर पुन्हा ‘मागील पानावरून पुढे’ प्रवृत्ती २१ दिवसांची नवी आवर्तने करण्यास सज्ज होते.  
मनमौजीपणाचा स्वभावदोष : संकल्प केल्यानंतर मन मारून जगण्याची शक्ती आपल्यातून लोप पावत चालली आहे. क्रयशक्ती विस्ताराने किंवा इतर कारणांमुळे विविध स्वभावदोष निर्माण होत चालले आहेत. त्याचा परिणाम संकल्पमोडीवर होतो.
ठरविलेली ध्येये साध्य करण्यासाठी मेहनतीचा खडतर मार्ग स्वीकारण्याची तयारी संपली की मग आपोआप व्यक्तीची संकल्पसुटका होते. त्यानंतर मग आपल्या मनमौजी वृत्तीला मन‘मोडी’ करण्याची व्यक्तीची शक्यता संपून जातो. वर्षोनुवर्षे केवळ नावाला संकल्पचित्र आखले जाते आणि स्वभावदोषामुळे ते मोडले जाते.
निश्चित कृती आराखडय़ाचा अभाव: सेल्फ हेल्प पुस्तकांच्या आदेशानुसार लोक निव्वळ संकल्पाच्या याद्या तयार करतात. त्या संकल्पांना सिद्धीस नेण्याचा कृती आराखडा तयार करण्याचे विसरतात. ही संकल्पना खिंडारे पडण्याची एकप्रकारे तयारी असते. निव्वळ दुसऱ्यांवर छाप पाडण्यासाठी संकल्पचित्रांची यादी सार्वजनिक केली जाते. मात्र त्याची खरी गरज डोक्यात पक्की नसल्याने संकल्पमोड नक्की होत असतो. लोक दिखाऊपणाऐवजी स्वविकासाकरिता संकल्प करतानाही स्वतच्या मनाची पुरेशी मशागत करीत नाहीत. कृती आराखडा नसल्याने शिस्तीला वाकडी वाट लवकर लागते आणि संकल्प धुळीला मिळण्याची शक्यता तयार होते, असे विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे.
दूरदृष्टीचा अभाव : वेगवेडामुळे दृष्टिबद्ध होण्याच्या या दिवसांमध्ये दूरदृष्टीची अपेक्षा करणे अतिरेकी ठरेल. लोक संकल्पसिद्धी करण्यात केल्या जाणाऱ्या चुकांना शिक्षेचा व योग्य दिशांना बक्षिसांचा अवलंब करतात. हे करणे काही अंशी योग्य असले, तरी नंतर शिक्षा भोगण्याचे प्रमाण हे बक्षीस मिळविण्याच्या कितीतरी पुढे निघून जाते व पराभूत मानसिकता व्यक्तीला आणखी शिक्षा भोगण्यासाठी तयार करीत राहते. या शिक्षाभोगी वृत्तीने नकारात्मकतेत वाढ होऊ लागते आणि संकल्पचित्र कुरूपतेचा चेहरा घेऊ लागते. आपण आत्ता केलेल्या कष्टांची पुढे आपल्याला किती प्रमाणात चांगली फळे मिळतील, याची खात्री हरविल्याने संकल्पांना अल्पावधीत विराम मिळतो.
(संदर्भ : हफिंग्टन पोस्ट, फास्ट कंपनी, रॉबर्ट केगान (हार्वर्ड विद्यापीठ),  पीटर कींडरमन यांचा लेख (लिव्हरपूर वीद्यापीठ), पॉवर ऑफ हॅबिट (चार्ल्स डुहिग)