‘अर्बन रीजनरेशन’सारखे शब्द आपल्याकडेही हल्ली ऐकू येतात, त्याचं मूळ युरोपातलं. ‘पुनर्निर्माणा’च्या नावाखाली तिथे काय झालं आणि स्थिती आत्ता काय आहे, याकडे पाहिल्यास काय जाणवतं?
‘ट्रोजन हॉर्स’ हा शब्दप्रयोग आपल्या कानावरून बऱ्याच वेळा गेला असतो.. ग्रीक मिथककथांचे तुटक संदर्भ , होमरचं ‘इलियड’ किंवा ब्रॅड पिटने ‘अकिलस’ साकारला तो ‘ट्रॉय’ हा भव्य सिनेमाही डोळ्यांसमोर तरळून जातो अशा वेळी. ट्रॉयच्या युद्धात वेढा मोडून नगरात प्रवेशण्यासाठी भव्य लाकडी घोडय़ाच्या पोटात लपून ग्रीक योद्धे नगरात घुसतात आणि बेसावध ट्रॉयवासीयांशी युद्ध जिंकतात, या पाश्र्वभूमीवर व्यवस्था भेदून गुप्त शिरकाव करणे आणि ‘परिस्थिती बदलून टाकणे’ याला उद्देशून ‘ट्रोजन हॉर्स’ हा शब्द योजला जातो. खरे तर याचा आपल्या शहरांशी काही संबंध आहे का, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे; पण तसा संबंध आहे. जेन्ट्रिफिकेशनबद्दल बोललो आपण मागच्या वेळी; ‘अर्बन रीजनरेशन’चाही उल्लेख झाला. एखाद्या शहरी समूहाच्या, ओघानेच शहराच्याही सामाजिक- सांस्कृतिक- आíथक भवतालावर खोलवर परिणाम करणाऱ्या या दोन प्रक्रियांचा परस्परांशी काही संबंध आहे का याची विद्यापीठीय वादचर्चा १९९०च्या दशकात युरोपात सुरू झाली. त्याचा आढावा आपण घेऊच पण या वादचच्रेत भरीव योगदान देणाऱ्या फ्रांको बियांकिनी या विद्वानाचे मत मजेशीरही आहे, अंतर्मुख करणारेही आहे. बहुतेक वेळा ‘अर्बन रिन्यूअल’ किंवा ‘अर्बन रीजनरेशन’ ही जेन्ट्रिफिकेशनची ‘ट्रोजन हॉर्स व्हर्जन’ असते, असे फ्रांको म्हणतो. सोप्प्या शब्दांत सांगायचे तर वरकरणी स्वतंत्र, निरुपद्रवी किंवा अगदी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ थाटाचे वाटले तरी शहरातील जुन्या भागांचे पुनíनर्माण/ ‘अर्बन रीजनरेशन’ हे तेथील निम्नआíथक स्तरातील लोकांना शहराच्या परिघावर ढकलणारे, त्यांच्या अस्तित्वाला मिटून टाकणारे असते. युरोपातल्या अनेक शहरांकडे बारकाईने पाहता हे प्रकर्षांने जाणवते, कारण १९७०च्या दशकात सुरू झालेले हे ‘अर्बन रीजनरेशन’ पुढे युरोपीय संघात ‘शहर विकासाचे’ एक महत्त्वाचे साधन मानले गेले, ‘अर्बन रीजनरेशन’ हा केंद्रिबदू मानून विकासाची जी धोरणे आखली गेली त्यांचे भले-बुरे परिणाम आता दृश्यमान झाले आहेत, अभ्यास करण्यासाठी परिपक्व मानले जात आहेत.
दुसऱ्या महायुद्धातून सावरणाऱ्या युरोपात अनेक अर्थव्यवस्था आणीबाणी अनुभवत होत्या. शतकभर आधी झालेल्या औद्योगिक क्रांतीने या देशांच्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला होता. अवजड उद्योग, प्रक्रियाप्रधान उद्योग निर्यातीवर भर देणारे होते. साहजिकच भरभराटीला आलेली लहान-मोठी बंदरे आणि त्यांना लडिवाळपणे लगटून वसलेली टुमदार शहरे अशी ‘बंदर-शहरे’/ पोर्ट सिटीज हा युरोपचा महत्त्वाचा हिस्सा होता. लंडन, रोटरडॅम, हॅम्बर्ग, अँटवर्प, गिनोआ यांसारख्या अतिव्यग्र, भव्य बंदरांपासून डब्लिन, लिव्हरपूलसारख्या मध्यम बंदरांपर्यंत अनेक शहरे अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होती. मात्र मालवाहू जहाजांत ‘कंटेनर’ वापरण्यात येऊ लागले, तसा मालवाहू जहाजांचा आकार वाढू लागला.. मग अनेक बंदरांमधल्या सुविधा, जुन्या गोद्या अपुऱ्या पडू लागल्या. बंदरे खोल समुद्रात हलवली गेली तरी बंदर आणि शहर या जोडरचनेला तडे गेलेच. कालांतराने युरोपीय अर्थव्यवस्थेची घडी बदलू लागली तसे जुने उद्योगही शहरांतून बाहेर जाऊ लागले वा बंद पडू लागले. उत्तम घडीव बांधणीच्या जुन्या गोद्या, गोदामे, विश्रांतिगृहे, कस्टम-क्लीअिरग एजंटांच्या कचेऱ्या, गोदी कामगारांच्या वसाहती किंवा मग कारखाने आणि कामगारांना जगवणाऱ्या कित्येक जागा यांचा ‘उपयोग’ नव्हता आता ‘शहराला’! आय.टी. इंडस्ट्री किंवा आय.टी. एनेबल्ड सíव्हस इंडस्ट्री ही शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची ठरू पाहणार होती. अर्थात जुन्या जागांचा ‘उपयोग’ नसला तरी जमिनीला मोल होतेच. ‘कलात्मक’ रचना असणाऱ्या इमारती- गोद्या, कारखाने वा सार्वजनिक चौक- पर्यटनाला चालना देऊ शकणार होत्या. ‘टुरिझम इंडस्ट्री’ अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देऊ शकणार होती. अडचण म्हणावी तर जुन्या जागांची नव्हती पण जुन्या जागा आणि हा ‘वारसारूपी अवकाश व्यापलेल्या’ रहिवासीवर्गाची होती. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपातून वा आशियातून स्थलांतर केलेल्या लोकांनी हा अवकाश जवळजवळ काबीज केला होता! दक्षिण लंडनमध्ये म्हणून ज्याला हिणवले जाते त्या वेस्ट इंडियन स्थलांतरितांनी दाटी केलेल्या ‘ब्रिक्सटन’ भागाचे उदाहरण अशीच एक ‘क्लासिक केस’ मानले जाते. उत्पादनप्रधान उद्योगांकडून सेवाप्रधान उद्योगांकडे झालेली युरोपीय अर्थव्यवस्थेची ही वाटचाल शहरांच्या जुन्या भागांच्या ‘पुनíनर्माणा’च्या मागणीला जोर देऊन गेली. इमारती, वसाहती, सार्वजनिक जागा यांच्या ‘पुनर्वापरा’चा विचार त्यात होताच होता; पण पुनर्वापर ‘कसा’ व्हावा यासोबतच वापर ‘कोणी’ करावा याचा विचार अधिक बारकाईने केला गेला होता. शहरीकरण, त्यामागचा भूगोल, सार्वजनिक अवकाश वा ‘पब्लिक स्पेस’चा वापर याचा हयातभर मागोवा घेणाऱ्या डेव्हिड हार्वेसारख्या अव्वल विचारवंताचं एक वाक्य फार चपखल आहे इथे – ‘‘पुनíनर्माण’ झालेल्या शहरी भागांत सार्वजनिक अवकाशात ‘वावर’ प्रत्येकाचा असू शकतो पण त्याचा ‘वापर’ मात्र फार कमी जण करू शकतात.’ म्हणूनच ब्रिक्सटनच्या ‘पुनíनर्माणा’नंतर नवस्थलांतरितांत गौरवर्णीय टक्का वाढतो, तिथला कृष्णवर्णीय तिथे ‘उपरा’ होऊन बसतो, सार्वजनिक बागा-बगीचे-पब्स-उपाहारगृहे तितकीशी ‘सार्वजनिक’ राहत नाहीत आणि ‘ट्रोजन हॉर्स’च्या टापा कानात घुमत राहतात.
युरोपात ‘अर्बन रीजनरेशन’ने विकासाच्या धोरणांत देखील स्थान मिळवलेले दिसून येते. शहरांचे पुनíनर्माण करताना शहरांमधील ‘सांस्कृतिक अवकाशाचे’ पुनíनर्माण केले आणि ‘संपन्न सांस्कृतिक वारशाचे’ जतन जर केले तर पर्यटनाला चालना मिळू शकते, पर्यटनकेंद्री अर्थव्यवस्था शहरांत रुजू शकते या विचारातून युरोपीय संघाने ‘कल्चरल कॅपिटल ऑफ युरोप’ अर्थात ‘युरोपची सांस्कृतिक राजधानी’ हा उपक्रम सुरू केला. युरोपीय शहरांमधल्या स्पध्रेतून एक शहर त्याचा वारसा, संस्कृती(?) या आधारावर ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून निवडले जाईल, दोन वष्रे त्याला तो मान मिळेल, संस्कृती जपण्याकरिता(!) शहराच्या सांस्कृतिक भागांच्या ‘पुनíनर्माणा’साठी भरघोस आíथक साहाय्य मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळून ते शहर आíथक-सामाजिक आघाडीवर प्रगती करेल हा त्यामागचा हिशेब. बरे, संस्कृती म्हणजे काय तर कला आणि कलात्मक परंपरा!! त्यामुळे सुंदर इमारती, बागा, बगिचे, नृत्यगृहे, म्युझियम्स, उपाहारगृहे अशी ‘बहरलेली संस्कृती(!) लाभलेल्या जीनिव्हा, अथेन्स, पॅरिस, अ‍ॅमस्टरडॅम, लंडन, ग्लासगो, एडिनबर्ग या ‘पारंपरिक’ सांस्कृतिक शहरांनी या उपक्रमाचा पुरेपूर फायदा घेतला. आपले सुंदर विभाग अधिक सुंदरिबदर बनवले, युरोपियन युनियनकडून आíथक साहाय्यबिहाय्य घेत ‘सांस्कृतिक सोहळे’ – म्हणजे क्रीडा स्पर्धा किंवा कल्चरल फेस्टिव्हल- साजरेबिजरे केले. पण ‘दादा’ शहरांचे नंबर लागून गेल्यानंतर मध्यम वा लहान शहरांनी जेव्हा यात भाग घेतला तेव्हा तेथील निम्नवर्गाची, शहरी कष्टकरी आणि स्थलांतरित वर्गाची जी ससेहोलपट झाली ती पुनíनर्माणाच्या गप्पाबिप्पा मारणाऱ्याच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
थेसालोनिकीचं उदाहरण पाहू. ज्या ‘वैभवशाली’ ग्रीसमध्ये सांस्कृतिकदृष्टय़ा अतिसंपन्न ‘अथेन्स’ आहे त्याच ग्रीसमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर आणि बंदर असा थेसालोनिकीचा लौकिक आहे. कालानुरूप बंदर उतरणीला लागले आहे खरे, पण जुन्या गोद्या, इमारती, रस्ते आहेतच. असो, इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस हे जे दक्षिण युरोपीय देश युरोपात स्थलांतर करण्यासाठी ‘सुरक्षित’ समजले जातात त्यात ‘थेसालोनिकीमाग्रे ग्रीस आणि ग्रीसमाग्रे युरोप’ हा मार्ग अधिक निवडला जातो. आम्रेनियन, रशियन, युक्रेनियन आणि पूर्व युरोपातले किंवा वायव्य आशियातले स्थलांतरित इथे दाटी करून असतात. त्यांची आíथक- सामाजिक जाळी इथे घट्ट पसरली आहेत. यामुळे थेसालोनिकीला एक बहुसांस्कृतिक चेहरा मिळाला आहे. या स्थलांतरितांनी गेली अनेक दशके चालवलेले ‘स्ट्रीट बाजार’ हा खरेदीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा विषय आहे. असे बाजार मुख्यत्वे जुन्या बंदर भागात भरतात. ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून या शहराची निवड झाल्यानंतर जुन्या इमारती आणि शहराला झळाळी प्राप्त करून देताना या ‘बाहेरून’ आलेल्या स्थलांतरितांना हाकलून देण्यात आले आहे किंवा त्यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. त्यांनी वसवलेले इलाके ‘पुनíनर्माणाच्या’ नावाखाली दूरवर पांगवण्यात आले आहेत. स्ट्रीट बाजार बंद पाडण्यासाठी शहर प्रशासन जिवाचे रान करीत आहे, पण ‘कला आणि कलात्मक परंपरा’ जोपासण्याच्या नावाखाली चकाचक केलेल्या जुन्या इमारती आज ओस आहेत. ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ‘पुनíनर्माण’ हाती घेणाऱ्या थेसालोनिकीचा ‘अनौपचारिक, अमूर्त, बहुसांस्कृतिक’ चेहरा पुसला गेला आहे.
काही तरी ‘नवीन’ निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या ब्रिक्सटनपासून थेसालोनिकीपर्यंत ही आवर्तने पाहिली की निर्माणाच्या नावाखाली मुळापासून उखडले गेलेले, चेहरा हरवलेले शहरी समूह आघात करून जातात. इथे कुर्तुल-ऐन-हैदर हटकून आठवतात.. भूराजकीय-सामाजिक व्यवस्थेने लादलेल्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर निर्वासित होऊ घातलेल्यांचे दु:ख ‘पतझड की आवाज’मध्ये मांडणाऱ्या! (एन.बी.टी.ने या पुस्तकाचे ‘पानगळीची सळसळ’ हे सरस भाषांतरही आणले.) तो कॅनव्हास ताणून, जेन्ट्रिफिकेशनचे अवलोकन ‘अर्बन रीजनरेशन’च्या चौकटीतून करताना, राजकीय अर्थव्यवस्थेने राहत्या अवकाशातून हद्दपार वा बेदखलही केलेल्या अशा कित्येक ‘पानगळींची सळसळ’ अस्वस्थ करीत राहते.

मयूरेश भडसावळे
लेखक एका नगरनियोजन अभ्यासगटात कार्यरत आहेत.

ईमेल : mayuresh.bhadsavle@gmail.com