24 November 2020

News Flash

झाडूचा दांडा.. गोतास काळ

हातात शस्त्र घेतले म्हणजेच हिंसेची शक्यता निर्माण होते असे नाही.

 

वर्षांतून एका सकाळी चार तास परजून स्वच्छ भारतप्रत्यक्षात अवतरेल असे वाटणे ही स्वत:ची वंचना आहे. स्वच्छतेचे ध्येय हे व्यापक, अहिंसक व रचनात्मक कार्यक्रमाचा भाग बनले तरच ते जमिनीवर उतरेल व परिणाम दाखवेल.

या आठवडय़ात म. गांधींचा भाव तेजीत दिसतो आहे. जो-तो त्यांच्या नावाने कुठले तरी नारे देण्यात नाही तर त्यांच्याशी बादरायण संबंध असल्याचे सिद्ध करतो आहे. स्वत: पंतप्रधान परीटघडीचे कपडे घालून नवा कोरा बांबू लावलेला खराटा वापरून झाडतानाची पोझ देऊन जाहिरातीत झळकले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी खुद्द झाडू गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रेयांकित बनून स्वत:चा पुन्हा एकदा अंत्योदय साधतो आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ २००७ सालापासून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जागतिक अहिंसा दिन साजरा करून दरवर्षी शांतता, अहिंसा वगैरे मूल्यांवर जगभर विचार मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आला आहे. मात्र नव्या सरकारने सत्तेवर येताच जागतिक अिहसा दिनाची परंपरा मोडीत काढून स्वच्छता दिनाची टूम काढली. निर्बळाची अिहसा कमअस्सल आहे म्हणतात. तेव्हा हे सध्यापुरते बाजूला ठेवूया.

हातात शस्त्र घेतले म्हणजेच हिंसेची शक्यता निर्माण होते असे नाही. हिंसा अनेक चेहरे व वेश धारण करून उभी असते व तेव्हा ती ‘आहे’ हे जाणवते. लपत नाही. शस्त्राशिवायही नाना प्रकारे हिंसा घडताना आपण पाहतो. त्यापैकी एक मनात घर करून राहणारी हिंसा असते ती म्हणजे अपेक्षाभंगाची किंवा स्वप्नांच्या समाप्तीची इ.स. २०००ला संयुक्त राष्ट्रसंघाने सहस्रकाच्या पूर्वसंध्येला तिसऱ्या सहस्रकासाठी विकासाची उद्दिष्टे जाहीर केली. खालील उद्दिष्टे सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्न करून २००१ ते २०१५ मध्ये पूर्ण करावी ही अपेक्षा होती.

उद्दिष्ट १ : पराकोटीची भूक व गरिबी हटविणे

एक डॉलरपेक्षाही रोजची कमाई कमी असणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या अर्धी करणे ही पहिली पायरी ठरली होती. सर्व तरुण, स्त्रिया व एकंदरच कुणालाही पूर्ण वेळ व ठीकठाक नोकरी मिळून संपूर्ण जगातच भुकेल्या व्यक्तींचे प्रमाण निम्म्यावर आणायचे ठरले होते. झाले काय? १९९२ सालातली भुकेलेल्या व्यक्तींची संख्या ८४ कोटी होती ती २००१ साली १०२ कोटींवर गेली!

उद्दिष्ट २ : सर्वाना प्राथमिक शिक्षण पूर्ण करता यावे

जगात कुठल्याही बालकाला किंवा बालिकेला प्राथमिक शिक्षण घेता आले पाहिजे याची प्रत्येक राष्ट्राने दक्षता घेणे अपेक्षित होते. विकसनशील देशांमध्ये प्राथमिक शाळेतील पटसंख्या ८३ टक्के (२०००) वरून ८८ टक्के (२००७) पर्यंतच पोचली. अविकसित देशात (उदा. सहारातील आफ्रिकेतील देशांमध्ये) पटसंख्या ५८ टक्केवरून ७४ टक्केपर्यंत वाढली.

उद्दिष्ट ३ : स्त्री-पुरुष समन्यायी व्यवहार व स्त्रियांचे सबलीकरण

मुला-मुलींच्या शालेय शिक्षणात भेदभाव न करता शिक्षणावर भर देणे व स्त्रियांना प्रोत्साहन देण्याचे धोरण प्रत्येकाने अवलंबणे अपेक्षित होते. मात्र या सर्व शिक्षणाचा व सबलीकरणाचा रेटा स्त्रियांना वेगवेगळ्या देशात प्रतिनिधीसभेपर्यंत पोहोचवतो का नाही हे पाहिले जात आहे. चित्र म्हणावे तितके आशादायक नाही.

उद्दिष्ट ४ : बालचमूचे प्रमाण घटविणे.

पाच वर्षे वयाखालील बालकांमधील मृत्युदर दोन तृतीयांशाने कमी करणे अपेक्षित होते. भारतीय उपखंड असलेल्या दक्षिण आशियातील राष्ट्रांची कामगिरी आफ्रिका खंडापेक्षाही कमी प्रशंसनीय आहे. एकूणच जगाने बालमृत्यूंकडे जास्त जबाबदारीने पाहिले पाहिजे. जगात दररोज पाच वर्षांखालची १६,००० बालके दगावतात, इतकेच नव्हे तर हे सर्व मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत.

उद्दिष्ट ५ : प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात आरोग्य

सन १९९०च्या तुलनेने, २०१५ पर्यंत बाळंतिणींचा मृत्युदर एक चतुर्थाश करण्याचे उद्दिष्ट ठरले होते. दक्षिण आशियात हा दर ५३० मृत्यू प्रति एक लाख यशस्वी बाळंतपणे (१९९०) होता. तो १९० मृत्यू प्रति एक लाख यशस्वी बाळंतपणे (१९९०) होता. तो १९० मृत्यू प्रति एक लाख बाळंतपणावर आला. उद्दिष्ट होते १३२चे. आज जगात रोज ८०० माता बाळाला जन्म देऊन मृत्यू पावतात. हे सर्व मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. चार बाळांपैकी एक बाळ आजही कुशल व सुयोग्य आरोग्य- सुविधांशिवाय जन्माला येत आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार थांबला पाहिजे.

बरेच प्रयत्न होताना दिसतात मात्र एकंदरच जगभर स्त्रियांना प्रसूतीपूर्व म्हणावी तशी मदत मिळत नाही. कामाचे प्रकार, कामाचे तास, आहार, विश्रांतीसाठी अवसर व सुखसोई वगैरेंचा फार मोठा अभाव आढळतो. इथून पुढच्या काळात गर्भार व प्रसूतीनंतर स्त्रीची काळजी घेण्याचे मुद्दाम प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा बाळ व मातेला फार दुर्दैवी व खडतर आयुष्याचा सामना करावा लागेल.

उद्दिष्ट ६ : एड्स, मलेरिया व इतर आजारांपासून संरक्षण

जगभरात एकूणच एड्सची लागण होण्याचे प्रमाण ४० टक्के घटले आहे. तरीही जगात २१ लाख एड्सचे रुग्ण २००० ते २०१३ या काळात नव्याने दाखल झाले. रुग्णांना म्हणावी तेवढी मदत व औषधी उपलब्ध नाहीत. खूप काही करण्यासारखे आहे. एड्समुळे शेवटी रुग्ण दगावत नाही. त्याआधीच मलेरिया, टी.बी. किंवा न्यूमोनिया त्यावर झडप घालतो. आपण सावधान बनले पाहिजे.

उद्दिष्ट ७ : पर्यावरण संरक्षणातून चिरस्थायी विकास

वर नमूद केलेल्या सहाही उद्दिष्टांचा निसर्ग, पर्यावरण, आपली जीवनपद्धती यांच्याशी थेट संबंध आहे. सर्वानी मान्य केले आहे की चिरस्थायी शाश्वत विकासाची सूत्रे व चौकट स्वीकारून प्रत्येकाने आपापल्या देशातील कायदे व ध्येयधोरणे एकात्मिक विकास प्रक्रियेशी सुसंगत बनवावी व पर्यावरण रक्षण करून आतापर्यंत झालेले नुकसान भरून काढता येईल का ते पाहावे. इ.स. २०१० पर्यंत जैवविविधतेत झालेली झीज व नुकसान भरून काढता येईल का ते पाहावे. इ.स. २०१५ पर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व शौचालये तसेच व्यक्तिगत स्वच्छतेसंबंधी ठोस पावले उचलून वंचितांची संख्या निम्म्यावर आणावी.

जंगलतोड व विकास प्रकल्पांमुळे निसर्ग भक्षणाला दिलेली सूट गेल्या दोन वर्षांत अभूतपूर्व आहे. विकासाची टिमकी वाजवताना प्रशासकीय व राजकीय वरवंटे फिरवून पश्चिम घाट, सी.आर.झेड. पट्टे, नदीकिनारे व जंगलांची अपरिमित हानी पत्करून जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्याची तडफ दाखवली जाते आहे.

बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात

स्त्रियांचे, बाल कामगारांचे, बेरोजगारांचे, दुष्काळ व आपत्ती पीडितांचे, शेतकऱ्यांचे, झोपडपट्टीवासीयांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न रडारवर नाहीत. कुठे स्मार्ट सिटीचे गाजर तर कुठे थेट परदेशी गुंतवणूकदारांनी दिलेल्या आश्वासनांची पानभर जाहिराती देऊन बिगूल वाजवण्याचे प्रकार बंद करून व्यापक शाश्वत विकास, पर्यावरण रक्षण, वंचितांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न नम्रपणे करण्याची गरज आहे. २ ऑक्टोबरच्या निमित्ताने आठवण करू या : अिहसा परमो धर्मा:

लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.

लेखक आयआयटी-मुंबई येथीलपर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रात प्राध्यापक आहेत.

ईमेल : a solekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2016 4:09 am

Web Title: article on swachh bharat abhiyan
Next Stories
1 पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे मर्म
2 पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनाचा श्रीगणेशा
3 कचरासाम्राज्याचे वारसदार
Just Now!
X