देशभरच्या महानगरांत दररोज निर्माण होणऱ्या ८८ हजार टन कचऱ्यापैकी ६५ टक्के, म्हणजे सुमारे ५७,२०० टन कचरा कचरापट्टय़ांवर नेला जातो. या कचऱ्यापासून खत करणे शक्य आहेच, पण बायोगॅस आणि ऊर्जानिर्मिती हे दोन पर्याय आपल्यापुढे आहेत.. खर्च आज अधिक वाटला, तरी धुरापेक्षा ते बरे..

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध व एकविसाव्या शतकाची सुरुवात या तीस वर्षांच्या कालखंडात माझ्या पिढीने भावी पिढय़ांसाठी काय निर्माण करून ठेवले आहे? अनेक बाबींचा उल्लेख करता येईल. उदा. जैवविज्ञान व तंत्रविज्ञान, अतिवेगवान संगणक, सॅटसाइटवर आधारलेली दूरसंचार प्रणाली, नॅनो टेक्नॉलॉजी, अणुऊर्जा किंवा अवकाशयाने व त्यासंबंधींचे तंत्रज्ञान. मी मात्र मुंबईतील ३०-३५ मीटर उंचीचे घनकचऱ्याचे टॉवर्स (की डोंगर?) या पराक्रमात समाविष्ट करायला विसरणार नाही!
जानेवारीमध्ये देवनार कचरापट्टीत रौद्र स्वरूपाची आग लागली. ती महिनाभर धुमसली. ती आटोक्यात आली म्हणता म्हणता मार्चअखेरीस पुन्हा आगीने भडका घेतला. आता किती दिवस हे चालू राहणार? मी ज्योतिषी नाही, पण इतके निश्चित सांगता येईल की, याला अंत नाही! आपण स्वत:हून शहाणे होणार की निसर्गाचे व संकटांचे तडाखे मिळाल्यावर स्वत:ला बदलणार इतकेच ठरवायचे तेवढे बाकी आहे.
मागच्या लेखात आपण पाहिले की, कचरा साधारण पाच प्रकारचा असतो. (१) कुजणारा कचरा, (२) ज्वलनशील कचरा, (३) बांधकाम, पाडकाम व एकूणच आधारभूत सुविधा निर्माण करताना तयार होणारा मलबा व घनकचरा, (४) रस्ते सफाईत सावडलेली धूळ, नाल्यांमधील गाळ व नागरिकांनी बेजबाबदारपणे फेकून दिलेला कचरा व (५) आस्थापनांमधील व कारखान्यांतील विषारी नसलेला घनकचरा. या कचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी तीन प्रकारच्या तंत्रज्ञानांचा वापर करणे शक्य आहे- (अ) कुजणाऱ्या कचऱ्यासाठीचे तंत्रज्ञान, (ब) कचराभट्टीचे व घनइंधन निर्मितीचे तंत्रज्ञान व (क) बांधकाम, पाडकामात निर्माण झालेला मलबा व घनकचऱ्यापासून वाळू, गिट्टी व विटा वगैरे बांधकामाचे साहित्य निर्माण करणारे तंत्रज्ञान.
या लेखात आपण कुजणाऱ्या कचऱ्यावर (बायोडिग्रेडेबल वेस्ट) विचार केंद्रित करणार आहोत.
कुठल्याही कचऱ्याची सुयोग्य तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर ऊर्जा निर्माण करता येते किंवा ऊर्जाबचत तरी किमान होतेच होते. ऊर्जेच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरू नये! एक सर्वपरिचित व सर्वाना हवीहवीशी वाटणारी बाजू ऊर्जानिर्मिती होय. दुसरी महत्त्वाची बाजू आहे ती ऊर्जाबचतीची. आता तर सिद्धच झाले आहे की, ऊर्जाबचत ही ऊर्जानिर्मितीपेक्षा खूपच जास्त किफायतशीर आहे!
कुजक्या कचऱ्याचा राक्षस किती मोठा?
सन २०१२ च्या आकडेवारीनुसार भारतातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ५३ महानगरांमध्ये एकूण १६ कोटी लोक राहत आहेत. त्यातील एकटय़ा बृहन्मुंबई महानगरात दोन कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. महानगरे रोज ८८,००० टन कचरा निर्माण करतात. त्यातला १० हजार टन कचरा मुंबईकरांचा! सुमारे १० टक्के घनकचरा स्त्रिया व कचरावेचक मुले घरोघरी फिरून व कचराकुंडीवरून वेचून भंगारात विकतात. याशिवाय सरासरी २५ टक्के घनकचरा बांधकाम, पाडकाम व पायाभूत सुविधा निर्माण करताना तयार होतो. रस्ते झाडताना वेगळी काढलेली धूळ व गटारे साफ करताना निघणारा गाळही याच वर्गात मोडतो. हे सर्व कचरा भराव क्षेत्रात न नेता बहुतांश वेळा कुठे तरी जमिनीवर भराव करण्यासाठी वापरले जातात. परिणामत: महानगरपालिका सरासरी सुमारे ६५ टक्के कचराच उचलून कचरापट्टीवर नेताना दिसतात.
कचरा पुनर्वापराची साखळी
वर वर्णन केल्याप्रमाणे देशभरात ५७,२०० टन कचरा दररोज कचरापट्टय़ांवर नेला जातो. यापैकी ५० टक्के सेंद्रिय खतनिर्मितीसाठी (composting) योग्य असतो. सुमारे १० टक्के कचरा बायोमिथेनेशन व बायोगॅसनिर्मितीसाठी योग्य असतो. उरलेला ४० टक्के कचरा हा घन इंधन व कचराभट्टीत टाकण्यायोग्य असतो. आपल्या देशात काच, मोठे व जाड भंगारात टाकलेले प्लास्टिक, कापड, धातूचे पत्रे व डबे, लोखंडी सामान, वर्तमानपत्र व खोके-पुठ्ठे यांची रद्दी कचरावेचक स्त्रिया व मुले घरातून, कचराकुंडय़ांमधून, दुकान व हॉटेलांमधून परस्पर उचलतात व भंगारात विकून रोजी-रोटी कमावतात. त्या गटाचे कचरा व्यवस्थापन कार्यातील योगदान अमूल्य व अतुलनीय आहे.
ज्योती म्हापसेकरांच्या ‘स्त्रीमुक्ती संघटना’ या ४० वर्षांहूनही जुन्या स्वयंसेवी संस्थेने कचरावेचक महिला व मुले यांना न्याय मिळवून दिला आहे व त्यांच्या संघटनेमार्फत चांगले उपक्रम राबवले आहेत. श्रीमती म्हापसेकरांनी हल्लीच लिहिलेल्या पुस्तकाचा (‘कचरा नव्हे संपत्ती’) सध्या बराच बोलबाला आहे. महानगरांमधला १० टक्के कचरा कचरावेचक स्त्रिया व मुले आजमितीला पुनर्वापर व पुनर्निर्माणाच्या साखळीमध्ये भरती करीत आहेत. त्यातून फार मोठी ऊर्जा निर्माण होते आहे व बचतही होत आहे. स्त्रीमुक्ती संघटनेसारख्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत व त्यांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे.
कुजक्या कचऱ्यापासून खत की बायोगॅस?
पुनर्वापर करताना ‘जे होते त्यासाठीच वापरले’ व ‘नव्या उपयोगात पुनर्वापर केला’ अशा दोन विभागांत धातू, काच, कागद व लाकूड यांचा पुनर्वापर शक्य असतो. अशा पुनर्वापरात सर्वात जास्त ऊर्जाबचत होते. एखाद्या वस्तूला वितळवले, शुद्ध केले व नंतर पुनर्वापर केला तर बरीच ऊर्जा खर्च होते व थोडीशीच वाचते. कुजणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत बनवले तर ते बरेच फायद्याचे ठरेल, कारण तितक्या प्रमाणात शेतीला लागणारी पोषक द्रव्ये सेंद्रिय कचऱ्यातून परस्पर जमिनीत टाकता येतील, नसता युरिया व सुपरफॉस्फेटची खते निर्माण करावी लागतील. तेव्हा तेवढी रसायने व त्या प्रक्रियेसाठी खर्च होणारी ऊर्जा यांची बचत होईल!
डॉ. शरद काळे या भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ महोदयांनी विकसित केलेले ‘निसर्ग ऋण’ हे तंत्रज्ञान बायोमिथेनेशन-बायोगॅस या वर्गातील एक उत्तम तंत्रज्ञान म्हणून नावाजले गेले आहे. मिथेन व कार्बनडाय ऑक्साइड या दोन वायूंचे मिश्रण बायोगॅस म्हणवले जाते. सरासरी दोन तृतीयांश मिथेन असतो. ही संयंत्रे विकेंद्रित (कुजणारा कचरा) व्यवस्थापनासाठी उत्तम मानली जातात. (१०० ते २,००० किलो कचरा प्रतिदिन). एक टन कचरा प्रक्रिया करणारे संयंत्र दिवसाकाठी सुमारे सहा-सात हजार लोकसंख्येसाठी पुरेसे होते व त्यातून ६० ते ९० घनमीटर बायोगॅस मिळतो व ६०-८० किलो खतही निर्माण होते. वीज बनवली तर चार ‘केडब्ल्यूएच’ वीज बनते. इतक्या विजेवर २० एलईडी किंवा सीएफएल दिवे (४० वॉट प्रत्येकी) वा पाच सोडियम व्हेपर लॅम्प (१५० वॉट प्रत्येकी) पाच तास रोज जाळता येतील.
तुमच्या लक्षात येईल की, बायोगॅस इंधन म्हणून जाळल्यास जास्त फायदा होईल. त्याची वीज करू म्हटले की, ऊर्जेत तूट सहन करावी लागेल. काहीही असो, विकेंद्रित व्यवस्थापन करणाऱ्या वस्तीने निर्णय घ्यावा- रस्ता, गावचावडी, रात्रशाळा, बस स्टॅण्ड इ. सार्वजनिक ठिकाणी विजेचे दिवे लावावे की रयतशाळा, रात्रशाळा, आधारगृह वगैरे ठिकाणी स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरावा. एक टन कचरा प्रक्रिया करू शकणाऱ्या संयंत्राला १५ ते २० लाख रु. खर्च येईल व वार्षिक वापर व दुरुस्तीचा खर्च १.५ ते २.० लाख रु. येईल. आता हे स्वस्त की महाग?
उत्तर साधे आहे.. कुजणाऱ्या कचऱ्यातून धूर काढायचा की ऊर्जा हे एकदा ठरवले की, प्रक्रियेला येणारा खर्च कमी की जास्त हे उमजेल.
पुढच्या लेखात ऊर्जा निर्माण करणाऱ्या आणखी काही तंत्रज्ञानाविषयी..
लेखक आयआयटी-मुंबई येथील ‘पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक आहेत.
ईमेल :asolekar@gmail.com