ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्याची सवय हवीच, पण कचऱ्याच्या ऊष्मांकावर वीजनिर्मिती ठरते..
पाच जूनला येणाऱ्या या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (वठएढ) या संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेने वन्यजीवांची हत्या व तस्करी यासंबंधी हाक दिली आहे. कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेन्जर्ड स्पीशीज ऑफ वाइल्ड फॉना अ‍ॅण्ड फ्लोरा (सीआयटीईएस) या आंतरराष्ट्रीय करारावर जगातल्या १८२ देशांनी स्वाक्षऱ्या करून बेचाळीस वर्षे उलटली. २०१३ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत ३ मार्च हा दिवस दर वर्षी वन्यजीवन दिन म्हणून घोषितही झाला आहे. सगळे जग वन्यजीवन, त्या अनुषंगाने हस्तिदंत, प्राण्यांची कातडी, पक्षी, पिसे, वाघ-सिंहांची हाडे, साप व एकंदरच वन्यजीवांचा व्यापार, हत्या व तस्करी या संदर्भात सामूहिक लढा देत आहे व त्यांना जागतिक स्तरावर सहकारी व बळ मिळत आहे.
प्रगती व वृद्धीच्या चढाओढीत वन्यजीव, जैवविविधता आणि वने-वनस्पती आशाळभूतपणे दाराबाहेर तिष्ठत उभे असल्याचे चित्र भारतात दिसते आहे. कुत्रे, मांजरे व गाई कचरा खाताना दिसतात. कित्येक प्राण्यांचा उपासमार व पोटात कागद, प्लास्टिक अडकून मृत्यू होतो आहे. अनेक स्वयंसेवी संस्था व प्राणिमित्र याविषयी आंदोलन करीत आहेत. पक्ष्यांची स्थिती गाई-कुत्र्यांपेक्षा वेगळी नाही. पंजांमध्ये, मानेमध्ये, पंखांमध्ये प्लास्टिकचे रिंग, दोरे व कचऱ्याचे तुकडे अडकून जायबंदी होऊन पक्षी मरणपंथाला लागतात. शहरातला असो नाही तर खेडय़ातला, नागरी घनकचरा प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जिवावर बेतला आहे.
या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये देवनार कचरापट्टीला आग धुमसण्याचे प्रकार घडल्यावर संबंधितांनी अक्षरश: हाताने हवे ते केले व तोंडाने वाटेल ती भाकिते केली. तो सगळा परिसर व अख्खी मुंबईच त्या प्रकारात हवालदिल झाली.
मिश्र कचऱ्याचे आव्हान
सगळा एकत्र मिसळलेला, बरबटलेला कचरा हे नागरी घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान आहे. यावर तोडगा सांगणारांचे प्राथमिक पातळीवर दोन वर्ग करता येतात. पहिला वर्ग मानतो की जिथे कचरा निर्माण होतो तिथेच तो जाळण्याजोगा, पुनर्चक्रित करण्यायोग्य (उदा.- काच, कागद, लाकूड इ.) कुजवण्यायोग्य व सुका अगदी कुचकामी अशी विभागणी करून त्या त्या कचराकुंडय़ांमध्ये भरून ठेवावा व कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांनी तो वेगळावेगळा ठेवून वाहून न्यावा म्हणजे व्यवस्थापन सोपे, कमी खर्चाचे व कचरा हाताळणाऱ्या कामगारांना कमी धोक्याचे होईल. तसे केल्यास विकेंद्रित व्यवस्थापनही सुकर होईल. कुजण्यासारखा कचरा कमी अंतरावर वाहून नेऊन त्या त्या उपनगरात किंवा वस्तीत निसर्गऋण, बायोमिथेनेशन, कम्पोस्टिंग किंवा व्हर्मिकल्चर कम्पोस्टिंग करून दरुगधी, माश्या, डास, उंदीर, इ. प्रश्न कमी तीव्रतेच्या पातळीवर हाताळता येतील. या वर्गातल्या तज्ज्ञांना व समाजसेवी संस्थांना कचरा एकत्र अवस्थेत दूर अंतरावर वाहून नेऊन अर्धवट कुजलेल्या अवस्थेत वर्गवारी करून केंद्रित व्यवस्थापन करून विल्हेवाट लावणे रानटीपणाचे व मागासलेपणाचे वाटते.
याउलट दुसरा वर्ग मानतो की आपल्या समाजात जागच्या जागी कचरा वेगळा करणे हे केवळ अशक्य आहे, किंबहुना लोकांना शिकवावे व मग ते शिकतील व वर्तन सुधारतील असे मानणे भोळसटपणाचे व स्वत:ची फसवणूक करणारे आहे. लोक कचरा वेगळा वेगळा ठेवतील हे मानून, कचरा व्यवस्थापनाची केंद्रित व विकेंद्रित तंत्रावर आधारलेली संकरित प्रणाली जर निर्माण केली तर जनतेच्या निधीचा अपव्यय होईल. लोक जे करू इच्छित नाहीत, ते त्यांना करायला लावणे किंवा ते करतील असे मानून निर्माण केलेली व्यवस्था हमखास फसेल असा त्यांना विश्वास वाटतो.
मला वाटते वर वर्णन केलेल्या दोन विचारपद्धती आपापल्या जागी योग्य असतीलही. मात्र, खरा प्रश्न आहे तो आपण स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याकडे कसे पाहतो याचा. उदाहरणार्थ, लोक (किंवा समाज म्हणा) आदर्श वर्तन करतील असे गृहीत धरताना, पहिल्या वर्गातले आग्रही जन, असेही गृहीत धरतात की लोकप्रतिनिधी (नगरसेवक, आमदार किंवा पालकमंत्री) व नगर प्रशासनातील नोकरशाही व तंत्रशाही वस्त्यांमध्ये उतरून व घराघरांमध्ये पोहोचण्याची इच्छा असलेले व लोकाश्रय असलेले आहेत! तशी परिस्थिती आज आहे का? मला वाटते की या सर्वाचा जनाधार पार संपलेला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर बहुश: ही मंडळी आळशी, बेफिकीर व रस्ता चुकलेली आढळतात. भरीस भर त्यांचे कंत्राटदार व परदेशी सल्लागारांसोबत गुळपीठ झालेले पाहावे लागते आहे. दिसते ते चित्र बरे नाही!

ज्वलनशील कचऱ्यापासून वीजनिर्मिती
भट्टी प्रक्रिया काय असते ते प्रथम समजावून घेऊ या. कचरा नुसता जाळणे वेगळे व भट्टीत टाकून ऊर्जानिर्मिती करणे निराळे. कचरा जाळला तर बहुतेक वेळा कचऱ्याचे लहान-मोठे गोळे वेगवेगळ्या तापमानावर जळतात व त्यातून बऱ्याच प्रमाणात हवाप्रदूषण होते. तशा जळण्याच्या प्रक्रियेत म्हणावेत तितके नियंत्रण ठेवणे जिकिरीचे असते. कारण कचऱ्याचे गोळे लहान-मोठय़ा आकाराचे तर असतातच तसेच त्यांची घनताही वेगवेगळी असते. ते भिन्न पदार्थाचेही असू शकतात. (उदा. लाकूड, कागद, प्लास्टिक, पॅकेजिंग मटेरियल, थर्मोकोल, पफ, कापड, बायोमास, इ.). वर वर्णन केलेल्या सर्व कचऱ्यामध्ये कमीअधिक प्रमाणात वेगवेगळी रसायने, फेकून दिलेली औषधे, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छतेसाठी वापरलेली द्रव्ये व रसायने असतातच. या सर्व भन्नाट मिश्रणाला स्वैर पद्धतीने केवळ जाळले तर उड2, उड, ठड७, रड७, धूलिकण, सूक्ष्म कण, अर्धवट जळलेली व न जळू शकलेली ऑरगॅनिक व इन-ऑरगॅनिक रसायने हवाप्रदूषण करतात. याशिवाय विषारी धातूंची मात्रा व दरुगधी निर्माण करणारे रासायनिक घटकही आढळू शकतात. शिवाय डायोक्सिन, फ्युरान्स, पी.सी.बी., पी.ए.एच. यांसारखी भयानक विषारी व कर्करोग निर्माण करू शकणारी प्रदूषके प्रच्छन्नपणे तयार होतात. तेव्हा कचरा जाळून नष्ट करणे ही जेवढी साधी क्रिया वाटते तेवढी ती निरुपद्रवी नाही!
याउलट भट्टी प्रक्रियेतील (इन्सिनरेशन) ज्वलन हे संपूर्ण नियंत्रित, हवा व इंधन यांचे परस्पर प्रमाण काटेकोरपणे पाळून व तापमान इतक्या उंचीवर ठेवलेले असते की घातक कर्करोगजनक प्रदूषके तयारच होऊ न देता केलेले असते. अशा प्रकारच्या नियंत्रित ज्वलनाला अतिरिक्त इंधनाची गरज पडू शकते व ते वापरूनच तापमान ८०० ते १,१०० अंश सेल्सिअस ठेवले जाते. भट्टीमध्ये नागरी कचरा सुकवून टाकावा लागतो. मुंबईपुरते बोलायचे तर ओला कुजण्याजोगा कचरासुद्धा म्हटले तर या भट्टी प्रक्रियेत लोटता येईल, पण त्यामुळे बरीचशी ऊर्जा ओल्या कचऱ्यातील पाणी बाष्पीभवन करण्यात वाया जाईल. हे विसरू नये की आपल्या ओल्या कचऱ्यात ४०-७०% पाण्याचा अंश असू शकतो. बरे, सुका ज्वलनशील कचरा तरी आपल्याला हात देईल? तिथेही व्यवहार आतबट्टय़ाचा ठरण्याची शक्यता आहे. सोबतचा तक्ता पाहा. मुंबईतल्या सुक्या कचऱ्याचा उष्मांक प्रगत देशांच्या मानाने दोन-अडीच पटींनी कमी आहे! त्यांच्या कचऱ्यातील प्लास्टिक खूप उष्णांक वाढवते. आपले पुठ्ठे, प्लास्टिक इ. ज्वलनशील पदार्थ कचरावेचक आधीच वेगळे काढून पुनर्चक्रित करतात.
आणखी एक वेगळेपणा असा की आपला सुका ज्वलनशील कचरासुद्धा ओलसर असतो व त्यात खाद्यपदार्थ, इतर ओले पदार्थ व माती चिकटलेली असल्याने पाण्याचा अंश व तुलनेने नगण्य उष्मांक असलेले खरकटे, कुजलेले खाद्यपदार्थ व इतर घाण उष्मांक आणखी खाली आणतात. समजा असे म्हटले की मुंबईतला सगळा जाळण्यायोग्य सुका कचरा इन्सिनरेशनसाठी पाठवला तर काय मिळेल? गृहीत धरा की मुंबईत सुमारे १ ते १० हजार टन घनकचरा रोज निघतो. त्यातील बांधकामाचा मलबा, रोड झाडल्यावर जमणारी माती, नाल्यामधला गाळ सुमारे २.५ हजार टन असतो. उरलेल्या कचऱ्यातील समजा ५०% कचरा जाळण्याजोगा आहे असे मानून दररोजच्या ३.५ हजार टन घनकचऱ्यापासून मुंबईला ३५ े६ वीज क्षमतेचा पॉवर प्लांट लावता येईल. ही वीज खूप झाली की थोडी आहे आणि आणखी पर्यायी तंत्रज्ञान कोणते आहे यावर चर्चा पुढच्या लेखात.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
nashik, Manmad, Severe Water Shortage, Wagdardi Dam, Near Depleting, water storage,
वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे

 

प्रा. श्याम आसोलेकर
लेखक आयआयटी-मुंबई येथील ‘पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक आहेत.
ईमेल :asolekar@gmail.com