24 November 2020

News Flash

मिश्र कचऱ्यासाठी औष्णिक तंत्रज्ञान

कचरा व्यवस्थापनासाठी महागडे परदेशी तंत्रज्ञान अधिक चांगले

कचरा व्यवस्थापनासाठी महागडे परदेशी तंत्रज्ञान अधिक चांगले, हा समज खरा मानण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे पर्याय कसे आहेत, हे पाहणे अधिक बरे!
ओला व सुका कचरा एकत्र वेगळा न करता जर इन्सिनरेशनसाठी पाठवला तर काय होऊ शकते याची थोडी चर्चा आपण गेल्या लेखात केली. प्रगत देशांमध्ये कचरा वेचायला किंवा कोणत्याच कामाला माणसे मिळू शकत नाहीत, मजुरी परवडत नाही व जोखमीचे कोणतेही काम हातांपेक्षा यंत्राकडून करून घ्यावे असा कल असल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण, पूर्वप्रक्रिया वगैरे करणे जवळपास अशक्य व अव्यवहारी ठरले आहे. तेव्हा यंत्रामार्फतच जे जमेल व जसे जमेल ते करावे, यालाच ते ‘बेस्ट अव्हेलेबल, प्रॅक्टिकेबल टेक्नॉलॉजी’ म्हणतात. आदर्श, अभिनव व प्रगत तंत्रज्ञान शोधण्याच्या वेडात पूर्वापारपासून पर्यावरण, नगर विकास, महानगरपालिका, आरोग्य इ. विभागांतले केंद्र सरकारातील व राज्याराज्यांतील प्रशासकीय अधिकारी व तंत्रशहा (टेक्नोक्रॅट) यांच्या परदेशयात्रा घडवून आणून भारताच्या माथी भयंकर महागडे व बहुतेक वेळा कुचकामी तंत्रज्ञान गळी उतरवलेले आहे.

अलीकडे तर लोकप्रतिनिधीसुद्धा अशा अभ्यासदौऱ्यात सामील होऊन सुयोग्य व सयुक्तिक तंत्रज्ञान वापरू पाहणाऱ्या तंत्रज्ञाला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला मागासलेला नाही तर अज्ञानी ठरवतात. हल्ली जग कुठे चालले आहे विचारत वरवंटा फिरवतात. काही असो-आपण मात्र येथे काय आपल्या खिशाला परवडणारे असू शकेल, काय आपल्या कार्यसंस्कृतीत बसणारे आहे व लोक स्वीकारतील असेच उपाय चर्चेमध्ये घेणार आहोत.

कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचे मायाजाल

आपण पूर्वीही पाहिले होते त्याप्रमाणे प्रत्येक राजकारण्याला व प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्या कारकीर्दीत काही तरी भव्य-दिव्य करून दाखवण्याची ईर्षां असते. अशा मन:स्थितीतल्या माणसांना कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे मायाजाल आपसूकच खेचून घेते. सगळे जग करते आहे मग आपण का करू नये असे विचार सारासारबुद्धीचा ताबा घेतात आणि दहा-वीसपट महागडे प्रकल्प योग्य व किफायतशीर वाटायला लागतात. असल्या स्वप्नांचे प्रगत राष्ट्रांतील तंत्रज्ञान सल्लगार हे सौदागर आहेत, याचा सहज विसर पडतो व कुणी तरी अलगद गळाला लागतो.

प्रगत युरोपातील देशांमधून साधारणत: एक तृतियांश कचरा इन्सिनरेशन (कचराभट्टी) मधून विल्हेवाट लावला जातो. तिकडे सध्या सुमारे पाचशे भट्टय़ा असतील.. त्यांचा आकार दिवसाकाठी १५० टन ते १,५०० टन इतका आहे. अलीकडे बऱ्याच ठिकाणचा कचरा एका ठिकाणी वाहून नेऊन मग केंद्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याकडे आहे. का? असे लक्षात आले आहे म्हणतात की, छोटय़ा भट्टय़ा जास्त प्रदूषण करतात. मोठी भट्टी लावली की सगळ्या प्रकारचे प्रदूषण नियंत्रण शक्य होते. मात्र अनेक ठिकाणचा कचरा वाहून आणण्याचा खर्च व खटाटोप करावा लागतो.

एकूणच जगभर हल्ली कचराभट्टय़ांकडे जरा शंकेने व चिंतेने पाहिले जात आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे-

१) एकंदरच हवा-प्रदूषणाच्या विषयात जागोजागी कचराभट्टय़ा सतत नापास होत असतात. दरुगधी, धूळ, धुरांडय़ावाटे जाणारी सूक्ष्म राख, राखेतील विषारी धातू व रसायने याबाबत सावधान राहणे ही फार कठीण तारेवरची कसरत व जोखीम बनली आहे. हलगर्जी व अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण करणारे अधिकारी, पालिका नोकरशहा व तंत्रशहा, लोकप्रतिनिधी कुणाचीही गय केली जात नाही. आपल्याकडे प्रकल्पबाधित, विस्थापित व आजूबाजूचे रहिवासी खुंटीवर बसवता येतात.

२) कचराभट्टय़ांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा विसर्गही मोठा असतो. त्याचे शुद्धिकरण वगैरे खटाटोपही करावाच लागतो. त्यातूनही दरुगधी सुटते.

३) हवा प्रदूषण रोखणाऱ्या संयंत्रात धूळ पकडून ठेवण्यासाठीच्या गाळण्या (फॅब्रिक फिल्टर्स), इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स, वायुरूपी प्रदूषके, अति-सूक्ष्म धुलीकण जेरबंद करण्यासाठी पाण्याचे फवारे वापरून वेट स्क्रबर्सची योजना केली जाते. हे सर्व करताना यातूनही प्रदूषण होत असते. त्याची विल्हेवाट लावणे बरेच जिकिरीचे आहे.

४) एकंदरच कचराभट्टय़ा हजारो ट्रकच्या फेऱ्या, ढिगारे इकडून तिकडे हलवणारे लोखंडी महाकाय पंजे, सरकते पट्टे, अगणित यंत्रांची घरघर, खडखडाट वगैरेंतून होणारे प्रचंड ध्वनिप्रदूषण ही तर दरुगधी व धुराळ्यापलीकडे पोचलेली डोकेदुखी बनली आहे.

५) बहुश: ज्वलनयोग्य कचरा व उच्च उष्मांक असणारा (कॅलोरिफिक व्हॅल्यू) मात्र इंधनांच्या तुलनेने त्याचा उष्मांक दोन ते पाचपट कमी असतो. वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणामुळे व बऱ्याच ठिकाणी अंगभूत ओलेपणामुळे ज्वलनयोग्य कचरा सहज पेट घेत नाही. त्याचे घनत्व कमी असल्याने ज्योतीचे तापमानही उच्च राखता येत नाही. परिणामत: कचऱ्यासोबत बहुतेक वेळा इंधन तेलसुद्धा भट्टीत टाकत राहावे लागते. ही बाब भयानक खर्चीक आहे.

६) मोठय़ा क्षमतेची कचरा भट्टी लावल्याशिवाय ती किफायतशीर ठरत नाही. तिच्यातून वीज उत्पादन करणे फक्त मोठय़ा क्षमतेवरच शक्य असते. मोठय़ा क्षमतेसाठी फार जास्त कचरा भट्टीपर्यंत आणावा लागतो. त्यामुळे दूरदूरच्या शहरांपासून वाहतूक करावी लागते. ती खर्चीक तर असतेच, पण तिच्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर हवेचे प्रदूषण, इंधन नासाडी व रस्त्यांवर अतिरिक्त ट्रक वाहतुकीचा बोजा पडतो.

७) शेवटी, आणखी एक तंत्रज्ञानाशी संबंध नसलेला तिढा तयार होतो. दूरवरच्या शहरांकडे व अनेक ठिकाणांहून कचरा आणताना भट्टीपर्यंत पोचून तिथली प्रक्रिया सुरू व्हायला ८ ते १८ तास वेळ लागतो. त्यामुळे कचरा कुजण्याची प्रक्रिया पुष्कळच पुढच्या टप्प्यावर पोचलेली असते. त्यामुळे असह्य़ दरुगधी, माशा व कीटकांचा उपद्रव सुरू होतो. मिश्र कचऱ्याचे यंत्रांमार्फत वेगळे वेगळे वेचक ढिगारे बनवून ते ज्वलनशील असतील तर भट्टीकडे पाठवणे खूप क्लेशकारक बनते.

कचरा व्यवस्थापनासाठी उष्ण प्रक्रिया व प्रश्न

थर्मल डिस्पोजल अर्थात उष्ण प्रक्रिया वापरून घनकचऱ्याची विल्हेवाट लावावी म्हणणारे खूप लोक आहेत. मात्र त्यासाठीच्या तंत्रज्ञानाच्या मुळाशी गेल्यावर बऱ्याच गोष्टींचा शोध लागेल. प्रथम तंत्रज्ञान तीन प्रकारचे आहेत ते समजावून घेऊ या. पहिले तंत्रज्ञान कचराभट्टीत ज्वलन (इन्सिनरेशन) कचऱ्यातील ज्वलनशील भागाचे संपूर्ण ऑक्सिडेशन यात केले जाते. गरज पडल्यास अतिरिक्त इंधनदेखील वापरतात. उच्च तापमानावर ज्वलन घडवून आणतात व सोबत पुरेसा ऑक्सिजनही ठेवतात. त्यामुळे विषारी वायू तयार होत नाहीत. मात्र खर्चीक आहे. धुलीकण व उष्णता धुराडय़ावाटे बाहेर टाकतात. हवा प्रदूषण होऊ नये यासाठी पुष्कळ काळजी घ्यावी लागते. उच्च तापमानावर रासायनिक अभिक्रियेसाठी ज्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवण्याच्या उद्देशाने गरजेच्या पेक्षा जास्त गुणोत्तरात हवा पुरवली जाते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाचा व हवेबरोबर उष्णता धुराडय़ावाटे बाहेर फेकली जाण्यामुळे वीजनिर्मितीचा ताळेबंद म्हणावा तितका आकर्षक नसतो.

दुसरे तंत्रज्ञान आहे ते वायुकरण (गॅसिफिकेशन) या नावाने ओळखतात. यात अपूर्ण ऑक्सिडेशन करतात. हवेचे प्रमाण कमी ठेवून हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड व मिथेनसारखे इंधन वायू रासायनिक अभिक्रियेत तयार होतात. त्यापासून ऊर्जानिर्मिती शक्य होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी करायचा असेल तर तुलनेने अतिरिक्त इंधन फारच जास्त लागते व घनकचऱ्यात ज्वलनशील पदार्थाशिवाय इतर जिनसा चालत नाहीत. हे तंत्रज्ञान एकूणच नाजूक व जिकिरीचे मानले जाते.

तिसरे तंत्रज्ञान आहे औष्णिक अपघटन (पायरोलिसिस). यात ऑक्सिजनविरहित परिस्थितीत व कॅटलिस्टसोबत रासायनिक अभिक्रिया घडवतात. यातून द्रवरूप व वायुरूप इंधनच निर्माण होते. मात्र यात फक्त ज्वलनशील कचरा (विशेषत: प्लास्टिक) टाकावा लागतो. परिणामत: यासाठी कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया उत्तम असावी लागते. थोडक्यात काय? ज्या तंत्रज्ञानातून भरपूर फायदा हाती लागण्याची शक्यता आहे तिथे आपले नागरी वर्तन आदर्श असेल तरच ते तंत्रज्ञान यशस्वी होईल!

पुढच्या लेखात बघू की जगभरात व आपल्या देशात आपण काय करून दाखवले आहे. किती ऊर्जानिर्मिती होत आहे व हा सगळा प्रकार आपल्या कायद्याबरहुकूम करायचा झाला तर कशी संरचना व नियोजन असावे लागेल.

प्रा. श्याम आसोलेकर
लेखक आयआयटी-मुंबई येथील ‘पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक आहेत.
ईमेल : asolekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2016 3:09 am

Web Title: thermal technology for mixed waste
Next Stories
1 सुक्याबरोबर ओले जळेल?
2 ऑगस्टा : दुर्लक्षित मुद्दे
3 जिथे कचरा, तिथेच खत
Just Now!
X