News Flash

हा ‘नंदीबैल’ सुधारा..

राज्यात जवळपास ५६ लाख हेक्टपर्यंत पेरण्या झालेल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पेरण्या फुकट जायच्या नसतील, तर हवामान खात्याचे काम नंदीबैलागत होऊ नये.. त्या खात्याने दिलेले मोसमाचे, पुढील आठवडय़ाचे आणि दैनंदिन अंदाज नेमके आणि पक्के असले पाहिजेत.. या दृष्टीने आपली उपग्रह यंत्रणा काम करू शकत नाही का? पाऊस लहरी झाला, त्यामागे हवामान-बदलाचे मोठे कारणही आहे. त्यावरील आपल्या उपाययोजना अद्याप वृक्षारोपणापाशीच का थांबतात?

आज पाऊस पडेल, उद्या पडणार, मान्सून कोकणात आला, शिवारात आला, असे हवामान खाते दररोज सांगते आहे.. दररोज वेगवेगळे ‘अपडेट’ दिले जाताहेत. यंदाच्या मोसमासाठी ९५ टक्क्यांपासून ते १०३ टक्क्यांपर्यंत पावसाचे अंदाज वर्तवून झालेले आहेत. तरीही पाऊस काही पडलेला नाही. शेतकरी अतिशय चिंतातुर झाला आहे. राज्यात जवळपास ५६ लाख हेक्टपर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. बळीराजा आता ढगाकडे टक लावून पाहत आहे. तरीही पावसाने सर्वत्र दडी मारल्याचेच सर्वत्र पाहावयास मिळत आहे. नक्षत्रांनुसार येणारा पाऊस आता हळूहळू इतिहासजमा होऊ लागलेला आहे. मुळात भारतीय शेती ही पूर्णत: पावसावर, पर्यायाने हवामान खात्यावर अवलंबून आहे. दररोज नवीन अंदाज येतात नि जातात. त्यातील बहुतांश अंदाज हे चुकीचेच निघतात. हवामान खात्यावर विनोद होत राहतात, पण शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जुल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मान्सूनचा पत्ता नाही. राज्यात बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री म्हणतात की, शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करू नये. पावसाचा अंदाज काही येत नाही. सरसकट पाऊस येतो म्हणतो, पण तत्त्वत: कुठेही नाही!.. पावसानेदेखील निकष लावले आहेत, असे दिसते.

पीक घेण्यास अजून दीड महिन्याचा अवधी आहे. मात्र आता पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न पडलेला आहे. अवेळी पडणारा पाऊस, लांबलेला मान्सून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. वास्तविक पाहता पृथ्वीचे वाढलेले तापमान व देशातील झपाटय़ाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे ऋतुचक्रच बदलत आहे व त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याकडे शास्त्रज्ञांनी वारंवार इशारे देऊनही आपण त्याकडे लक्ष दिले नाही व पर्यावरणाचा ऱ्हास करून या तापमानात भरच घालत राहिलो. पावसाचा संबंध पर्यावरणाशी आहे व पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन न केल्यानेच आपल्याला आज कमी आणि अनियमित होत जाणाऱ्या पर्जन्यमानाला तोंड द्यावे लागत आहे. शहरीकरण व रस्तेबांधणी यासाठी आपण सातत्याने वृक्षतोड चालवली, जंगलांचा नाश केला. खेडी ओस पडू लागलेली आहेत. शेती संपण्याच्या मार्गावर आहे. शहरीकरणाच्या नावाखाली गावाचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात होऊ लागलेले आहे. रस्तेबांधणी, विविध प्रकल्प, वाढलेले औद्योगिकीकरण, आटलेले पाण्याचे स्रोत, मानवाने केलेली निसर्गाची छेडछाड यामुळे निसर्गाचे विद्रूपीकरण झाले आहे. याचाच परिणाम पावसावर झालेला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाऊस जास्त पडला तरी नुकसान शेतकऱ्यांचेच होते. मग ते गारपिटीने असू दे नाही तर मग अतिवृष्टीने असू दे.

दुसरीकडे, कोरडवाहू शेतकरी केवळ पावसावरच अवलंबून असतो. आज ना उद्या पाऊस पडेल आणि आपली शेती फुलेल याच आशेवर तो जगलेला असतो. मात्र इथेही त्याची साफ निराशा होते. हवामान खात्याचे अंदाज दररोज बदलात. त्यामुळे शेतकरी अतिशय गोंधळलेल्या आणि बिथरलेल्या अवस्थेत आहे. अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशामध्ये पाऊस कधी पडणार, किती पडणार, किती वाजता पडणार याचा अचूक अंदाज दिला जातो. पाश्चिमात्य देशांतील बहुतांश संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आपल्याच देशातील आहेत. मग हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्याला का अवगत होत नाही? पंतप्रधानांचे दोन-चार विदेश दौरे तसेच आठ-दहा जाहीर सभा रद्द करा आणि त्याच पशात अवकाशात एखादा उपग्रह सोडा म्हणजे देशातील शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती मिळेल. हवामानाची भाकिते आजही उपग्रहांआधारेच होतात, पण माहिती अचूक असली तरच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. येणाऱ्या पावसावर कोणते पीक घ्यायचे हे शेतकऱ्यांना ठरविता येते.

शेतकरी कोणतेही पीक घेऊ दे, निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान हे ठरलेले आहे. सन २०१४ मध्ये अवकाळी पावसामुळे अन्नधान्य पिकाखालील एकूण १२.७१ लाख हेक्टर क्षेत्राचा इस्कोट झाला, तर ९८,२२२ घरांचे नुकसान झाले. काही हजार जनावरे दगावली. उत्तरेकडील कर्नाटकचा भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने आपत्तीग्रस्त झाला. जास्तीत जास्त १.४१ लाख हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्य़ातील असल्याचे आढळले. पावसाने फळबागाही होत्याच्या नव्हत्या केल्या, त्यात राज्यातील द्राक्ष, संत्र, केळी आणि टरबूज पिकांचा समावेश होता. पिके भुईसपाट झाली आणि प्रचंड आíथक नुकसान झाले. या सर्व नुकसानीमुळे धक्का सहन न झाल्याने ३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांची धान्याची पिके गेली, नगदी पिकांचे नुकसान झाल्याने आíथक अरिष्ट ओढवले. शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. या सगळ्यांना जबाबदार कोण?

शहरीकरणाच्या नावाखाली अनेकांनी निसर्गाची छेडछाड करून इमलेच्या इमले बांधले आहेत. प्रकल्पाच्या नावाखाली जंगलाची वृक्षतोड केली जाते. पिकाऊ जमिनीवर रोडरोलर फिरवला जातो. मग एकरावर घेतलेल्या जमिनीचे दर चौरस फुटांवर येऊन ठेपतात. कोकणपट्टय़ात वारंवार होणाऱ्या डोंगरखोदाईचाही आपण विचार केला पाहिजे. लोकांचा चंगळवाद दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. वैश्विक तापमानवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान हळूहळू वाढत आहे. आता तर एकविसावे शतक संपेपर्यंत हवामान-बदलामुळे जागतिक तापमान सुमारे चार ते सहा अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. हवामान-बदलाच्या दुष्परिणामांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनावर विपरीत प्रभाव टाकायला सुरुवात केलेली दिसून येते. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे सृष्टीच्या हवामानात कमालीचे बदल घडत आहेत. म्हणूनच हवामान-बदलाचे आव्हान मानव जातीपुढील पर्यावरणीय आव्हानांपकी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही समस्या सर्व जगाला भेडसावत आहे. अन्न उत्पादन, नसíगक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींवर त्याचा परिणाम  होणार आहे. त्यासोबत त्याचे शेतीवर आणि कृषीशी निगडित इतर उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. हवामान-बदलामुळे तापमानवाढ, अनियमित पाऊस, हवेतील आद्र्रतेचा आणि तापमानाचा अचानक चढ-उतार अशा बाबींची सुरुवात झालेलीच आहे. मग या सगळ्या गोष्टींवर उपाय काय करणार आणि कधी करणार? शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, रोगराई, कीड आदींचा सामना करावा लागतो. आपल्या हवामान खात्याने अजून प्रगती केलेली नाही. केवळ अंदाज वर्तवून वेळ मारून नेतात; पण इथे हाल होतात ते शेतकऱ्यांचेच. पाऊस नाही झाला तर मग दुबार पेरणीचे संकट येते. मग किडीचा प्रादुर्भाव, त्यात खर्चाचा भर या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर आल्यावर पीक हातात येईतोपर्यंत अवकाळी पावसाने सगळेच हिरावून घेतले जाते. मग येतो महसूल विभागाचा पंचनामा! एखादा अधिकारी येतो, खोटी आश्वासने देऊन जातो. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत आले आहेत.. किती शेतकऱ्यांना वेळेवर नुकसानभरपाई दिलेली आहे? अजूनही सरकारी आकडेवारी स्पष्ट नाही. निसर्गाचा समतोलपणा राखण्यासाठी शेतकरी कटिबद्ध असतोच. मात्र काही बांडगुळांनी या निसर्गावरच अतिक्रमण केले आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यावर आत्ता उत्तर दिले जाते वृक्षारोपणाचे. वृक्षांमुळे आकाशातील ढग आकर्षति होतात व पाऊस पडण्यास मदत होते. वृक्षांचे हे महत्त्व लक्षात घेता सामाजिक वनीकरणाच्या चळवळीला जोर येणे आवश्यकच आहे. त्यासाठी शासनाने चार कोटी वृक्षांची लागवड मोहीम राबविली. मात्र त्याचे संगोपन होणे गरजेचे आहे. गेल्या आघाडी सरकारनेही दोन कोटी झाडे लावलेली होती. त्यातील किती झाडे जगवली गेली याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन तीन वष्रे होऊन गेली आहेत. या तीन वर्षांत मोदींनी अनेक देशांचा दौरा केला आहे. मग या दौऱ्यांतून शेतकऱ्यांना काय मिळाले, हा प्रश्न आहेच. हवामान खाते सुरळीत चालले तर कित्येक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आपल्याला टाळता येणार आहे. पावसाचे प्रमाण आपल्याला मोसमाआधी नेमके समजल्यास कोणते पीक घ्यायचे हे शेतकरी ठरवेल. पाऊस कधी व किती पडणार हे कळल्यास पिकाचे संरक्षण करायचे शेतकऱ्यांना जमेल. पाऊस नाही पडत असे दिसले तरी शेतकरी पेरणी करायचा थांबेल, त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही. संभाव्य नुकसान शेतकऱ्यांना टाळता येणार आहे. आज शेतकरी पावसाकडूनही मारला जातो नि सरकारच्या उदासीनतेमुळेही मारला जातो. निदान हवामान खाते तरी सक्षम करा. त्याला तरी अच्छे दिन येऊ द्या.. हवामान खात्याचे काम नंदीबलागत झाले आहे. पाऊस पडेल काय, तर नुसताच मान डोलविणार, हे आता कुठे तरी थांबायला पाहिजे.

लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:35 am

Web Title: weather department issue monsoon prediction farmer problem
Next Stories
1 ‘एक बाजार’ आणि जुने आजार!
2 कर्जमाफीचा गोंधळ
3 शेतकऱ्यांची एकजूट हेच उत्तर
Just Now!
X