दोन महिन्यांनी, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी मांडणी करण्यासाठी मुलं आपापल्या वस्तू घेऊन आली. रंगीत काचा, दगड, पाने, चॉकलेटचे रॅपर्स, बसची तिकिटं, नाणी, गोटय़ा, खेळण्यातल्या गाडय़ा.. मुलांनी जमवलेल्या वस्तूंचे एवढे वैविध्य आम्हा सर्वाना प्रथमच अनुभवायला मिळाले. एका केशवमुळे मुलांच्या अंगी उपजत असलेल्या संचयवृत्तीचा छंदप्रदर्शनापर्यंत खूप सुरेख प्रवास झाला होता..

 

केशव. जेमतेम अडीच फूट उंचीचा, सावळ्या वर्णाचा, पडक्या दातांचा, वाटोळ्या चेहऱ्याचा आणि वाटोळा चष्मा असलेला, हसऱ्या डोळ्यांचा मुलगा. माझ्या एका प्रयोगाला केशव कारणीभूत ठरला. त्याचीच ही गोष्ट.
वेळ सकाळची. शाळा भरण्याची. ‘‘केशव, हातात काय आहे? दे, दे ते माझ्याकडे, शीऽऽ! काय काय घेऊन येतो हा वर्गात!’’ केशवच्या हातातून त्याला रस्त्यात सापडलेले वाळके, चिखलातले, माझ्या दृष्टीने अगदी घाणेरडे पान काढून घेऊन मी ते केराच्या डब्यात टाकले आणि त्याला हात धुवायला पिटाळले. आमची ही अशी झकाझकी रोज चालत असे. रोज तो काही ना काही तरी घेऊन यायचा, कधी ते वाळलेले पान असेल तर कधी एखादा दगड, काच किंवा चॉकलेटची चांदी असे काहीही. शाळेत येताना, रस्त्यात त्याला कुठली वस्तू आकर्षित करेल याचा नेम नसायचा. मग तो ती अगदी जिवापाड जपत वर्गात यायचा आणि मी निर्दयपणे त्या वस्तूला केराची टोपली दाखवत असे. त्यामुळे आता स्वारी रोज काही घेऊन आली की ती वस्तू बाईंपासून कशी लपवायची या विचाराने नवनवीन शक्कल लढवत असे. कधी शर्टाच्या आत, बास्केटमध्ये तर कधी पॅन्टच्या खिशात. पण वर्गातले इतर डिटेक्टिव्ह त्याने काय आणलंय आणि ते कुठे लपवलंय याची अगदी बरोबर, खडान् खडा माहिती मला देत असत. केशव बिचारा आमच्या या एकजुटीमुळे अगदी हतबल होत असे. पण म्हणून वस्तू आणायचे पण थांबत नसे.
बरं, त्याच्या आईलाही काही सांगून उपयोग नव्हता, हे सत्यही मला एकदा उमगले. झाले असे की पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत केशव माझ्याजवळ येऊन एखादे खास गुपित सांगावे तसे माझ्या कानापाशी येऊन सांगून गेला, ‘‘बाई, गोगलगाई आल्या आहेत.’’ ‘‘बरं मग?’’ मी निर्विकार! दोन-तीन दिवस रोज मला ‘‘बाई, गोगलगाई आल्या आहेत.’’ हे सत्य कळत होते पण त्यानंतर वर्गात येताना तो ओंजळीतच गोगलगाय घेऊन आला. झुरळ-पाल झटकावी तशी त्याची गोगलगाय मी टाकून द्यायला लावली. त्या दिवशी मी त्याला, ‘‘आईलाच नाव सांगते,’’ म्हणून धमकीच दिली. शाळा सुटल्यावर मी त्याला हाताशी धरून, त्याच्या आईची वाट पाहात होते. लांबून मला ती येताना दिसली. मी त्याला म्हटले, ‘‘आता चांगलं तुझं नावच सांगते आईला, नको नको त्या वस्तू उचलून आणतो.’’ पोरसवदा अशी त्याची आई आमच्या जवळ आली, आपली मूठ उघडून अगदी कौतुकाने, मला म्हणाली, ‘‘बाई, ही बघा गोगलगाय. गोगलगाई आल्या आहेत.’’ मी दचकलेच. केशवचा उगम मला समजला. मी केशवचा हात सोडून दिला. माय-लेकांची जोडी गोगलगाय सांभाळत निघून गेली.
मला स्वत:लाच उमजलं, अरे! लहानपणी आपणही असे उद्योग केले आहेतच की! फक्त जमवलेल्या वस्तू वेगळ्या होत्या, बांगडय़ांचे तुकडे, गोटय़ा, गुंजा आणि इतर काय काय! खरं सांगायचं झालं तर मुलांच्या अंगी अशी ही वस्तू जमवण्याची वृत्ती उपजतच असते. ती त्यांची सहज प्रवृत्ती आहे. आपल्या नजरेला सहसा पडणार नाहीत अशा वस्तू मुलांच्या डोळ्यांना सहज दिसतात, त्यांचं कुतूहल जागं करतात, मग त्या वस्तू त्यांना हव्याशा वाटतात. तासन् तास ते अशा प्रकारच्या वस्तू गोळा करण्यात आणि त्या नीट जपून ठेवण्यात घालवू शकतात. केशवचे हे अशा वस्तू गोळा करणे, त्याच्या संचय करण्याच्या वृत्तीचाच एक भाग होता. मी मात्र माझ्या मोठेपणीच्या भूमिकेत शिरून केशवच्या प्रत्येक वस्तूला केराची टोपली दाखवत होते. किती सहज आपण लहान मुलांच्या कृतींना अव्हेरू शकतो. बरं-वाईट समजण्याचा सगळा ठेका घेऊन बसतो आपण; पण मुलांच्या नजरेतून जर जग पाहिले तर? जरा वेगळं (आणि चांगलंदेखील!) दिसेल का आपल्याला? वाटलं, मुलांच्या अंगी असलेल्या या वस्तू जमवण्याच्या वृत्तीचा उपयोग त्यांना एखादा छंद लावण्याकरिता आणि तो जोपासायला शिकवण्यासाठी करता आला तर मुलांना त्याचा फायदाच होईल. त्यादृष्टीने वाचन केलं तेव्हा तसा संदर्भ सापडला मग त्याची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं.
एक दिवस केशव वर्गात आला. त्याच्या हातात काहीच नव्हतं. मी त्याला विचारलं, ‘‘केशव, आज काही मिळालं नाही का?’’ त्याने चष्म्याआडून जरा संशयानेच माझ्याकडे बघितले. त्याची धास्ती मला सहज वाचता आली. मी हसून म्हटले, ‘‘अरे, तू जे काही आणशील ते काही मी केरात टाकणार नाही. उलट आजपासून तू जे आणशील ते आपण सगळे जण बघू आणि जपून एका खोक्यामधे ठेवू.’’ मग बाकीच्या मुलांनाही सांगितलं, ‘‘उद्यापासून तुम्हालाही जर असे काही सापडले, काही आवडले तर शाळेत घेऊन या. आपण आपल्याला सापडलेल्या वस्तू एका खोक्यामध्ये जमा करून ठेवणार आहोत.’’ सगळ्यांनी ऐकून घेतलं, पण त्यांना काही समजलेलं दिसत नव्हतं. सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीच मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी घरातला एक रिकामा खोका घेऊन मी वर्ग गाठला. त्या दिवशी नेमकं केशवला काही तरी सापडलं होतं. त्याला काही सापडलं असलं की मला त्याच्या हालचालींवरून आणि नजरेतून बरोब्बर कळायचे, कारण ती हालचाल व नजर वस्तू माझ्यापासून लपवण्यासाठी असायची. मी त्याला म्हटलं, ‘‘आज तुला काय सापडलंय ते मला दाखवशील? मी ते अजिबात केरात टाकणार नाही. हा बघ एक खोका आणला आहे, याच्यात तुला सापडलेल्या सगळ्या वस्तू आपण जपून ठेवू.’’ कसा कोणास ठाऊकपण माझ्या मनापासूनच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला. आज बाई आपली वस्तू टाकणार नाहीत अशी त्याची खात्री झाली असावी. त्याने पँटच्या खिशात हात घालून माझ्यासमोर मूठ उघडली. एक मळलेला पण मधूनच चकाकणारा मणी होता. ‘‘हाऽऽऽ!!! किती छान मणी आहे,’’ मी मुद्दामच मोठय़ाने चित्कार केला. माझ्या चित्काराचा परिणाम म्हणून सगळ्या चिमुकल्या डोक्यांची तो मणी बघायला गर्दी झाली. एव्हाना केशवला आपण काही तरी एकदम भारी घेऊन आलोय असं वाटायला लागलं. मग मी आणलेला खोका त्याच्यासमोर ठेवला आणि म्हटलं, ‘‘आजपासून तू आणलेल्या वस्तू आपण या खोक्यात जमवू या. चालेल?’’ स्वारी विचारात पडली. मी म्हटलं, ‘‘अरे, त्या वस्तू तू तुझ्या हाताने ठेव. मग तर झालं?’’ हो नाही करता थोडय़ा नाराजीनेच तो तयार झाला. मी रोज तुला तुझी वस्तू दाखवीन, मी पुन:पुन्हा त्याला सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो आल्यावर त्याला खोका दाखवला. आता त्याचा विश्वास बसला की आपली वस्तू सुरक्षित आहे. त्यानंतर मात्र तो जे काही वर्गात आणत असे ते आम्ही सर्व जण उत्सुकतेने बघत असू. त्यावर भरपूर बोलत असू आणि मग ती आमच्या खोक्यात जमा होत असे.
बाकीच्या मुलांनीही मग अशा काही वस्तू आणायला आपोआप सुरुवात केली. काही दिवस गेल्यावर मुलांच्या संचयवृत्तीचे परिवर्तन त्यांच्या ठायी एखादा छंद जोपासण्यात आता करू शकू, असं मला वाटायला लागलं. एकदा सकाळी खोक्याभोवती डोकी गोळा झाली असताना, संधी साधून मी मुलांना छंदाची कल्पना द्यायला सुरुवात केली. म्हटले, ‘‘आता घरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी अशाच तुम्हाला आवडतील त्या वस्तू जमवायच्या आहेत. कुणाच्या वस्तू घ्यायच्या नाहीत, पण आपोआप सहज सापडल्या, जमवाव्याशा वाटल्या तर जमा करायच्या.’’ मी उदाहरणे द्यायला सुरुवात केली, ‘‘म्हणजे तुमच्यापैकी कोणाला वाटले वेगवेगळ्या प्रकारची पानं जमवावीत तर पाने जमवा. कोणाला वेगवेगळी बटणे जमवायची असतील तर ती जमवा, कोणाला वेगवेगळी पेनस् जमवावीशी वाटली तर पेनस् जमवा, दगड, रंगीत काचा, मणी, गाडय़ा काहीही जमवा. मग शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी आपण आपल्या वस्तू शाळेत घेऊन येऊ आणि सगळ्यांना दाखवू.’’ सगळे खूप छान ऐकत होते. मला वाटले, ‘‘वा! आपण मुलांमध्ये काय छान कल्पना रुजवली. आता आपल्या वर्गातल्या प्रत्येकाला एक छंद असेल. दोन महिन्यांनी शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी सगळे आपापल्या वस्तू घेऊन येतील आणि त्या वस्तूंचे एक सुंदर प्रदर्शन आपण भरवू, अशी ‘शेखचिल्ली स्वप्ने’ मी बघू लागले. दुसऱ्या दिवशी शुभम धावत वर्गात आला, धापा टाकत त्याने पँटच्या खिशातून भरपूर वाळलेली पाने बाहेर काढली. माझ्यासमोर ती टाकून म्हणाला, ‘‘ही बघा, मी खूप पानं आणलीत.’’ माझी ‘छंद’ कल्पना पार पाला-पाचोळा होऊन धुळीला मिळाली आहे, हे मला उमगले. आपण छंद म्हणजे काय वगैरे, मुलांना फार छान समजावू शकलो आहोत, हा माझा भ्रम शुभमने दूर केला. पण मी हरले नाही.
मुलांची संचयवृत्ती छंदात रूपांतरित करायची असेल तर त्यांच्या आई-वडिलांच्या सहभागाखेरीज शक्य नाही हे लक्षात आले. पण अर्थातच त्याविषयी पालकांशीही बोलणे, त्यांना कल्पना समजावून सांगणे गरजेचे होते. शिवाय माझ्या वर्गापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता सर्व वर्गाच्या मुलांसाठी ही कल्पना राबवावी असाही विचार केला. मग पालकसभेत या वयोगटातल्या मुलांच्या ठायी असलेल्या संचयवृत्तीविषयी चर्चा केली आणि तिचे पर्यवसान त्यांच्या अंगी एखादा छंद जोपासण्याकरिता होऊ शकेल ही कल्पना मांडली. त्यांना मुलांच्या आवडीच्या कुठल्याही वस्तू जमवण्यासाठी मुलांना मदत करावी असे सुचवले. जर मुलाला उमजले नसेल तर पालकांनी स्वत: एखादी वस्तू जमवायला सुरुवात करून त्याला त्या वाटेवर हळूच सोडावे असेही सुचवले. त्यानंतर मात्र मुलं, त्यांच्या भाषेत सांगायचे तर, ती घरी ‘काय जमा करत आहेत’, याबद्दल भरभरून बोलू लागली. त्यांच्या संचयवृत्तीचा विकास होत असताना मी पाहात होते. सुरवंटातून फुलपाखरू व्हावे तसे. वर्गातल्या आमच्या खोक्यातही भर पडत होती.
दोन महिन्यांनी, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी मांडणी करण्यासाठी मुलं आपापल्या वस्तू घेऊन आली. पाच वर्ग विविध वस्तूंनी ओसंडून गेले. रंगीत काचा, दगड, पाने, चॉकलेटचे रॅपर्स, बसची तिकिटं, नाणी, गोटय़ा, खेळण्यातल्या गाडय़ा, वेगवेगळी खेळणी, एका विशिष्ट रंगांच्या वस्तू अशा एक ना अनेक प्रकारच्या गोष्टी मुलांनी जमवल्या होत्या. जमवलेल्या वस्तूंचे एवढे वैविध्य आम्हा सर्वानाच प्रथमच अनुभवायला मिळाले. एका केशवमुळे मुलांच्या अंगी उपजत असलेल्या संचयवृत्तीचा छंदप्रदर्शनापर्यंत खूप सुरेख प्रवास झाला होता. माझाही प्रवास झाला होताच की, केशवच्या प्रत्येक वस्तूला केराची टोपली दाखवण्यापासून मुलांच्या उपजत संचयवृत्तीचा विकास घडवण्यापर्यंत..
ratibhosekar@ymail.com