‘आम्ही आहोत नद्या महाराष्ट्राच्या मी गोदावरी, मी भीमा मी तापी नि मी कृष्णा’ असं गाणं कानावर पडलं. मी चमकून पाठीमागे बघितलं, तर उडय़ा मारत, फेर धरून माझ्या नद्या नाचत होत्या. त्यांचे माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्या आपल्याच नादात होत्या. खरोखरच एक चमत्कार झाल्यासारखे मला वाटले. मुलांना सगळ्या नद्या सहज पाठ झाल्या होत्या..

महिना-दीड महिन्यापूर्वीची गोष्ट. सकाळी साधारण साडेदहा वाजता मी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांना भेटायला उभी होते. तिथल्या शाळांमधून चाललेले ज्ञानरचनावादावर आधारित प्रयोग मला पाहायचे होते. खरं सांगायचं तर काहीशा साशंक मनानेच मी तिथे थांबले होते. माझा सगळा रस माझ्या पूर्वप्राथमिक शाळेत. माझ्या शाळेचे सगळे काम बाजूला ठेवून त्या शाळांमधून शिकण्यासाठी मी तीन दिवसांकरिता दाखल झाले होते; पण पूर्वप्राथमिकच्या दृष्टीने या माझ्या साताराभेटीचा नक्की उपयोग होणार आहे किंवा नाही याची मला खात्री वाटत नव्हती.

ज्ञानरचनावादावर आधारित प्रयोग पाहण्यासाठी माझ्याप्रमाणेच हल्ली तिथे अनेक जण शाळाभेटीसाठी येत असतात. मी तिथे होते त्या तीन दिवसांतही जथ्यानेच अनेक शिक्षक शाळाभेटीसाठी प्रत्येक दिवशी येत होते. मी मात्र एकटीच होते. प्रतिभा भराडेंनी मला वर्दापुरे सरांकडे सुपूर्द करून त्यांना मला शाळा दाखविण्यास सांगितले. मी ज्या शाळांमधून फिरले त्या सगळ्या शाळा पहिली ते चौथीपर्यंतच्या होत्या. शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा, कुमठे, मानेवाडी कारी अशा तीन शाळांमधून मी त्या तीन दिवसांत जाऊन आले. सगळ्या शाळा खरोखरच अप्रतिम. तिथे चाललेले प्रयोग व त्यामुळे त्यांना मिळालेले यशही अचंबित करणारे. सगळी मुले अगदी सगळ्या क्रिया-कृती करून दाखविण्यात पटाईत झाली होती. मी मात्र साशंक होते की, या सर्वाचा मला नक्की काय उपयोग होईल म्हणून!

ज्ञानरचनावाद आणि पूर्वप्राथमिक, पूर्वप्राथमिक आणि ज्ञानरचनावाद! मी फिरत होते प्राथमिकच्या वर्गातून, पण शोध घेत होते की, माझ्या पूर्वप्राथमिकच्या मुलांना यातून काय देता येईल याचा. वर्गात एकीकडे बसून राहायचे. मुलांच्या व शिक्षकांच्या दिनक्रमात अडथळा न आणता कामकाज पाहायचे अशा स्वरूपाच्या सूचना शाळा पाहायला आलेल्या आम्हा सर्वानाच दिलेल्या होत्या. दिलेल्या सूचनांनुसार मी काहीशा अलिप्तपणे शिक्षक आणि मुलांच्या क्रिया-कृती पाहत पहिल्या दिवशी शिवाजीनगरच्या शाळेत एका वर्गात बसले होते. मध्येच ती मुले इतिहासाचे धडेच्या धडे नाटय़रूपाने सादर करून दाखवू लागले आणि मी एकदम हरवलेले गवसल्याच्या आनंदाने व आश्चर्याने स्वत:ला म्हटले, ‘‘अरे हे!’’ नकळत मी माझ्यातच मागे वळून पाहिले.

फार जुने नाहीत, पण मी केलेले सहा-सात वर्षांपूर्वीचे काही प्रयोग आठवले. शाळेचे दुसरे सत्र चालू झाले की, स्नेहसंमेलनाची गडबड सुरू होते. दरवर्षी एक विषय ठरवून स्नेहसंमेलन केले जाते. त्या त्या विषयाची दहा गाणी जमवून, जमली नाही तर वेळप्रसंगी रचून त्या विषयाचा सोहळा साजरा केला जातो. एका वर्षीचा विषय ‘महाराष्ट्र’ असा होता. त्यामुळे गाण्यांना काहीच कमतरता नव्हती. महाराष्ट्रातील विविध सण व त्यांची गाणी, लोकनृत्ये यांनी शाळा दणाणून गेली होती. माझी मुले, लहान शिशूची; म्हणजे साधारण साडेतीन ते चार वर्षांची. वाटले की यांना महाराष्ट्राची ओळख करून देता येईल का? म्हणजे असं की, आपला महाराष्ट्र कसा संपन्न आणि समृद्ध आहे, तिथले डोंगर, नद्या, महाराष्ट्रात पिकणारी फळे, तिथल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाज्या, प्रसिद्ध पिके, तिथल्या जंगलात कोणते प्राणी आढळतात यांची ओळख यांना करून देता येईल का? एवढय़ाशा जीवांना पेलेल का महाराष्ट्र? अगदी खरं म्हणजे शाळेच्या दिवसांत भूगोल हा काही माझ्या आवडीचा विषय नव्हता. त्यामुळे या सगळ्यांची ओळख करून देताना मलाच आधी अभ्यास करावा लागणार होता. एकदा असाही विचार आला, मुलांना पुढे जाऊन हाच अभ्यास करायचा आहे. मग आतापासून कशाला भूगोल त्यांच्या माथी मारायचा; पण का कोणास ठाऊक सारखे वाटत होते की, मुलांना मजा वाटेल अशा रीतीने ही माहिती त्यांना करून देता येईल. मी प्राथमिक शाळेत जाऊन चौकशी केली की, महाराष्ट्राचा भूगोल कितव्या इयत्तेला आहे? तर समजलं की चौथीला आहे. परत मनात विचार आला, अरे बाप रे, म्हणजे चौथीचा भूगोल लहान शिशूला घ्यायचा? पण तरीही मनाचा हिय्या करून पुस्तक घेऊन आले. विचार केला की, बघू या तर, नाही तर आहेच आपल्या एवढय़ा सणांमधला कुठला तरी सण आणि त्याचे गाणे किंवा एखादे लोकनृत्य!

पुस्तक घरी घेऊन आले आणि माझ्या शाळेच्या दिवसांत वाचला नव्हता एवढय़ा मनापासून महाराष्ट्राचा भूगोल वाचून काढला. महाराष्ट्रातील डोंगर, नद्या, फळे, पिके, भाज्या आणि जंगलातले प्रसिद्ध प्राणी सगळ्यांना घेऊन एक सांगीतिका तयार केली, ‘मी आहे महाराष्ट्र मुलांनो, मी आहे महाराष्ट्र!’ मग झाला महाराष्ट्र एक प्रमुख व्यक्तिरेखा. बाकीच्या व्यक्तिरेखा झाल्या महाराष्ट्रातील डोंगर, नद्या, फळे, पिके, भाज्या आणि जंगलातले प्रसिद्ध प्राणी. रूपरेषा ठरली. स्वत: महाराष्ट्रच सगळ्यांची ओळख करून देत होता आणि त्यानुसार त्या त्या व्यक्तिरेखा पुढेपुढे येत होत्या. कार्यक्रम यथावकाश छान पार पडला.

पण खरी मजा तर पुढे माझ्या लक्षात यायला लागली. मधली सुट्टी चालू होती. मी वर्गात काही तरी करत बसले होते. अचानक ‘आम्ही आहोत नद्या महाराष्ट्राच्या, मी गोदावरी, मी भीमा, मी तापी नि मी कृष्णा’ असं गाणं कानावर पडले. मी चमकून पाठीमागे बघितलं तर उडय़ा मारत, फेर धरून माझ्या नद्या नाचत होत्या. त्यांचे माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्या आपल्याच नादात होत्या. खरोखरच एक चमत्कार झाल्यासारखे मला वाटले, कारण मला एकदम ‘महाराष्ट्रातील नद्या कुठल्या?’ या रूक्ष प्रश्नाला आवंढा गिळत गिळत आठवून आठवून उत्तर देणारी मी आणि माझ्या वर्गातील माझ्यासारखीच भूगोलाला कंटाळलेली माझी दोस्तमंडळी आठवली. त्या पाश्र्वभूमीवर ही चिमुकली मंडळी सगळ्या नद्यांची नावे धडाधड सांगत होती. हळूहळू माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली, ती म्हणजे मुलांना डोंगर, नद्या, फळे, पिके, भाज्या, प्राणी ही माणसं वाटत होती व त्यांची ओळख म्हणजेच त्या अनुषंगाने स्वत:चीच ओळख आपण करून देत आहोत असे त्यांना वाटत होते. सगळ्या व्यक्तिरेखांच्या ओळखीसाठी लिहिलेले काव्य हे त्यांच्या ओळखीच्या बालगीतांत थोडाफार फरक करून लिहिलेले होते, त्यामुळे सगळ्या वर्गाला तो महाराष्ट्राचा भूगोल तोंडपाठ झाला होता. स्नेहसंमेलन संपल्यानंतरही किती तरी दिवस माझा महाराष्ट्र, ‘मी आहे महालाष्ट्र मुलांनो, मी आहे महालाष्ट्र’ म्हणून नाच करत होता. डोंगर झालेली मुले, जेव्हा महाराष्ट्र गाणे वर्गात म्हणायला लागत असे तेव्हा पुढे येऊन लगेच पैलवानासारखे करत असत, कारण आमचे गाणे होते,

।। माझे डोंगर, माझे डोंगर
सह्य़ाद्री, सातपुडा माझे डोंगर
पोलादी आणि आहेत कणखर ।।
वसईची केळी, नाशिकची द्राक्षं, घोलवडचे चिकू, नागपूरची संत्री आणि कोकणचा राजा सगळे आपली आपली गाणी म्हणत नाच करायचे.
।। माळ्याच्या मळ्यामधून कोण गं आलं,
टोमॅटो, कोबी, बटाटा, वांग।।
।। माझ्या गं शेतामध्ये काय काय पिकतं
ज्वारी-बाजरी, तांदूळ पिकं।। असं म्हणत भाज्या आणि पिके ठुमकत येत होती, तर जंगलामधल्या प्राण्यांचा धुमाकूळ तर काय विचारायलाच नको.
।। जंगलामधले माझ्या आपण प्राणी पाहू या
धमाल उडवू या मुलांनो, धमाल उडवू या
ससे, हरीण, कोल्हे, वाघ, अस्वल पाहू या
धमाल उडवू या मुलांनो, धमाल उडवू या।।

किती तरी दिवस वर्गात एकदम धमाल चाललेली होती. चौथीच्या वर्गातल्या भूगोलाच्या तोंडी परीक्षेत माझ्या लहान शिशूच्या मंडळींनी नक्की बाजी मारली असती एवढा भूगोलाचा अभ्यास त्यांचा झाला होता, तोही अगदी उडय़ा मारत मारत.

हा माझा प्रयोग यशस्वी झाला आणि मग मात्र मला नादच लागला. नंतर एकदा पाणी विषय होता तेव्हाही पृथ्वीचा रंग तिच्यावर असलेल्या पाण्यामुळे अवकाशातून निळा दिसतो इथपासून सुरू करून, पाण्याचे स्रोत, पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे उपयोग, पाण्याचे प्रदूषण, घ्यावयाची काळजी इथपर्यंतच्या गोष्टी त्यांना सुलभ वाटतील अशा गाण्यांमधून गुंफल्या आणि सादर केल्या. बालहक्क विषयही त्यांना त्याची व्याप्ती किती, कशी आहे कळावी अशी मांडणी करून सादर केला. प्रत्येक वेळी अनुभव हाच आला, की मुले अगदी समरसून त्या विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात.

साताऱ्याच्या शिवाजीनगरची मुले तानाजी मालुसरे, शिवाजी, बाजीराव देशपांडे होऊन अशीच समरसून इतिहास उलगडत होती; पण आता पहिल्यांदाच भेटत असलेली ती सगळी जण मला एकदम जुनी ओळख असल्यासारखी वाटायला लागली. सगळा दिवस त्याच्याबरोबर गाणी, गोष्टी आणि खेळात कसा गेला कळला नाही. इथे आपण आलोय ते बरोबर का चूक या दुविधेत सापडलेल्या माझ्या मनावरचं सगळं मळभ दूर झालं. याच वाटेवरून तर आपण चालत होतो ही जाणीव होऊन साताऱ्याच्या शाळांच्या त्या अनोळखी वाटा क्षणार्धात माझ्या वहिवाटेच्या झाल्या. ज्ञानरचनावादाचा धडा मी नकळत केव्हाच गिरवला होता की!

– रती भोसेकर