21 September 2018

News Flash

नाते तुझे नि माझे..

माझा या सदराचा लेखन प्रवास आणि त्याची मजा काही औरच होती.

माझा या सदराचा लेखन प्रवास आणि त्याची मजा काही औरच होती. भारल्यासारखी लेखनाची लागणारी समाधी प्रत्येक उपक्रमाची नव्याने आणि विस्ताराने मूल्यमापन करणारी ठरली. त्या उपक्रमांचा झालेला उपयोग माझ्यापुरता मर्यादित न राहता माझ्यासारख्या वाटचाल करणाऱ्या अनेकांपर्यंत पोहोचवता आला याचं समाधान वाटतं आहे. पण वाचकहो, आता आपला हा संवाद सध्यापुरता तरी थांबवायचा आहे. या वर्षभरात मला तुमच्यापैकी अनेकांचे ई-मेल आले, दूरध्वनी आले. प्रत्येक प्रतिक्रिया ही लेखनाची जबाबदारी निश्चितच वाढवणारी होती.

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 25000 MRP ₹ 26000 -4%
  • Apple iPhone 8 64 GB Silver
    ₹ 60399 MRP ₹ 64000 -6%
    ₹7000 Cashback

‘गुड मॉऽऽऽऽर्निग मुंबई’ ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमातील जान्हवीची रेडिओवरील आरोळी आठवते का? तिच्या त्या आरोळीने मुन्नाभाई जसा एकदम फ्रेश होत असे तसाच आणि तेवढय़ाच ताकदीचा अनुभव माझ्या लहान शिशूतल्या मयूरीने मला काही वर्षांपूर्वी दिला होता. लहान शिशूतली चार वर्षांची माझी मयूरी न चुकता रोज सकाळी ९ वाजता वर्गाच्या दारात एका हातात बास्केट आणि चेहऱ्यावर भरपूर हसू घेऊन उभी असायची आणि जोरात ‘बाऽऽऽई’, अशी हाक मारायची. मी चंद्रवंशी. त्यामुळे सकाळी मी फारशी बडबड करत नसे. माझी बहुतेक कामं शांतपणे झोपेचाच एक भाग असल्यासारखी करत असे. पण मयूरीची हाक कानावर पडली की माझी सगळी मरगळ निघून जात असे. मला एकदम जादू झाल्यासारखं टवटवीत वाटत असे आणि तेवढय़ाच जोरात (आता आश्चर्य वाटतंय)  मी पण, ‘मयूऽऽऽरी’ अशी तिला हाक मारत असे. मग आम्ही एकमेकींना अगदी खूपखूप वर्षांनी भेटल्याप्रमाणे मिठी मारत असू. हा आमचा रोजचा कार्यक्रम असे.

त्या वर्षी वर्ष संपत आलं तेव्हा जानेवारीपासून माझ्या मनात विचार येत होता, मयूरीच्या या हाकेचा माझ्यावर होणारा सकारात्मक परिणाम तिला कसा कळणार? तिच्यासाठीच्या या माझ्या भावना ती माझ्या वर्गातून पुढे गेली तरी तिच्याजवळ असायला पाहिजेत असं वाटायला लागलं. आपल्यामुळे आपल्या बाईंना किती छान वाटायचं हे तिला कळून तिच्या ते संग्रही राहावं असं वाटलं. म्हणजे तिची ती वाचायला लागली की केव्हाही माझ्या आणि तिच्या अशा या खास आठवणी तिला कधीही वाचता येतील. मग विचार केल्यावर जाणवलं असं तर वर्गातल्या प्रत्येकाबरोबर आपलं काहीतरी विशेष असं नातं वर्षभरात नेहमीच जोडलं जातं. वर्गातल्या प्रत्येकाबाबत त्याच्या आणि माझ्या अशा काही खास आठवणी आहेतच आहेत. त्यातूनच सुरू झाला ‘नाते तुझे नि माझे’ उपक्रम. मयूरीपासूनच मी त्याची सुरुवात केली होती. यामधे त्या वर्षांपासून वर्षांच्या शेवटी एप्रिल महिन्यात माझ्या वर्गातल्या प्रत्येकाला एक माझं पत्र मिळत असे. त्यात त्याने आणि मी वर्गात काय काय गमतीजमती केल्या ते मी लिहीत असे. तो वर्गात असल्याने मला कसं वाटायचं हे सांगत असे. आता तो मला सोडून दुसऱ्या वर्गात जाणार तेव्हा मला त्याची कशाबद्दल आठवण येईल हे लिहीत असे. मयूरीच्याच बाबतीत मला वाटतं मी लिहिलं होतं,

‘प्रिय मयूरी,

तुझी सकाळी सकाळीच कानावर पडणारी ‘बाऽऽऽई’ अशी हाक मला एकदम ताजंतवानं करते. त्या हाकेची मी सकाळपासूनच वाट बघत असते. वर्गात त्यामुळे सगळ्यांनाच किती छान वाटतं. एखादं दिवस जरी तू आली नाहीस की तुझ्या हाकेची खूप आठवण येते.’

अशाच पद्धतीने बरच काही.

श्रीराम नावाचा वर्गात मुलगा होता. तो स्वत: एकदम हुशार. छान गोष्ट सांगायचा. पण इतरांवर नजरही ठेवून असायचा. कोण लिहीत नाही, कोण उलट लिहितोय याबद्दल स्वत: सतर्क राहायचाच, पण मलाही सतत सतर्क करायचा. त्याला पत्र लिहिताना म्हटलं होतं.

‘प्रिय श्रीरामबुवा,

बुवा तुम्ही वर्गामधे हसत हसत येता.

सगळीकडे नजर फिरवून मांडा ठाकून बसता.

बुवा तुमची स्वत:पेक्षा इतरांवर नजर भारी.

बाई याचे चार उलटे, बाई याची पाटी कोरी,

सांगून बाईंना हैराण करते तुमची स्वारी.’

मी खुर्चीत कधीही न बसता खाली मुलांबरोबर बसत असे. मुलांना बसायला सतरंज्या होत्या पण मी त्याच्यासमोर लादीवर बसत असे. वर्गातल्या गार्गीच्या लक्षात आलं तेव्हापासून ती काळजीपूर्वक माझ्यासाठीही बैठक घालत असे. का नाही मला तिची आठवण येणार? एवढी माझी काळजी घेणारी गार्गी दुसऱ्या वर्गात जाताना माझी आणि तिची ही आठवण बरोबर घेऊन गेली.

लिहायला लागले आणि जाणवलं, प्रत्येकाबाबत आपल्याकडे खास त्याच्या आणि माझ्याच अशा आठवणींचा भरपूर खजिना आहे. त्यानंतर दरवर्षी न चुकता न खंड पाडता हा आठवणींचा खजिना माझ्या वर्गातील प्रत्येकाला पत्ररूपाने मिळत असे. मी त्याचे आणि माझे नाते फुलवणारे क्षण कायमस्वरूपी पत्ररूपाने त्याच्याकडे सोपवत असे. खरं तर मला आता माहीत नाही की कोणाकोणाकडे ती पत्रं अजून आहेत. पण दुसऱ्या वर्गातील एक पालक आई मात्र एकदा आवर्जून येऊन मला म्हणाली, ‘‘बाई, केवढं महत्त्वाचं लिहून देताय या मुलांना. ती मोठी झाली की त्यांना वाचल्यावर नक्की तुमच्या भावना कळतील.’’ खरं तर तिचं मूल माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे त्याला असं काही पत्र मिळालं नव्हतं पण तिने मात्र उपक्रमाची तोंडभरून स्तुती केली. मला छान वाटलं त्या माऊलीच्या बोलण्याने. एका व्यक्तीपर्यंत तरी माझा उपक्रम आणि त्यातील भावना पोहोचली होती.

आज या उपक्रमाची आठवण यायला हेच कारण आहे. वर्ष सरलं आहे. वाचकांशी माझे भावबंध जोडले गेले आहेत. आणि जाणवलं  आता तुम्हालाही पत्र लिहिण्याची वेळ आली आहे. तेव्हा..

प्रिय वाचकहो, सप्रेम नमस्कार.

आता माझं आणि तुमचंही एक नातं माझ्या मनात तयार झालं आहे. माझ्या मनातल्या तुमच्याबद्दलच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची वेळ आली आहे. ही लेखमालिका सुरू होण्यापूर्वी मी लेखनाला प्राधान्य देत नव्हते. माझं प्राधान्य हे केवळ माझ्या उपक्रमांना असतं. ते कसे केले, त्यातून नेमके काय फायदे झाले याची माझ्या मनातली मांडणी ही मनातच असे. कागदावर उतरली नव्हती. या लेखमालिकेच्या निमित्ताने ते सुसूत्र पद्धतीने मांडले गेले. याचं संपूर्ण श्रेय हे अर्थातच ‘लोकसत्ता’चं आणि वाचकांचं.

दर महिन्याला आता आपला कोणता उपक्रम मांडायचा याची सुरुवातीला एक यादी केली होती. ते कशा पद्धतीने पोहोचवायचे याची एक मांडणी केली होती. पण नंतर काही लेख हे अचानक वेगळेही लिहिले गेले. पण तो लेखनप्रवास आणि त्याची मजा काही औरच होती. भारल्यासारखी लेखनाची लागणारी समाधी प्रत्येक उपक्रमाची नव्याने आणि विस्ताराने मूल्यमापन करणारी ठरली. त्या उपक्रमांचा झालेला उपयोग माझ्यापुरता मर्यादित न राहता माझ्यासारख्या वाटचाल करणाऱ्या अनेकांपर्यंत पोहोचवता आला याचं समाधान वाटतं आहे. पण आता आपला हा संवाद सध्यापुरता तरी थांबवायचा आहे. या वर्षभरात मला तुमच्यापैकी अनेकांचे ई-मेल आले, दूरध्वनी आले. प्रत्येक प्रतिक्रिया ही लेखनाची जबाबदारी निश्चितच वाढवणारी होती. या वर्षभरात वाचकहो, तुमच्यामुळे मी जास्त अभ्यास करायला लागले एवढं मात्र निश्चित.

बालकवितांच्या लेखानंतर अनंत भावे यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या कवितांची आणि गोष्टींची पुस्तकं माझ्यापर्यंत मुलांसाठी कौतुकाने पोहोचवली. एकदा त्यांची आणि पुष्पाबाईंची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा पुष्पाबाईंनीही या वयोगटातील मुलांविषयी आणि त्यांच्याशी निगडित कामाविषयी छान गप्पा मारल्या. तो दिवस तर माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असाच ठरला. एका बालशिक्षिकेला तिच्या कामाविषयी आणि उपक्रमाविषयी एवढय़ा थोर व्यक्तीशी संवाद साधायला मिळाला यापेक्षा भाग्य भाग्य म्हणतात ते दुसरे काय.

‘आनंदवन’मधून भारतीताई आमटे यांनी उपक्रम आवडतात असं आवर्जून कळवले आणि आमच्यात संवादांची देवघेव सुरू झाली. त्यांच्या इथल्या बालवाडीतील गमतीजमती, त्यांच्या नातीबरोबर माझे काही उपक्रम कसे केले हे अधूनमधून कळवू लागल्या. त्यांना स्वत:ला माझं हे क्षेत्रच जास्त आवडतं आणि तुम्ही करत असलेलं काम खूप छान आहे या त्यांच्या प्रतिक्रिया मला पुढील वाटचालीस नक्कीच प्रोत्साहित करणाऱ्या ठरतील.

दादर येथील ‘जे दत्त’ कंपनी जी लहान मुलांची लाकडी खेळणी बनविण्याची जुनी व नावजलेली कंपनी आहे तेथून नानाही फोनवरून आवर्जून लेख आवडल्याचे कळवत असत. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या कारागृहातून ई-मेलद्वारे आलेले पत्र वाचून दोन-तीन मिनिटे डोकं एकदम विचार करायचंच थांबलं. त्या गृहस्थांना काही कारणाने कारावास झाला आहे. पण तुरुंगातही ते माझ्या लेखांची आतुरतेने वाट पाहतात आणि लवकरच बाहेर पडल्यावर आपल्या शाळेत ते उपक्रम करावेत अशी त्यांची मनापासूनची इच्छा त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली होती. त्यांच्या एका शिष्याने तो पत्रव्यवहार माझ्यापर्यंत पोहोचवला होता. त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा.

आई वर्गाने तर आपल्या मुलांच्या अनेक समस्यांवरील उपाय विचारले. तर कितीतरी शाळांमधील शिक्षिकांचे अशाच प्रकारचे उपक्रम आम्हालाही करायचे आहेत त्यासाठी मार्गदर्शन हवे, असे फोन येत होते. सगळं वर्ष कसं सरलं माझं मलाच कळलं नाही एवढी मी सगळ्यांच्यात गुंतत गेले. जास्तीतजास्ती काळजी घेऊन एकही ई-मेल उत्तराशिवाय राहू नये याची काळजी घेत होते. तरीसुद्धा कोणी राहिलंच असेल तर ते नजरचुकीने एवढंच म्हणता येईल. ई-मेल आणि फोनवरून वाचकांशी झालेल्या संवादाप्रमाणेच प्रत्यक्ष भेटून सांगणारे माझे वाचक तर शाळा, बालभवन सगळीकडेच भेटत होते.

हे झाले मोठे वाचक, पण माझे लहान वाचकही होते. आपल्या बाईंचा फोटो वृत्तपत्रामधे येत आहे याचं माझ्या मुलांनाही कौतुक असायचं. लेख वगैरे त्यांच्यासाठी काही महत्त्वाचं नसायचं. त्यांना फक्त आपल्या बाईंचा फोटो येतो हे कळायचं. पण ते काहीतरी अभिमानास्पद आहे ही जाणीव त्याच्यात असायची. एकदा सोमवारी शाळेत गेले तर एक मुलगा लांबून ओरडत ओरडत आला, ‘‘बाई, बाई, तुमचा फोटो आला आहे पेपरमध्ये.’’ त्याच्या चेहऱ्यावर एकदम बाईंना माहीत नसलेली माहिती आपण देत आहोत असा भाव होता.

बालभवनात एकदा एक जण हातात माझ्या लेख असलेल्या वृत्तपत्राचे पान अगदी फोल्ड करून माझाच चेहरा दिसेल अशा तऱ्हेने दुमडून घेऊन आला. माझे लक्ष नव्हते. मी मुलांबरोबर धावत होते. तो माझ्यामागे, ‘‘ओ टीचर, ओ टीचर, तुमचा फोटो. तुमचा फोटो.’’ असं म्हणत धावत होता. तसाच एक पूर्वीचा माझ्या वर्गातला पण आता तिसरीत गेलेला मुलगा गंभीरपणे, ‘‘बाई तुम्ही पेपरमधे लिहिता नं?  माझी आई मला वाचून दाखवते. मला फार आवडतं.’’ असं सांगणारा माझा वाचक होता. ज्या मुलांचा उल्लेख असायचा ते आणि त्याचे पालक येऊन भेटायचे. माझा केशव, जाड भिंगातून बघत, ‘‘बाई, तुम्ही माझ्याबद्दल लिहिलंय, ते आईने वाचून दाखवलं.’’ असं सांगून जायचा. अनुभवातून रंग ओळख करून घेणाऱ्या ऋत्विकलाही आपलं वृत्तपत्रामध्ये बाईंनी नाव छापून आणलंय याचा कोण आनंद झाला होता आणि त्या दिवशी त्याच्या घरी येणाऱ्या सगळ्यांना तो ते वाचायला देत होता, असं त्याच्या आईने हसत हसत आनंदाने सांगितलं. असे हे वाचक लाभण्याचे भाग्य फक्त आमच्यासारख्या बालक्षेत्रात काम करणाऱ्यांचेच असू शकते याबद्दल दुमत नसावे.

वाचकहो, तुमच्या बरोबरच्या या प्रवासाने एक लेखिका म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे. पूर्वी फक्त उपक्रम करणं एवढंच महत्त्वाचं वाटत असे, आता त्याबरोबर त्याच्या लेखनाचंही महत्त्व कळलं आहे. त्या लेखनाची बी या प्रवासामुळे मनामध्ये खोलवर रुजली आहे. या बीचा सखोल अभ्यास आणि मुलांबरोबरचं आणि त्याच्याशी निगडित घटकांबरोबर सातत्याने काम याच्या जोरावर मोठा वृक्ष होईल याची काळजी मी घेणार आहे. अजून अशा आणि अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचा प्रसार दूरवर करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान गावातील मुलांपर्यंत त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. तेव्हा हा प्रवास इथे जरी थांबला तरी अविरत चालूच राहणार आहे.. लोभ असावा. येते मी.   रती भोसेकर …..

सदर समाप्त

 

रती भोसेकर

ratibhosekar@ymail.com

First Published on December 24, 2016 12:11 am

Web Title: rati bhosekar comment on lokrang articles experience