गुरुनाथ रवींद्रनाथ टागोर आणि त्यांच्या शांतिनिकेतनची गोष्ट वाचल्यापासून आमच्या शाळेच्या मैदानावर मुलांना घेऊन जावं आणि रोज तिथेच वर्ग भरवावेत असं वाटत होतं. मनात अनेक शंका होत्या, पण मुलांनी त्या खोटय़ा ठरवल्या. उलट जे वर्गात शक्य नव्हतं ते त्यांना मैदानात अनुभवायला मिळालं. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव मिळाले आणि शांतिनिकेतन अनुभवण्याचं माझं स्वप्न काही अंशी पूर्ण झालं.

झाडाखाली भरणाऱ्या वर्गाचं मला खूप आकर्षण आहे. झाडाखालचे वर्ग म्हटलं की आठवतं ते शांतिनिकेतन. अजून तरी मी न पाहिलेलं. प्रत्येक शिक्षकाचं तीर्थस्थान आहे आणि असायलाच पाहिजे असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन. त्याच्याशी निगडित असलेली एक खूप छान गोष्ट आहे. गोष्ट अशी की एकदा गुरुदेव झाडाखाली मुलांना शिकवत होते. काही मुलं त्यांच्यासमोर बसून ऐकत होती, तर काही मुलं झाडावर बसून ऐकत होती. तेवढय़ात गुरुदेवांना कोणीतरी म्हणालं, ‘‘हे काय गुरुदेव, अर्धी मुलं झाडावर बसली आहेत.’’ गुरुदेव पटकन् म्हणाले, ‘‘बघा नं, खाली बसलेल्यांना मी केव्हाचा सांगतोय, तुम्हीपण झाडावर बसा. पण ही ऐकतच नाहीत. किती मजा येत असेल ना झाडावरच्या मुलांना!’’  मला मनापासून आवडते ही गोष्ट! असंही मी ऐकलं होतं की, गुरुदेवांच्या वर्गात मुलंच रोज ठरवायची की आज आपल्याला कोणता विषय शिकायचा आहे. त्यांच्या आवडीनुसार ती त्या विषयाच्या वर्गात जाऊन बसत असत.

BJP, Namo Yuva Sammelan, Nagpur University, ground, Student Organizations, Strong Opposition,
नागपूर : विद्यापीठाच्या मैदानावर भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाषण; विद्यार्थी संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण…
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती
england cricket team fan pays kal ho naa ho tribute during india vs england test match
VIDEO: क्रिकेट स्टेडियमवर शाहरुखची हवा! विदेशी चाहत्याने ट्रम्पेटवर वाजवलं “कल हो ना हो” गाणं

या दोन्ही गोष्टी आपल्या वर्गासाठी, अर्थात आपल्या मर्यादांच्या कक्षेत कशाकरिता येतील याचा विचार मनात चालू होता. खरं तर ही गोष्ट वाचल्यापासून माझं मन वर्गात लागतच नव्हतं. आमच्या शाळेच्या मैदानावर, मोकळ्या आकाशाखाली मुलांना घेऊन जावं आणि रोज तिथेच वर्ग भरवावेत असं वाटत होतं. निसर्गाच्या सान्निध्यात मस्त मजेत दिवस घालवायचे. रोज मुलंच आल्यावर सांगतील की त्यांना त्या दिवशी काय करायचं आहे. जर एखाद्या दिवशी त्यांना चित्र काढायची असतील तर तो संपूर्ण दिवस भाषा, गणित, परिसरानुभव सर्व काही चित्रांमधून घ्यायचे, जर एखाद्या दिवशी गाणी म्हणायची असतील तर विषयाच्या अनुषंगाने त्या दिवशी नुसती विविध गाणीच म्हणायची. प्रत्येक दिवस कसा घालवायचा हे मुलंच ठरवणार. नुसत्या कल्पनेनेसुद्धा वाटत होतं की, आपले वर्ग असे रोज झाडाखाली भरवले तर खरंच किती मजा येईल मुलांना आणि आपल्यालाही शाळेत यायला.

मग मुलांना रोज मैदानावर घेऊन जायचं असं मी ठरवलं. मुलांना मात्र आपण रोज मैदानावर जायचं हे सांगायचं नाही. ठरवलं तर खरं, पण मनात अनेक शंका यायला लागल्या. रोज मैदानावर नेलं तर त्यातील नावीन्य निघून जाईल का? मुलं चारी बाजूला उधळतील का? त्यांना एका जागी बसायची शिस्त राहणार नाही. त्यांचं लक्ष त्यांच्या क्रियाकृतींवर केंद्रित होईल का? मोकळ्या वातावरणात बाहेर बसलो की आपलंही लक्ष विचलित होतं, मुलं तर लहानच आहेत.. सारखी इथे तिथेच बघत बसतील का? सतत वाहनांचे एवढे आवाज येत असतात. गोष्ट वगैरे सांगताना एकाग्रता आणणे कठीण जाईल का? आपण त्यांचे नुकसान तर नाही ना करत आहोत? बापरे केवढय़ा त्या शंका. त्यापेक्षा एकदा वाटलं वर्गातच बसलेलं बरं. पण ते तेवढय़ापुरतंच. मैदानावरच्या, झाडाखालच्या वर्गाचं आकर्षण त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त होतं. त्यामुळे या सगळ्या शंकाकुशंकांवर त्यानं सहज मात केली आणि आम्ही रोजच्या रोज मैदानावर जायला लागलो. त्या वर्षी खरोखरच पावसाळ्यानंतरचं र्अध वर्ष आम्ही आमचा वर्ग शाळेच्या मैदानावरच्या वेगवेगळ्या झाडांखाली भरवला. तिथल्याच आमच्या या काही गमतीजमती..

दुपारची एकची वेळ होती. आमच्या शाळेच्या मैदानावर ‘मी आणि माझी चाळीस पोरं’ असे एका झाडाखाली गोलाकार बसलो होतो. आज आम्ही आमच्या या मैदानवर्गात मातीकाम घेऊन आलो होतो. एवढय़ात शर्वरीचं लक्ष झाडावरच्या एका घरटय़ाकडे गेलं. तिनं लगेच ‘‘बाऽऽऽई, झाडावर बघा. घरऽऽऽटं आहे.’’ असं म्हणतं आमच्या सगळ्यांचं लक्ष घरटय़ाकडे वेधून घेतलं. प्रत्येक जण हातातलं काम टाकून टाचा उंचावून उंचावून घरटय़ाचं निरीक्षण करू लागला. तेवढय़ात मी झाडावरच्या घरटय़ाशी निगडित आमच्या एका गाण्याचा सूर धरला. त्याबरोबर सगळ्यांनीच तो उचलून धरला. दुसऱ्याच क्षणाला, झाडावरचं घरटं बघून सगळ्यांनी

दूर एक पहाड, पहाड पे पेड,

पेड पे डाली, डाली पे पत्ते,

पत्तों मे घोसला, घोसले में चिडिया,

चिडिया के बच्चे,

इधर उधर हरियाली, इधर उधर हरियाली।

असं ओरडून ओरडून तल्लीन होऊन नाचत नाचत गाणं म्हणायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर मीही तेवढीच रमून त्या गाण्याचा आनंद घेत होते. गाण्यात वर्णन केलेली प्रत्येक ओळ मुलं प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवत होती. सगळं वातावरण विलक्षण चैतन्यमय झालं होतं. असा हा अनुभव आमच्या चार भिंतींच्या बंद वर्गात आम्हाला नक्कीच मिळाला नसता.

मैदानावरच्या आमच्या अंक ओळखीने तर धमाल उडवली होती. मैदानावर मस्तपैकी मांडा ठोकून मी मुलांच्या मधोमध बसले होते. मातीवर कोणताही एक अंक मी लिहीत होते. तो अंक कोणता हे बघण्यासाठी सगळे श्वास रोखून पळण्याच्या तयारीत उभे होते. मी आकडा लिहिला दोन आणि सगळी जणं चारी दिशांना पळाली. पुढच्या काही मिनिटांत प्रत्येकजण मैदानावरील कोणत्या तरी दोन वस्तू घेऊन हजर झाला. आता परत सगळे मी पुढचा अंक कोणता लिहिते ते बघायला पोझिशन घेऊन उभे राहिले. आमचा हा खेळ खूप वेळ चालला होता. एरवी ‘हा कोणता अंक आहे’, ‘हा कोणता अंक आहे’ अशी अंक ओळख घेताना करावी लागणारी कंटाळवाणी बडबड आणि अंक ओळखीचा मुलांचा निरुत्साह चैतन्यात बदलून गेला होता.

दररोज मैदानावर एखाद्या झाडाखाली सावलीचा अंदाज घेत आम्ही बसत असू. सावली जिथे जाईल तिथे आमचे बस्तान हलत असे. झाडाच्या हलणाऱ्या सावलीवरून माझा आणि मुलांचा ‘झाडाची सावली कुठे जाणार?’ असा एक मजेदार खेळ तयार झाला होता. मी मुलांना ‘झाडाची सावली कुठे जाणार?’ असं विचारत असे. सावलीची दिशा माहीत झाली असल्याने ज्या दिशेला सावली जात असे त्या दिशेला उडय़ा मारून मुलं ‘इथे जाणार, इथे जाणार’ असं म्हणत असत. सूर्य आपल्या डोक्यावर कुठे आहे त्यानुसार आपली सावली सरकत जाते याचा अनुभव घेत मुलं दिशाभान शिकत होती.

आमच्या मैदानात शेवरीचं एक झाड आहे. त्याच्या मऊ मऊ कापसाच्या म्हाताऱ्या पकडण्यात तर मुलांना काय मजा यायची! कधी कधी मैदानावर पडलेलं त्याचं बोंड मी मुद्दाम फोडत असे. मग तर काय, मी पण माझं वय विसरून त्यांच्याबरोबर म्हाताऱ्या पकडायला धावत असे. झाड आपल्याला कापूस देते ही जाणीव त्याच्यात मैदानवरच्या वर्गात आपोआप रुजली. कापसाचेच नाही तर इतरही झाडांचे अवयव, पानांचे प्रकार, फुलांचे प्रकार ‘मैदान वर्गा’त मुलांना खूप पाहायला मिळाले.

एकदा एक कुत्रा आमच्या इथे अचानक आला. तेव्हा त्याचं निरीक्षण तर आमच्या सर्वासाठी एक विलक्षण अनुभव होता. कारण एकेकटय़ाने कुत्रा हा प्राणी पाहिला होता. त्याची नीट माहितीही होती. पण सगळ्यांनी मिळून आमच्या ‘मैदान वर्गा’त आलेल्या या पाहुण्याचं एकमेकाच्या मदतीनं निरीक्षण केलं. अरे, त्याला बघ एक नाक आहे, ओमने सांगितलं. पण त्याच्यावर काळा डाग पडलाय, स्वप्निल म्हणाला. त्याला चार पाय आहेत. त्याने तो असा, असा असा चालतो, अभिनयासह मयूरेशने भर टाकली. कुत्र्याचं असं निरीक्षण करून वर्णन करणं मैदान वर्गाशिवाय कुठेही शक्य झालं नसतं, अर्थात मुलं कुत्र्याच्या फार जवळ जात नाहीत ना याच्यावर मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. शेवटी जाधव मामांनी कुत्र्याला गेटच्या बाहेर काढलं. किती साधी घटना, पण मुलं नुसती खिदळत होती.

आम्ही रोज मैदानावर येतो हे आता आमच्या शाळेच्या जाधवमामांना माहीत होतं. ते आमच्यासाठी काय काय गंमत घेऊन यायचे. एकदा मामांनी एका पानावर मोठी अळी आणली आमच्या ‘मैदान वर्गा’त. अळीचा रंग कोणता, ती कशी बघते, तिला ऐकू येतं का, तिचे कान कुठे आहेत, ती खाते कशी. इतकंच काय तर ती शू कुठून करते असे एक ना अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं आम्ही आमच्या परीने शोधली. मधोमध पानावरची अळी आणि तिच्याभोवती मैदानात लोळून अळीच्या पातळीवर उतरून तिचं मस्त अवलोकन करणारी मुलं. किती मनमोहक दृश्य होतं ते!

सुरुवातीला रोज आम्ही आमच्या नेहमीच्या भिंतींच्या वर्गात आल्यावर आमची हजेरी वगैरे झाली की मोकळ्या हातानेच ‘मैदान वर्गा’त जात असू. कधी मैदानावरच्या लाल मातीत बसून मातीची पाटी करून मुलं छान छान चित्र काढत असत. लेखन पूर्व तयारीची वळणं गिरवायला, अक्षरांची वळणं गिरवायला वेगळ्या वाळूची आवश्यकता भासत नव्हती. एखाद्या पानाचा देठ मुलांची पेन्सिल होत होती. त्या पेन्सिलीनं लाल पाटीवर मुलं वळणं गिरवत, अक्षरं गिरवत. गणिताचे सगळे खेळ मैदानावरच छान रंगत. लहान-मोठा, कमी-जास्त, जड-हलकं ओळखीसाठी झाडाची पानं गोळा करत, दगड गोळा करत होते. मैदान आम्हाला भरपूर शैक्षणिक साहित्य पुरवत असे. नंतर मात्र रोज आपल्याला आज काय करायला आवडेल हे आम्ही ठरवत असू. त्याचं साहित्य घेऊन ‘मैदान वर्गा’त जात असू. बरोबर आणलेलं साहित्य छान झाडाखाली ठेवत असू. कधी मातीकाम, कधी चित्र रंगवायला आमच्या चित्रकलेच्या वह्य़ा, लेखनासाठी कधी आमच्या पाटय़ा, वाचनाचा ट्रे, तर कधी हस्तकलेसाठी कागद. मातीवर आमची किनताणं घातली की आमच्या वह्य़ा वगैरेही खराब होत नसत. मुलांना आणि मला वर्गात आल्यावर कधी एकदा मैदानावरच्या वर्गात जातोय असं होऊन जायचं.

झाडाच्या सावलीत किनताणावर छान झोपून गोष्ट ऐकणारी, तिथेच मस्त लोळून चित्र रंगवणारी, आपापल्या मातीकामाच्या पाटय़ा घेऊन मस्त मातीकामात दंग असणारी, वाचनाच्या ट्रेमधील पुस्तक घेऊन छान छान चित्र वाचनात रमणारी आणि पुस्तकं बघून झाल्यावर परत ट्रेमध्ये नीट ठेऊन देणारी मुलं पाहून मला सुरुवातीला ज्या ज्या शंकांनी घेरलं होतं त्यात काहीही तथ्य नव्हतं हे मुलांनीच सिद्ध करून दाखवलं. क्रियाकृती कोणतीही असो मुलं नेहमी छान गोलाकार बसायची. उलट असं जाणवलं की कोणाचाही उगीच खोडकरपणा नसे. वर्गात आमच्या पसारा आवरायला नंतर आमच्या मावशी येत. इथे ‘मैदान वर्गा’त एवढय़ा लांब आमच्या बरोबर त्या येऊ शकायच्या नाहीत. त्यामुळे आपला पसारा आपणच आवरायचा आणि आठवणीने बरोबर घेऊन जायचा, हे मुलांच्या छान अंगवळणी पडलं होतं. या वर्गातले स्वावलंबनाचे आणि शिस्तीचे धडे तर आमच्या नेहमीच्या वर्गापेक्षा जास्तच स्वावलंबन आणि शिस्त शिकवून गेले. घरी जाताना रोज मैदानावरच्या मातीने लाल लाल होणारी मुलं माझ्या नजरेला खूप गोंडस दिसत असत.

मी माझ्या परीने शांतिनिकेतन अनुभवण्याचं, तिथे जाण्याचं आणि असण्याचं माझं स्वप्न, थोडय़ाफार प्रमाणात पूर्ण करायचा प्रयत्न माझ्या ‘मैदान वर्गा’त केला. माझ्या मुलांनीही मला छान साथ दिली. पण गुरुदेवांचं शांतिनिकेतन अजूनतरी माझ्यासाठी एक अपूर्ण स्वप्नच आहे..

रती भोसेकर

 ratibhosekar@ymail.com