rati_bhosekarलहान मुलं जेव्हा पहिल्यांदा शाळेत येऊ लागतात तेव्हा त्यांच्यासाठी ते अनोळखी जग असतं. या जगाशी मैत्री होणं सर्वस्वी त्यांच्या शिक्षिकेवर अवलंबून असतं. शिक्षिकेने आईच्या मायेनं त्यांना भावनिक सुरक्षा दिली की ते मूल तिथलं होऊन जातं. शून्य ते सहा वर्षांच्या वयाचा काळ. मानवी मेंदूची झपाटय़ाने वाढ होण्याची ही अत्यंत महत्त्वाची र्वष. त्या वर्षांमध्ये मुलाला आलेले अनुभव हे मुलाच्या पुढच्या आयुष्यात अत्यंत खोलवर परिणाम करणारे आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविणारे असतात. त्यासाठी त्यांना ‘वळण’ लावण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे समृद्ध अनुभव देणं गरजेचं असते. मुलांची वाढ ही जाणीवपूर्वक, प्रयोगशील राहूनच करावी लागते तर ती मुलं विचाराने, ज्ञानाने समृद्ध होतात. असेच काही प्रयोग करत मुलांना कसं घडवता येईल हे आपल्या स्वानुभवाने सांगणारं शिक्षिका रती भोसेकर यांचं हे सदर दर पंधरा दिवसांनी.

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक विभागात जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी, मी शिक्षिका या पदासाठी अर्ज करायला गेले तेव्हा मला लहान मुलांची आवड आहे या पलीकडे बालशिक्षण व त्याची शास्त्रशुद्ध पद्धत याची जरासुद्धा माहिती नव्हती. त्या अनुषंगाने एक शासनमान्य बालवाडी प्रशिक्षण चालू केलं होतं इतकंच! पण या विश्वातील व्यापकता आणि मोहकता खरोखरीच माहीत नव्हती. प्रशिक्षण घेऊन चारचौघींप्रमाणेच एक नर्सरी सुरू करायची आणि ती सुरू करण्यापूर्वी एखादं र्वष एखाद्या शाळेत शिकवायचं एवढाच साधा-सोपा विचार होता.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये मी रीतसर अर्ज दिला. त्यांनी मला पूर्वअनुभव आहे का, अशी विचारणा केली. अर्थातच माझं उत्तर ‘नाही’ असंच होते. ‘ठीक आहे, सध्या तरी जागा नाही.’ असे म्हणून त्यांनी माझा अर्ज ठेवून घेतला. मीही मग फारशी आशा धरली नाही; परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशीच शाळेतून फोन आला आणि मला भेटायला येण्यास सांगितलं. घरगुती अडचणींमुळे कोणी तरी अचानक एक महिना येणार नव्हतं आणि त्या जागी मला येण्याविषयी विचारणा केली होती. एका महिन्यासाठीच नोकरी करायची होती तरीपण मी त्याक्षणी हो म्हटलं. एक महिना तर एक महिना; पण थोडा तरी अनुभव मिळेल या एकाच विचाराने मी शाळेत रुजू झाले आणि माझा मुलांबरोबरचा सुंदर आणि सर्वार्थाने मला समृद्ध करणारा प्रवास सुरू झाला. कालांतराने एक महिन्याचा प्रवास एका वर्षांवर गेला आणि नंतर तो सुरूच राहिला..

हा प्रवास सुरू करण्याआधीच मी दोन मुलांची आई झाले होते, पण आता खंत वाटतेय की त्यांच्याबरोबर असा समृद्ध प्रवास माझा झाला नाही. त्याला कारण म्हणजे मुलं वाढवणं म्हणजे त्यांना ‘वळण लावणं’ असा काहीसा रूढीबद्ध (गैर)समज! शाळेमध्येही सुरुवातीला या वयोगटातील मुलांना शिकवणं म्हणजे केवळ गाणी आणि गोष्टी अशी आपली ढोबळ संकल्पना. आपण शिक्षिका आहोत आणि आपणच काय ते त्यांना शिकवणार आहोत ही वर्गपद्धतीची पकड असलेली मी जसजशी त्यांच्यात रमत गेले, तस तशी बदलत गेले. त्या छोटय़ांच्या जगातील व्यापकता मलाच अधिकाधिक छोटं करत गेली. आपण काय त्यांना शिकवणार, ती मुलंच आपल्याला किती आणि काय काय शिकवतात! तेसुद्धा अगदी हसतखेळत आणि भरपूर प्रेमानं आणि आपुलकीनं, हे गुपित उलगडत गेलं. म्हणजे हल्लीच्या परवलीच्या आणि सगळीकडे ज्याचा बोलबाला आहे त्या ज्ञानरचनावाद पद्धतीने या चिमुकल्यांनीच प्रत्यक्ष कृतीतूनच माझ्यातच शिक्षिका ते बालशिक्षिका असा बदल घडविला.

शून्य ते सहा वर्षांच्या वयाचा काळ. मानवी मेंदूची झपाटय़ाने वाढ होण्याची ही अत्यंत महत्त्वाची र्वष. त्या वर्षांमध्ये मुलाला दिलेले अनुभव हे मुलाच्या पुढच्या आयुष्यात अत्यंत खोलवर परिणाम करणारे आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविणारे असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे समृद्ध अनुभव देणं गरजेचं असते. अर्थात सर्वप्रथम त्याचे आई-वडील हे पालक या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावत असतातच पण शाळाही हेच काम करत असते. आपणही त्याच्या पालकांसारखेच मुलांना अनुभव देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहोत ही जाणीव मला होत गेली. जाणवत गेलं की त्यांच्या भावनिक आणि सामाजिक जडणघडणीत बालशिक्षिकेची जबाबदारीही खूप मोठी असते. लहान मूल आपल्या घरी वेगवेगळ्या गोष्टींमधून अगदी मोकळेपणाने अनुभव घेत आपली ज्ञानरचना करत असतं. आपल्या आई-वडिलांच्या सान्निध्यात त्याला सुरक्षित वाटत असतं. अशी सुरक्षितता, असा मोकळेपणा त्याला त्याच्या सामाजिक वातावरणात केवळ बालशिक्षिकाच देऊ शकते, म्हणून तर एकदा मूल शाळेत जाऊ लागलं की आमच्या बाई.. हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अर्थात तो तसा होण्यासाठी त्या शिक्षिकेला आपल्या छोटय़ा दोस्तांसमवेत एक घट्ट नातं निर्माण करावं लागतं. त्याच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करावा लागतो. सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की, शाळेची मुलांना सवय होईल किंबहुना त्यांना तशी सवय लागायलाच हवी, त्याशिवाय ती मुलं धीट होणार नाहीत. घरी राहिली तर मुलं आई आई करत राहतील असंही काही पालकांना वाटत असतं. पण त्यांच्या भावनिक सुरक्षिततेचं काय? एका वातावरणातून दुसऱ्या नवीन वातावरणात स्वत:ला सामावून घेणं म्हणजे लग्न झाल्यावर मुलीनं माहेरून सासरच्या घरी नांदण्यासारखंच आहे की!
माझ्या शिशुवर्गातील एक मुलगा, अर्णव, रोज शाळेत यायला नाराज असायचा. साहेब आले की वर्गात भिंतीकडे तोंड करून बसायचे. वर हाताची घट्ट घडी. रडायचा मात्र नाही. आई नोकरीवर जाण्यापूर्वी शाळेत सोडून जायची. ती जाताना तिला अच्छा, टाटा वगैरे अजिबात नाही. त्या आईचा जीव फार चुटपुटायचा. तिचं उतरलेलं तोंड पाहून मलाही फार वाईट वाटायचं.

‘अरे अर्णव, नुसता टाटा कर, इथे बघ, माझ्या जवळ बस.’ असं काहीही सांगून उपयोग होत नव्हता. असेच चांगले दोन-तीन आठवडे गेले, मी रोज वेगवेगळी आमिषं त्याला दाखवत होते पण उं हूं! कशाचा म्हणजे कशाचा परिणाम होत नव्हता. आता त्याचा नेमच ठरून गेला, शाळेत आलं की भिंतीकडे तोंड करून सगळ्या जगावर रुसून बसायचं. त्याला कारणही तसंच होतं. संगोपनासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर त्याच्या आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. इथेच गाडी घसरायला लागली. अर्णवची आई त्याला सुरुवातीला पाळणाघरात सोडत होती. सहा एक महिने तो तिथे जात होता. तिथल्या वातावरणात त्यानं स्वत:ला सामावून घेतलं होतं की तेवढय़ात पुन्हा एकदा त्याला नवीन वातावरणात सोडलं गेलं. त्यामुळे साहेबांची सर्व जगावर खप्पामर्जी.

काही तरी करणं गरजेचं होतं. कदाचित झाली ही असती अजून एखाद् महिन्यात सवय त्याला. कदाचित कशाला, नक्कीच झाली असती. पण त्याची शाळेतील पालक म्हणून मला हे मान्य होत नव्हतं. त्याच्या डोळ्यातील नाराजी मला अस्वस्थ करत होती. आणि एक दिवस मी वर्गात बाकीच्या दोस्तांना म्हटले, ‘आजपासून की नाही आपण सगळ्यांनी अर्णवबरोबर त्याच्यासारखंच भिंतीकडे तोंड करून बसायचं. तो नाही आपल्याबरोबर बसत तर आपण बसू त्याच्याबरोबर. चालेल?’ सगळ्यांना कल्पना आवडली. एव्हाना त्यांना माहीत झालं होतं की अर्णव आपल्यात येत नाही, याचं आपल्या बाईंना वाईट वाटतं. झालं, आम्ही सगळे वर्गात उलटे बसलो आणि रोजच्या क्रियाकृतींना सुरुवात केली. बाहेरून बघणाऱ्या सगळ्यांना आमच्या पाठी दिसत होत्या. अर्णवला असं काही अपेक्षित नव्हतं. त्यालाही माझ्यासकट सगळ्यांच्या अशा उलट बसण्याची एकदम गंमत वाटली. आणि थोडय़ाच वेळात स्वारीची एकदम कळी खुलली. त्याचा रुसवा नाहीसा झाला आणि आमच्या सगळ्यांच्यात तो रमून गेला. दुसऱ्या दिवशी त्यानं आईला चक्क हसत हसत टाटा केला, आईनं कौतुकानं विचारलं, ‘ही जादू कशी काय झाली?’ मी हसून म्हटलं, अर्णव आपली गंमत आईला सांगायची का रे? त्या छोटय़ा दोस्ताला काही कळलं नाही. त्याच्या आईलाही वाटलं, झाली असेल सवय. पण ती सवय नव्हती, तर आमची एक छोटीशी कृती त्याला आमच्याबद्दल विश्वास देऊन गेली होती. आपले दोस्त आणि आपल्या बाई आपल्याबरोबर नेहमीच असणार आहेत याची त्याला खात्री झाली. त्याच्यात भावनिक सुरक्षितता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो.

अर्णवसाठी केलेला हा छोटासा प्रयोग मला बरंच काही शिकवून गेला. त्यानंतर रोज वर्गात नवनवीन प्रयोग करण्यात मला रस वाटू लागला. लहान मुलं तर मला आवडत होतीच पण आता मुलांबरोबर मीच आनंदाने अनेक गोष्टी शिकू लागले. भाषेची कौशल्यं असोत किंवा गणनपूरक संकल्पना किंवा प्रत्यक्ष गणित असो किंवा झाड, पाणी वगैरे प्रकल्पांशी निगडित गोष्टी असोत, त्या जास्तीत जास्त सोप्या प्रयोगांद्वारे त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील हा विचार करत अनेक उपक्रम वर्गात मी करत गेले. अगदी रोजची हजेरी घेणं हादेखील मुलांच्या आवडीचा खेळ झाला. मला कल्पना आहे की, असे व इतर खूप चांगले उपक्रम इतरही अनेक शाळांमधून होत असतील. पण मुलांबरोबर चालता चालता मला जी वाट आपोआप सापडत गेली त्या वाटेवर नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अनेक जणी चाचपडत असतील; त्यांना माझ्या अनुभवाचा उपयोग होईल या उद्देशानं माझा हा अनुभवप्रवास आजपासून सुरू करते आहे. ‘शिकवू आनंदे’ असे न म्हणता मी म्हणेन की आपणच ‘शिकू आनंदे’