News Flash

हसरी चांदणी, रडका भोपळा

मोठय़ा शिशूचा वर्ग. दुपारची पावणेबाराची वेळ. नेहमीचा परिपाठ झाला आणि हजेरी घेण्यासाठी रजिस्टर घेतलं.

‘हसरी चांदणी- रडका भोपळा’ या खेळामुळे आज शाळेत यायचा कंटाळा आला आहे, या आपल्या भावनेला समजून घेतलं जात आहे व ती भावना प्रकट करण्यास वाव मिळत आहे ही जाणीव लहानग्यांना झाली. त्यानंतर वर्गात कधी हजेरीला नाव घेतलं आणि प्रतिसाद नाही असं कधीच झालं नाही.

मोठय़ा शिशूचा वर्ग. दुपारची पावणेबाराची वेळ. नेहमीचा परिपाठ झाला आणि हजेरी घेण्यासाठी रजिस्टर घेतलं. ‘आदित्य’ ‘हजर’, ‘स्वयम्’ ‘हजर’ ‘मत्रेय’ – काहीच प्रतिसाद नाही. म्हणून वर बघितलं तर कंटाळलेले डोळे एकटक माझ्याकडे बघत होते. दुपारच्या वेळेमुळे कोमेजलेलं चिमुकलं फूल ते. मला गंमत वाटली. बहुतेक जबरदस्तीनं स्वारी शाळेत आली होती. मी पुढचं नाव घेतलं. दोन-चार नावांनंतर परत तसंच. खरं म्हणजे हा अनुभव बहुतेक वेळा येणारा. प्रत्येक वेळेला मुलांच्या नावाने हजेरी घेतली आणि प्रतिसाद आला नाही की; त्याला जबरदस्तीनं ‘हजर’ म्हणायला लावायचं हा सगळ्यांचाच शिरस्ता. पण ही जबरदस्ती बरोबर नाही हेही मनात जाणवायचं.

दुसऱ्या दिवशी अशीच हजेरी घेत होते आणि परत तेच झालं. त्याच क्षणी रजिस्टर बंद केलं आणि म्हटलं, ‘‘शी! शाळेत यायचा काय कंटाळा आलाय नं?’’ समोरचे ऐंशी डोळे चमकले! काय ऐकलं बरं? बाईच शाळेत यायचा कंटाळा आलाय म्हणत आहेत, याची त्यांना गंमत वाटली हे दिसत होतं. मग म्हटलं, ‘‘माझ्यासारखाच तुम्हाला पण येतो का रे कधी कधी शाळेचा कंटाळा?’’ वर्गात एकदम गलका उठला. आपल्याला असं काही वाटू शकतं का आणि आपण ते तसं स्पष्ट सांगायचं असतं का, हेच त्यांना बहुतेक कळत नव्हतं. काही जण म्हणत होती, ‘‘हो हो, खूप कंटाळा आलाय.’’ काही जण म्हणत होती, ‘‘आम्हाला नाही आला कंटाळा.’’ स्वयम् एकदम कानाशी येऊन गुपित सांगितल्यासारखं म्हणाला, ‘‘बाई, मला तर रोजच कंटाळा येतो, पण तरी मी रोज शाळेत येतो.’’ आणि त्याबद्दल कौतुक करून घेऊन मगच महाराज जागेवर बसले.

सगळ्यांना शांत करून म्हटलं, ‘‘मी रोज तुमची हजेरी घेते, हो की नाही. आणि तुम्ही ‘हजर’ किंवा ‘नमस्ते’ म्हणता.’’ सगळ्यांनी मान डोलावली. पुढे म्हटले, ‘‘पण काही जण काहीच बोलत नाहीत, मग मला समजत नाही ते आलेत की नाही.’’ त्यांना माझी समस्या कळू लागल्याचं जाणवलं. ‘‘पण आता मला कळतंय, तुम्हाला जर शाळेत यायला आवडलंच नसेल तर तुम्ही कसं काही बोलणार.’’ आता आपली समस्या बाईंना समजतेय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. पुढे म्हटलं, ‘‘आणि म्हणूनच उद्यापासून एक गंमत खेळ खेळायचा आहे.’’

खेळ खेळायचा म्हटल्याबरोबर सगळे जण कान टवकारून बसले. मी दोन कार्डपेपरचे चौकोन घेतले. एकावर चांदणी काढून ती हसरी दाखवली. हसणारी चांदणी मुलांना खूपच आवडली. तिचं नाव ठेवलं ‘हसरी चांदणी’. दुसऱ्या कार्डवर गोल काढून, त्याचा चेहरा उदास काढला. त्याचं नाव ठेवलं ‘रडका भोपळा’. मग म्हटलं, ‘‘आपण कधी कधी ‘हसरी चांदणी’ असतो तर, कधी कधी ‘रडका भोपळा’.

‘‘म्हणजे काय?’’ लगेचच स्वयम्चा प्रश्न. तोच प्रश्नार्थक भाव बाकीच्यांच्याही चेहऱ्यावर. त्यांना समजावत म्हटलं, ‘‘म्हणजे कधी कधी आपल्याला शाळेत यायला खूप छान वाटत असतं, आपण उत्साही आणि आनंदी असतो. आपण एकदम या चांदणीसारखं हसत हसत वर्गात येतो. तेव्हा आपण या हसऱ्या चांदणीसारखेच दिसतो. पण कधी कधी आपल्याला घराची, आई-बाबांची, आजी-आजोबांची आठवण येत असते. परवाच नाही का श्रीरामची आजी गावाहून आली होती आणि तरीसुद्धा त्याच्या आईने त्याला शाळेत सोडलं तेव्हा त्याला किती वाईट वाटलं होतं.’’ श्रीरामला मनापासून पटल्याचं जाणवलं. ‘‘तसंच घरी कधी कधी आपल्या आवडीची माणसे आलेली असतात आणि आपल्याला मात्र इथे शाळेत यावं लागतं किंवा कधी तरी उगीचच घरी राहावंसं वाटतं. पण कोणीसुद्धा ऐकत नाही. आणि शाळेत आणतात. हो, नं?’’ वर्ग एकदम खुदुखुदु हसायला लागला. ‘अगदी बरोबर!’ असं ऐंशी डोळे लगेच बोलले. ‘‘तेव्हा की नाही आपण अगदी या रडक्या भोपळ्यासारखे दिसतो.’’ सगळ्यांच्या मनात वर्गातील त्या दोन नवीन व्यक्तिरेखांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं.

आता आपण काय करायचं सांगू, ‘‘मी हजेरी घेताना, जर तुम्हाला शाळेत यायला आवडलं असेल तर, नाव घेतलं की म्हणायचं ‘हसरी चांदणी’ म्हणजे मला समजेल की आज तुम्हाला शाळेत यायला मजा आली आहे आणि मनापासून तुम्ही शाळेत आला आहात. पण जर तुम्हाला कंटाळा आला असेल, मनाविरुद्ध शाळेत आला असाल किंवा असं वाटत असेल की घरीच राहायला हवं होतं तर म्हणा, ‘रडका भोपळा’. मग तुम्हीही मला विचारायचं. मीही सांगेन मला आज हसरी चांदणी वाटतं का रडका भोपळा. आपल्या या खेळाचं नाव आहे, हसरी चांदणी- रडका भोपळा.’’

दुसऱ्या दिवशी शाळेचा दिवस सुरू झाला. आज येताना मी बॅजमध्ये मावतील एवढय़ा आकाराची एकेचाळीस कार्डस् करून आणली होती. प्रत्येक कार्डवर एका बाजूला आमची हसरी चांदणी व दुसऱ्या बाजूला रडका भोपळा होता. मी हजेरीचं रजिस्टर घेतलं आणि म्हटलं, ‘‘लक्षात आहे नं, आपल्याला ‘हसरी चांदणी- रडका भोपळा’ खेळ खेळायचा आहे.’’
परत एकदा खेळ कशा प्रकारे खेळायचा हे सांगितलं आणि नावं घ्यायला सुरुवात केली. आणि मग काय नाव ऐकल्याबरोबर प्रत्येक जण आपल्या मन:स्थितीनुसार हसरी चांदणी किंवा रडका भोपळा असा प्रतिसाद देत होता. प्रतिसादानुसार मी त्यांच्या बॅजमध्ये हसरी चांदणी किंवा रडका भोपळा लावत गेले. मग मलाही विचारलं गेलं. मी त्या दिवशी हसरी चांदणी होते म्हणून माझ्याही बॅजमध्ये कार्डाची हसरी चांदणीची बाजू लावली.

आता रोज आमचा खेळ सुरू झाला. आपल्याला आज शाळेत यायला आवडलं नाहीये किंवा कंटाळा आला आहे, या आपल्या भावनेला समजून घेतलं जात आहे व ती भावना प्रकट करण्यास वाव मिळत आहे ही जाणीव त्या लहानग्यांना झाली आणि मग मात्र त्यानंतर कधी हजेरीला नाव घेतलं तरी काहीच प्रतिसाद नाही असं कधीच झालं नाही. जे आनंदाने शाळेत येत त्यांना आम्ही सगळे ‘हसरी चांदणी’ म्हणत असू, मात्र ‘रडका भोपळा’ असेल तरी त्याला चिडवायचं नाही हा आमचा अलिखित नियम होता. त्याच्या भावनांची आम्हाला कदर करायची होती. रोजच्या प्रतिसादानुसार कार्डाची बाजू बदलत होती. थोडय़ा दिवसांनी जाणवलं की, रडका भोपळा मुलांना आवडत नव्हता. हसरी चांदणी मात्र खूप आवडत होती. त्याचा परिणाम म्हणून की काय आता रोज सगळे हजेरी घेताना उत्साहात वाटत होते आणि रडक्या भोपळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. पडताळणी करण्यासाठी एके दिवशी मी रडका भोपळा म्हटलं व कार्डाची ती बाजू वर ठेवली. थोडय़ा वेळाने कार्डाकडे बघत म्हटलं, ‘‘छे, मला बुवा हा रडका भोपळा बॅजमध्ये आवडला नाही.

मी आता रोज हसरी चांदणीच बनून शाळेत येणार आहे.’’ ‘‘हो, बाई आम्हाला पण नाही आवडत बॅजमध्ये रडका भोपळा,’’ वर्गाच्या आमच्या ठमाकाकू ऋजुताताईंनी सर्वाच्यावतीने मत नोंदवलं. पुढे काही दिवसांनी आपणहून काही जण येताना घरातूनच हसरी चांदणी लावून येऊ लागले आणि आल्याबरोबर आम्ही आज हसरी चांदणी आहोत हे सांगू लागले. म्हणजेच ही मुले आपोआप पुढच्या पायरीपर्यंत पोहोचली की ज्यामध्ये ती मुले शाळेत येतानाच्या आपल्या मानसिकतेचा विचार करत होती व ती मानसिकता दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकत होती. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर नकळत त्यांना स्वत:लाच स्वत: जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा दृष्टिकोन मिळाला असं म्हणता येईल. स्वत:ला मांडणं किंवा व्यक्त करणं ही जी महत्त्वाची गोष्ट आपण मोठी माणसंही सहज करू शकत नाही, ती ही छोटे दोस्तमंडळी आमच्या या खेळामुळे सहज करत होती. आपल्या भावनांना वाट करून देत होती.

महिन्याच्या पालकसभेत सगळ्यांनी आवर्जून रडका भोपळा आणि हसरी चांदणीविषयी विचारलं. पालकांनी हेसुद्धा सांगितलं की, हसरी चांदणी बॅजमध्ये वर दिसायला हवी म्हणून खूप जणांचा हल्ली शाळेत येतानाचा कंटाळा बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्याचप्रमाणे ‘रडका भोपळा’ असणं म्हणजे वाईट नसतं कधी कधी आपण रडका भोपळा असू शकतो असंही मुलांनी घरी सांगितलं होतं. खरंच, निव्वळ हजेरीसाठी सुरु केलेल्या एका छोटाशा खेळामुळे आम्हाला मुलांचं मन जाणण्याचं आणि मुलांना स्वत:चं मन जाणण्याचं एक साधन सापडलं.

– ratibhosekar@ymail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:06 am

Web Title: students approach towards school
Next Stories
1 प्रयोगांच्या ‘वळण’वाटेने
Just Now!
X