रंगसप्ताह ते रंगदालने हा रंगओळखीचा प्रवास मुलांचं आणि आम्हा मोठय़ांचंही रंगांचं विश्व समृद्ध करणारा झाला. लहान वयोगटातल्या मुलांचा सर्वागीण विकास साधताना त्यांना जे अनुभवसंपन्न करावं लागतं ती शाळा, शिक्षक आणि पालक या तिघांची एकत्रित जबाबदारी आहे याची जाणीव आणि प्रचीती या रंगदालनांच्या उभारणीमुळे नक्कीच आली.

शिशु गटातील मुलांचं शिक्षण हे अनुभवाधारित असणं आवश्यक असतं हे सर्वमान्य तत्त्व आहे. अनुभवाधारित शिक्षण लहान मुलांच्या मेंदूविकासासाठी पोषक असतं. किंबहुना त्यांचा मेंदूही अनुभवांच्या सतत शोधात असतो. बालकांच्या सर्वागीण विकासात मोठय़ांना मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. लता काटदरे यांच्या मते, मुलांना मिळणारे अनुभव जर आनंद देणारे असतील तर आनंदाचे विविध पैलू त्यांच्या मेंदूत साठवले जातात. म्हणजेच हे अनुभव त्यांच्या मेंदूवर कोरले जातात आणि त्यातून होणारं त्यांचं शिक्षण आनंददायी होतं. म्हणूनच त्या वयोगटातील मुलांना आनंद देणारे संपन्न आणि समृद्ध अनुभव देणं महत्त्वाचं असतं.
मुलांच्या आनंददायी शिक्षणासाठी हे असे अनुभव देणं ही शाळा, शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी आहे. किंबहुना हे असे अनुभव एक संस्था म्हणून शाळा किंवा एक मार्गदर्शक म्हणून शिक्षक किंवा एक संगोपक म्हणून पालक आपापल्या परीने देत असतात. पण जर हे तिन्ही घटक एकत्र आले आणि त्यांनी हातात हात घालून आपल्या मुलांचं जीवन अनुभवसंपन्न करायचं ठरवलं तर ते किती सुंदर पद्धतीने होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या शाळेत झालेली काही प्रदर्शनं. त्या प्रदर्शनांच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी मिळून मुलांना वेळोवेळी ज्या अनुभवांच्या अद्भुत विश्वाची सफर घडवली त्यातल्या रंगसप्ताहाच्या अनुषंगाने घडवलेल्या एका सफरीची ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी.
रंग-ओळखीसाठी माझ्या वर्गात सुरू झालेल्या रंगसप्ताहात आमच्या शाळेत खंड कधी पडला नाहीच उलट लहान व मोठय़ा शिशुसाठी सगळ्या वर्गात तो उपक्रम दर वर्षी पक्का होऊन गेला. माझ्या सहकारी शिक्षिकाही हा रंगसोहळा आपापल्या वर्गात करायला लागल्या. पहिल्या वर्षी पालकांना दुसऱ्या दिवशी कुठला रंग आहे ते तोंडी सांगितलं होतं. त्यात आमूलाग्र बदल होऊन नीट नियोजनाने आमच्या वार्षिक माहिती पुस्तिकेत त्या आठवडय़ाची आणि त्यात काय करायचं याची माहिती आम्ही द्यायला लागलो. प्रत्येक दिवसाचे रंगही ठरवले. पहिल्या वर्षी फक्त आमचा एकच वर्ग त्या त्या रंगात रंगला होता पण पुढच्या वर्षांपासून आमचा पूर्ण विभागच त्या त्या रंगाचा होऊ लागला. पूर्ण शाळाभर तोच रंग ‘छा गया है’ असं होतं. आमचा रंगसप्ताह सगळ्या शाळेचा कौतुकाचा विषय झाला आहे.
बरीच र्वष रंगसप्ताह साजरा केल्यावर, गेल्या वर्षी मला वाटायला लागलं की रंगसप्ताहात आणखी एक पाऊल पुढे जाऊन रंगदालनं उभी करावी का, जमेल का हा उपद्व्याप. असं वाटत होतं की, रंगसप्ताहाची सांगता रंगदालनांनी करावी, त्या रंगाचे एक पूर्ण जगच मुलांच्या डोळ्यांसमोर उभं करावं, स्वतंत्रपणे त्यांना त्याचा अनुभव घेऊ द्यावा. एका रंगासाठी एक वर्ग घ्यायचा आणि फक्त त्या रंगावरच पालक व शिक्षकांनी सगळं लक्ष केंद्रित करायचं. त्या रंगाच्या जेवढय़ा म्हणून वस्तू जमवता येतील तेवढय़ा जमवायच्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या मुलांसमोर ठेवायच्या. त्या रंगाचा परिपूर्ण असा विचार करायचा. त्या रंगाच्या प्राण्यांची चित्रं, फुलं, फळं, औषधं, साबण, स्वयंपाकघरातल्या वस्तू, त्या रंगाच्या भाज्या, त्या रंगाच्या विविध छटा घ्यायच्या आणि तशा वस्तू जमवायच्या. म्हणजे फक्त रंगच नाही तर त्याच्या छटांचीही ओळख होईल. त्या रंगाची सगळ्या अंगांनी उभारणी करायची त्या रंगाच्या हस्तकला आणि चित्रकलेच्या क्रियाकृती शिक्षकांनी मुलांकडून वर्गात करवून घ्यायच्या आणि त्या वर्गात मांडायच्या. एवढय़ा वर्षांच्या अनुभवानं एक मात्र माहीत होतं की, अशी दालनं उभी करणं हे काही एकटय़ा-दुकटय़ाचं काम नाही तर यासाठी शाळा, शिक्षिका आणि पालक, तिघांनाही एकत्र काम करायला लागेल. मनात असाही एक महत्त्वाचा उद्देश होता की, आम्ही एकत्र काम केलं तर मुलांना परस्पर साहचर्याचा एक वेगळा आणि परिपूर्ण अनुभव देता येईल. पालकांना आणि शिक्षकांनाही आपण एकमेकांच्या सहकार्याने मुलांना किती उमदा अनुभव देऊ शकतो याची जाणीव येईल. या वयोगटातल्या मुलांचा सर्वागीण विकास साधताना त्यांना जे अनुभवसंपन्न करावं लागतं ती शाळा, शिक्षक आणि पालक या तिघांची एकत्रित जबाबदारी आहे याची जाणीव आणि प्रचीती या रंगदालनांच्या उभारणीमुळे येईल, असंही वाटत होतं.
हा विचार मी प्रथम शिक्षिकांपुढे मांडला. त्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. आतापर्यंत आम्ही शाळेतल्या प्रदर्शनांसाठी पालकांकडून साहित्य मागवत होतो आणि त्याची मांडणी शिक्षकवर्गच करत असे. या वेळी मात्र जाणीवपूर्वक पालकसभेमध्ये रंगदालनांचा उपक्रम आणि त्यामागचा उद्देश यांची चर्चा केली. या वर्षी रंगसप्ताहाचा शेवट आपण रंगदालनांनी करू या आणि परस्पर सहकार्याने एक परिपूर्ण अनुभव मुलांना देऊ या, असं सुचवलं. पालकांचा सक्रिय सहभाग मुलांबरोबर वस्तू जमा करण्यात तर हवा होताच पण त्यांची मांडणी करण्यातही हवा आहे असं सांगितलं. असा सहभाग हा आमच्यासाठी आणि पालकांसाठीही सर्वस्वी नवा होता. त्याचा फायदा होणार का उगीचच शाळेच्या कामात पालकांची लुडबुड होणार याविषयी मनात थोडी धाकधुक होती, पण त्याच वेळी मुलांना आपण जास्तीतजास्त समृद्ध अनुभव देऊ शकू असा विश्वासही वाटत होता. प्रदर्शन मांडणीसाठी पालकांचा सहभाग घ्यायचाच असं ठरवलं.
रंगसप्ताहाची सुरुवात केली तेव्हा पालकांशी संवाद वगैरे विषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते पण रंगदालनांच्या वेळी मात्र पूर्ण नियोजनासह शिक्षकवर्ग आणि पालकांशी संवाद साधत होते. पालकसभेमध्ये पाच वर्गाना रंगसप्ताहात साजरे केले जाणारे पाच रंग – पिवळा, लाल, पांढरा, निळा आणि हिरवा वाटून दिले. प्रत्येक वर्गाने पूर्ण लक्ष फक्त आपल्या रंगावर केंद्रित करून त्या रंगाच्या जेवढय़ा म्हणून वस्तू जमवता येतील तेवढय़ा जमवायच्या, त्या रंगाचे जेवढे अनुभव मुलाला देता येतील तेवढे द्यायचे हे समजावून सांगितले. मुलांना त्या रंगाच्या दालनात आपण जात आहेत असंच वाटलं पाहिजे.
वर्गाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी वर्गभर तोच रंग दिसला पाहिजे, अशी रंगदालनांची संकल्पना स्पष्ट केली. सगळे जण मनापासून कामाला लागले. वर्गातील शिक्षकांनी पालकांचे गट केले, नेमकं कोणी काय जमा करायचं हे सांगितलं, जेणेकरून एकाच प्रकारच्या वस्तू जमा होऊ नयेत आणि त्याचबरोबर एखादी वस्तू राहून जाऊ नये याची खबरदारी घेतली गेली. शिक्षक आणि पालक दोन्ही गट या उपक्रमात मनापासून सहभागी झाले.
..आणि रंगदालन मांडणीचा तो दिवस उजाडला. त्या दिवशी दुपारी चार वाजता शाळा सुटल्यावर रंगदालनं उभी करायची असं ठरवलं होतं. दुपारी चार ते रात्री साडेनऊपर्यंत शिक्षिका आणि पालकांनी मिळून दृष्ट लागावी अशी रंगदालनं मुलांसाठी उभी केली. खरोखरीच रंगांची एक अद्भुत नगरीच मुलांसाठी सगळ्यांनी हातात हात घालून उभी केली. सजावट करताना मुलं आजूबाजूला नव्हती. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आल्यावर त्यांच्या नजरेतलं आश्चर्य आणि त्यांच्या नजरेतून रंगांची दुनिया अनुभवण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो.
रंगदालनांचं औपचारिक उद्घाटन झालं आणि वर्गावर्गात त्या रंगाचा महोत्सव साजरा व्हायला लागला. प्रत्येक वर्गात प्रवेश करणाऱ्या लहान-थोरांवर त्या रंगाची बरसात होत होती. वर्गात प्रवेश केल्यावर त्या रंगाचा टॅटू काढला जात होता. पालक मुलांकडून वर्गातील रंगानुसार त्या रंगाचे क्राफ्ट करून घेत होते. वर्गामधल्या त्या रंगाच्या वस्तू, चित्रं भरभरून बघून झाल्यावर वर्गाबाहेर पडताना त्याच रंगाचा खाऊ मिळत होता. सर्व वर्गाना जोडणाऱ्या पॅसेजमध्ये काही पालक मुलांना चित्र रंगवायला देत होते. तिथे बसून मुलं रंगदालनामधल्या रंगांची चित्रं रंगवत होती. सगळं वातावरण रंगमय झालं होतं. मुलांच्या आणि पालकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आम्ही शिक्षिका त्या उत्साहाच्या धबधब्यात न्हाऊन निघालो होतो. शाळा दणाणून गेली होती.
रंगसप्ताह ते रंगदालने हा रंग-ओळखीचा प्रवास नक्कीच मुलांचं आणि आम्हा मोठय़ांचंही रंगांचं विश्व समृद्ध करणारा झाला.
या सगळ्या प्रवासाचा मला वैयक्तिक झालेला फायदा असा की, सुरुवातीला म्हटलं तसं मुलांना अनुभवसंपन्न करताना शाळा, शिक्षक, पालक या एकेका घटकाला काही मर्यादा येतात, पण जर तिन्ही घटक एकत्र येऊन एखादा उपक्रम राबवतील तर मुलांचं अनुभवविश्व संपन्न करण्याच्या दिशेने आपण मोठीच मजल मारू शकू हा माझा होरा खरा ठरला आणि पुढेही असेच आणखी उपक्रम राबवण्यासाठी उत्साह वाढला.
 ratibhosekar@ymail.com

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?