21 March 2019

News Flash

मोठं सत्य

‘‘तन, मन, वचन या साऱ्यांद्वारा आम्ही एकमेकांशी अत्यंत एकनिष्ठ राहिलो आहोत. ...

जगविख्यात लेखिका अमृता प्रीतम आणि त्यांचा सुप्रसिद्ध चित्रकार मित्र इमरोज याचं सहजीवन म्हणजे प्रौढ वयात रुजलेल्या प्रेमाची आणि उतार वयात व्यक्त होणाऱ्या उत्कट भावभावनांची सत्यकथा आहे. ज्या काळात त्यांनी हे पाऊल उचललं त्या काळात त्यांना परखड टीकेला सामोरं जावं लागलं. अमृताजी म्हणत, ‘‘तन, मन, वचन या साऱ्यांद्वारा आम्ही एकमेकांशी अत्यंत एकनिष्ठ राहिलो आहोत. अत्यंत सच्चेपणानं आमच्यातलं नातं जोपासलं आहे. खरं तर समाजापुढे आम्ही एक परिणामकारक उदाहरण ठेवलं आहे. समाजाला बळकट केलंय. आम्ही काय म्हणून लाज वाटून घ्यायची? ’’ 

 

त्या दोघांनी एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा तिचं वय होतं ४६. तो तिच्यापेक्षा साडेसहा वर्षांनी लहान. त्याचं तिच्यापेक्षा लहान असणं तिला कधी कधी अस्वस्थ करून जायचं. एकदा ती त्याला म्हणाली, ‘‘तू तरुण आहेस. आता तू आयुष्यात स्थिर व्हायला हवंस. तू तुझ्या मार्गानं जा. माझ्याबद्दल म्हणशील तर मी फार जगेन असं वाटत नाही.’’ यावर तो पटकन म्हणाला, ‘‘तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरणच. मला इतक्यात मरायचं नाही.’’ एक दिवस विषण्ण मन:स्थितीत ती पुन्हा म्हणाली, ‘‘तू एकदा बाहेर पडून जग बघून ये. परत आल्यावरसुद्धा तुला जर माझ्याबरोबर राहावसं वाटलं तर तू सांगशील ते ऐकायला मी तयार आहे.’’ यावर तो ताडकन उठला आणि त्यांच्या छोटय़ाशा खोलीत तीन फेऱ्या मारल्या आणि म्हणाला, ‘‘झालं माझं जग बघून. माझा निर्णय कायम आहे.’’ त्याच्या कृतीनं तिला काय बोलावं कळेना.

कोणत्याही प्रेमकथेत शोभावा असा हा प्रसंग. कुणाला तो नाटकी वा कृत्रिम वाटण्याची शक्यता. पण तो प्रत्यक्षात घडला आहे तो जगविख्यात लेखिका अमृता प्रीतम आणि त्यांचा सुप्रसिद्ध चित्रकार मित्र इमरोज यांच्यामध्ये. अमृता-इमरोजचं सहजीवन म्हणजे प्रौढ वयात रुजलेल्या प्रेमाची आणि उतार वयात व्यक्त होणाऱ्या उत्कट भावभावनांची सत्यकथा आहे. अमृताजींच्या ‘रसीदी टिकट’ या आत्मचरित्रातून आणि उमा त्रिलोक यांच्या ‘अमृता-इमरोज एक प्रेमकहाणी’ (अनुवाद – अनुराधा पुनर्वसू) या पुस्तकातून ती आपल्यापर्यंत पोहोचते. ती समजून घेताना कधी आपल्या जाणिवा समृद्ध होत जातात तर कधी प्रेमाच्या सांकेतिक कल्पना आपल्या नकळत तपासू लागतो.

अगदी तरुण असल्यापासून इमरोजच्या मनात अमृताजींविषयी प्रेम तर होतंच पण त्याबरोबर आदर आणि भक्तिभाव होता. साहिर लुधियानवी आणि अमृताजी यांच्या गहिऱ्या मैत्रीविषयी त्यांना माहिती होती. एकदा अमृताजींना स्कूटरवरून घरी सोडताना इमरोजच्या पाठीवर अमृताजी हाताच्या बोटानं साहिरचं नाव गिरवत होत्या, परंतु त्यामुळे इमरोज यांची प्रेमभावना जराही उणावली नाही. पुढे अमृताजींसोबत राहायला लागल्यावर एकदा त्यांनी हसतहसत म्हटलं की, ‘‘इमू, जर मला साहिर मिळाला असता तर तुझी भेट झाली नसती.’’ त्यावर ते ठामपणे म्हणाले, ‘‘मी तर तुला भेटलोच असतो, भले साहिरच्या घरी नमाज पढताना तुला शोधून काढावं लागलं असतं तरी..’’ असाच एक दुसरा प्रसंग. ‘आओ कोई ख्वाब बुने’ या साहिरच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ इमरोजने बनवलं होतं. पुस्तकाचं नाव वाचून गंभीर झालेल्या अमृताजींना पाहून इमरोज फटकन म्हणाले, ‘‘स्वप्न विणण्याची गोष्ट करतो. स्वप्न होण्याची नाही.’’ त्यांच्या प्रतिक्रियेला अमृताजींनी मनापासून हसून दाद दिली. आपल्या प्रियतमेला तिच्या असफल प्रेमासह स्वीकारण्यासाठी आभाळाएवढं मन लागतं ते इमरोजपाशी निश्चित होतं. त्याविषयी ते म्हणाले आहेत. ‘‘अमृता भेटल्यानंतर माझ्यातील रागाची भावना लुप्त झाली. कशी ते मलाही माहीत नाही. कदाचित प्रेमाची भावना प्रबळ झाल्यामुळे द्वेष, राग, मत्सर, अहंभाव राहत नसावा.’’ या निखळ नात्यामुळे त्यांनी अमृताजींना सर्वार्थानं साथ दिली. वार्धक्यामुळे त्यांना कुठे जाणं अवघड वाटत असेल तर निमंत्रण नसतानाही इमरोज त्यांच्या सोबत जायचे. त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडून स्वत: गाडीत किंवा बाहेरच्या हिरवळीवर बसून पुस्तक वाचायचे. घरून आणलेला डबा खायचे. ते दोघं जाणत होते की, साहिरबरोबरचं त्यांचं आयुष्य हा आभास होता तर इमरोजबरोबरचं आयुष्य हे वास्तव होतं. साहिरनं त्यांना अस्वस्थता दिली तर इमरोजनं समाधान. हे समाधान आणि विश्वास कसा निर्माण होत असेल? आज आपल्या आसपास पन्नाशी ओलांडलेली अशी काही जोडपी वावरताना दिसतात की एकमेकांना आलेले वॉट्स अ‍ॅपवरचे एसएमएस वाचून अस्वस्थ होतात, एखाद्दोन व्यक्ती न्यायालयाकडे धाव घेतात तर विवाहाची पन्नाशी गाठल्यावरही काही जण एकमेकांविषयी उतू जाणारं असमाधान घेऊन जगत राहतात. या पाश्र्वभूमीवर लौकिक अर्थानं एकत्र राहण्याचं कोणतंही बंधन नसताना एकमेकांना साथ देणारं अमृता-इमरोजचं सहजीवन अधिक अलौकिक वाटायला लागतं.

आजच्या काळात अशा प्रकारचं ‘लिव्ह इन’ नातं काही प्रमाणात स्वीकारलं जात आहे, परंतु ज्या काळात त्यांनी हे पाऊल उचललं त्या काळात त्यांना परखड टीकेला सामोरं जावं लागलं. ‘लग्न न करता एकत्र राहिल्यामुळे तुम्ही समाजापुढे एक वाईट उदाहरण ठेवत आहात असं तुम्हाला नाही का वाटत?’ असा प्रश्न त्यांना विचारला गेला असता इमरोज म्हणाले, ‘‘ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते.’’ तर अमृताजी म्हणाल्या, ‘‘तन, मन, वचन या साऱ्यांद्वारा आम्ही एकमेकांशी अत्यंत एकनिष्ठ राहिलो आहोत. अत्यंत सच्चेपणानं आमच्यातलं नातं जोपासलं आहे. खरं तर समाजापुढे आम्ही एक परिणामकारक उदाहरण ठेवलं आहे. समाजाला बळकट केलंय. आम्ही काय म्हणून लाज वाटून घ्यायची? उलट आमच्याबद्दल गैरसमज करून घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी.’’ असा आत्मविश्वास निर्माण व्हायला प्रेमही त्याच ताकदीचं लागतं हे निश्चित. अर्थात प्रेम कितीही असलं तरी दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं जेव्हा एकत्र येतात, मग त्यांच्यामध्ये लग्नबंधन असो वा नसो, रोजच्या व्यवहारात छोटय़ामोठय़ा कुरबुरी, वादविवादाचे प्रसंग उद्भवणं अपरिहार्य असतं. त्याविषयी अमृताजींनी अत्यंत मोकळेपणाने सांगितलं आहे. त्यांच्यामध्येही ‘सिगरेटचं रिकामं पाकीट दिवाणावर का पडलं, गाडी बाहेर काढल्यावर गॅरेजचा दरवाजा बंद का केला नाही’ अशा क्षुल्लक कारणांचं रूपांतर ताणतणावात व्हायचं, परंतु चुटकीसरशी संपायचंही. म्हणून या सगळ्याला अमृताजी ‘छोटं सत्य’ म्हणतात. तर त्यांच्या आयुष्यातील मोठी सत्ये होती ती अशी – जेव्हा नोकर यायचा नाही तेव्हा त्या भांडी घासताना इमरोज त्यांच्या जवळ उभे राहून पाणी गरम करून द्यायचे किंवा इमरोज स्टुडिओत बसून चित्र काढत असतील तर त्या जराही आवाज येऊ न देता कामं उरकून टाकायच्या. इमरोजचा व्यवसाय फार महागडा असल्यामुळे कधी कधी त्यांच्याकडे रंग वा कॅनव्हास घ्यायला पैसे नसत. अशा वेळी त्या म्हणत, ‘‘तुझं आधीचं पेंटिंग मी विकत घेतलं. त्याचे हे पैसे.’’ कधी अमृताजींच्या पुस्तकाचे पैसे न मिळाल्यामुळे त्या उदास झालेल्या पाहून ते म्हणत, ‘‘आज मी तुझ्या कथेवर फिल्म बनविण्याचे अधिकार विकत घेतले. त्याची ही सायनिंग अमाऊंट.’’ हे संवाद म्हणजे त्यांच्या आयुष्यातील ‘मोठं सत्य.’ एकमेकांना गृहीत धरून जगतानाही परस्परांना अवकाश मिळवून देणं, त्या अवकाशाचा सन्मान करणं याहून सुंदर असं सहजीवन दुसरं कुठलं असणार? त्याचं वर्णन अमृताजींनी इमरोजना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या खास शैलीत केलं आहे. ‘आज पंधरा ऑगस्ट. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. जर कोणी माणूस कुठल्या दिवसाचं चिन्ह बनू शकत असेल तर तू माझा पंधरा ऑगस्ट आहेस. कारण तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वाला स्वतंत्रतेचा स्पर्श लाभला आहे.’

अमृताजींचं वय वाढत चाललं तसा त्यांना कधी कधी शारीरिक थकवा जाणवायचा, परंतु इमरोजचा उत्साह पाहिला की वाटायचं ‘ईश्वर एक तरुणाई तर सर्वानाच देतो पण मला त्यांनी दोन दिल्या आहेत. माझी स्वत:ची सरायला आली तर इमरोजच्या रूपानं दुसरी दिली आहे.’ एकदा आजारी पडल्यावर अमृताजी त्यांना म्हणाल्या, ‘‘मी जर गेले तर तू एकटा राहू नकोस. जगातले सौंदर्य पाहा..’’ त्यांना पुढे काही बोलू न देता इमरोज म्हणाले, ‘‘माझ्याआधी मरायचा तुला अधिकारच नाही. एक चांगली फिल्म काढायची माझी इच्छा आहे. ती काढू आणि मग दोघं बरोबरच या जगाचा निरोप घेऊ. तोवर तू सावकाश चालशील असं मला वचन दे.’’ इमरोजची साथ हे आयुष्यातील ‘मोठं सत्य’ आहे याची त्यांना सतत प्रचीती यायची ती अशी.

असं मोठं सत्य फार कमी व्यक्तींना गवसतं. वय वाढलं तरी हातातून निसटू न देता घट्ट पकडून ठेवता येतं. गुलजारजींच्या शब्दात सांगायचं तर ‘अमृताइमरोज’ यांचं नातं हे कविता आणि प्रतिमा यांचं नातं होतं आणि त्यांची दोस्ती म्हणजे एक आख्यायिका!

chitale.mrinalini@gmail.com

मृणालिनी चितळे

First Published on September 24, 2016 1:11 am

Web Title: big truth