पती-पत्नीच्या नात्यात मुलं हा अविभाज्य भाग असतो; परंतु उतारवयात मुलांचं बोट सोडता आलं नाही वा मुलांनी आपलं बोट धरावं, अशी अपेक्षा करत राहिलं तर सहजीवनातील आनंद हरवत जातो. मुलांबरोबरचं आणि मुलांशिवायचं असं पती-पत्नीचं मिळून दोघांचं असं आयुष्य असतं. त्यामधील समजूतदारपणाचे साकव पुन:पुन्हा पक्के करावे लागतात. कसे? ..
‘‘तुम्हाला शेवटचं सांगते, मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे. वयाची सत्तरी आली तरी घरातील धुणंभांडी, स्वयंपाक आहेच.’’ अनघा तावातावानं बोलत होती.
‘‘मला शक्य असेल तेवढी मदत मी करतोच ना? तरी तुझी किटकिट संपत नाही,’’ महेश वैतागून म्हणाला.
‘‘किटकिट? सर्वासाठी खपायचं ते खपायचं वर त्यांची नाराजी आहेच. काल पाहिलंत ना, मी खपून मसालेभात केला तर तेल जास्त पडलं म्हणून गायत्रीच्या कपाळावर आठय़ा होत्या. सासूबाईंच्या राज्यात मला किंमत नव्हती आणि आताही तेच.’’
कुणालाही वाटेल की हा संवाद इथल्या कनिष्ठ मध्यमवर्गातील प्रौढ नवरा-बायकोंमध्ये घडत आहे. प्रत्यक्षात तो घडत होता अमेरिकेत. सहा खोल्या, पुढेमागे बगीचा असलेल्या प्रशस्त घरात. आज महेश-अनघासारखी अनेक जोडपी आहेत की ज्यांची मुलं परदेशात स्थायिक झाली आहेत. निवृत्तीनंतर त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय त्यांनी स्वखुशीनं स्वीकारला आहे. सुरुवातीला दोन-तीन वेळा टुरिस्ट व्हिसावर तिथं जाऊन आल्यावर तिथली संपन्नता, स्वच्छता, शिस्तप्रियता यामुळे ते भारावून गेले. मुलगा आणि सुनेनं तिथं येऊन राहण्याचा प्रस्ताव पुढे ठेवल्यावर त्यांचा समजूतदारपणा पाहून हरखून गेले. एव्हाना त्यांच्या संसारात दोन मुलांची भर पडली होती. त्यामुळे आपला त्यांच्यावर भार पडत नसून त्यांना आपली गरज आहे या जाणिवेनं परावलंबित्वाची जाणीव त्यांच्या मनात नव्हती. तिथं गेल्यावर दोघांनी आपणहून घरकामाची जबाबदारी उचलली; परंतु नव्याचे नऊ दिवस संपल्यावर दोन पिढय़ांमधील मतभेद चेहरा बदलून डोकावू लागले. नातवंडांमागे धावधाव धावायचं पण निर्णय घेण्याचं कोणतंच स्वातंत्र्य नाही यामुळे सासू-सुनेमध्ये तेढ निर्माण झालीच पण महेश याबाबत काही बोलत नाही याबद्दल त्याच्याविषयीची चिडचिड उठता बसता व्यक्त होऊ लागली.
निवृत्तीनंतरच्या निरामय सहजीवनावर ओरखडे उठू लागले. अखेरीस दोघांनी मिळून भारतात येण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय मुलगा आणि सुनेच्या कानावर घातल्यावर मुलानं त्यांना राहण्याचा जराही आग्रह केला नाही. अमेरिकेला जाताना आपला भर वस्तीतील छोटा फ्लॅट विकून महेशनं पैसे बँकेत ठेवले होते; परंतु त्या पैशात आता गावात फ्लॅट घेणं शक्य नव्हतं. मुलानं मात्र नवीन फ्लॅट घेतला होता. त्यांनी तिथं राहण्यास हरकत नसल्याचं मुलानं सांगितलं. त्यावर ‘अनायासे फ्लॅट स्वच्छ राहील आणि महिन्याभरासाठी आले तर जेवायची व्यवस्था होईल,’ अशी टीकाटिपणी अनघानं केली. कुठं राहायचं यावर महेश-अनघामध्ये वाद होऊन अखेरीस ते भाडय़ाच्या घरात राहू लागले. थोडक्यात म्हणजे बारा वर्षांनी दोघं भारतात परतले ते पराभवाचं शल्य मनात घेऊन.
आपल्या परत येण्याचं कारण नातेवाईक, मित्रांना काय सांगावं यावर त्यांचं एकमत होत नव्हतं. खरं काय ते सांगून मोकळं व्हावं, असं अनघाचं म्हणणं, तर सगळं कसं आलबेल आहे हे दाखवण्याचा महेशचा आटापिटा. यापायी दोघांमधील दरी मात्र रुंदावत गेली. आजही सणासुदीला गोडधोड केलं की नातवंडांच्या आठवणीनं त्यांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि तिथं आपल्याला कशी वागणूक दिली गेली हे आठवलं की चिडचिड थांबत नाही. पती-पत्नीच्या नात्यात मुलं हा अविभाज्य भाग असतो; परंतुउतार वयात मुलांचं बोट सोडता आलं नाही वा मुलांनी आपलं बोट धरावं अशी अपेक्षा करत राहिलं तर सहजीवनातील आनंद कसा हरवत जातो याचं हे चालतं बोलतं उदाहरण.
महेश-अनघानं भारतात परतायचा निर्णय तरी एकमतानं घेतला होता. हेमंत आणि जयाच्या बाबत मात्र परिस्थिती अजूनच वेगळी होती. हेमंत एका मोठय़ा कंपनीतून सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेला. त्याची फिरतीची नोकरी. त्यामुळे जयानं कधी नोकरीचा विचार केला नव्हता. आपलं गृहिणीपद मिरवताना तिला कधी कमीपणा वाटला नव्हता. त्याच्याबरोबर देशविदेशात फिरताना आपला लेखनवाचनाचा छंद तिनं जोपासला. आपल्या मर्यादा ओळखून जमेल तसं सामाजिक संस्थांना बांधून घेतलं. हेमंत निवृत्त झाल्यावर दोन्ही मुलं परदेशात असल्यामुळे तिथं स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोणत्याच एका गावात त्यांची मुळं रुजली नसल्यामुळे परदेशात राहणं जड जाणार नाही याची त्यांना खात्री होती. मुलांजवळ राहायचं पण त्यांच्या संसारात लुडबुड करायची नाही याविषयी त्यांच्या कल्पना स्पष्ट असल्यामुळे त्यांनी मुलगा आणि मुलगी राहत होते त्या भागात छोटा फ्लॅट घेतला. गाडी घेतली. हेमंतनं ठरवल्याप्रमाणे आर्थिक सल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली. वर्ष-सहा महिन्यांत त्याचा जम बसला. जयानंही तिची राहून गेलेली इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशानं एका स्वयंसेवी संस्थेमध्ये कामाला सुरुवात केली. शनिवार-रविवार मुलं-नातवंडं भेटत होती. वाढदिवस, पिकनिक्स सगळे मिळून एकत्र साजरे करत होते. कुणालाही हेवा वाटावा, असं आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आलं होतं. पण जया मात्र मनातून अस्वस्थ होती. परदेशात राहून आपला जीव रमविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भारतात परतण्याची अनिवार ओढ तिला लागली होती. ‘काय ठेवलय तिथं जे तुला इथं मिळू शकत नाही?’ या हेमंतच्या प्रश्नाला तिच्यापाशी समर्पक उत्तर होतंही आणि नव्हतंही. ‘माझा नवरा, माझी मुलं या पलीकडचं माझं स्वत:चं असं जे अस्तित्व आहे, जी आयडेंटिटी आहे ती शब्दात नाही सांगता येणार, पण ती अमेरिकेत हरवत चालली आहे,’ हे तिचं पालुपद होतं. हेमंतला त्यामागचा भाव कळत नव्हता, पण ती इथं दु:खात नसली तरी सुखातही नाही हे उमगत होतं. दोघांनी मिळून ठरवलं की, जयानं सध्या तरी एकटीनं परत जायचं. काही दिवसांसाठी का कायमचं याचा आत्ता विचार करायचा नाही. दोघांच्यात ताकद आहे, हिंमत आहे तोवर मनासारखं जगून घ्यायचं. पुण्यात घर होतं. त्यामुळे कुठं राहायचं हा प्रश्न नव्हता. दोघांचा निर्णय ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘वाटलं नव्हतं यांचं पटत नसेल’ इथपासून दोघांपैकी कुणाला खास ‘मित्र’ वा ‘मैत्रीण’ तर नाही ना इथवर नाना शंका घेतल्या गेल्या.
जयाला मात्र पुण्याला आल्यावर पूर्वीच्या काळी बायकांना माहेरी आल्यावर कसं वाटत असेल त्याची अनुभूती आली. तिला वाटलं ‘नोस्टेल्जिया’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आपल्याला माहिती होता पण त्याची प्रचीती मायदेशी परतल्यावर आली. त्याबद्दल तिनं मनोमन हेमंतला धन्यवाद दिले. तिनं घराजवळच्या अंध विद्यालयात जाऊन कामाला सुरुवात केली. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा आखीवरेखीव असा दिनक्रम नव्हता. कधी जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून भेळपुरीचा कार्यक्रम. कधी गाण्याची मैफल. कधी साहित्यिक गप्पा. या सगळ्या विषयी हेमंतशी फोनवरून भरभरून बोलणं, कधी ई-मेलवरून लांबलचक पत्रं. वर्षांतून एकदा ती अमेरिकेला जात असे, एकदा हेमंत पुण्याला येत असे. कुणाला विश्वास वाटणार नाही पण दोन र्वष लांब राहूनही त्यांच्या सहजीवनाचा प्रवास सुरळीत चालू होता. एक दिवस अचानक हेमंतचा मेल आला. ‘मी पुण्याला येतोय. कायमचा.’
आज हेमंत आणि जया वयाच्या ऐंशीव्या वर्षी झोकून देऊन काम करत आहेत. वय मग कोणतंही असो, परस्परांना पुरेसं समजून घेऊन स्पेस देता आली, एकमेकांच्या मतांचाच नाही तर मतांतराचाही आदर करता आला तर दोघांचं आयुष्य सहजसोपं होऊन जातं. त्या दोघांसारखं मन:पूत आयुष्य जगायची संधी सगळ्यांना मिळणं अवघड असतं; परंतु आहे या स्थितीत वेगवेगळे पर्याय शोधण्याचे प्रयत्न करणारेसुद्धा फार थोडे असतात. अनेक जण महेश-अनघाप्रमाणे परस्परांमधील नात्याचा गुंता करून ठेवतात. अपेक्षांच्या जंजाळात अडकून पडतात.
‘मूल’ हा पती-पत्नीच्या नात्यातील महत्त्वाचा दुवा असतो. पण कितीही महत्त्वाचा असला तरी तो एकमेव दुवा नसतो. त्यापलीकडे आपलं स्वत:चं आयुष्य असतं. मुलांबरोबरचं आणि मुलांशिवायचं असं पती-पत्नीचं मिळून दोघांचं असं आयुष्य असतं. त्यामधील समजूतदारपणाचे साकव पुन:पुन्हा पक्के करावे लागतात. फक्त तरुण वयात नाही तर उतारवयातही. हे ज्यांना उमगतं त्यांच्यातील नातं सदा सतेज नि ताजंतवानं राहतं.
chitale.mrinalini@gmail.com