23 July 2019

News Flash

लग्न म्हणजे धर्म, अर्थ आणि ‘काम’ही ..

‘‘सेक्सविषयी आम्ही मित्रमंडळींमध्ये बोलतो, शंका विचारतो.

आपल्या आई-वडिलांना एकांताची गरज आहे ही गोष्ट मुलांच्या ध्यानीमनीही नसते. आजी-आजोबा झालेल्या व्यक्ती कधी त्यांची स्वत:ची वा जोडीदाराची गरज ओळखू शकत नाहीत. अशा वेळी गरज आहे ती विवाह करताना धर्म, अर्थ, ‘काम’ यासंबंधी घेतलेल्या शपथेचा अर्थ समजून घेऊन त्याची बांधिलकी सांभाळण्याची.

‘पूर्वीपेक्षा आमची भांडणं प्रचंड वाढली आहेत. त्यांना माझी कोणतीच गोष्ट आवडत नाही. कौतुक करणं तर लांबच. मी केलेल्या स्वयंपाकापासून माझं दिसणं आणि वागणंही त्यांना खटकत असतं.’
‘अलीकडे माझ्या बायकोचा सगळ्याच बाबतीत नन्नाचा पाढा असतो. कुणाशी बोलावं कळत नाही. माझा पाय घसरला तर ती जबाबदार असणार आहे.’
‘मुलं, नातवंडं यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे पण कधी तरी दोघांनीच राहावं असं वाटतं. ही गोष्ट मुलांना कळत नाही. खूप कुचंबणा होते.’
‘‘सेक्सविषयी आम्ही मित्रमंडळींमध्ये बोलतो, शंका विचारतो. पण याबाबत एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय मदत करणार असा प्रश्न पडतो.’
या प्रतिक्रिया माझ्याकडे पोचल्या त्या आम्ही भरून घेतलेल्या प्रश्नावलीमार्फत. काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये ‘बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्रा’ची अध्यक्षा या नात्यानं ‘साठीनंतरचे सहजीवन’ या विषयावर मी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या वयातील सहजीवन आनंदी ठरण्यासाठी वा त्यामध्ये ताण निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात हे समजून घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार करून सुमारे तीनशे जणांकडून ती भरून घेतली. त्यामध्ये आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक, भावनिक इत्यादी विषयांवरील प्रश्नांबरोबरच लैंगिक सहजीवनाविषयीचे काही प्रश्न समाविष्ट केले होते; ज्याबद्दल फार क्वचित बोललं जातं. त्यामध्ये वरील प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या होत्या.
वास्तविक विवाह करून एकत्र राहण्यामागच्या वेगवेगळ्या उद्देशांमध्ये लैंगिक सहजीवन हा महत्त्वपूर्ण घटक असतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये विवाह करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. इतर प्राण्यांमधील नर-मादी फक्त विणीच्या हंगामापुरते एकत्र येतात. दोघं मिळून घरटं बांधतात. पिल्लांना वाढवतात. त्यानंतर त्यांचे एकमेकांशी ना भावनिक नातं राहतं ना लैंगिक. माणसाचं मात्र तसं नसतं. त्याला लाभलेल्या प्रगल्भ मेंदूमुळे लैंगिक क्रियेचा आनंद तो फक्त शारीरिक पातळीवरून घेत नसतो तर भावनिकदृष्टय़ा तो त्यामध्ये गुंतलेला असतो. आपल्या जोडीदाराची खमुशी/नाखुशी यावर त्याचा आनंद नि समाधान अवलंबून असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची लैंगिक इच्छा फक्त विणीच्या काळापुरती मर्यादित नसते. वयात आल्यापासून वर्षांतील सर्वकाळ लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तो उत्सुक असतो. अर्थात त्याची तीव्रता व्यक्तिसापेक्ष असते. वयावरही अवलंबून असते. तरुण वयात परस्परांविषयी शारीरिक ओढ सर्वात जास्त असते. त्यामुळे लैंगिक आनंदासाठी मतभेद विसरून नातं टिकविण्याची मानसिकता असते. परंतु वयोपरत्वे ही इच्छाशक्ती कमी होते. याचा अर्थ ती अजिबात नसते असं नाही. प्रत्येकाबाबत याचा आलेख वेगळा असतो. ही गोष्ट अनेकांच्या ध्यानीमनीही येत नाही. हे लक्षात घेऊन प्रश्नावलीमध्ये त्यासंबंधी पुढील प्रश्न उद्धृत केले होते. लैंगिक संबंधांबाबत परस्परांच्या अपेक्षा समान आहेत का? नसल्यास त्यावरून वाद होतात का? त्यासंबंधी अधिक माहिती हवी असं वाटतं का? वाटत असल्यास ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नांची उत्तरे देताना नाव लिहिण्याचं बंधन नव्हतं. तरीही एकतृतीयांश व्यक्तींनी या माहितीसंबंधीचे रकाने कोरे सोडले होते. काहींनी अर्धवट भरले होते. यावरून त्याविषयी बोलणं/लिहिणं यासंबंधी किती संकोच वाटत असेल हे लक्षात येतं.
या वयातील ‘लैंगिक सहजीवन’ हा विषय शास्त्रोक्त पद्धतीनं समजून घेण्यासाठी डॉ. सागर पाठक यांना आमंत्रित केलं होतं. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, स्त्रियांमध्ये ऋतुसमाप्तीच्या (मेनोपॉज) दरम्यान शारीरिक आणि भावनिक बदल व्हायला सुरुवात होतात. हे बदल दृश्य स्वरूपात असतात. पुरुषांमध्येही अ‍ॅण्डरोपॉजमुळे काही बदल होत असतात याची स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही जाणीव नसते. स्त्रियांमध्ये मेनोपॉजची लक्षणे साधारणपणे वयाच्या पंचेचाळिशीच्या आसपास दिसायला लागतात तर पुरुषांमध्ये अ‍ॅण्डरोपॉजची लक्षणे ५५/६० वर्षांनंतर. त्या वेळी जाणवणाऱ्या शारीरिक बदलांविषयी बोललं जातं, पण स्वत:मध्ये होणाऱ्या लैंगिक इच्छेसंबंधीच्या बदलांकडे लक्ष दिलं जात नाही. त्याबद्दल जोडीदाराशी संवाद साधणं ही गोष्ट तर अजूनच दूरची. इच्छेअभावी वा शारीरिक क्षमतेअभावी आपण आपल्या जोडीदाराला सुख द्यायला कमी पडत आहोत याचं दडपण मात्र अनेक जणांच्या मनावर येत असतं. मग काही जण सेक्स टॉनिक घेऊन बघतात तर स्त्रिया एच.आर.टी.चा (हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी) उपाय करून पाहावा की नाही या संभ्रमात पडतात. सेक्स टॉनिक आणि एच.आर.टी. या दोन्हीच्या दुष्परिणामांची टांगती तलवार सतत मनावर असते. कधी कधी जोडीदाराला दुखवायला नको म्हणून त्याच्या इच्छेपुढे शरणागती पत्करली जाते. त्यातून अस्वस्थता, नाराजी, वैफल्य, अपराधी भाव, राग अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. मानसिक घुसमट वाटय़ाला येते. यामागचं प्रमुख कारण म्हणजे मानवी लैंगिकतेबद्दलचं अज्ञान. अनेक जणांना माहीत नसतं की ‘सेक्स लाइफ हे शारीरिक आनंदावर नाही तर मानसिक आनंदावर अवलंबून असतं. कोणत्याही वयात लैंगिक सुख उपभोगण्यासाठी शरीरापेक्षा भावनिक जवळीक म्हणजेच परस्परांविषयी वाटणारं प्रेम, ओढ आणि जोडीदाराची परिपूर्ण साथ महत्त्वाची ठरते. प्रौढ वयात या सर्व गोष्टींबरोबरच एकमेकांच्या क्षमता समजून घेणं नितांत गरजेचं असतं. त्याप्रमाणे लैंगिक क्रियेत बदल करणं आवश्यक असतं. वयोपरत्वे लैंगिक सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदललेली असते हे ज्यांना कळत नाही ते जोडीदाराकडूनच नाही तर स्वत:कडूनही अवास्तव अपेक्षा करत राहतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की उदास होतात वा चिडचिडत राहतात. वास्तविक या वयात एकमेकांकडे टाकलेले प्रेमळ कटाक्ष, सहेतुक स्पर्श, मिठी मारणं, बिलगणं अशा साध्यासाध्या गोष्टींमधूनही नात्यातील उत्कटता टिकून राहते. स्त्री-पुरुष नात्यामध्ये असलेली नैसर्गिक ओढ आपल्यामध्ये पूर्वीइतकीच आहे ही भावना पोचविता येणे प्रत्यक्ष लैंगिक क्रियेएवढीच महत्त्वाची ठरते. परंतु या गोष्टीची अनेकांना जाणीव नसते. आपल्याकडे ‘स्पर्श’ या संवेदनेविषयी मोकळेपणा नाही. एक प्रकारचं अवघडलेपण आहे. भावना आतल्या आत दाबून टाकणं घडतं. वास्तविक जी भावना व्यक्त करायला हजारो शब्द अपुरे पडू शकतात ती स्पर्शातून व्यक्त करता येऊ शकते याची जाणीव नसते.
कोणत्याही वयात असलेली स्पर्शसुखाची ओढ प्रौढ वयातील स्त्री-पुरुषांना उमगत नाही तशी त्यांच्या विवाहित मुलांनाही. आपल्या आईवडिलांना एकांताची गरज आहे ही गोष्ट मुलांच्या ध्यानीमनीही नसते. अनेक घरांमधून नातवंडांची झोपायची व्यवस्था कायमसाठी आजी-आजोबांच्या खोलीत केली जाते किंवा आजी-आजोबांची खोली नातवंडांना देऊन त्यांची सोय दिवाणखान्यात केली जाते. याबाबत आजी-आजोबा झालेल्या व्यक्ती कधी त्यांची स्वत:ची वा जोडीदाराची गरज ओळखू शकत नाहीत. गरज लक्षात आली तरी संकोचापायी बोलू शकत नाहीत. याचे पर्यवसान एकमेकांवर क्षुल्लक कारणांवरून चिडण्यात होत राहतं. जोडीदाराचं दिसणं, वागणं, बोलणंही खटकायला लागतं.
आपल्या आजूबाजूला पाहिलं तर साठीसत्तरी ओलांडलेले विवाहित स्त्री-पुरुष कधी कधी ‘नाति चरामि’ची शपथ झुगारून आक्षेपार्ह मैत्रीसंबंधात गुंतलेले दिसतात. त्यापायी त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होतं. सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते. समाजातही अशा संबंधांकडे ‘म्हातारचळ’ म्हणून पाहिलं जातं. परंतु भली भली मंडळी जेव्हा अशी अविचारी पावलं उचलतात तेव्हा त्याचं कारण त्यांच्या जोडीदारानं लैंगिक संबंधांबाबत दाखवलेली उदासीनता आणि असहकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे विकाराच्या अधीन होण्यापूर्वी गरज असते ती आपल्या जोडीदाराशी मोकळेपणी संवाद साधण्याची. आवश्यक असेल तर समुपदेशक वा डॉक्टरची मदत घेण्याची. विवाह करताना धर्म, अर्थ, काम यांसंबधी घेतलेल्या शपथेचा अर्थ समजून घेऊन त्याची बांधिलकी सांभाळण्याची.
कार्यशाळेमध्ये प्रौढ वयातील लैंगिक सहजीवन या विषयावर चर्चा सुरू झाल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर दिसणारा संकोच हळूहळू दूर होत गेला. चर्चेत सहभाग घेताना लैंगिक सहजीवनाचा अशा प्रकारे विचार केला नसल्याचे अनेकांनी सांगितलं. आजकाल तरुणवर्गाला विवाहातील खाचाखोचा समजावून सांगण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाच्या कार्यशाळा घेतल्या जातात तेव्हा हा विषय चर्चिला जातो. डॉक्टर शशांक सामक यांनी ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ हा विषय शास्त्रीय पद्धतीनं घराघरात पोचवला आहे. त्याप्रमाणेच पन्नाशीनंतरच्या सहजीवनात फक्त धर्म, आणि अर्थ याचा विचार करून ‘काम’ वगळून चालणार नाही याची जाणीव या निमित्तानं झाली हे निश्चित.
chitale.mrinalini@gmail.com

First Published on June 18, 2016 1:29 am

Web Title: sex life after 60