आता साठी उलटल्यानंतर मिळवायचं असं काही राहिलं नव्हतं. करायचं ते सगळं करून झालं होतं. तरी मग ही उदासीनता का? का नाही हसतमुखानं स्वागत करता येत आयुष्यात उतरलेल्या या शिशिराचं? तिला कळायचं नाही. आणि अचानक ‘काय हवे ते मिळवायला’ या ओळींचा अर्थ तिला समजला..

मार्च महिना. परीक्षेची लागलेली चाहूल. पोर्शन पूर्ण करायची प्रोफेसर्सची गडबड. नोट्सची होणारी देवघेव. एकंदर अभ्यासमय वातावरण. त्यातच शिशिरातील असह्य़ झळा. आपसूक रसवंतीगृहाकडे वळणारी पावले. कॉलेजकट्टय़ावर रंगणाऱ्या गप्पा. त्यात न कंटाळता ऐकणारा तो महाकाय शिरीष. आसमंतात भरून राहिलेला आंब्याच्या मोहराचा गंध. त्यापलीकडचं ते बदामाचं झाड. लालजर्द पानांचा सांभार उतरवू लागलेलं. त्याही पलीकडं मूकपणे पानं गाळणारा देवचाफा. वाऱ्याच्या झुळकीसरशी जमिनीलगत गोल गोल फिरणारी त्याची पानं. शिशिरातील ही अविरत पानगळ उगाचच हुरहुर लावून जाणारी.

अशाच एका शिशिरात अवेळीच दाटून आलेलं आभाळ. ‘मी मी’ म्हणणारं ऊनसुद्धा त्या मळभानं गिळून टाकलेलं. तनामनाची होणारी तगमग अजूनच वाढलेली. त्या दिवशी आसपासच्या वृक्षराजीबरोबर तीही खुळ्यागत पावसाची वाट बघत बसली होती. पण ‘येऊ  येऊ’ म्हणणारा पाऊस आलाच नाही. मात्र त्या दिवशी अवचित भेटला तिला तिच्या ‘जिवाचा सखा’. मग त्या सरत्या शिशिरात ती अंतर्बाह्णा मोहरून आली. टपटप गळणाऱ्या पानांच्या झंकारात उमलत गेली. दर वर्षी मग शिशिर आला, शिशिरात मळभ दाटून आलं, की जुन्या आठवणींना मोहर यायचा. ती दोघंही हरखून जायची. पुढं आयुष्याला इतकी गती आली की त्यांच्या लाडक्या शिशिराचं वेगळेपण अनुभवायला सवड नसायची. बदलीच्या निमित्तानं गावं बदलली. ऋतू बदलले. किती तरी शिशिर आले आणि गेले.
..आणि आज ती दोघं निवृत्तीनंतर त्यांच्या गावी परत आली होती. फक्त दोघंच. पाखरं त्यांचं अवकाश शोधायला उडून गेली होती. त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणारं शिरीषाचं झाड पाहून ती खूपच खूश झाली. लालजर्द पानांच्या बदामाच्या झाडाकडे पाहून तिला बरंच काही आठवलं. आयुष्य आता नव्यानं सुरू होणार होतं.

जुन्या मित्रमैत्रिणींचे पत्ते शोधून दोघं जण सर्वाना जाऊन आवर्जून भेटून आले. पण चारदोन भेटींनंतर गप्पांचे विषय संपून गेल्यासारखे तिला वाटायला लागले. जो तो आपापल्या कोशात बंद. रोज उठून तिच्या कॉलेजजवळच्या टेकडीवर फिरायला जायचा तिचा उत्साह टेकडीला वेढून राहिलेल्या झोपडपट्टीनं काही दिवसांतच बारगळला. घरासमोरच्या ट्रॅफिकच्या गोंगाटानं निवृत्तीनंतरच्या निरामय आयुष्याच्या कल्पनेला सुरुंग लावला. मग ती तासन्तास समोरच्या झाडाकडे बघत बसायची. पण आता त्या लालजर्द पानांतील अपूर्वाई मनाला भिडण्यापूर्वी त्यांचं गळून जाण्यातील अटळपण तिला अधिक जाणवायचं आणि एक उदासपण तिच्या डोळ्यांतून टपटपत राहायचं. कधी काळी वाचलेल्या बालकवींच्या ओळी आठवत राहायच्या;

‘कोठून येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला,
काय हवे ते मिळवायला, हृदयाच्या अंतर्हृदयाला.’

आता साठी उलटल्यानंतर मिळवायचं असं काही राहायलं नव्हतं. करायचं ते सगळं करून झालं होतं. तरी मग ही उदासीनता का? का नाही हसतमुखानं स्वागत करता येत आयुष्यात उतरलेल्या या शिशिराचं? तिला कळायचं नाही.
तिच्या ‘त्याला’ मात्र शिशिराचं अजिबात भान नव्हतं. निवृत्तीनंतरचं आयुष्य त्याला अजूनच हिरवं आणि हवंहवंसं वाटत होतं. रसरसून जगायची त्याची ऊर्मी पाहून ती आतून उसवत चालली होती. जीनची पँट आणि टी शर्ट चढवून तो जणू गेलेलं तारुण्य हाती पकडू पाहत होता, पण बाह्य़ांगानं सजण्यानं का तारुण्य परत येऊ  शकतं? एकदा त्याचा लालभडक रंगाचा टी शर्ट पाहून ती न राहून म्हणाली, ‘‘काय रे हे, कसले कपडे घालतोस? तुझा कुणी विद्यार्थी भेटला तर काय म्हणेल?’’
‘‘हे बघ उभं आयुष्य प्राध्यापकाची बिरुदावली मिरवत पोरांना शिस्त लावण्यात गेलं. आता जरा मला हवं तसं जगू दे. लाइफ एन्जॉय करू दे.’’
‘‘त्यासाठी हे असं राहायला पाहिजे?’’
‘‘काय असतं प्रत्येकाच्या एन्जॉयमेंटच्या कल्पना वेगळ्या असतात. तू तुझ्या पद्धतीनं एन्जॉय कर. पण सदा सर्वकाळ असा सुतकी चेहरा करून बसू नकोस.’’
‘‘नसेल आवडत माझा चेहरा तर नको बघूस.’’
‘‘म्हणून तर सारखा बाहेर राहणं पसंत करतो मी.’’
‘‘हो का? बरं झालं सांगितलंस. पण आत्ता स्वारी कुठे चाललीय ते कळेल का?’’
‘‘मी आणि पम्या झुम्बा डान्स शिकायला जातो सध्या.’’
‘‘डान्स? अरे वय काय तुझं?’’
‘‘वयाचा काय संबंध? झुम्बा म्हणजे व्यायामाचा प्रकार आहे एक. तुला पण चल म्हणणार होतो पण हिंमतच झाली नाही.’’
तिनं एक सुस्कारा टाकला आणि वर्तमानपत्र उचललं. त्यामध्ये तिला वाचण्यासारखं फारसं काही नसतं हे माहीत असूनही. केवळ त्याच्याशी होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी. त्यालाही काय बोलावं ते कळेना झालं. तिला आजकाल कशामुळे बरं वाटेल हेच त्याला समजेनासं झालं होतं. पायात बूट चढवता चढवता तो म्हणाला, ‘‘मला माहितीय तुला बाहेर जायला आवडत नाही आणि घरात कंटाळा येतो. आपण पुढच्या आठवडय़ात घरीच सगळ्यांना बोलावू या का?’’
‘‘कारण?’’
‘‘कारण? येस. तुझा वाढदिवस आहे. तो सेलिब्रेट करू या.’’
‘‘वा! माझा त्रेसष्ठावा वाढदिवस सेलिब्रेट करायचा म्हणजे ड्रिंक आणि डान्स हवाच. माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणींना बोलावते. शिवाय सुमाताईलाही.’’ तिच्या शब्दातील उपहासाचा सूर त्याच्यापर्यंत पोचलाच नाही.
‘‘गुड आयडिया!’’
‘‘रिटर्न गिफ्ट पण द्यायला हव्यात नाही का? कॅडबरी आणू या का बार्बी डॉल?’’
‘‘त्यापेक्षा असं कर माझा मोबाइल नंबर तुझ्या मैत्रिणींना रिटर्न गिफ्ट म्हणून दे. म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर मस्त धमाल करता येईल आम्हाला. फक्त तुझ्या सुमाताईला नको. ती फारच पीळ मारते.’’ तो खो खो हसत म्हणाला. ती हताशपणे त्याच्याकडे पाहत राहिली.
त्या दिवशी असंच उदासपणे झाडाकडे पाहत असताना सरत्या शिशिरात झाडाला फुटलेली पालवी तिनं पाहिली. पोपटी पानांची सुबकशी झालर फांद्यांचा शुष्कपणा झाकू पाहत होती. ते पाहून तिला त्याचा अट्टहास आठवला. पांढऱ्या केसांना रंग लावून काळा करण्याचा. पण त्याच्या मनाचा हिरवेपणा तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याचा उदंड उत्साह आणि तिचं मिटलेपण दिवसेंदिवस वाढतच गेलं. त्यातून उडणारे खटके. होणारी पानगळ आणि वाढत जाणारा दुरावा.
मग ती समोरच्या वठलेल्या झाडाकडे पाहत बसायची. तासच्या तास. दिवसच्या दिवस. एक दिवस सहज म्हणून हातात असलेल्या पेनानं ती समोरच्या कागदावर रेघोटय़ा मारत बसली. रेघोटय़ा मारताना त्यातून नकळत अक्षरं उमटली. अक्षरांचे शब्द झाले आणि शब्दांच्या ओळी.

ओसाड माळरानी उभे एकटे ते झाड
किती उन्हाळे पाहिले कोण करी मोजदाद
आला शिशिर परतून पान गळे अजून एक
किती बसणार चटके कोण सांगेल प्राक्तन?
येता पावसाच्या सरी कंठी दाटे गहिवर
पिकल्या पानातून हसे कोवळा अंकुर
जीवनाची ही ओढ, नेणार कुठवर?
कोण जाणे मुळे किती रुतली खोलवर?

तिनं पेन बाजूला ठेवलं आणि कागदावर लिहिलेल्या ओळींकडे ती अविश्वासाने पाहू लागली. तिनंच का लिहिल्या होत्या या ओळी? एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेनं? त्याही पहिल्यांदा? आयुष्यात शिशिर प्रगटला असताना? कुठून आली ही नवनिर्मितीची जाण? कुठून उगम पावला हा सर्जनाचा स्रोत? तिला कळत होतं जे काही कागदावर उमटलं होतं त्यात भव्यदिव्य असं काही नव्हतं; पण ते तिचं होतं. तिच्या आयुष्याला आलेला हा नवोन्मेष तिचा तिलाच अगम्य होता, अकल्पित होता आणि खूप हवाहवासा वाटत होता. ‘काय हवे ते मिळवायाला’ या ओळींचा अर्थ समजल्यासारखी ती लिहीत राहिली. ती भानावर आली तेव्हा समोरच्या निष्पर्ण वृक्षावर बसून एक अनाम पक्षी केव्हाचा गात असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपल्या दुखणाऱ्या टाचांची पर्वा न करता त्याला बघायला ती लगबगीनं उठली. सारा पर्णभार उतरवून ठेवलेल्या त्या वृक्षाकडे, त्याच्या पायापाशी गळून पडलेल्या मळकट पानांकडे, निरागस पालवीकडे आणि त्या पक्ष्याकडे तिनं प्रेमभरानं पाहिलं आणि ती स्वत:च्या नकळत तिच्या ‘त्याची’ वाट पाहू लागली. चाळीस वर्षांपूर्वी एका सरत्या शिशिरात पाहिली होती त्याच अधीरतेनं, पण अधिक परिपक्व मनानं..

– मृणालिनी चितळे