20 February 2019

News Flash

.. पण लग्नच का करतात?

साठीनंतरच्या सहजीवनात संवादाचा सूर हरवून बसलेली जोडपी दिसतात

आयुष्याच्या उत्तरार्धात आपण लग्न का केलं? हे योग्य झालं का अयोग्य? याविषयी काहींच्या मनात साशंकता निर्माण होते. एकटेपणाच्या सावल्या वैवाहिक आयुष्य झाकोळून टाकतात. काही जणांचं सहजीवन मात्र एकमेकांच्या सान्निध्यात इतक्या सहजपणे खुललेलं असतं की कोणत्याही नकारार्थी गोष्टींचा ओरखडा सहजीवनावर उमटत नाही. अशा जोडय़ा पाहिल्या की ‘शहाणीसुरती माणसं लग्न का करतात?’ या प्रश्नाचा शोध वेगवेगळ्या अंगांनी घेणं शक्य होत जातं. या प्रश्नाचं बोट धरून ‘पन्नाशीनंतरचं सहजीवन’ या संकल्पनेला थेटपणे भिडण्याचा हा प्रयत्न. त्यातूनच ‘शिशिरातही वसंत’ शोधता येईल का, या प्रश्नाचंही उत्तर सापडू शकेल.

पन्नास वर्षांपूर्वी वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकातील गीत ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात?’ त्या काळात खूप गाजलं होतं. आजही त्या ओळींमधल्या भावार्थाला उत्स्फूर्ततेने दाद दिली जाते. ‘लग्नसंस्था आता मोडकळीस आली आहे.’ असा गहजब करत तावातावाने चर्चा केली जाते. तसं पाहिलं तर लग्नसंस्था ही सगळ्यात जुनी संस्था आहे. कोणतीही राज्यसंस्था वा धर्मसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वीची संस्था. म्हणजे टोळी करून रानोमाळ फिरणाऱ्या माणसानं शेतीला सुरुवात केली, घर केलं. त्यानंतर माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं असं म्हणत लग्नसंस्था ही संकल्पना अस्तित्वात आली.
खरं तर संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये लग्न करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. बहुतेक पशुपक्ष्यांमधले नरमादी फक्त विणीच्या हंगामापुरते एकत्र येतात. दोघं मिळून घरटं बांधतात. पिल्लांना स्वतंत्रपणे जगण्याचे बळ आले की ना त्यांच्यात आणि आईवडिलांच्यात काही नातं राहत, ना आईवडिलांचं एकमेकांत. परंतु माणसाला लाभलेल्या प्रगल्भ मेंदूमुळे तो आपला जोडीदार आणि मुले लक्षात ठेवू शकतो. त्यांच्याविषयी प्रेम, आस्था, आपुलकी, आदर या भावभावनांबरोबरच मालकीहक्काची भावना त्याच्या मनात असते. या संकल्पनेतून कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था अस्तित्वात आली. त्यासंबंधीची आचारसंहिता तयार झाली. लग्नसंस्था हा त्यातीलच एक भाग.
काळानुरूप आणि गरजेनुरूप त्यामध्ये प्रचंड बदल होत गेले. लग्न करण्यापासून लग्न मोडण्यापर्यंतची नियमावली तयार होत गेली. आज अस्तित्वात असलेली लग्नसंस्था आणि त्याविषयक कायदे म्हणजे रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत बनण्याच्या दिशेने माणसाने केलेला प्रवास आहे. असं असूनही पती-पत्नीच्या नातेसंबंधांतील गुंता सोडवायला हा प्रवास पुरेसा ठरत नाही. एकीकडे लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पर्याय शोधला जात आहे आणि आजही एकाच मुहूर्तावर देशभरात हजोरोंच्या संख्येनं विवाह होत आहेत. लग्न करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोघांनाही आयुष्यात कधीतरी प्रश्न पडत आहे की ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात? जाणूनबुजून संसाराच्या खडय़ात का पडतात?’ लग्नाविषयीची ही परस्पर विरोधी मते ऐकताना संभ्रमित अवस्था होते. म्हणजे लग्न करणारी माणसे शहाणी नसतात, का शहाणी असूनही विवाहवेदीवर चढताना आपलं शहाणपण विसरलेली असतात? त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे हा प्रश्न ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना पडत आहे आणि वयाची साठी उलटलेल्या प्रौढांनाही पडत आहे. सर्वाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा शोध घ्यायचा ठरवला तर तो हजार एक पानी ग्रंथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभराच्या सदरासाठी हा विषय प्रौढ व्यक्तींमधील सहजीवनापुरता मर्यादित ठेवायचं ठरवलं आहे.
माणूस लग्न का करतो, या प्रश्नाचं उत्तर साठी उलटलेल्या ज्यांना सकारत्मक पद्धतीनं देता येत असेल त्यांनी साहजिकच परस्परांच्या सवयींशी आणि विचारांशी जुळवून घेतलं असणार. एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन कधी तिनं तर कधी त्यानं पडतं घेत दोघांनी मिळून संसाराची सम साधली असणार. या जुळवून घेण्यात तडजोड, तोडून जोडण्याची भावना नसते तेव्हा परस्पर सामंजस्याचं माप पुरेपूर भरलेलं राहतं. याउलट जोडीदाराच्या आग्रहासाठी, दुराग्रहासाठी स्वत:च्या इच्छाआकांक्षा कायमच गुंडाळून ठेवून, स्वभावाला मुरड घालत जगावं लागतं तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी दु:खीकष्टी होण्याशिवाय गत्यंतर नसतं. आपल्या आजूबाजूलासुद्धा साठीनंतरच्या सहजीवनात संवादाचा सूर हरवून बसलेली जोडपी दिसतात. अतितापट  वा संशयी स्वभाव, कंजूषपणा, अहंगंड असे गुणदोष स्त्री-पुरुष दोघांमध्येही असू शकतात. त्यामुळे संसारातील विसंवादाला दोघंही जबाबदार असतात. असे विसंवादी संसार आजच अस्तित्वात आले असं नसून वर्षांनुर्वष ते रेटले गेले आहेत. थोडक्यात म्हणजे सहजीवनाच्या संदर्भातील समस्या पूर्वीही होत्या, आजही आहेत पण आज एकविसाव्या शतकात फरक इतकाच पडला आहे की असं रडतकुढत जगण्यापेक्षा त्यातून काही मार्ग काढण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायची असते ही जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी मग उतारवयात कुणी न्यायालयाची पायरी चढताना दिसतो तर कुणी समुपदेशनाची वाट धरतो. हे लिहिताना आठवण झाली ती सुमनताईंची.
फोनवर वेळ ठरवून घेऊन त्या माझ्याकडे आल्या. त्यांना बघितलं आणि उभ्या आयुष्याचं थकलेपण त्यांच्या चेहऱ्यावरून निथळत असल्यासारखं वाटलं. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या तीन मुली. तिघीही लग्न झालेल्या. पहिल्यापासून वडिलांकडे असलेला त्यांचा ओढा. घरीदारी सुमनताईंना मिळणारी कस्पटासमान वागणूक.. नवऱ्यांनं वेळोवेळी केलेला अपमान. मुलींनी केलेला पाणउतारा. माहेरचं कुणी नसणं.. या सगळ्यांचा सुमनताईंना होणारा मनस्ताप. एकात एक गुंतलेल्या अनेक गोष्टी त्या सांगत होत्या. त्या सांगत होत्या त्या सगळ्या तक्रारी होत्या. त्यांची समस्या होती ती त्यांचं एकाकीपण. त्यांचा ओघ न थांबवता मी फक्त ऐकत राहिले. काही वेळानं त्यांचं स्वगत थांबलं तेव्हा मी बोलायला सुरुवात केली. ‘‘तिन्ही मुलींची तर आता लग्नं होऊन गेली. घरात आता तुम्ही दोघंच असता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात एखादी तरी अशी गोष्ट असेल की जी दोघांना मिळून करायला आवडत असेल. तुमचे मिस्टर इथे येऊ  शकतील?’’ यावर त्या काही वेळ गप्प बसल्या,  म्हणाल्या, ‘‘अहो रस्त्यानं चालताना सुद्धा हे नेहमी माझ्या पुढे दहा पावलं चालत असतात. जोडीनं कुठे जायचा प्रश्न कधीच संपलाय. जन्मभरात जे कधी जमलं नाही ते आता जमणं शक्य आहे का?’’ असं म्हणत त्या निघण्यासाठी उठल्या. थोडं थांबून मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला माहीत नाही. इतक्या वर्षांत इतकी सलग मी कुणाशीही बोललेली नाही. सतत कुणीतरी मला सांगत, समजावत, रागवत राहिलं. माझं ऐकून घेतलंत. मला आता खूप शांत वाटतंय.’’ सुमनताई खूप मनापासून बोलत होत्या. त्या बोलत होत्या त्यात तथ्य असल्याचं मलाही जाणवलं. आपली समस्या काय आहे हे कळणं, त्याच्या मुळाशी जाता येणं आणि आहे तशी ती स्वीकारता येणं ही गोष्टसुद्धा सोपी नसते. समस्यांना उत्तरं मिळाली नाहीत तरी तुमची जगण्याची ताकद मात्र त्यामुळे वाढू शकते.
‘लेकुरे उदंड झाली’ मधील राजा आपल्या मित्राला मारुतरावला पुन:पुन्हा विचारतो की ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात?’ नाटकाच्या शेवटी राजाला आपण बाप होणार असल्याचं कळतं आणि त्याच्या प्रश्नाला जणू उत्तर  मिळून जातं. हलक्याफुलक्या पद्धतीनं लिहिलेल्या नाटकाचा शेवट गोड होतो. परंतु खरंच आयुष्य इतकं हलकंफुलकं असतं? विशेषत: आयुष्याच्या उत्तरार्धात आपण लग्न केलं / आपलं लग्न झालं हे योग्य झालं का अयोग्य याविषयी काहींच्या मनात साशंकता निर्माण होते, मुलं जवळ असून प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच जातात आणि लांब असली तर एकटेपणाच्या सावल्या वैवाहिक आयुष्य झाकोळून टाकतात. काहीजणांचं सहजीवन मात्र एकमेकांच्या सान्निध्यात इतक्या सहजपणे खुललेलं असतं तर काहींनी इतक्या प्रयत्नपूर्वक फुलवलेलं असतं की मुलं जवळ आहेत की दूर, मौजमजा करायला पुरेसा पैसा आहे की नाही, जोडीदाराची तब्येत खणखणीत आहे की नाही या गोष्टींचा ओरखडा सहजीवनावर उमटू न देता ते आयुष्य समाधानानं व्यतीत करू शकतात.
अशा जोडय़ा पाहिल्या की ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात?’ या प्रश्नाचा शोध वेगवेगळ्या अंगांनी घेणं शक्य होत जातं. तो घेताना मिळणारी उत्तरं कधी व्यक्तीसापेक्ष असतात तर कधी परिस्थितीसापेक्ष. परत प्रत्येक वेळी उत्तर मिळेल याची शाश्वती असतेच असं नाही. परंतु म्हणून हा प्रश्न फिजूल ठरत नाही तर तो विचारल्यामुळे प्रश्नांच्या मुळापाशी जायची वाट तयार होते. मला खात्री आहे की ‘माणसं लग्न का करतात?’ या प्रश्नाचं बोट धरून चालताना ‘पन्नाशीनंतरचं सहजीवन’ या संकल्पनेला थेटपणे भिडता येईल आणि अनेक शक्यतांचा परमार्श घेता येईल.
chitale.mrinalini@gmail.com

First Published on January 2, 2016 1:31 am

Web Title: why people get married