१ हजार वर्षे प्राचीन सांगाडा नेमका कोणाचा? काशीचा प्राचीन इतिहास बदलणार का?
वाराणसी ही केवळ धार्मिक श्रद्धेची नगरी नाही, तर हजारो वर्षांच्या मानवी वस्तीचे थर आपल्या पोटात जपून ठेवलेले एक जिवंत पुरातत्त्वीय क्षेत्र आहे. या पार्श्वभूमीवर राजघाट येथे १९५७ साली उत्खननादरम्यान सापडलेला आणि बनारस हिंदू विद्यापीठात जवळपास सत्तर वर्षे जतन करून ठेवलेल्या मानवी सांगाड्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंदाजे एक हजार वर्षे जुना मानला जाणारा हा सांगाडा प्राचीन डीएनए, रेडिओकार्बन डेटिंग आणि स्थिर समस्थानिकांच्या विश्लेषणासाठी तपासला जात आहे.