जन्माने मुस्लीम, कपाळावर कुंकू अन् पाकिस्तानात आंदोलन करणाऱ्या शीमा केर्मानी कोण?
गेल्या काही दिवसांपूर्वी कराचीच्या रस्त्यावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. कराची पोलिसांच्या बुरखाधारी लेडी कॉन्स्टेबल पांढर्या साडीतील एका ७५ वर्षीय महिलेला ताब्यात घेत होत्या. विशेष म्हणजे या महिलेच्या कपाळावर ठसठशीत लाल टिकली होती आणि केसात सफेद फूल. त्यामुळे त्या महिलेकडे लक्ष वेधलं जाण साहजिकच होतं. पाकिस्तानमधील कराचीसारख्या शहरातील रस्त्यावर अशी महिला दिसणं दुर्मीळच. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच जगभरातील अनेकांना या महिलेची लगेचच ओळख पटली.