04 August 2020

News Flash

‘‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे’’

‘‘वडिलांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले.

|| बाबासाहेब पुरंदरे

‘‘वडिलांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच! आज वयाच्या ९७ व्या वर्षीही तो दिवस मला आठवतोय. वडिलांनी, मामासाहेबांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात.. इतिहास माझ्यासाठी  केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला आहे.’’

एक सांगू का? माझं श्रेयस-प्रेयस किंबहुना आयुष्यातलं जे काही असेल ते फक्त आणि फक्त पाच अक्षरात सामावलेलं आहे, ते आपण ओळखलं असेलच.. ते म्हणजे ‘शिवचरित्र’! आयुष्यातून शिवचरित्र वजा केलं तर.. तर झालो असतो एखादा अगदी सामान्य आणि समाजाच्या फारसा उपयोगाचा नसलेला माणूस.. माझ्या जीवनातील साफल्याचे श्रेय शिवचरित्रालाच आहे!

आजवरच्या आयुष्यात मी जे काही करू शकलो, त्याबद्दल विधात्याशी कृतज्ञ आहे. तृप्त आहे. समाधानी आहे. मी एक हजाराहूनही अधिक पौर्णिमेचे चंद्र पाहिले पण याचा अर्थ मी एक हजाराहूनही अधिक अमावास्या, ग्रहणं पाहिली असाही होतो नाही का? आणि त्या पौर्णिमा, अमावास्या, ग्रहणं सगळं काही माझ्या लक्षात राहिलं आहे. आजवर आयुष्यात माझ्या कामाची दखल घेणारी, कामाविषयी कौतुक असणारी, विचारपूस करणारी आणि कामात रस घेणारी माणसं भेटली आणि त्यांच्यामुळे जीवनप्रवास सुखकर होत गेला. अर्थात, या प्रवासात याउलट वागणारी काही माणसंही भेटली. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे आणि सुख देणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. तरीही त्रास देणाऱ्यांविषयी मनात राग वा तक्रार नाही.

मी केव्हा बोलायला लागलो आणि पहिलं अक्षर मी कोणतं उच्चारलं ते मला माहीत नाही. कुणी सांगितल्याचं आठवत नाही! पण ज्यांनी मला बोलायला शिकवलं त्यांच्याशी मी अतिशय कृतज्ञ आहे. माझे या क्षेत्रातील गुरू आहेत माझे वडील. माझ्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. आम्ही त्यांना मामासाहेब म्हणत असू. ते उत्तम चित्रकार होते. सुमारे सहा फुटांहूनही अधिक उंची, धोतर, कोट त्यावर उपरणं. कपाळावर गंध. भरघोस मिशा आणि यापेक्षाही लक्षात राहील असा भारदस्त आवाज. त्यामुळे त्यांच्याशी बोलणारा सुरुवातीला दोन पावलं मागेच सरके. सांजवात झाली की देवापुढे परवचा म्हणायला बसायचं. तो म्हणून झाला की मामासाहेब गोष्टी सांगत. पुराणातल्या, इतिहासातल्या, त्यांचा आवाज खूप मोठा, त्यात चढ-उतारही भरपूर. शिवाय हावभाव, हातवारे करून ते गोष्टी सांगत त्यामुळे आम्ही त्यात अगदी रंगून जायचो. त्यांच्या तोंडून इतिहासातल्या गोष्टी ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर ते प्रसंग, त्या लढाया जणू प्रत्यक्ष घडत असल्याचं चित्र दिसू लागे आणि त्या गड-किल्ल्यांवर जाण्याची ओढ वाटू लागे. त्यांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. त्या किल्ल्यांवरच्या मातीशी माझं असं माझ्याही नकळत नातं जोडलं जाऊ लागलं. मी अगदी लहान आठदहा वर्षांचा असेन. पण आईच्या कुशीचं आणि मातीच्या स्पर्शाचं भान येण्यासाठी वयाच्या जाणतेपणाची गरज नसतेच मुळी. ती ओढ जन्मजातच असावी.. असतेच!

त्या काळात प्लेगची साथ आली आणि मग पुणेकर मंडळी सिंहगडाच्या पायथ्याशी वास्तव्याला आली. मला ती एका अर्थानं पर्वणी वाटली नसेल तर नवल. पहाटे उठल्यापासून सूर्य तेजात न्हाऊन निघत असलेला सिंहगड मला खुणावू लागला. मी तहानभूक विसरून त्याच्याकडे टक लावून पाहात बसे. मामासाहेबांनी एक दिवस मला गडावर नेलंच! त्यांचं बोटं धरून मी गडावर पोहोचलो. आज वयाच्या ९७ व्या वर्षीही (येत्या १५ ऑगस्टला तिथीनुसार माझा जन्मदिन) तो दिवस मला आठवतोय. त्यांनीच मला त्या इतिहासात नेऊन सोडलं.. मी अजूनही तिथेच आहे फक्त मामासाहेबांचं बोट सुटलं.. त्यांनी मला ‘बाबासाहेब, इथं असं असं घडलं’ असं त्यांच्या आवाजात सांगितलेलं आठवतं, अजूनही तो आवाज ऐकू येतो आणि त्या आठवणी गडाच्या एकेका तटाकोटासारख्या मनात रुतून बसतात. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की माझं एकही व्याख्यान त्यांनी ऐकलं नाही. तसा कधी त्या काळी योगच आला नाही.

मामासाहेब मला त्यांच्याबरोबर नाटक, चित्रपट पाहायला घेऊन जात. त्याकाळच्या ‘आर्यन चित्रमंदिरात’ मूक चित्रपट लागत. त्या नाटक, चित्रपटातील अभिनेत्यांच्या अभिनयाचा पगडा माझ्या मनावर बसला. आपणही नाटकातल्यासारखा अभिनय करावा, संवाद म्हणावेत असा एक नादच मला लागला. ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच चित्रपटगृहात लागला होता. त्यामधील बाबुराव पेंढारकर यांच्या अभिनयानं मला झपाटून टाकलं. त्यानंतर ‘प्रभात’चा प्रत्येक चित्रपट पाहणं हा जणू घरातला कुळधर्म. कुळाचारच बनला! त्यातल्या त्यात ‘सिंहगड’ हा चित्रपट पाहिल्यावर तर पुढचे काही दिवस दुसरं काही सुचेनाच. सगळे संवाद, गाणी पाठ झाली होती. त्यातलं तानाजीचं काम तर मला फारच आवडलं होतं. मग माझ्या अंगात तानाजी संचारू लागे.

एकदा असाच मी एक चित्रपट पाहून आलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडय़ातल्या एका खोलीत कंदिलाच्या उजेडात- कारण त्यावेळी आमच्याकडे वीज नव्हती- अभिनय करायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशामुळे माझी सावली भिंतीवर पडली होती. त्या सावलीकडे पाहात मी अभिनयाला सुरुवात केली. त्यात दंग असताना माझ्या सावलीशेजारी आणखी एक सावली हलताना दिसली. मी मागे वळून पाहिलं तर दारात वडील उभे. आता आपली धडगत नाही, आपली पाठ शेकणार म्हणून भिंतीला पाठ लावून भेदरलेल्या नजरेनं वडिलांकडे पाहात राहिलो. वडिलांनी गंभीरपणे पाहात मोठय़ा आवाजात विचारलं, ‘नट व्हायचंय? व्हा! पण केशवराव दात्यांसारखे व्हा!’ मी थरारलो, तसाच वाकून त्यांना नमस्कार केला.

माझी इतिहासाची आवड फुलवली आणि वाढवली भावे स्कूलमधील शिक्षकांनी. वर्तमानकालीन परिस्थितीशी तुलना करीत करीत ते शिकवीत. त्यामुळे इतिहास केवळ कथेचा विषय न राहता तो व्यथा जागी करणारा विषय ठरला. त्या लहानग्या वयात इतिहासावरचं माजगावकरसरांचं ‘भाष्य’ ऐकून मी अस्वस्थ होत असे. ते ऐकून अनेकदा मी वर्गात रडलो होतो. असे विद्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे शिक्षक त्यावेळी होते. मला आणखी एक आवड होती, नाद होता- नकला करण्याचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही मी अनेकदा करीत असे. एकदा शाळेत- स्नेहसंमेलनात ती नक्कल मी प्राचार्य नारळकर, प्रा. दबडघाव, श्री. म. माटे अशा मान्यवर मंडळींसमोर केली होती. त्यांचं भाषण मी म्हणून दाखवू लागलो. ‘‘वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, वलकले असतात ती वाढत वाढत तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात. उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.. मलाही एक वल्गना करू द्या! माझे गाणे मला गाऊ द्या! या जगात आपणाला जर हिंदुत्वाच्या मानाच्या राष्ट्रात सन्मानाने जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे. ते राष्ट्र वटवृक्षाप्रमाणे विस्तारायला हवेच. हिंदुध्वजाखाली ते स्थापन झाले पाहिजे. या नाही तर पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली तर वेडा ठरेन मी! आणि माझी ही वल्गना खरी ठरली तर मी ‘प्राफेट’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!’’ नक्कल संपली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनी खूप कौतुक केले. प्रा. नारळकरांनी तर माझे दोन्ही दंड धरून वर उचलले आणि म्हणाले, ‘‘शाब्बास, शाब्बास पुरंदरे.. फार छान नक्कल केलीस तू. भाषणही उत्तम केलेस. तू उत्तम वक्ता होशील.’’

पुढे एकदा तर सावरकरांची ही नक्कल मी साक्षात त्यांच्याच समोर केली. केवढं धाडस होतं ते! एकदा गायकवाड वाडय़ात स्वातंत्र्यवीर सावरकर उतरले होते. त्यांच्याबरोबर गोखले, गणपतराव नलावडे, म. तु. कुलकर्णी वगैरे मंडळीही होती. सावरकरांचं दर्शन घ्यावं म्हणून मी वाडय़ात गेलो. तेव्हा मला पाहून गणपतराव तात्यांना म्हणाले, ‘तात्या, हा मुलगा तुमची नक्कल फार उत्तम करतो, अगदी हुबेहूब!’ सावरकर किंचितसे हसले. म्हणाले, ‘‘असं!. कर बघू बाळ.’’ हाफ पँट, वर पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशा वेषात मी उभा राहिलो आणि जरा दबकतच सावरकरांची नक्कल त्यांच्यासमोर करायला सुरुवात केली. नंतर आवेशानं भाषण म्हणू लागलो. स्मितवदनाने तात्या ते ऐकत होते. आपलीच नक्कल पाहात होते. नक्कल संपली. मी तसाच उभा राहिलो. त्यांनी मला जवळ बोलावलं. पाठ थोपटून माझं कौतुक केलं. ‘‘फार उत्तम! उत्कृष्ट!! अगदी हुबेहूब!’’.. त्यांच्या त्या कौतुकोद्गारानं माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. पण त्यांच्या पुढच्या शब्दांनी मनावरचं ओझं दूर झालं. मी एकदम सावध झालो; भानावर आलो. आजपर्यंत जी मी व्याख्यानं दिली. इतिहासाचा अभ्यास केला त्याचं श्रेय टाळ्यांच्या या शब्दांना द्यावं लागेल. ते म्हणाले, ‘नक्कल उत्तमच केलीस बाळ. पण आयुष्यभर केवळ नकलाच करू नकोस दुसऱ्यांच्या. स्वत:चं असं काही तरी निर्माण कर!’ त्या दिवसापासून मी नक्कल करण्याचं सोडून दिलं. सावरकरांबद्दलच्या आदरभावात वाढच झाली.

वक्तृत्व शिकण्याच्या दृष्टीने माझ्यावर सरस्वतीने कृपाच केली. वक्तृत्वाच्या बाबतीत सावरकरांच्या जवळपास फिरकू शकेल, असा दुसरा एकही वक्ता मी अद्याप पाहिलेला नाही. सावरकरांची वाणी म्हणजे केवळ उसळता लाव्हा. त्यांचं उभं राहणं, त्यांचे हावभाव, त्यांच्या डोळ्यांच्या, भिवयांच्या आणि मानेच्या हालचाली केवळ अनुपमेय! त्यांचा शब्दस्रोत म्हणजे आभाळातून अवतरणारा गंगौघ. छे! छे! त्याला उपमाच नाही. ते वक्तृत्व म्हणजे शिवतांडव! माझ्या मनावर सावरकरांच्या शब्दांचा आणि शैलीचा फार मोठा परिणाम झाला. त्यांच्या त्या शैलीनं संस्कार आणि शिकवण मला दिली.

याच काळात नारायण हरी ऊर्फ नाना पालकर यांनी मला अनेक गोष्टी सहजपणे शिकविल्या. ‘कशाकरता’ बोलायचं हे मला नानांकडून समजलं, उमजलं. मला जर नाना पालकर, विनायकराव आपटे आणि ताई आपटे यांचा सहवास लाभला नसता तर उत्तम वक्ता होऊनही मी दगडच राहिलो असतो. त्यांनी माझ्या जीवनाला अर्थ दिला. आत्मा दिला. कशाकरिता जगायचं आणि कसं जगायचं हे त्यांनी स्वत:च्याच जीवनाचा नकाशा माझ्यापुढे ठेवून मला शिकवलं.

नागपूरच्या राजाराम सीताराम ग्रंथालयात माझं पहिलं सार्वजनिक व्याख्यान झालं. नंतर भरतीच्या लाटेप्रमाणे एकापाठोपाठ एक व्याख्यानमाला होत गेल्या. नागपूरचे माझे मित्र क्रीडापटू शामराव सरवटे यांचे मला ऐरावताच्या बळाने साहाय्य झाले. विदर्भात माझे शेकडय़ाने कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांची बहुतांशी योजना माझे मित्र दि. भा. ल. ऊर्फ राजाभाऊ कुलकर्णी यांनी केली. शिवचरित्राच्या कामात राजाभाऊंचा निम्म्याहून मोठा वाटा आहे.

‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथ छापण्यासाठी पैसे आवश्यक होतेच. आमच्या आईसाहेबांनी, थोरल्या वहिनीसाहेबांनी आणि दाते आजींनी आपलं स्त्रीधन माझ्या हाती सोपवलं, आशीर्वाद दिले.. छे? त्यांचं ऋण फेडण्याचा उद्धटपणा मी करू शकलो नाही. मी पुण्याहून मुंबईला कोथिंबीर विकण्याचा अनुभव घेतला. पुस्तके विकली. त्यावेळी राजाभाऊ माझ्याबरोबर होताच. श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ‘राजहंस प्रकाशन’ सुरू केलं आणि या प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित केला. त्या समाधानाच्या आठवणी अविस्मरणीयच!

या सर्वात आवर्जून श्रेयाचा मान द्यावा तो सातारच्या पुण्यशील माँसाहेब महाराज राजमाता सुमित्राराजे भोसले यांना. त्यांनी मला ‘शिवशाहीर’ संबोधलं! माँसाहेब महाराजांबद्दलच्या आदराला माझे शब्द अपुरे आहेत. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्य ‘मराठा’ या दैनिकातून आणि थोरल्या भावासारख्या असणाऱ्या पु. लं.नी सरकार दरबारी ‘राजा शिवछत्रपती’ची अशी भलावण केली की, त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या शिवचरित्राकडे वळले. मुंबईच्या शिवाजी पार्कवर साकारलेल्या ‘शिवसृष्टी’चं यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे अशांसारख्या महानुभवांनी आणि असंख्यानी कौतुक केलं. कोणा कोणाची नावं घेऊ? ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेचं अतोनात स्वागत – कौतुक झालं, ते त्यातील प्रतिभावंतांच्या कवनांनी, बाळासाहेब मंगेशकरांच्या संगीतानं आणि आपल्या लतादीदींच्या स्वरांमुळे! ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अनेक महान व्यक्ती तसेच देश-विदेशातल्या मानकऱ्यांचा, जाणकारांचा आणि रसिक श्रोतृवर्गाचा अपरंपार कृतज्ञ आहे.

या सर्वाना मी अंत:करणपूर्वक श्रेय देतो. पण ते देण्यासाठी शब्द कोणते वापरू?.. उमगत नाही, सूचत नाही.

मुंबईतील माझी पहिली व्याख्यानमाला विलेपाल्र्याला पु. ल. देशपांडे यांनी आयोजित केली. कोणत्याही बाबतीत त्यांनी मला मदत करायची शिल्लक ठेवलं नाही. या पती-पत्नींची माया.. मला ठरवलं त्यापेक्षा जास्त जगायच्या मोहात पाडते. मात्र एक खंत मनात आहे ती म्हणजे भाईंनी वेळोवेळी दिलेला सल्ला मनात असूनही मी पाळू शकलो नाही. व्याख्यानमालांतून मिळालेलं धन मी समाजकार्यासाठी सगळं वाटून टाकलं. भाई सांगायचे स्वत:साठी थोडा तरी भाग ठेवून दान करा आणि ते सांगणं अगदी योग्यच, काळजीपोटीचं होतं. पण मला ते तसं वागणं जमलं नाही हे खरं.

माझ्या आजवरच्या जीवनात खारट-तुरटही अनुभव आहे. पण चांगले अनुभव इतके प्रचंड आहेत की, खारट-तुरट प्रसंग अगदी नगण्यच! जनतेच्या प्रेमाने माझे मन अतिशय मोहरून गेले आहे. वास्तविक मी एक लहानसा विद्यार्थी आहे. इतिहास आणि त्यातही शिवशाहीचा इतिहास हा माझा विषय. हा इतिहास मी महाराष्ट्र रसात, महाराष्ट्राच्या कडेपठारांवर गात हिंडतो आहे.

इतिहास हा पाचवा वेद आहे. पण मी वेदांती नाही. मी विद्वान नाही. मी गोंधळी आहे. मी इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गाणारा मी एक शाहीर आहे. मी बखरकार आहे. इतिहासाचा अभ्यास मांडणे आणि इतिहासाचा उपयोग सांगणे ही या पाचव्या वेदाच्या वैदिकांची मुख्य कामे असतात. या इतिहासवेदाचा पथ्यपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उपयोग करण्याचे व्रत घेतलेला मी एक कलावंत आहे. मला माझ्या व्रताची अतोनात आवड आहे, हौस आहे, अभिमान आहे.

मी या पुण्यात जन्मलो, रंगलो, खेळलो. सारे संस्कार पुण्यात घडले. किती तरी मोठी माणसं दोन हातांवरून पाहिली. त्यांची भाषणं ऐकली. कुणाची गाणी ऐकली. कुणाचे पोवाडे ऐकले, कुणाची कीर्तने ऐकली. गोंधळ-भारुडे ऐकली. कुणाची चिडणी-रागावणी आणि कुणाकुणाच्या अस्सल मराठी शिव्यासुद्धा मन लावून ऐकल्या. पूर्वीच्या ‘मिनव्‍‌र्हा टॉकीज’समोर अनेक वेळा वर्तुळाकार गर्दीत मांडी घालून बसून खास मंडईत गाणाऱ्या गोंधळ्यांचे पोवाडे ऐकले. भजने, लळिते, मेळे आणि लावण्या ऐकल्या. मी त्यात रंगलो तो रंग माझ्या अंत:करणावर पडला तो पक्काच जडला.

मी जर या मावळात लहानाचा मोठा झालो नसतो तर या अस्सल महाराष्ट्र रंगाला मी फार फार मुकलो असतो. पुण्याची पुण्याई मला लाभली. मी कुठे साती समुद्राच्या पार पोहून गेलो- आलो तरी माझ्या तनामनाला लागलेला खंडोबाचा भंडारा, भवानी आईचा मळवट, ज्ञानेश्वर- तुकारामांचा अबीरगुलाल आणि कसबा गणपती, मंडईच्या गणपतीचा अष्टगंध, गुलाल थोडासुद्धा धुतला जाणार नाही. सह्य़ाद्रीतल्या अणूरेणूशी मी कृतज्ञ आहे. शिवपूर्वकालापासून या सह्य़ाद्रीत कला आणि विद्या यांचा संचय होत आला. अनेक महान कार्याचे संकल्प येथेच सोडले गेले. अनेक यज्ञांच्या आहुती इथेच दिल्या गेल्या.

आमच्या पुरंदरे वाडय़ात थोर कीर्तनकारांची कीर्तने होत. मी अगदी पुढे बसून ती ऐकायचो. या कीर्तनकारांचा वेष, त्यांच्या लकबी, त्यांची लीन-तल्लीन वृत्ती, त्यांनी दिलेले दृष्टान्त, त्यांचे ओघवतं वक्तृत्व या सगळ्या गोष्टींनी मी भारावून जायचो. एक अगदी नक्की की त्यामुळे माझं आयुष्य भक्तिरसपूर्ण झालं. हे असे संस्कार होत होते. त्यातच माझ्या देश प्रेमाच्या बीजाला धाडस-धैर्याचे-अंकुर फुटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठका, शिबिरे यातून विचारांना एक वेगळी आणि ठाम अशी दिशा मिळाली. संघप्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपविली गेली. त्यामुळे गावोगावी जाणं झालं. पण परत महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात परतलो.

या पुणे शहराने अनेक यश-अपयश, अनुग्रह आणि आघात, उत्कर्ष आणि नाश, गाढवाचा नांगर आणि सोन्याचा नांगर, जलप्रलय आणि अग्निप्रलय, चिखलफेक आणि पुष्पवृष्टी असे अनेक आकाश-पाताळ गाठणारे प्रकार अनुभवले आहेत. कधी शिरी मंदिल चढला तर कधी पाठीला माती लागली. यातूनच इतिहास घडला आहे. संस्कृती यातूनच फुलली आहे. बंड करून उठणं हा इथल्या मातीचा धर्म आहे. या मातीतूनच राजमाता जिजाऊसाहेब, शिवाजीराजे, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, फडके यांसारख्ये बंडखोर उठले. तसेच धोंडो केशव कर्वे, इतिहासाचार्य राजवाडे, गुरुवर्य बाबुराव जगताप, ‘सकाळ’कार ना. भि. परुळेकर, डॉ. बानू कोयाजी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, ‘पंचवटी’तले ग. दि. माडगूळकर, यंत्रतपस्वी किलरेस्कर, अनेक चित्रतपस्वी युगनिर्माते,

पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, बालगंधर्व आणि नाटय़तपस्वी- किती तरी ‘वेडी’ माणसं याच मातीत रुजली. याच आणि अशांनीच पुण्याचा आणि देशाचा सांस्कृतिक इतिहास घडवला आहे. या इतिहासाचा आणि या चरित्रांचा माझ्या मनावर परिणाम आणि संस्कार झाला. मलाही माझं वेड आणि स्वप्न या मातीत सापडलं.

भविष्यात माझं आणखी एक स्वप्न आहे. ते भव्य-दिव्य आणि अफाट आहे, असं म्हणावं लागेल. मला संपूर्ण शिवचरित्र वॅक्स, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपुढे ठेवायचं आहे. म्हणजे ‘डिस्ने लँड’सारखी ही ‘शिवसृष्टी’ असणार आहे. शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत, हीच इच्छा आहे.

शिवचरित्रावर भाषणे करून मिळवलेले लाखो रुपये मी वेगवेगळ्या संस्थांना अर्पण केले हे खरे. पण ही धन देण्याची प्रेरणा मला कशातून मिळाली आहे, सांगू? शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना भूमीमध्ये धन सापडले. ते त्यांनी जनतेसाठी- विहिरी- तलाव वगैरे कामांसाठी वापरले. स्वत: महाराजांना तोरणा किल्ल्यावर धन मिळाले. ते त्यांनी स्वराज्याच्या कारणी लावले. लोकमान्य टिळकांना अर्पण केलेल्या थैलीचा त्यांनी विश्वस्त निधी केला.

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, कला यातून मिळालेले लाखो रुपये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजार्पण केले. अशा थोरांच्या वाटचालीने जी वाट मिळालेली आहे, तिच्यावरून चालणारा मी एक वाटसरू आहे. ही थोर मंडळी माझी यामागची प्रेरणा आहेत. यावेळी आणखी एक विचार मनात येतो की, हे जग सोडून आपल्याला केव्हा तरी जायचे असते आणि मग तेव्हा आपल्याबरोबर काय येते? हातातली अंगठी, दाग-दागिने काढून घेतले जातात. इमले, बंगले, गाडय़ा, धनदौलत, सोने-नाणे सारे सारे काही इथेच राहते. असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची? आपण मिळवलेल्या मिळकतीतील काही भाग तरी रुग्णालये, वाचनालये, शाळा-महाविद्यालये किंवा आपल्याला पसंत पडणाऱ्या मार्गाने समाजाला देण्याची इच्छा असावी. हे आणि हेच माझे श्रेयस-प्रेयस असावे असे मला वाटते.

आता पसायदानाची वेळ जवळ येत आहे; अशी मला जाणीव होत आहे. मी हे पसायदान सतत मागतो आहे. मागणे एवढे आहे,

‘चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे

रक्त दे, मज स्वेद दे, तुज अघ्र्य देण्या अश्रु दे।’

तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे

मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे

मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळु दे

चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे।

बहुत काय सांगणे?

आमचे अगत्य असो द्यावे-

लेखनालंकार- राजते लेखनावधि:।।

 

शब्दांकन- डॉ. चित्रलेखा पुरंदरे

chitra.purandare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2018 2:55 am

Web Title: amazing success story of babasaheb purandare
Next Stories
1 मी शि. द. फडणीस
2 डॉक्टरकी नव्हेच व्रत!
3 जगण्याची लढाई
Just Now!
X