दुपारची वेळ.. १९८८ च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईची हवा इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे ‘ऑन इट्स बेस्ट बिहेवियर’ अशी होती. मी टाटा इन्स्टिटय़ूटमधल्या आपल्या ऑफिसमधून राहत्या फ्लॅटमध्ये जेवायला आलो होतो. ऑफिस ते घर हे अंतर पार करायला मला ६-७ मिनिटे लागत. मुंबईकर असून इतका कमी कम्यूटिंग टाइम किती लोकांचा असेल? रहदारी जवळजवळ नाहीच, ऑफिस एअर-कंडिशंड, काम करायच्या वेळा स्वत:च ठरवायच्या! टी.आय.एफ.आर. (टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) ची स्थापना करताना संस्थापक होमी भाभांनी पुष्कळ विचारमंथन करून या सोयी पुरवल्या होत्या. त्यामागे हेतू हा की दैनंदिन जीवनातल्या काळज्या शक्य तितक्या कमी केल्या तर तेथील वैज्ञानिकाला उत्कृष्ट दर्जाचे काम करायला वेळ आणि संधी दोन्ही उपलब्ध होतील.

त्या दिवशी मी एक दोन घास घेतले असतील नसतील की टेलिफोनने ठणाणा सुरू केला. टेलिकोन हे एक उपयोगी यंत्र असले तरी आपण त्याला डोक्यावर चढवून ठेवले आहे, असे माझे प्रांजल मत आहे. त्याउलट जेवण अर्धवट टाकून आलेला फोन कॉल दहा-पंधरा मिनिटे खेळवत ठेवायला मंगलाला (माय बेटर हाफ!) काही गैर वाटत नाही. तेव्हा मी बसल्या जागेतून तिला माझ्यातर्फे सोडवाक्य सांगितले : ‘‘माझ्याकरिता असेल तर सांग १५ मिनिटांनी करायला.’’  पण ती परत येऊन म्हणाली, ‘‘फोन यश पाल यांचा आहे. तुला बोलणे भाग आहे.’’ तिच्या चेहऱ्यावरील खोडकर स्मित पाहून पण दुर्लक्षून मी रिसिव्हर उचलला. तो कानाला लावताना मला कल्पना नव्हती की पुढील पाच एक मिनिटे माझ्या जीवनाची मोटर कार एका वेगळ्या गियरमध्ये टाकणार आहेत.

‘‘जयंत! आय हॅव सीन युवर रिपोर्ट.’’ यश पाल सरळ मुद्दय़ाकडे आले. मी जरा भीत भीतच विचारले की, ‘‘रिपोर्ट ठीक होता का?’’

‘‘रिपोर्ट तो बहुत बढिया है’’ रंगात आले की यश पाल हिंदीत शिरायचे. ‘‘पर उसे मैं एक कंडिशन पर स्वीकृत करुँगा. जयंत, यू हॅव टू अ‍ॅक्सेप्ट द फाउंडर डायरेक्टरशिप ऑफ दिस सेंटर!’’

यश पाल यांनी माझ्यावर टाकलेला हा एक ‘बाउंसर’च होता. त्यामागची पाश्र्वभूमी थोडक्यात अशी. १९८७ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाने (युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन- थोडक्यात ‘यू.जी.सी.’) इंटर युनिव्हर्सिटी सेंटर (आय.यू.सी.) ची कल्पना राबवायला सुरुवात केली. वास्तविक अशा आंतरविद्यापीठीय केंद्रांची आवश्यकता अनेक विषयांत जाणवते. त्यामागची कल्पना दिल्लीतील पहिल्या आयूसीद्वारे स्पष्ट होते. न्यूक्लिअर अ‍ॅक्सिलरेटर हे प्रचंड यंत्र अणुगर्भाच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरले आहे. विद्यापीठात न्यूक्लिअर फिजिक्समध्ये संशोधन करणाऱ्यांना हे उपकरण उपलब्ध करून देण्यात यू.जी.सी.पुढे दोन अडचणी होत्या. एक तर पैशाची! प्रत्येक विद्यापीठात असे यंत्र पुरवणे परवडणारे नाही. आणि जरी ते एखाद्या विद्यापीठात स्थापित केले तर त्याचा उपयोग करणारे थोडे थोडकेच शास्त्रज्ञ त्या विद्यापीठात असणार. म्हणजे एक खर्चीक यंत्र बराच काळ ‘बेकार’ पडून राहणार.

या अडचणींवर रामबाण उपाय आय.यू.सी. दाखवते. एकच यंत्र आय.यू.सी.च्या निदर्शनाखाली बांधून ते सर्व विद्यापीठांतल्या गरजू शास्त्रज्ञांना वापरायला द्यावे. यश पाल यांनी ही कल्पना उचलून धरली. अर्थात न्यूक्लिअर अ‍ॅक्सिलरेटरप्रमाणे प्रत्येक विषयाची गरज वेगळी असणार.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात तेजी असलेला पण भारतीय विद्यापीठात पैशाअभावी मागे पडलेला असा एक विषय म्हणजे खगोलशास्त्र. त्यासाठी आय.यू.सी. असावे असे यू.जी.सी.चे प्रमुख यश पाल यांना वाटत होते व त्यासाठी त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. वास्तविक, पुणे विद्यापीठातील गणित विभागाचे एक अध्यापक नरेश दधीच यांनी व्यापक सापेक्षता आणि खगोल विज्ञानाशी जोडलेले एक केंद्र विद्यापीठात असावे असा प्रस्ताव मांडला होता. ‘थिंक बिग’ अशा मताचे यश पाल यांनी केवळ एकाच विद्यापीठापर्यंत मर्यादित न ठेवता ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर मांडली. तिच्यावर विचारमंथन घडवून आणून एक सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. जर ही कल्पना योग्य वाटली तर तिच्या आधारे खगोलविज्ञान या विषयाकरता आय.यू.सी.ची निर्मिती करता यावी हा त्यांचा उद्देश होता.

त्यानुसार एक सविस्तर अहवाल मी तयार करून पाठवला. त्यासाठी नरेश दधीच आणि टी.आय.एफ.आर.मधील माझा पूर्वीचा विद्यार्थी अजित केंभावी यांची मला पुष्कळ मदत झाली. परदेशातल्या संशोधन संस्था कशा चालतात, लालफीत कशी टाळायची, नोकरशाहीला दूर ठेवून सुटसुटीत निर्णय कसे घ्यायचे याचाही बराच प्रयत्न त्या अहवालात होता. फ्रेड हॉएल यांची केंब्रिजमधील खगोलविज्ञान संस्था आणि ट्रिएस्टे येथील अब्दुल सलाम यांच्या सैद्धांतिक भौतिक विज्ञान केंद्राच्या पाश्र्वभूमीवर हे आय.यू.सी. कसे असावे याची कल्पना माझ्या डोळ्यापुढे होती.

आता पुन्हा यश पालच्या ‘त्या’ फोन कॉलकडे वळू!

माझा अहवाल पाठवताना माझ्या मनात एकच विचार प्रामुख्याने होता. आदर्श आय.यू.सी. कसे असावे यावर आधारित हा अहवाल एखाद्या नोकरशहाच्या फायलिंग कॅबिनेटमध्ये धूळ खात न पडता त्याबरहुकूम त्यावर कार्यवाही व्हावी. आता यश पाल त्या कार्यवाहीची जबाबदारी माझ्यावरच टाकत होते. यश पाल यांनी पुढील तपशील सांगितला. आय.यू.सी.च्या संचालक पदावरून मी घेतलेले निर्णय अमलात आणायला यू.जी.सी.चे प्रमुख या नात्याने त्यांचा पूर्ण सहभाग असेल. पण मी संचालक म्हणून येणार ते माझ्या त्या वेळच्या पदाला (टी.आय.एफ.आर.च्या ज्येष्ठ प्राध्यापकाचे पद) कायमचा रामराम ठोकून!

ही अट घालण्यामागे इतिहास होता. टी.आय.एफ.आर.ची कीर्ती आणि तेथील सोयी आकर्षक असल्याने तेथील संशोधक इन्स्टिटय़ूट सोडून इतरत्र (वरचा हुद्दा मिळत असूनही) गेले की वर्षां-दोन वर्षांत परत येत. मी तसे करणार नाही अशी ग्वाही द्यावी. थोडक्यात, हा सिंहगड सर करताना मी दोर कापून यावे!

‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) ही संस्था अस्तित्वात यायची का नाही याचे उत्तर आता सर्वस्वी माझ्यावर अवलंबून होते, आणि यश पाल यांना आव्हानाला प्रतिसाद लगेच हवा होता.

‘‘फोन धरून ठेवा.. मी कौटुंबिक सल्ला घेऊन ताबडतोब येतो,’’ असे सांगून मी मंगलाला तिचे मत विचारले. ‘‘आपल्याकडून काहीतरी चांगले घडणार असेल तर त्यासाठी हा धाडसी निर्णय घ्यावा.’’ ती उत्तरली. मग तिने विचारले, ‘‘पण गिरिजाचे काय?’’ गिरिजा आमची दुसरी कन्या त्या वर्षी अकरावीत होती. बारावीची परीक्षा आणि आय.आय.टी.साठी प्रयत्न या गोष्टी सुखरूप होऊन गेल्यावर मुंबईहून पुण्याकडे बस्तान हालवता येईल. तो हिशोब मांडून मी यश पाल यांचा फोन उचलला. ‘‘मी तुमचे आव्हान घेतो. पण माझ्या मुलीचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन १ जून १९८९ ला मी पुण्याला सहकुटुंब सहपरिवार स्थलांतर करू शकेन. अर्थात तोपर्यंत मी मुंबईहून आयुकाची कामे पाहू शकेन.’’

माझी ही अट मान्य करून यश पाल उत्तरले, ‘‘छान! मला तुझ्याकडून होकारच अपेक्षित होता.’’

मी टाटा इन्स्टिटय़ूट सोडणार ही वार्ता लवकरच पसरली. अर्थात् मी माझा निर्णय औपचारिक रूपात टी.आय.एफ.आर.च्या संचालकांना कळवला, तेव्हा त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘यू.जी.सी.चे काही खरे नाही! तेथून नवे प्रकल्प जाहीर होतात, पण या ना त्या कारणास्तव पुढे सरकत नाहीत. तेव्हा जाणारच असलात तर निदान ‘लीन ठेवून’ जा.. म्हणजे तुमचा परतीचा मार्ग मोकळा असेल.’’ लीन ठेवल्याने त्या संस्थेत परत येण्यात अडचण आली नसती.

थोडक्यात ते तोच पर्याय सुचवीत होते जो टी.आय.एफ.आर.चे इतर शास्त्रज्ञ अमलात आणायचे. मी उत्तरलो, ‘‘मी यश पालना शब्द दिलाय की लीनचा पर्याय वापरणार नाही. त्यांनी मला सर्वतोपरी साहाय्य देऊ केले आहे त्यावर माझा विश्वास आहे.’’ माझे मत बदलणार नाही हे ओळखून टी.आय.एफ.आर.च्या संचालकांनी फार आग्रह केला नाही. वास्तविक अशासारखा एकतर्फी निर्णय घेण्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हता हे मी संचालकांना सांगितले नाही. १९७२ मध्ये केंब्रिजमध्ये १५ वर्षे घालवून मी भारतात परतलो ते असाच ‘दोर कापून’. त्यावेळीसुद्धा असे अनेक महाभाग भेटले होते ज्यांचे मत होते, ‘‘कशाला परदेशातली करियर थांबवून हा भारतात परतण्याचा धाडसी पर्याय निवडलात?’’

आज मागे वळून पाहताना १९७२ मधील सीमोल्लंघन मला मानवले असेच वाटते. १९७२ च्या तुलनेत आज भारतात माझ्या विषयाच्या सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. ही प्रगती भारतात राहून पाहायला मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो. पण माझ्या १९८८ मधील त्या निर्णयाचे काय स्वरूप होते? एका अद्ययावत् वातानुकूलित इमारतीतून निघून पुणे विद्यापीठाने दिलेल्या ‘गोळे बंगलो’ (एके काळी रजिस्टार गोळे यांचे निवासस्थान) मधील ‘दहा बाय बारा’ खोलीत काम करताना काय वाटले? कशाला ही ब्याद पत्करली – असे न वाटता आपण शून्यातून उत्कृष्टता निर्माण करणार आहोत त्याची ही सुरुवात आहे असा एक उत्साह मनात होता. माझ्या पाठोपाठ येणाऱ्या सहकाऱ्यांपैकी दिलेल्या खोलीत मावतील तेवढे आत – बाकीचे बंगल्याबाहेरच्या पायऱ्यांवर – अशा आदिकालात आयुकाची सुरुवात झाली. आपण उत्साहाने नवनिर्मिती करायला धजतो तेव्हा बाहेरून मिळालेल्या साहाय्याचे महत्त्व अमाप असते. त्याची काही उदाहरणे..

  • प्रख्यात वास्तुशिल्पकार चार्ल्स कोरिया मित्र म्हणून परिचित होते. आयुका निर्मितीसाठी त्यांना विचारावे का याबद्दल मी सांशक होतो. कारण मोठाले प्रकल्प हाती घेणारे आमच्या लहानशा प्रकल्पासाठी वेळ देतील असे वाटत नव्हते. पण अजित आणि नरेश (हे माझे आयुकातील पहिलेवहिले सहकारी) म्हणाले विचारून तर पाहा! विचारले आणि त्यांनी आनंदाने होकार दिला. जयपूरमध्ये पौराणिक खगोलशास्त्रीय कल्पनांवर आधारित इमारती बांधल्यानंतर आधुनिक खगोलशास्त्रावर इमारत बांधायला ते उत्सुक होते. कोरियांच्या निवडीला यश पाल यांनी आनंदाने मान्यता दिली.
  • आय.यू.सी.सारखी ‘ऑटॉनॉमस’ संस्था स्थानिक सोसायटीच्या नियमानुसार चालते. मात्र त्यासाठी रजिस्टार ऑफ सोसायटीची मान्यता लागते. दिल्लीतल्या आय.यू.सी.ला ही मान्यता मिळवायला कित्येक महिने वाट पाहावी लागली, शिवाय सरकारदरबारी खेटे मारावे लागले. आमचा अनुभव वेगळा होता! पुण्यातील संबंधित अधिकारी म्हणाले, ‘‘तुमच्या संस्थेला सरकारी मान्यता मिळाली याचा दाखला आणा. त्यानंतर दोन दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ.’’ आणि खरोखर त्यांनी हा शब्द पाळला.
  • आयुकाला २० एकरची जागा हवी होती. शक्यतो पुणे विद्यापीठाच्या आवारात. टी.आय.एफ.आर.च्या रेडिओ दुर्बिणीशी संपर्क आणि विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाशी जवळीक या दृष्टीने जमीन मिळवायचा प्रयत्न होता पण तो यशस्वी होत नव्हता. अखेर मदतीसाठी मी पंतप्रधान राजीव गांधींना पत्र लिहिले. फलस्वरूप आमचा उद्देश साध्य झाला. पंतप्रधानांचे सचिव देशमुख यांच्या मदतीमुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि नंतर शरद पवार यांच्या मदतीने जागेची समस्याही सुटली.
  • माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे भारतातील इमारतींचे बांधकाम अपेक्षेपेक्षा पुष्कळ लांबते. काही विद्यापीठातील इमारतींचा अनुभव प्रत्यक्ष पाहिला होता. विशेषकरून शासकीय नियंत्रणाखालचे बांधकाम अपेक्षेपेक्षा जास्त खर्चीक, पूर्णत्व गाठण्यात दिरंगाई, पुरेसे लक्ष न दिल्याने बांधकामाचा दर्जा निकृष्ट, वगैरे ऐकून मी साशंक आणि सावध होतो. सुदैवाने मला लाभलेली नियंत्रण यंत्रणा, गरजेनुसार मिळालेले शासकीय अनुदान आदीचा परिणाम असा की ‘आयुका’च्या इमारती नियोजित वेळापत्रकाप्रमाणे तयार होत गेल्या. तरी पण काही ‘विघ्नसंतोषी’ लोकांनी आयुकाच्या बांधकामासाठी भरमसाट खर्च झाला असेल म्हणून त्या वेळेवर आणि उत्तम झाल्या असे म्हणायला लागल्यावर मी आयुकाच्या ‘खगोल’ माहितीपत्रात खर्चाचे आकडे प्रसिद्ध करून दर स्वेअर फुटामागे पडलेला खर्च पुण्यातील तत्कालीन शासकीय इमारतींच्या तुलनेत कमीच होता हे दाखवले.
  • चार्ल्स कोरियाने रचलेल्या इमारतीमध्ये आयुका एक महत्त्वाचे शिल्प मानले जाते. साहजिकच देशी-परदेशी मिळालेली स्तुतिसुमने मी मंगलाला सांगत असे तेव्हा तिने माझा अभिमान खाली आणणारा एक प्रश्न केला, ‘‘आयुकातील इमारती उत्कृष्ट असतील पण तेथील वैज्ञानिक शिक्षण-संशोधन कुठल्या स्तराचे आहे?’’ हा प्रश्न १९९३ मध्ये (आयुका पाच वर्षांचे असताना!) विचारला गेला. उत्तरासाठी मी वेळ मागून घेतला. आयुकाच्या नियमावलीत देशी-परदेशी वैज्ञानिकांची एका सल्ला देणाऱ्या समितीची योजना होती. या मार्गदर्शनाखाली आयुका प्रगतिपथावर होती. आणखी ५ वर्षांनी – १९९८ मध्ये मी या समितीचे शिफारसपत्र मंगलाला दाखवले, ‘‘आयुका जागतिक स्तरावरील खगोल संस्थात पहिल्या डिव्हिजनमध्ये आहे.’’

एक संस्कृत श्लोक आठवतोय, ‘‘लालयेत् पंचवर्षांनि दशवर्षांनि ताडयेत्। प्राप्तेषु शोडषे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्।’’ मुलांचे संगोपन करताना त्यांचे पहिले पाच वर्षे लाड करावेत. नंतरची १० वर्षे त्यांना अनुशासित करावे. आणि त्यांनी सोळाव्या वर्षांत पदार्पण केल्यावर त्यांना मित्राप्रमाणे वागवावे. संस्थांच्या बाबतीत असेच काही म्हणता येईल! पहिली दहा वर्षे त्यांना सर्व प्रकारे मदत करावी. नंतरची १५ वर्षे त्यांचे कठोर निकष लावून मूल्पमापन करावे आणि २५ वर्षे पूर्ण झाली की संस्था अनुभवाने परिपक्व झाली असे समजावे. नव्या संस्थांच्या मूल्यमापनात ‘थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रख्यात आंतरराष्ट्रीय प्रबोधिनीने आयुकाला पहिला नंबर दिला तेव्हा वाटले की १९८८ मध्ये यश पाल यांनी सोपवलेली जबाबदारी आपण पार पाडली.

जेव्हा कारचे दोष होतात साकार..

आयुष्यात इतकं छान मनासारखं घडत गेलं. एखादीच खंतावणारी, चुटपुट आठवतेय. परदेशी संशोधनासाठी गेल्यावर, जर ती यात्रा काही आठवडय़ाची (किंवा त्याहूनही जास्त लांबणारी) असेल तर हाताशी स्वत:चे वाहन असणे सोयीचे- किंवा आवश्यक- वाटते. अशा वेळी जर निवास एक-दोन आठवडे असेल तर स्वत: चालवायची गाडी भाडय़ाने घेणे परवडते. पण दीर्घ निवासासाठी एखादी जुनी कार विकत घेऊन परत जाताना विकून टाकण्याचा पर्यायपण विचारात घेतला जातो.

१९८०-८१मध्ये मला कार्डिफला वर्षभरासाठी जायचे होते, तेव्हा हा शेवटचा पर्याय आम्ही विचारात घेतला. सधन पाश्चात्त्य देशात नवी कार विकत घेऊन तीन-चार वर्षे वापरून विकून टाकण्याचा कल असल्याने अशी फार न वापरलेली कार माफक किमतीत मिळू शकते. मात्र ती शोधून तपासून घेणे आवश्यक असते. आम्ही कार्डिफ (वेल्स, यू.के.)ला आल्यावर शोध आरंभला. लवकरच एक महिला आपली गाडी विकण्यासाठी दाखवायला घेऊन आली. फ्रेंच रेनो या चांगल्या कंपनीची गाडी, एकच मालक (ती स्वत:) असलेली चांगली असणार अशा समजुतीने आम्ही ती चालवून पाहिली. किंमत ३०० पाउंड फार नव्हती. तेव्हा, विकणारीला लवकर विकण्याची गरज असल्याने किंमत कमी होती हे कारण पटण्याजोगे होते व आम्ही तात्काळ सौदा केला.

आमच्या काही मित्रांनी आम्हाला सल्ला दिला होता की कार नीट तपासून घ्या. ते शहाणपण आम्हाला सौदा केल्यावर आठवले! निदान स्वत:च्या हितासाठी तरी कारची स्थिती तपासून घ्यावी. एका जाणकार शेजाऱ्याचे कार दुरुस्तीचे गराज होते. त्याने तपासण्याचे काम केले आणि स्पष्ट निष्कर्ष काढला, ‘‘ही गाडी वाईट स्थितीत आहे.. तुम्ही बिलकूल वापरू नका!’’ त्याने गाडीचे काही भाग मोडकळीला आलेले दाखवले. अशा तऱ्हेने फसगत झाल्यावर ती गाडी विकून टाकून नव्याने शोधास सुरुवात केली.

या वेळी एखाद्या व्यक्तीकडून गाडी विकत घेण्याऐवजी जुन्या गाडय़ांचे परवाना असलेले विक्रेते पाहायचे ठरवले. अशा तपासणीतून जाणकार मित्राच्या सहभागातून सुमारे ६०० पौंडांची ऑस्टिन, स्टेशन वॅगन टाइप ऐसपैस घेतली. ती दोन महिने व्यवस्थित चालल्यावर तिच्यातून फ्रान्स व जर्मनीचा प्रवास करायचे ठरवले. ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे कागदपत्रे व आमच्या शेजारच्या गराजवाल्याकडून कारची तपासणी करून घेतली. पण एक अनपेक्षित संकट उद्भवले. कार्डिफमधल्या जर्मन कॉन्सुलेटने कळवले की जरी त्यांनी ‘भारतीयांना जर्मन व्हिसा लागत नाही असे सांगितले होते तरी आता (गेल्या आठवडय़ातच!) नियम बदललेत. इतकेच नव्हे तर व्हिसासाठी आमचे पासपोर्ट दिल्लीला पाठवले जातील – त्यामुळे व्हिसा मिळवायला महिनाभर तरी लागेल.

झाले! या नव्या फतव्यामुळे आमच्या नियोजित वेळापत्रकात हा प्रवास बसत नव्हता. त्यांत रदबदली करायला लंडनमधली जर्मन वकिलात तयार नव्हती. अखेर आमचा प्रवास तिकडे न होता आम्ही त्याऐवजी केंब्रिजला जायचे ठरवले. अर्थात् या बदलाकरिता जर्मन वकिलातीला शिव्या देत (सभ्य भाषेत!) आम्ही केंब्रिजला जात असता वाटेत कारने दगा दिला – ती बंद पडली! मोटरवेवरील फोन यंत्रणा वापरून ऑटोमोबाइल असोसिएशनच्या माणसाला बोलवले. त्याने गाडीचे इंजिन बंद पडल्याचे निदान करून गाडी स्वीडनच्या ऑस्टिन गराजकडे पोचवली. हे सर्व फुकट असले तरी कारची दुरुस्ती, केंब्रिजला ट्रेनने जाणे व नंतर स्वीडनहून दुरुस्त केलेली गाडी आणणे हे सर्व भुर्दंड आमच्याच माथी होते!

पण या सगळ्या कटकटीतून आम्ही एक सुखी असायचा मुद्दा निवडला : जर जर्मन व्हिसा आवश्यक नसता तर आमची कार फ्रान्समध्ये बंद पडून त्याचा आम्हाला किती त्रास झाला असता? भाषेचा प्रश्न, दुरुस्तीची कटकट! केंब्रिजसारखे अनेक मित्रांचे नगर आमच्या मदतीला होते तसे फ्रान्समध्ये मिळाले असते का?

डॉ. जयंत नारळीकर

jvn@iucaa.in

chaturang@expressindia.com