19 January 2019

News Flash

मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे

बागडणाऱ्या निसर्गाचा विध्वंस करू घातला आहे.

प्रेयस म्हणजे जे शरीराला सुख देते ते आणि श्रेयस म्हणजे जे शरीराच्या पलीकडचे असते आणि ज्यामुळे आत्मिक समाधान मिळते ते, असा ढोबळ अर्थ सांगितला गेला आहे. संतती केवळ प्रेयातून निर्माण होते असे जरी गृहीत धरले तरी त्या संततीच्या संगोपनात श्रेयसाचा प्रवेश होतो आणि त्या संततीच्या आगमनानंतर नवरा-बायकोचा एकमेकाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही श्रेयस प्रवेश करते, असे म्हणता येते. हाच श्रेयसाचा अनुबंध पुढे कुटुंब, गाव, समाज, भाषा, प्रांत, देश असा वृद्धिंगत होतो. आपल्या कर्मावर बुद्धीचा अंमल असल्यामुळे सर्वानी सुखात राहावे आणि तसे झाले तरच आपल्यालाही सुखात करता येईल असा बुद्धीचा संकेत असतो, परंतु तसे घडत नाही, कारण प्रेयस जैविक असल्यामुळे ते सतत आडवे येते आणि प्रकरण विकोपास जाते. अशा वेळी श्रेयस्कर कर्मे करणारी माणसे प्रेयस आणि श्रेयस यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.

बागडणाऱ्या निसर्गाचा विध्वंस करू घातला आहे. हे लक्षात आल्यावर श्रेयस्कर कार्यकर्त्यांची जी फळी निर्माण झाली आहे ती वर सांगितलेल्या अनुक्रमाचाच भाग आहे. प्रेयस बहिर्मुख असते आणि श्रेयस अंतर्मुख असते. परंतु ते सगळ्यांच्यात असतेच असते. त्याला ज्ञान म्हणतात. ते प्रेयसाच्या अतिरेकाने म्हणजेच अज्ञानाने झाकले जाते असे तत्त्वज्ञान सांगते. श्रेयसाचा आविष्कार सगळ्यांमध्ये सारखा होत नाही. आपल्या प्रेयसाला जपत परंतु शक्यतोवर परपीडा न करता बहुसंख्य माणसे येतात आणि जातात तशीच श्रेयस कर्मे करणारी माणसे येत-जात असतात. त्यांची वर्गवारी कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी करू नये, गोष्टी घडत राहतात त्या मी घडवतो असे म्हणण्यात आत्मघात होतो असाही एक संकेत आहे. ‘श्रेयस-कर्म’ कळपाने राहणाऱ्या प्राण्यांमध्येही दिसते, मात्र त्याचा स्तर कमी-जास्त होत नसावा. मानवी संस्कृतीत श्रेयसाचा अंश वर-खाली होतो. ‘तो जुना (श्रेयस) धर्म अस्ताला गेला म्हणून मला तो परत सांगावा लागला हे श्रीकृष्णाचे गीतेतले विधान त्या दृष्टीने बघावे लागते.’

माझी आई मी अकरा वर्षांचा असताना १९५० मध्ये गोध्रा या गुजराथमधल्या मागासलेल्या गावात स्त्रियांच्यात कुटुंब नियोजनाचा प्रचार करत असे. समाज मध्यमवर्गीय गुजराती, मुसलमान आणि आदिवासी अशा तिन्ही प्रकारचा होता. त्या काळात माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा असलेल्या एका मुलाने माझ्या आईबद्दल वाईट शेरेबाजी केली. त्याच्या कानाखाली मी एक मोठा आवाज काढला होता. अकरा वर्षांच्या मला कुटुंब नियोजन या प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हती, परंतु स्वभावाच्या पलीकडे जाणे मला जमले नाही. माझी आई मी पंधरा वर्षांचा असताना गेली. आता तिची नात म्हणजे माझी मुलगी पन्नासाव्या वर्षी नोकरी सोडून स्त्रियांवर सार्वजनिक आणि कौटुंबिक दोन्ही ठिकाणी होणाऱ्या निरनिराळ्या जुलैमाच्या विरोधात उभी ठाकली आहे. मला आणि माझ्या बायकोला या विषयाची जाण आहे, परंतु या बाबतीत आम्ही (सामाजिक कामात गुंतलो असलो तरी) फारसे काही केलेले नाही. जी आजी तिला कधी भेटलीच नाही तिच्या पावलावर पाऊल ठेवणारी माझी मुलगी श्रेयस जाणिवांचे संक्रमण आहे का, हा प्रश्न विचारायला हरकत नसावी. श्रेयस आणि प्रेयस या विषयावर लिहिताना आत्मचरित्र अनाहूतपणे उलगडणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचे स्वरूप आत्मपरीक्षणासारखे असावे असा थोडा श्रेयस विचार मनाला साद घालतो आहे.

आपल्यापेक्षा मोठय़ा मुलाच्या थोबाडात देण्याचे साहस माझ्यात कोठून आले? ते साहसही मला पूर्वजांकडून मिळाले असणार. स्वातंत्र्याच्या लढय़ात दोन काका तुरुंगात होते. माझ्या वडिलांनी आणि एका काकांनी जन्मभर सरकारी नोकरी केली, परंतु त्यांची चरित्रे निष्कलंक होती. आणि नोकरी करताना येणाऱ्या प्रलोभनांसमोर त्यांनी कधीही मान तुकवली नाही आणि सडेतोडपणा दाखवला. कामगार विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार बोकाळला होता तेव्हा माझ्या वडिलांच्या निस्पृह आणि सडेतोड स्वभावामुळे ती घाण निपटण्यासाठी त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले होते ही एक आठवण आहे. पुढे मुंबईत मी वैद्यक व्यवसाय सुरू केला तेव्हा टिळक रुग्णालयात मी पाचशे रुपये महिना या दराने अनेक वर्षे प्लास्टिक सर्जरी विषयाचा मानद प्राध्यापक होतो. त्या काळात एकही दिवस मी पाच तासांपेक्षा कमी काम केले नाही. माझा खासगी व्यवसाय नियंत्रित ठेवला. भरभरून शिकवले. भारतासारख्या देशाला साजेशा अशा शस्त्रक्रिया स्वयंस्फूर्तपणे त्या काळातच शोधल्या गेल्या, त्या परदेशात प्रसिद्ध झाल्या, त्यातून अनेकानेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. परदेशी वास्तव्याच्या संधी उपलब्ध झाल्या तेव्हा मला त्या घ्याव्यात असे कधीही वाटले नाही हा संस्कारांचा परिणाम असणार आणि तो परिणाम श्रेयस म्हणून गणला गेला. माझे एकूण एक विद्यार्थी खूप यशस्वी झाले. प्लास्टिक सर्जरीचा प्रत्येक उपविभागात या विद्यार्थ्यांनी अक्षरश: अटकेपार झेंडे लावले. त्यांच्यातले काही परिषदांचे अध्यक्ष झाले. आणखी काही होऊ  घातले आहेत. परंतु माझ्या एकाही विद्यार्थ्यांने अमाप संधी असूनही परदेशात जाऊन इथे शिकलेले परदेशात वापरून आपली बरकत करून घ्यावी, असे मनात आणले नाही, कारण त्यांच्या मास्तरानेच ते करून दाखवले होते. हे एक श्रेयसच म्हणायला हवे आणि ते माझ्या आधीच्या माझ्या कुटुंबातल्या पिढीने माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझ्यामार्फत पोहोचवले. मी वाहक होतो जनक नव्हतो. मी परिषदांची निवडणूक आमंत्रणे असूनही लढण्यास नकार दिला. परंतु माझ्या विद्यार्थ्यांना मात्र मी निवडणुका लढा असा उपदेश करतो, कारण सत्ता वापरताना ही मुले आणि मुली काहीतरी विधायकच करतील अशी खात्री आहे आणि तसेच झाले आहे. हे त्यांचे श्रेयसच.

मला निवृत्त होऊन वीस वर्षे झाली. गेल्या सात-आठ वर्षांत आमच्या प्लास्टिक सर्जरीच्या अखिल भारतीय संस्थेतर्फे प्लास्टिक सर्जरी विषयावरच्या एका विस्तृत ब्लॉगचे काम दररोज दोन तास देऊन मी सुरू ठेवले आहे. माझे काम संपादकीय आहे, पण जिकिरीचेही आहे. प्लास्टिक सर्जरीचा उगम भारतातला. त्याचा जनक सुश्रुत. या भारतीय ब्लॉगला सर्व जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी जगभरातले शंभर विद्यार्थी या ब्लॉगला भेट देतात. मी या कामाचे पैसे घेत नाही आणि ब्लॉगचा वापरही नि:शुल्क आहे. हेही माझ्या संचिताचे आणि प्रारब्धाचे श्रेय आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्या विज्ञानाच्या उपशाखेने मला एवढे दिले त्या उपशाखेचे काम मी चालू ठेवणे हे माझे क्रियमाण कर्म असायला हवे असे माझे मन मला बजावते. ते माझ्यावरच्या संस्कारांमुळे.

टिळक रुग्णालयातले माझे काम सात्त्विक असेलही, परंतु मी लहानपणी हूड आणि व्रात्य होतो. आणि अभ्यासात अगदीच कच्चा होतो. कॉलेजमध्ये असताना निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मी काही तास पोलीस चौकीची हवा खाऊन आलेला माणूस आहे. भारतातल्या निवासी डॉक्टरांच्या पहिल्या संपाचा (१९६२) मी पुढारी होतो. पुढे शिकागोमध्ये असताना तिथेही अमेरिकेत जेव्हा निवासी डॉक्टरांचा पहिला संप झाला तेव्हा वाटाघाटी मीच केल्या होत्या. (१९७१) हल्लीच्या निवासी डॉक्टरांच्या चांगल्या वेतनाचे मूळ ते संप होत. हे सगळे गुण आक्रमक पद्धतीने वापरून मी एका बलाढय़ आंतरराष्ट्रीय समूहाला नामोहरम केले. मी माहीमला जिथे राहतो त्याच्या शेजारच्या उद्यानासाठी राखून ठेवलेल्या एका भूखंडावर या समूहाची वक्रदृष्टी होती. एक-दोन नव्हे जवळजवळ पंचवीस वर्षे या भूखंडासाठी जे लढे झाले त्यात लोक सामील झाले आणि गेलेपण, मी एकटाच सुरुवातीपासून चिवटपणाने झुंजत राहिलो. प्रलोभनांना भीक घातली नाही. कोर्टाची पायरी चढलो, सरकारदरबारी खेटे घातले. दुर्दैवाने साम्यवादी डावे ते हिंदुत्ववादी उजवे सगळेच त्या समूहाला धार्जिणे होते. सुदैवाने महापालिका आयुक्त काळे आणि शिवसेनेचे सुधीर जोशी यांनी हात दिला आणि मी यशस्वी झालो. अशा तऱ्हेची कर्मे करताना श्रेयसाबद्दल आत्मीयता असलेली माणसे भेटतात, हा अनुभव श्रेयस समाजात अस्तित्वात असतेच याचा पुरावा होता. मग तो भूखंड लोकांकडून पैसे घेऊन विकसित केला. पैसे देणे सोपे असते, परंतु मागणे अवघड जाते असे एक म्हणाला होता ते खरेच होते. माळी कमी होते तेव्हा पाणी घालणे, साफसफाई करणे, झाडांसाठी खड्डे खोदणे हे सगळे मी केले. ते उद्यान मी रात्रंदिवस जगलो. पुढे उद्यान विकसित झाल्यावर माझे सहकारी माझ्या एकाधिकारशाहीला कंटाळले तेही स्वाभाविकच होते. त्यांनी ते उद्यान माझ्याकडून हिसकावून घेतले, परंतु असल्या गोष्टींसाठी जी धमक लागते ती त्यांच्यात नव्हती. उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्यामुळे त्या बागेची आबाळ झालेली पाहून माझी खूप तळमळ झाली. शेवट मात्र गोड झाला. देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याने सगळी उद्याने महापालिकेने ताब्यात घेऊन विकसित करावी असे ठरवले. महापालिकेच्या अगडबंब पैशापुढे असली उद्याने विकसित करायला टीचभरही पैसे लागत नाहीत. आता ते उद्यान परत फुलते आहे, परंतु त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मागे मी माझा ससेमिरा चालूच ठेवला आहे.

या सगळ्या गोष्टीत मला मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू दिसले. त्या आंतरराष्ट्रीय समूहाच्या म्होरक्याने अमेरिकेत एक संगणक कंपनी सुरू केली. त्यात माझ्या सख्ख्या धाकटय़ा भावाला निवडले. माझा भाऊ आहे हे माहीत असूनही निवडले. निवडताना त्याला सांगितले, तू त्या माणसाचा भाऊ आहेस तेव्हा तू प्रामाणिकच असणार. ही घटनाही श्रेयसच. त्या माझ्या प्रतिस्पध्र्याच्या हृदयातले श्रेयसही बाहेर पडले. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे त्यात रजोगुणी माणसाचे वर्णन करताना असली माणसे धर्मशाळा बांधतात आणि बागांची लागवड करतात असे सांगितले आहे. ती ज्ञानेश्वरांची ओवी माझ्या बाबतीत खरी ठरली.

मी सतत धापा टाकणारा माणूस आहे. परंतु माझ्या संस्कारांमुळे, ‘ही ऊर्जा काही तरी चांगले करण्यासाठी वापर’ असा घोष लहानपणापासून सतत ऐकत आलो आहे. मी त्या भूखंडासाठी झगडत होतो तेव्हा माझ्या आईवडिलांची अगदी जवळच्या दोन ज्येष्ठ स्नेह्य़ांची सतत आठवण येत असते. एक म्हणजे आमच्या येवला गावचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिगरीने इंग्रजांच्या फर्मानाविरुद्ध राष्ट्रीय शाळा चालवणारे आणि भारतात मृत्युपश्चात देहदानाचा पायंडा पाडणारे आपटे गुरुजी आणि दुसरे म्हणजे आपल्या ध्येयापासून कधीही विचलित न झालेले समाजवादी नेते एस एम उपाख्य अण्णा जोशी. माझे प्रारब्ध बेहतर होते आणि असल्या संस्कारांची पाश्र्वभूमी होती म्हणूनच हे क्रियमाण कर्म घडले. मी आणि माझी ऊर्जा निमित्तमात्र ठरली.

माझे वैयक्तिक आयुष्य काही बाबतीत फार दुर्दैवी ठरले. व्यावसायिक कामात भरघोस यश आणि ज्या विषयी मी काही करू शकत नव्हतो असे अपार वैयक्तिक दु:ख मी अनुभवले तेव्हा ज्ञानेश्वरी उघडली. मागच्या पिढय़ांमध्ये ती वाचण्याची परंपरा होती. परंतु माझ्या आईवडिलांच्या सुधारक पिढीने कर्मकांड आणि भंपक ईश्वरभक्ती नाकारत असताना ज्ञानेश्वरीतले तत्त्वज्ञान अनाहूतपणे नाकारले हे मला ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे लक्षात आले. ज्ञानेश्वरीने मला अमाप शिकवले. आकाश हे ब्रह्माचे अंकुर आहे. ते आकाश पसरल्यावर त्यात लुकलुकणारे ग्रहतारे हे ब्रह्माचे केवळ कवडसे असतात. त्या ब्रह्मातून एक वृक्ष खाली लोंबतो, तो गर्द असतो, त्यात निरनिराळ्या प्रकारचे जीव जगतात आणि त्या वृक्षात गुंतून पडतात, त्याच्यापलीकडे बघत कर्म करायचे असते. कर्महीन माणसाचे जीवन अरण्यात काटय़ाकुटय़ाने घेरलेल्या आणि जनावरांची हाडे आजूबाजूला पसरलेल्या ओसाड शेवाळ्याने माखलेल्या विहरीसारखे असते, सात्त्विक कर्माचा अहंकार सगळ्यात धोकादायक असतो. माणसाला सुख-दु:ख द्वेष यापलीकडे भावना नसतात त्या तिघांकडे तिऱ्हाईतासारखे बघितले तर आनंद अनुभवता येतो अशी ती शिकवणी होती. ज्ञानेश्वरच माझे गुरू, त्यांनी मला मी कोण कसा काय आहे हे पद्धतशीर वैज्ञानिक तऱ्हेने समजावून सांगितले. पारंपरिक भक्ती मला जमण्यातली नव्हती. ज्ञानेश्वरांची केली तेवढीच भक्ती. पुढच्या पिढीचे मराठी लयास जात आहे म्हणून मग सहा वर्षे मानेवर खडा ठेवून ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत पद्य भाषांतर आणि गद्य टीका लिहून काढली. डेरवणच्या विकास वालावलकरांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेवरून आर्थिक मदत केल्यामुळे ते शक्य झाले. अनेक वर्षे मी डेरवणला जाऊन विनामूल्य शस्त्रक्रिया करत असे. त्या श्रेयसाचे या श्रेयसात रूपांतर झाले. या जाडजूड पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या (देशपरदेशात त्या वाचल्या गेल्या) जगातल्या दहा सर्वोत्तम प्रतिभावंतांची यादी केली तर ज्ञानेश्वर नावाचा मराठी माणूस त्यात निवडला जाईल हा विचार उराशी बाळगला आणि त्यांच्याच कृपेने हे काम झाले. मी लहान होतो तेव्हा माझी आई लेख लिहीत असे आणि माझे एक मामा कवी होते, लहान मुलामुलींसाठी कविता लिहिणारे कवी मायदेव हे नाव गेल्या शतकात सुपरिचित होते. त्या दोघांचा वारसा आणि ओघ या भाषांतरातून प्रकट झाला आणि श्रेयाची साखळी पुढे उलगडत गेली.

तसे मी अनेक उपद्व्याप केले. त्याची यादी लांब आहे. ती देण्याची टाळतो. दर वेळा मी पूर्णत: यशस्वी झालो नाहीच. श्रेयस्कर कर्मे करणे क्लेशकारक असते हेही नमूद केलेले बरे. हे क्लेश माणसाला तगडे करतात, त्याला काहीतरी अप्रूप समाधान देतात असे म्हणण्याची पद्धत आहे. तसे माझ्या बाबतीत घडले असे म्हणण्याचे धारिष्टय़ मी करत नाही. माझ्या स्वभावाला आणि संस्कारांना धरून मी वागलो, घडायचे ते घडले, काही ठिकाणी यश मिळाले, काही ठिकाणी अपयश. गीतेतल्या दहाव्या अध्यायात यश आणि अपयश, कीर्ती आणि अपकीर्ती, माझ्याच विभूती आहेत असे ब्रह्माचा प्रतिनिधी म्हणून वावरणारा श्रीकृष्ण म्हणतो आणि अठराव्या अध्यायात स्वत:च्या स्वभावाला जागत जगणारा माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, असे विधान करतो. ही विधाने खरी असोत अगर खोटी ती मोठी सुखदायक आहेत हे नक्की. जिवावर उदार होऊन गावभर हिंडणारा प्रखर समाजसेवक मी नव्हतोच. तसा मी खाऊनपिऊन (!) सुखी आहे. हेही नमूद केलेले बरे.

भारतातल्या असंख्य लोकांपेक्षा चांगल्या परिस्थितीत मी जन्मलो हे माझे सुदैव. तेव्हा जे घडले त्याचे मूल्यमापन ती परिस्थिती लक्षात घेऊनच करायला हवे. अशा प्रकारचे लेख लिहिण्याचे आमंत्रण आले की दचकायला होते. आता गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे की काय असा विचार मनात चमकतो. दहा वर्षांपूर्वी जीवनगौरव पुरस्कार मिळाला तेव्हाही असाच विचार मनात आला होता. त्यानंतरही श्रेयस गोष्टी घडतच गेल्या त्या गोष्टींना माझा हातभार लागला. तेव्हा या लेखानंतर पुढची दहा वर्षे काय श्रेयस घडू शकेल आणि मी त्याला काय हातभार लावू शकेन असा विचार सुरू करून हा लेख संपवतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे.

– डॉ. रविन थत्ते

rlthatte@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 31, 2018 1:04 am

Web Title: amazing success story of ravin thatte