|| सुमित्रा भावे

आमच्या ‘दोघी’ या चित्रपटात एक दृश्य आहे. कृष्णा आणि गौरी. या दोघी बहिणी मजुरीहून परतताना त्यांना रानात एक पूजा चाललेली दिसते. एका वठलेल्या उंच वृक्षाच्या मुळाशी रोवलेले दोन-तीन उभे दगड. त्यांची पूजा चाललेली. तिथं एक उदास मुलगी बसलेली. तिच्या पाठीशी तिचे (बहुधा) आई-वडील. शेजारी देवऋषी वाटणारा भट. भट खर्जात अगम्य मंत्र म्हणतोय. बसलेल्यांच्या चेहऱ्यावर गूढ उदास भाव. भेदरलेली कृष्णा घरी आल्यावर दबक्या आवाजात आईला विचारते, ‘आये, त्या कसल्या देव्या हायेत गं?’ आई दचकून तिच्याकडे बघते. मग नजर टाळून स्वत:शीच बोलल्यासारखी म्हणते, ‘त्या महुलाया हायेत. (महुलाया म्हणजे मातृका देवी) बाया छळानं झुरून मेल्या किंवा दु:ख झेपेना म्हणून त्यांनी जीव दिला, तर त्या काहींच्या महुलाया होत्यात. असं म्हणत्यात की त्या नवसाला पावत्यात. म्हणून छळ कमी करायला त्यांची पूजा करत्यात.’

कृष्णा पुन्हा चाचरत विचारते, ‘खरंच पावत्यात?’

हे स्क्रिप्ट- हे संवाद मीच लिहिलेले; पण लिहिताना मी इथे अडले. उत्तरा बावकर, सोनाली कुलकर्णी, रेणुका दप्तरदार आणि छोटा पार्थ उमराणी यांच्या अत्यंत संवेदनशील, सखोल अभिनयानं माझ्यासाठी अजरामर झालेला हा छोटा सीन.. तर मी या प्रश्नाच्या उत्तराशी अडले. आता आई काय उत्तर देणार?..

छळ म्हणजे काय? बाईचा छळ म्हणजे काय? तो कशाकशानं होतो? तो करण्यात कोण कोण सहभागी असतं? या महुलायांची पूजा करायची म्हणजे काय? त्यांच्या देवी कशा होतात? नवस बोलायचा म्हणजे काय? आणि नवसाला पावणं म्हणजे तरी काय? छळ कमी होतो म्हणजे काय होतं?

गावातल्या बायांनी मला जेव्हा खरोखर या महुलाया दाखवल्या होत्या, तेव्हा मी फार अस्वस्थ झाले होते! माणूस जात विकासाच्या कुठल्या टप्प्यावर आहे आणि ही कुठली सनातन दु:खं कवटाळून हे दगड वठलेल्या झाडाखाली घट्ट रोवून बसलेत? अजूनही सुख-दु:खाची सोपी गणितं आपण एकमेकांसाठी कांद्याच्या पाकळ्यांसारखी आवरणं घालून सोलायला अवघड करून ठेवतो आहोत का?

कृष्णा पुन्हा विचारते, ‘सांग ना गं, खरंच पावत्यात त्या?’

आई खोल आवाजात म्हणते, ‘खरं अन् खोटं’ बस्स इतकंच!

खरं उत्तर हेच आहे, हे मला पटलं. जे खरं आहे ते मिथ्याही आहे आणि जे खोटं वाटतंय ते सत्यही आहे. हे उत्तर त्या अशिक्षित आईला सुचलं आणि मला पटलं. ‘हो’ही आणि ‘नाही’ही!

कुणी विचारतील, तुम्ही जवळजवळ ३०-३५ वर्षांपूर्वी स्त्रियांच्या मानसिकतेत बदल घडावा म्हणून, त्यांना आपल्या आंतरिक समजुतीचा शोध लागावा म्हणून चित्रपट या – जीवनाशी निवडक हुबेहूबता साधू शकणाऱ्या माध्यमातून संवाद साधू बघितलात.. खरंच का हो असा बदल साधता येतो?

उत्तरात मी म्हणते, ‘हो अन् नाही’ दोन्ही खरंच आहे. बदल ही प्रक्रियाच मुळी अदृश्य, हळुवार, कधी नकळत घडणारी आहे. तिळभर पुढे तर गहूभर मागे अशी; पण बी जमिनीवर पडते आणि तिला कोंब फुटला की आपल्याला समजणार, की बी रुजली. त्या फुटलेल्या कोंबाचा रंग आणि तेज वेगळंच असतं. एखादा कोंब नंतर सुकूनही जाईल. एखादी बी स्वत:ला विसरून जाण्याइतकी नुसतीच झोपूनही राहील आणि मोठय़ा काळानं अचानक तिलाही कोंब फुटेल. एक नक्की, एका फुटलेल्या कोंबानंही बीचं पोटेन्शिअल सिद्ध केलेलं असतं. ‘जंगल उठलंका?’ तर ‘नाही’; पण बीमध्ये ते उठवण्याची ताकद आहे का? तर ‘हो’.

म्हणून तर वेगवेगळ्या प्रश्नांवर फिल्मस् कराव्याशा वाटल्या. छोटय़ा-मोठय़ा.. फिल्मसाठी बघितलेली ऐकलेली किती माणसं डोळ्यासमोर येतायत, ऐकू येतायत. ती दाखवून प्रेक्षकांशी संवाद करावासा वाटला. सुख-दु:खाशी समजुतीचं नातं जोडावंसं वाटतं..

मला वाटतं २००१ वर्ष होतं. महाराष्ट्र शासनाचा चित्रपट पुरस्कार सोहळा- सर्वोत्तम चित्रपटांचे पुरस्कार नेहमी शेवटी असतात. आमच्या ‘१० वी फ’ आणि ‘वास्तुपुरुष’ दोन्ही चित्रपटांना नामांकन होतं. वेगवेगळ्या कारणांनी दोन्ही चित्रपट आमच्या विशेष जिव्हाळ्याचे होते. प्रथेप्रमाणे पहिल्यांदा तिसरा क्रमांक जाहीर झाला. मग दुसरी अनाऊन्समेंट झाली.. ‘वास्तुपुरुष’. माझा सहदिग्दर्शक सुनील सुकथनकर- त्याला ‘वास्तुपुरुष’चे विशेष प्रेम होते. तो स्टेजवर जाता जाता म्हणाला, ‘‘ज्युरीनं ‘वास्तुपुरुष’ला जर दुसरा पुरस्कार दिला असेल तर आता पहिला कुणाला देतील ते?’’ तो सरळच नाराज झाला होता. पारितोषिक घेऊन आम्ही दोघं वळलो. मागे सर्वोत्तम चित्रपटाचे नाव जाहीर होत होते. मला ते ऐकूच आले नाही. सुनीलनंच ते ऐकलं. तो म्हणाला, ‘‘अरे.. ‘१० वी फ’ सर्वोत्तम चित्रपट..’’ खरं तर पहिला आणि दुसरा दोन्ही पुरस्कार आपल्यालाच मिळाले. पुरस्कारांच्या इतिहासातले ते एक विशेष रेकॉर्ड ठरले म्हणून खूप आनंद व्हायला हवा होता, पण ‘वास्तुपुरुष’ सर्वोत्तम चित्रपट ठरला नाही, याची खंतच वाटली. म्हणजे आनंद नाही का झाला? तर, ‘हो’ आणि ‘नाही’.

पागल शरीरात अडकून राहुलनं एका एड्स झालेल्या मित्राची जिवापाड सेवा केली. त्याला आमचा ‘जिंदगी जिंदाबाद’ हा चित्रपट अर्पण केला आहे. मित्रही अकाली गेला आणि राहुलही! पण राहुलच्या निमित्तानं मुंबईच्या रस्त्यांवर हिंडणाऱ्या एच.आय.व्ही.ग्रस्त अनाथ मुलांचं दर्शन झालं. मुंबईहून शूटिंगसाठी पुण्याला काही अभिनेते येणार होते. त्यात एक ओम पुरी, मीता वशिष्ट असे, तर दुसरे हे रस्त्यावर कचरा गोळा करत हिंडणारे- रोज नवा निवारा शोधणारे होते. ओम पुरी, मीता यांची सोय चांगल्या हॉटेलात सहज करता आली. या दुसऱ्या अभिनेत्यांचं काय करायचं? माझा भाऊ म्हणाला, ‘‘ते माझ्या घरीच राहू देत.’’ निर्णय सोपा नव्हता, पण घेतला. तर ती मुलं नम्र, मदत करणारी, घर स्वच्छ राखणारी, चोरीमारी नाही की काही नाही. थोडे दिवस राहिली आणि सर्वाना जीव लावून गेली. तशाच भेटलेल्या वेश्या. म्हणाल्या, ‘‘नात्याचे लोक पैसे घेतात, पण सुखं-दु:खं विचारत नाहीत; पण कुंटणखान्याची मालकीण जीव लावते.’’

राजस्थानात शूटिंगला गेलो होतो. जयपूरला सुंदर सुंदर गालिचे बघितले. नाजूक डिझाईन्सना परदेशात खूप मागणी. खेडय़ात ते गालिचे विणणारी मुलं बघितली. ठेकेदार म्हणाला, ‘‘मुलांची बोटं नाजूक असतात, त्यानं बारीक धाग्यांना चांगल्या गाठी बसतात. त्यांची बोटं, पाठ दुखायला लागली तर पोरांना मध्ये मध्ये सुटी देतो.’’ पोरं निमूट वेगानं काम करत होती. आई-वडील म्हणाले, ‘‘शेती नाही, दुसरं काही मजुरीचं काम नाही, काय करायचं? जगायला तर हवं. पोरांच्या जिवावर जागायला लाज वाटते, पण नाइलाजच!’’ तीच कथा तमिळनाडूतल्या काडय़ापेटय़ांच्या आणि फटाक्यांच्या कारखान्यांतली. बालकामगारांवरची फिल्म केली तेव्हा हे सगळं बघितलं होतं. अपंग मुलांवरच्या फिल्मस् केल्या तेव्हा ‘अपंग मूल हे आईचे असते’ हे वाक्य एका आईकडून ऐकलं होतं.

‘पाणी’ ही आमची अगदी साधी खडबडीत फिल्म. १९८६/८७ मध्ये नुकतेच फिल्म बनवायला लागलो होतो तेव्हाची. अजून फिल्ममेकिंग नीट समजायचं होतं त्या काळातली. मोठय़ा कष्टानं कसेबसे पैसे जमवून स्वत:च प्रोडय़ूस केलेली फिल्म. तेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हतीच म्हणून १६ एम.एम.वर केलेली. म्हटलं तर पुरेसं यशही या फिल्मला मिळालं होतं, कारण (‘पाणी’) सामाजिक प्रश्नावरचा सर्वोत्तम लघुचित्रपट असा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथल्या ‘फ्रिन्ज फिल्म फेस्टिव्हल’मध्ये त्यांच्या निमंत्रणावरून मी हा चित्रपट दाखवला होता. तिथल्या विद्यापीठात चित्रपट दाखवून चर्चा केल्या होत्या; पण खरा ‘हो’ यात नव्हता. उषाताई मोडक या समाजकार्यकर्त्यां बाईंनी आम्हाला एक १६ एम.एम.चा प्रोजेक्टर भेट दिला होता.

सुनील सुकथनकर प्रोजेक्टर चालवायला शिकला होता. मी आणि सुनील तो प्रोजेक्टर आणि १६ एम.एम.ची रिळं घेऊन झोपडपट्टीत, खेडय़ांमध्ये कधी पंचायतीच्या ऑफिसात, कधी चावडीवर हा सिनेमा दाखवत असू. साऊंडची व्यवस्था गाव करत असे. अशा एका गावातून शो झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गावातल्या बायकांचा फोन आला. सिनेमात दाखवल्याप्रमाणे पुरुषांना न जुमानता गावातल्या बायकांनी एकजूट करून गावातलं एक ‘नळ कोंडाळं’ सगळ्या गावासाठी खुलं करून बायकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला होता. म्हणजेच, चित्रपटांनी बदल होतो का..

तर ‘हो’!

‘जिंदगी जिंदाबाद’ चित्रपटाला वितरक मिळेना; पण हा एड्सवरचा चित्रपट आम्हाला लोकांपर्यंत न्यायचाच होता. ठरवलं, प्रत्यक्ष वस्तीत आपणच विनामूल्य दाखवू; पण सिनेमात वेश्या, समलिंगी नाते, लिव्ह-इन रिलेशनशिप असे स्त्री-पुरुष नात्याचे अनेक पैलू- लोक रस्त्यावर बसून शांतपणे कसे बघतील? प्रेक्षकांनी गोंधळ केला तर? तेव्हा अतुल पेठे मुंबई महानगरपालिकेत काम करत होता. त्यानं मोठंच सहकार्य केलं आणि मुंबईच्या झोपडपट्टय़ांमध्ये रात्री उशिरा उघडय़ावर या सिनेमाचे शो करायचे, नंतर चर्चाही करायची असं ठरवलं. मुंबईत आणि दिल्लीत असे शंभरच्या वर शो आम्ही केले. प्रेक्षकांनी कधीच गोंधळ केला नाही. पिनड्रॉप सायलेन्स असे, चर्चाही होई.

‘१० वी फ’ चित्रपट प्रदर्शित झाला. शिक्षकांच्या संमेलनामध्ये त्याच्यावर चर्चा झाल्या. गावोगावी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकत्रित समूहानी तो बघितला आणि महाराष्ट्र शासनाने, मार्कावर आधारलेली तुकडय़ांची अ ते फ अशी उतरंड रद्द करण्याचा वटहुकूम काढला. त्यात ‘१० फ’चा उल्लेख होता. अनेक वर्तमानपत्रांनी या वटहुकमाची आणि ‘१० फ’ या चित्रपटाची संपादकीयात नोंद घेतली. म्हणजे मोठाच ‘हो’. तरी ‘नाही’ उरलंच. अजूनही मुलांच्यावरचा घोकंपट्टीचा भार, परीक्षांचा धाक, मार्काची स्पर्धा, त्यांच्यावर ठरणारं त्यांचं यशापयश कमी होत नाही. शाळेत दोस्ती निभावणं, मित्रांशी सुखं-दु:खं वाटून घेणं, वेळेला स्वत:चा मोह- स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याला मदत करणं, कुटुंबासाठी कष्ट करून अभ्यासाची ओढ धरणं, संयम, विवेक, चिकाटी, रसिकता, सौंदर्यदृष्टी अशा आपलं आणि दुसऱ्याचं जीवन समाधानी आणि समृद्ध करणाऱ्या किती तरी गुणांच्या मूल्यमापनाला आजच्या शिक्षण पद्धतीत जागाच नाही.

‘माझी शाळा’ ही ज्ञानरचना पद्धतीवर दूरदर्शन मालिका करताना हे ‘हो’ – ‘नाही’चे झोके खूप अनुभवले. अगदी दूरच्या खेडय़ातले तल्लख, सहृदय, सर्जक शिक्षक आणि लुकलुकणाऱ्या उत्सुक डोळ्यांची मुलं- शिक्षणाच्या ओढीनं त्यांच्या मनाचे, बुद्धीचे उमललेले ताटवेही बघितले आणि सर्व उपलब्धी असून, क्लासेसच्या ओझ्यांनी ‘स्पेस आणि टाइम’ याच्या गुंत्यात अडकून हतबल झालेली, शहरी मुलं आणि स्पर्धेसाठी शारीरिक आणि वैचारिक खुराक देऊन धापा टाकणारे त्यांचे पालकही बघितले. एकाच वेळी समाधानीही आणि हतबलही व्हायला झालं.

मुंबईला टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकत असताना मी परळच्या चाळीत आणि वरळीच्या बी.डी.डी. चाळीत फिल्डवर्कला जात असे. कामगारांसाठी साक्षरता वर्ग घेत असे. त्याही पूर्वी कळसूबाईच्या आसपासच्या महादेव कोळ्यांच्या वाडय़ांवर काम करताना, नंतर कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सव्‍‌र्हिसमध्ये शिक्षक व समाजसंशोधक म्हणून काम करताना तुरुंगातल्या गुन्हेगार स्त्रियांचा सव्‍‌र्हे आणि खुनी स्त्रियांचा अभ्यास करताना, कुमारी मातांच्या कथा ऐकताना, उरळी कांचनच्या आसपासच्या खेडय़ातल्या शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांबरोबर काम करताना, स्त्रीवाणीत दलित स्त्रियांच्या आत्मकथा ऐकताना मला नेहमीच या ‘हो’ आणि ‘नाही’नं सतावलं आहे.

चित्रपट बनवताना तुम्ही वेगवेगळ्या पात्रांच्या मनात सहानुभूतीनं अलगद प्रवेश करायला लागलात की न्याय-अन्याय, सत्य-असत्य, चूक-बरोबर याची सोपी ठोस उत्तरं तुम्हाला देता येईनाशी होतात. कदाचित, हाच तो स्वीकार. हे ‘अस्तू’, ‘कासव’ आणि आताचा ‘वेलकम होम’ करताना मला अधिक अधिक उमजत गेलं. ‘लाहा’ हा आम्ही नर्मदेतल्या आदिवासींच्या विस्थापनावर केलेला एक लघुपट. शूटिंगला जायला निघाल्यापासून अनेक अडचणींनी आम्हाला अगदी हैराण केलं. वाटेत एका सहकारी मुलीला विंचू चावला. जवळपास वैद्यकीय मदत नव्हती. वेदनेनं तळमळणाऱ्या तिला भावनिक आधार देण्याशिवाय दुसरं काहीच करता आलं नाही. रात्री एका मंदिरात मुक्काम केला असताना काही आदिवासी गैरसमज होऊन काठय़ा घेऊन आम्हाला हुसकावायला आले. नर्मदा पार जाताना आमचे सहकारी बसलेली डोंगी (छोटी नाव) उलटली. त्यांना आदिवासींनी पाण्यात उडय़ा मारून वाचवलं. एका मित्राचा जुना टेम्पो आणला होता. एकमेव वाहन. तो नादुरुस्त झाला. कडाक्याच्या उन्हानं कॅमेरा अटेंडन्ट आणि साऊंड रेकॉर्डिस्ट आजारी पडले. तेव्हा मात्र साऊंड रेकॉर्डिस्टना राहावेना. ते म्हणाले, ‘मावशी इतक्या अडचणींचं मुख्य कारण हे आहे की आपण रोज कॅमेऱ्यासमोर नारळ फोडत नाही.’ माझ्या हे मनातही आलं नव्हतं.

आमच्या ‘बाधा’ चित्रपटात गावातल्या हरवलेल्या मुलाचा शोध घ्यायला आलेला इन्स्पेक्टर आणि गावातला पोपाट (पोलीस पाटील) यांच्यात मी एक संभाषण लिहिलं आहे..

इन्स्पेक्टर : यंदा इकडं पुरेसा पाऊस झालेला दिसत नाहीत. तर मग गावच्या देवऋषी बाबाला सांगा की मंत्रानं पाऊस पाडायला.

पोपाट : मंत्रानं पाऊस पडला असता तर सगळ्या देशात आबादीआबाद नसती का झाली?

म्हणजे एका नारळावर नैसर्गिक आपत्ती किंवा माणसांच्या वेडेपणानं, अज्ञानानं, स्वार्थानं आलेल्या आपत्ती दूर होऊन चित्रपट चांगला झाला असता तर सोप्पंच होतं की सगळं!

रेकॉर्डिस्ट म्हणाले, ‘म्हणजे तुमची कशावर श्रद्धाच नाही का?’ मी म्हटलं, ‘आहे तर- माझी माणसाच्या चांगुलपणावर (अनेकदा आश्चर्यकारक उलटा अनुभव येऊनही!) विवेकावर आणि या विश्वाच्या मला अनाकलनीय शिस्तबद्ध रचनेवर माझी श्रद्धा आहे. म्हणजे सूर्य रोज उगवणारच की.. पाण्यानं तहान भागणारच की.. वगैरे!’

माझ्या आई-वडिलांच्या औपचारिक शिक्षणात मोठी तफावत. म्हणजे वडील डबल ग्रॅज्युएट तर आई जेमतेम २-४ यत्ता शिकलेली. पण दोघांची बौद्धिक कुवत एकाच तोलामोलाची. दोघांनीही आम्हा मुलांना कुठलीच अंधश्रद्धा शिकवली नाही. निखळ-नितळ प्रामाणिकपणा, सहृदयता, आपल्या स्वार्था-मोहापलीकडचं दुसऱ्याच्या सुख-दु:खाचं भान आणि सगळी माणसं समान ही उमज म्हणजेच आपली श्रद्धा हे शिकवलं. ईदला आवर्जून रझाककडे जावं आणि गणपतीच्या आरतीला त्याला आपल्या घरी बोलवावं हे शिकवलं. गणपतीची आरती झाली की बाबा साष्टांग नमस्कार घालायचे. आम्ही भावंडं त्यांची मनसोक्तचेष्टा करायचो- अशी चेष्टा करायला आमच्या घरी आडकाठी नव्हती. बाबा हसून म्हणायचे, हा रिचुअल नम्रता सहज जमण्यासाठी करण्याचा सराव असावा. बरं असतं.

– तेव्हा नर्मदा घाटीत मी आमच्या रेकॉर्डिस्टना म्हटलं, तुम्हाला बरं वाटणार असेल तर फोडा नारळ. बाजूला उभं राहून नमस्कार करून टाळ्या वाजवायला माझी हरकत नाही. आमच्या चित्रपटांचा मुहूर्त- ज्याला ‘मुहूर्त’ म्हणतात तो- सर्वाच्या सोयीनं हवामानाची चौकशी करून कॅलेंडर बघून ठरवला जातो.

‘बाधा’ हा आमचा चित्रपट अंधश्रद्धेवरचाच. सामाजिक, सांस्कृतिक, अन्यायातून, नात्यांमधल्या असहिष्णू अहंकारातून एखाद्याच्या मनावर दबाव पडत राहिला तर त्यातून मानसिक आजार तयार होऊ शकतो. भोगणाऱ्याला त्याच्या जवळच्यांना याचं नेमकं भान आलं नाही. मानसिक विकृतीचं मूळ सापडलं नाही तर, अनाकलनीय घटनांवर, माणसांवर कारणांचं आरोपण होऊन अघोरी, अशास्त्रीय उपाय केले जातात. हा सगळा विषय आम्ही एका खेडय़ातल्या देवऋषींबरोबर बोलत होतो. अस्सल काळी जादू जाणणारे ते गृहस्थ- ते म्हणाले, ‘‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही कार्यकर्ते आमच्या गावात आले होते. मी त्यांचं म्हणणं नीट ऐकलं. मला पटलं.  माझ्या लक्षात आलं की मंत्र-तंत्र सोडून देऊनही मी बायकांना मदत करू शकतो. म्हणजे एक प्रकारे मानसिक उपचारकरू शकतो.’’ त्यावर साताऱ्याचे एक मानसोपचारतज्ज्ञ आम्हाला म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेचं दुसरं टोक गाठण्यापेक्षा या देवऋषींनाच विज्ञान सांगून या स्त्रियांना आपण अंधश्रद्धेतून बाहेर काढू शकतो. म्हणजे टोकाचं नाही,’’ ‘‘नाही’’.

तर असं हे चित्रपट-माध्यम नि:शब्दतेतून, छाया-प्रकाशाच्या हळुवार मांडणीतून स्वरांची अस्फुट जोड देत, या ‘हो’- ‘नाही’चा जादूई समतोल साधत फिल्ममेकर आणि प्रेक्षक यांच्यात सेतू बांधतं, तेव्हा या खेळाचे आपण भाग आहोत, हे श्रेय पुरेसं असतं.

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com