23 October 2020

News Flash

‘रसिकांसी म्हणे मी आपुले..’

कोणी एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी कधीमधी जेवायला जायचे.

कोणी एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी कधीमधी जेवायला जायचे. गुरुजी घरी आले की त्या विद्यार्थ्यांची आई जेवणात कारल्याची भाजी वाढे. एक दोन वेळा ठीक, परंतु प्रत्येक वेळी अगदी ठरल्याप्रमाणे कारल्याचीच भाजी का वाढली जाते, याबद्दल त्या गुरुजींना कुतूहल असे. वास्तविक कारले ही काही गुरुजींची आवडीची भाजी नव्हती किंवा त्या घरी गुरुजींचा पाहुणचार अनास्थेने होतोय असेही नव्हते. शेवटी न राहून त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या आईला नम्रपणे विचारले की, ‘‘मी जेव्हा जेव्हा भोजनास येतो तेव्हा तुमच्याकडे जेवणात कारल्याचीच भाजी का असते?’’ त्यावर त्या गृहिणीने जराशा नाराजीत सांगितले की, ‘‘याला कारण हा तुमचा विद्यार्थी आहे! अहो, एरवी आम्ही कधी कारल्याचा पदार्थ याच्या ताटात वाढला, तर हा शिवतदेखील नाही. पण तीच भाजी तुमच्याबरोबर पंक्तीत बसला म्हणजे निमूटपणे खातो. तेव्हा मी ठरवले की निदान तुमच्या उपस्थितीत तरी कारले याच्या पोटात जावो.’’ या छोटय़ाशा उदाहरणात एक गोष्ट स्पष्ट आहे की आईला आपल्या मुलाची काळजी आहे आणि त्याच्यासाठी काय श्रेयस आणि काय प्रेयस हे तिला व्यवस्थित कळते.

शब्दश: अर्थाने श्रेयस म्हणजे चांगले आणि प्रेयस म्हणजे आवडीचे. श्रेयस हे चांगले असले तरी आवडीचे असेलच असे नाही आणि प्रिय ते नेहमी चांगले असेल असेही मानू नये. आपले जीवन आणि जीवनशैली या श्रेयस-प्रेयसच्या धाग्यांनी विणलेली असते. आज वयाच्या साठीचा उंबरठा ओलांडल्यावर बऱ्या-वाईट घटनांची गोळाबेरीज पृथक करताना चित्रगुप्ताच्या नोंदवहीची पाने आपली आपणच चाळावी अशी येथे भावना आहे.

माझ्या बालपणी आम्ही राहत असलेल्या चाळीतल्या भिंतीवर खडूच्या तुकडय़ाने किंवा कोळशाने लांबच लांब आडव्या रेषांना उभ्या रेषांनी छेद देत रेल्वेचे रूळ आणि त्यावर धूर सोडत धावणारी रेलगाडी मी चितारत असे. या गाडीला जितकी गोल गोल धावणारी चाके असत तितकीच नाकडोळे चितारलेल्या माणसांचे गोल चेहरे गाडीच्या खिडक्यांमधून डोकावताना दिसत. ही माझ्या डाव्या हाताची ‘चित्त कला’ होती. जेव्हा शाळेत जाऊ लागलो त्या वेळी मात्र पाटीवर मुळाक्षरे गिरवताना डाव्या हाताऐवजी उजव्या हाताने लिहावे म्हणून आई-बाबा सक्ती करू लागले. तेव्हा आमच्या शेजारी राहणारे नारायण जोगदादा (त्यांना मी ‘आजा’ म्हणून हाक मारीत असे) माझ्या आईला म्हणाले, ‘‘बाई गं, याच्या हातात कला आहे, तो सक्तीने उजव्या हाताने लिहील पण त्याच्या डाव्या हातातली किमया उजव्या हातातून पाटीवर उतरणार नाही!’’ आमच्या घरातील रूढी प्रियतेला थोडी बगल दिली गेली तरी माझ्यातील कलारुची पोषक असा योग्य सल्ला जोगदादांनी दिला याबद्दल आजही माझ्या मनात त्यांच्या विषयी कृतज्ञता आहे.

शाळेतही माझा जास्त चित्रकलेकडे ओढा असला तरी अभ्यासात मी ‘ढ’ नव्हतो. धडा कुठल्या विषयाचा आहे त्यापेक्षा धडय़ातील सुलभ आणि सुस्पष्ट उदाहरण चित्रांमुळे माझा अभ्यास अधिक लक्षात राही. गणिताच्या पुस्तकात मात्र अशा चित्रांची रचना नसल्यामुळे साहजिकच या विषयात मी ‘बॅक फूट’वर होतो हे खरे!

आमच्या लहानपणाच्या चाळ संस्कृतीत ‘परिवार’ भावना होती. शाळा सुटल्यावर सायंकाळी सूरपारंब्या, विटीदांडू, डबा ऐसपैस, क्रिकेट असे नाना प्रकारचे खेळ खेळण्यासाठी सारी मुले एकत्र येत. साहजिकच चित्रकलेबरोबर किंबहुना त्यापेक्षा मलाही त्यांच्यात खेळायला आवडे. खेळायला घरातून मज्जाव नव्हता पण सायंकाळी बाबा कामावरून घरी आले की दोन गोष्टी विचारत, की, ‘‘आज कोणते चित्र काढलेस?’’ आणि ‘‘सायं शाखेत (आर. एस. एस.) गेला होतास का?’’ या दोन प्रश्नांना माझ्याकडून बाबांना ‘हो’कार हवा असे. त्याचे महत्त्व आज मला पटते. बालपणी माझ्या उत्कर्षांकरिता योग्य ते संस्कार जसे घरातून झाले तसेच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून, शाळेतल्या चित्रकलेचे मास्तर देसाई सर, महाजन सर आणि माझे कलागुरू नाना अभ्यंकर यांच्याकडून प्रेम आणि मार्गदर्शन मला लाभले हे माझे परम भाग्य समजतो. अनेक जण मी काढलेल्या चित्रांचे कौतुक करीत, आणि मीही त्याचा आनंद घेई. तरीदेखील मी काढलेले प्रत्येक चित्र नानांना दाखविल्याशिवाय त्यावर घरातून पूर्णत्वाची मोहोर उमटत नसे. नाना अभ्यंकरांची वृत्ती ज्योतिष विद्येची होती, शिवाय ते उत्तम चित्रकार आणि शिल्पकार होते. त्यांची निरीक्षणक्षमता अफाट होती. इयत्ता सातवीपासूनच मी नियमितपणे नानांकडे जात असे. चित्रकलेचे धडे घेताना मी काढलेल्या चित्रावर ठळक रेघांनी ते चुका सुधारून दाखवत. सर. जे. जे. स्कूलच्या शिक्षण काळातही माझी अभ्यासचित्रे नानांना न चुकता दाखवू लागलो. नानांची दिलेली प्रत्येक शिकवण मला आजही उपयोगी पडते. ते सांगत, चित्र रंगवण्याची घाई घाई करू नये. अचूक रेखांकन हे रंगकामाला योग्य दिशा देते. अन्यथा कितीही चांगले रंग दिले तरी चुकीच्या रेखांकनामुळे चित्र पूर्ण झाल्यावरही दोषपूर्ण राहते.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या वर्गातले सर्वच विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ लागले. मी मात्र नानांनी सांगितलेल्या सर जे. जे. कला शाळेत प्रवेश घेतला. तिथला अभ्यासक्रम, कला शिक्षक यांनी जसं आम्हाला घडवलं तसंच त्या वास्तूच्या भिंतींवरच्या चित्रांनी आणि शिल्पांनी देखील आम्हाला शिकवलं. अन्य कला शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांला बाहेर पडताना अंतिम परीक्षेत कुठला क्लास मिळाला किंवा त्याची मार्कलिस्ट हातात मिळते, तीच त्याच्या यशाची पावती असते. पण ‘मी जे.जे.चा विद्यार्थी’ असे सांगितल्यावर त्या नावातच अशी जादू की पुढचा रिझल्ट सांगण्याची गरज नसते. जे.जे.च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात माझी नेमकी आवड जशी कळू लागली, तसेच योग्य-अयोग्यची उमजदेखील येऊ लागली.

कॉलेजमध्ये शिकताना वास्तववादी शैलीतले व्यक्तिचित्रण आणि प्रत्यक्ष स्पॉटवर बसून निसर्गचित्रण करण्याची आवड होती आणि ही आवड विनाखंडित मी आजही जोपासली आहे. परंतु याचा अर्थ मी नवकलेच्या किंवा जनसामान्यांच्या भाषेत सांगायचे तर मॉडर्न आर्टच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे, असे मुळीच नाही. नवकलेतले नवनवीन प्रयोग, केवलाकारी कलाकृती-शिल्पे आणि रचना-शिल्पांचे विश्व याविषयी कुतूहल, आस्वादनक्षमता आणि प्रियताही मी स्वत: ‘अप टु डेट’ बाळगून आहे. परंतु अ‍ॅबस्ट्रॅक्ट करणाऱ्यांनी रिअलिस्ट कलाकाराला ‘अ‍ॅकेडेमिक’ म्हणणे आणि ‘रिअलिस्ट’ कलाकारांनी मॉडर्न आर्टला ‘बेसलेस’ किंवा बाळबोध म्हणणे हे कला क्षेत्रात दरी निर्माण करणारे आहे. एका मोठय़ा कलाकाराने ही कला क्षेत्रातील दुविधा जाणून खंत व्यक्त करताना म्हटले की, ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘अ‍ॅकेडेमिक’ ही मला आता आपल्या कला क्षेत्रातील ‘शिवी’ वाटू लागली आहे.’

माझ्या अनेक चित्रप्रदर्शनांत ज्या वेळी वास्तववादी चित्रशैलीबद्दल आपुलकी ठेवणारा कोणी कलारसिक प्रांजळपणे सांगतो की, आम्हाला तुमची चित्रे आवडतात, समजतात परंतु ते ‘मॉडर्न’ काही समजत नाही!’ अशा वेळी त्यांच्या विधानात ‘होकार’ न मिळवता नवकलेतल्या प्रयोगांतही कशी रंगत असते, ती पाहायची कशी, त्याचा आनंद कसा घ्यायचा हे मी माझ्या कुवतीनुसार, जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर मी देखील त्याचा आनंद कसा घेतो ते पटवून दिले आहे. ही जबाबदारी कलासमीक्षकांची नव्हे तर आम्हां कलाकारांचीच आहे, असे मी ठासून सांगत असतो.

आमच्या एका मित्राचे जहांगीरच्या दालनात प्रदर्शन चालू होते. त्याच्या टेबलासभोवताली बसून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. प्रदर्शन पाहणाऱ्यांची गर्दी होती. अशातच एक गृहस्थ आपल्या कडेवर एका लहान मुलाला घेऊन प्रदर्शन पाहता पाहता आम्ही बसलेल्या टेबलाजवळ आले आणि चौकशी करू लागले की त्या चित्रांचा चित्रकार कोण? आम्ही लगेचच आमच्या मित्राकडे निर्देश केला, त्यावर ते गृहस्थ काहीसे संकोच आणि नम्रतेनेच म्हणाले की, ‘तुमच्या चित्रांचा मला अर्थ लागत नाही, जरा एखादे चित्र समजवू शकाल का?’ त्यावर आमचा मित्र कोरडेपणाने उत्तरला की, ‘चित्र नुसतेच पाहा, नाही समजले तर पुढच्या दालनात जा, तिथे तुम्हाला समजणारी चित्रे आहेत!’ यावर तो गृहस्थ ‘सॉरी!’ इतकेच म्हणाला आणि निघून गेला. मी आमच्या मित्राला म्हटले की, ‘मित्रा, इथे तुझे चुकलेच! तू एक आस्वादक गमावलास. नुसताच एक माणूस नव्हे तर येणारी पिढीसुद्धा!’ कारण त्यांच्या कडेवर एक मुलगा होता. त्यावर आमचा मित्र म्हणतो, ‘अरे! कुठून कुठून येतात ७७७! मी काय येणाऱ्याला फक्त सांगत बसू की काय!!’ यावर मी काहीच बोललो नाही. कारण चित्र कसे पाहावे हे त्या गृहस्थाला सांगण्यापेक्षा, चित्र कसे पाहावे हे सांगण्याची शिकवण, आमच्या चित्रकार मित्राला देण्याची आवश्यकता आहे, हे मी जाणून गेलो.

खरे तर दृश्यकला आणि कलारसिक यांच्या मधली ‘दूरी’ कमी करण्यासाठी नेहमी कलासमीक्षकच हवा असे नाही, तर ही क्षमता आम्हा कलाकारांमध्येच असणे योग्य ठरेल. नाही तरी अधिक ठिकाणी लिहून येणारी कलासमीक्षा इतक्या दुबरेध अवजड शब्दांची असते की ती उमजण्यासाठी बाजूला ती कलाकृतीही नसते आणि हाताशी डिक्शनरीही नसते.

खरे तर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर हे अचूक असले तरी समोरच्या व्यक्तीला पटेलच असं नाही. त्याचे समाधान होण्याकरिता प्रत्येक अनुभवांची गरज असते. त्याकरिता थोडा कालावधी जाईल. परंतु कला क्षेत्राकडून सामाजिक जाणिवेने ही अपेक्षा जरूर करावी लागेल.

जळगावमध्ये गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन होत असते. काही वर्षांपूर्वी त्या संगीत महोत्सवाला गेलो असता तिथल्या आयोजकांनी मला पाहून अचानकच ठरवले की मंचीय संगीत प्रस्तुतीबरोबर मी एखादा कॅनव्हास रंगवावा – संगीत आणि चित्र याची जुगलबंदी जळगावच्या रसिकांशी अनुभवावी असा त्यांचा संकेत होता. वास्तविक मी असा प्रयोग केला नव्हता, परंतु आयोजकांच्या आग्रहाखातर मी तयार झालो.

पं. सतीश व्यास यांच्या परवानगीने त्यांच्या संतूरवादनातील एका राग प्रस्तुतीवर ‘३ बाय ४’ फुटाच्या कॅनव्हासवर मी अ‍ॅक्रॅलिकने केवलाकारी रंगलेपन सुरू केले. चित्र पूर्ण झाले तसे संतूरवादन संपले. जवळजवळ हजार संख्येने उपस्थित रसिकांसमोर ही प्रस्तुती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंगला खाडिलकर करीत होत्या. रसिकांकडून त्यांच्या हातात काही चिठ्ठय़ा आल्या, त्यातली एक चिठ्ठी अशी होती की, ‘वासुदेव कामतांनी संतूरवादनाच्या वेळी रंग्विलेल्या चित्राचा अर्थ सांगावा.’ मला मंचावर बोलावले गेले. मी जाता जाता विचार करू लागलो की, या जनसमुदायासमोर थोडक्यात काय सांगावे? तेही या केवलाकारी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्राबद्दल! मी बोललो ते येणेप्रमाणे..

‘‘सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरच्या ढगांवर तिन्हीसांजेच्या प्रकाशाची किमया आपण पाहिली आहे, समुद्राच्या ओहोटीनंतर ओल्या वाळूवर समुद्रजीवांना किंवा खेकडय़ांनी इथून तिथे धावत सुंदर गुंतलेल्या रेघोटय़ांची रांगोळी कधी कोणी पाहिली असेल, तसेच पावसाळी दिवसांत रस्त्यावरील खाचगळग्यात साचलेल्या पाण्यावरून एखादी मोटार किंवा वाहन जाताना पडलेल्या तेलाच्या थेंबांनी इंद्रधनुष्याच्या रंगांचे आकार आपण कुतूहलाने पाहतो. निसर्गातल्या अशा अनेक दृश्य किमयांचा आनंद घेताना मात्र आपण कधीही याचा अर्थ काय? म्हणून विचारीत नाही. आजच्या संगीत महोत्सवात पं. सतीश व्यासांचे संतूर ऐकताना रसिकांच्या माना डोलत होत्या, समेवर दाद मिळत होती आणि माझ्यासमोर कॅनव्हास हातात ब्रश आणि वॅलेटवर रंग होते. माझे हे तयार झालेले चित्र ही संगीतातल्या सुरांच्या जाणिवांची दृश्य दाद आहे! यापेक्षा वेगळा अर्थ नाही आणि अर्थ शोधू नये!’’

माझे बोलणे संपले आणि समोरच्या रसिकांच्या पसंतीच्या टाळ्यांची दाद मिळाली. केवळ सुरांची आवड जशी आपल्याला उपजत असते, तशीच केवळ रंग-रेषा आकारांची आस्वादक्षमतादेखील आपल्यात उपजत असते. फक्त त्याची जाणीव करून द्यावी लागते. असे असूनही मला मात्र एखादा विषय घेऊन चित्र काढण्याची विशेष आवड आहे. चित्रात सादृश आकार असूच नयेत, चित्राला विषय असू नये, ‘अनटायल्ड’ असावे इथपासून स्वयंभू नवनिर्मिती किंवा रचना हीच खरी कला’ वगैरे असा विचार करणारा कलाकारवर्ग आज गणला जात असताना, मला मात्र वास्तववादी शैलीतूनच काहीशी ‘स्मरणचित्रा’कडे झुकणारी संकल्पना किंवा बोधचित्रे रंगवावीशी वाटतात या प्रेयसाशी मी प्रामाणिक आहे.

कोणत्याही कलेमध्ये सौंदर्य आणि आकर्षण उपजत असते. हेच त्याचे साहित्य असते. त्यामुळे त्याच्या आस्वादनात आनंद, मनोरंजन सामावलेले आहे. परंतु याबरोबरच ही कलाकृती एखाद्या विचाराची किंवा संस्कारकथनाची वाहक बनली तर ती अधिक श्रेयस ठरू शकते असे मला वाटते. त्यामुळेच मी अनेक विषयांवर वेगवेगळ्या अंगांनी विचार करून त्यांना दृश्यरूप देण्याचे जणू व्रत घेतले आहे.

प्रत्येक विचाराला एक भाषा असते. आपण प्रत्येक जण आपल्या अवगत असलेल्या भाषेत विचार करतो. तसेच या विचारांना एक दृश्यही असते. आणि प्रत्येक जण त्याचा अनुभव आपल्या मन:पटलावर घेत असतो.

आम्ही चित्रकार तो दृश्यानुभव कलाकृतीतून साकार करीत असतो. विचार आपल्याला मनात अमूर्त असतो. परंतु कलेच्या अभिव्यक्तीतून किंवा प्रस्तुतीतून तो साकार मूर्त रूपात प्रकट होतो. माझ्या चित्रातील वास्तववादी शैली ही कौशल्य दाखविण्यासाठी नसून विचारांना सुसहय़ आणि सुलभ जाणिवेने व्यक्त करण्यासाठी आहे. त्यामुळे माझी काही चित्रे अधिक वर्णनात्मक आणि अधिक तपशील दर्शविणारी सब्जेक्टिव्ह असतात तर काही केवळ प्रयोगशील रंगभूमीतल्या अभिनयासारखी केवळ संकल्पना स्पष्ट करणारी असतात. माझा विचार आणि चित्र हे बहुतांशी मी जसे विचार करतो त्यानुसार रसिकांच्या अंत:करणात पोचावे अशी माझी प्रामाणिक इच्छा असते.

या विचारानेच व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण यासारखे कला प्रकार हाताळतानाही मनाच्या अंतरंगात असलेल्या अनेक अमूर्त विचारशृंखला चित्रांमधून प्रकट करण्याचा मी प्रयत्न करीत आलो. ‘प्रतिभा’, ‘बालपण’, ‘आपले सोबती’, ‘गुरू-शिष्य’, ‘आई आणि मूल’, ‘कृष्ण’, ‘बुद्ध’, ‘गजराज’, ‘कालिदासानुरूपम्’, ‘मोगरा फुलला,’ ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आणि नुकतेच ‘उपनिषत्सु..’ अशा अनेक चित्रमालिका मी रंगविल्या.

या सर्व मालिकांमधील विचारांच्या गांभीर्यामुळे ही सर्व चित्रे आजही अनेक रसिकांच्या स्मरणात आहेत. कधी कोणी अवचितपणे भेटल्यावर पुढले प्रदर्शन कधी आणि यंदा कोणता विषय असे विचारतात. चित्र सौंदर्यापेक्षाही त्यातील विषयाच्या नावीन्याची त्यांना अधिक उत्सुकता असते, हे अनुभवल्यावर आपण कलारसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळते.

केवळ धार्मिक, ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक विषयांवर चित्र काढणे हा माझा हेतू कदापि नाही. त्यातील भारतीय, राष्ट्रीय आणि संस्कारक्षम विचारधारा उद्धृत करणारे विषय मला अधिक प्रिय आणि श्रेयकारक वाटतात. परंतु केवळ नॅरेशन हा हेतू ठेवला तर तो कंटाळवाणा आणि अरुचीचा विषय ठरेल. परंतु नॅरेशनची सुप्त मात्रा ठेवून कलात्मकतेच्या पातळीवरची कलाकृती अधिक आस्वादक ठरते. चित्रशिल्प कलाकृतींचा आस्वाद दृश्य इंद्रियांनी घेतला जातो. संगीताचा श्रवणाने तर काही दृश्यं – श्राव्य उभय आस्वादनाच्या कला असतात. असे वेगवेगळ्या इंद्रियांशी निगडित कलाकृती असल्या तरी चित्र हे केवळ पाहण्यानेच समजावे, आकलन व्हावे किंवा आस्वादिले जावे, असा माझा अट्टहास नाही. त्यामुळे चित्र हे शब्दांतूनही वर्णिले गेल्याने त्याची महती अधिक वाढते आणि म्हणूनच माझ्या काही चित्रमालिकांचे पीपीटी प्रेझेन्टेशन करून निरूपण करण्याचाही प्रयत्न मी केला. कधी कधी चित्र कसे पाहावे, इथपासून त्याची अर्थप्राप्ती कशी समजून घ्यावी, हेही रसिकांना सांगावे लागते. आज तरी ज्या गतीने अन्य कला भारतीय समाजमनात स्थान मिळवून आहेत, तितकी ‘चित्रकला-शिल्पकलेच्या’ नशिबी नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून जनमानसाशी चित्रकलेची जवळीक साध्य करणे हे कला क्षेत्राचे कर्तव्य आहे असे मी समजतो. याकरिता केवळ कलानिर्मिती करून कलाकाराने अलिप्त राहून चालणार नाही. कलाकाराला बोलावं लागेल, लिहावं लागेल. कारण मूर्तातलं अमूर्त वास्तव शब्दांच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकेल.

शेवटी माझ्याच ‘मोगरा फुलला’ या प्रदर्शनातील अनुभवाची गोष्ट इथे सांगाविशी वाटते. ‘मोगरा फुलला’ या चित्र प्रदर्शनात आपल्याकडील संत-महंतांच्या रचनांवर आधारित चित्रं रंगविली होती. सात दिवसांच्या प्रदर्शनात रोज निदान दोघे-तिघे तरी केवळ चित्रं पाहून सद्गदीत होत. कारण या चित्रात केवळ संतांची पोट्र्रेट्स नव्हती, तर त्यांच्या साक्षात्कारी अनुभवातून रचलेल्या काव्यरचनांचे दृश्य प्रकटीकरण होते. याच प्रदर्शनात एक विदेशी जोडपे संपूर्ण प्रदर्शन खूप वेळ पाहत होते. सरतेशेवटी ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, kwe don’t know the stories behind these pictures, but certainly we feel here the existance of jesus christ!l  ही त्या प्रदर्शनाला मिळालेली पावती होती.

प्रिय हे केवळ आपल्याशीच निगडित असते, परंतु श्रेयस आपल्यासहित समष्टींचे हितकारक ठरते. माझ्या कलासाधनेतून मिळालेले पसायदान संविभाग करून सर्वाप्रति वितरित करता आले तरी मी कृतकृतार्थ होईन.

– वासुदेव कामत

vasudeokamath@gmail.com

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 5:03 am

Web Title: amazing success story of vasudeo kamath
Next Stories
1 मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे
2 ‘राजहंसी’ वाटचाल
3 नाटय़ प्रशिक्षणानं दिला पुनर्जन्म
Just Now!
X