खंत करत उसासे टाकत कण्हत बसणं माझ्या स्वभावात नाही. पण आपल्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं तर तो घाव फार खोल जिव्हारी लागतो. कधी मी घाबरीघुबरी होते की आपण चांगली आई नाही आहोत. तर कधी मी मुलासाठी, घरासाठी, संसारासाठी माझ्यातल्या नृत्याला, गाण्याला; गावभर भटकंती करण्याच्या वेडाला ठार मारलंय्.. माझ्यातल्या कुणा एकीला मी गळा दाबून मारून टाकलंय् त्याची खंत करू की नको? कारण वेगवेगळे देश फिरताना, निसर्गसौंदर्य न्याहाळताना, करिअर करताना घरी माझ्या एकटय़ा मुलाला आईची जास्त जरूर आहे; मी हा आनंद घेऊ शकत नाही या अपराधी भावनेने अनेकवेळा माघारी फिरले. बरोबर काय? कर्तृत्वाचं समाधान मोठं? की करिअरमधलं सुख न मिळण्याची खंत?

केवढं तरी चमत्कारिक की मी या विषयाचा कधी विचारच केला नव्हता. खरंच माझ्या आयुष्यात, साहित्यात, कलाविश्वात खूप अशा काय काय बरं घटना घडल्या की ज्यानं मी समाधान पावले किंवा खंत वाटत राहिली, काय श्रेयस आणि काय प्रेयस असावं? असं का बरं आठवावं लागावं? की आज अशा वळणावर येऊन पोचले आहे की या गोष्टींना काही अर्थच उरलेला नाहीये?

a young man told a list of reasons why he can not leave Pune
Pune : “मी पुणे सोडू शकत नाही” ‘ही’ कारणे देत तरुणाने स्पष्टच सांगितले, पाहा Viral Video
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नेहरू नव्हेत, बोस..!
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

याचा एक भाग असाही आहे की एकेकाळी तीव्र खंत किंवा भयानक समाधान मानाव्या अशा गोष्टीनंतर त्याची तीव्रता कमी कमी होत त्या एकतर नाहीशा होतात किंवा त्याबद्दल आपल्याला स्वत:शी हसू येतं किंवा कीव येते स्वत:ची किंवा दुसऱ्यांची. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या समाधानाच्या आणि खंत वाटून घ्यायच्या व्याख्या बदलत जातात.. नुकतंच मला नामदेवाच्या प्रिय भक्तानं, कार्यकर्त्यांनं खुशवंतसिंगांचं पुस्तक ‘वहिनी साहेबांना सस्नेह भेट’ दिलं. ते वाचता वाचता त्यातलं एक वाक्य म्हणजे ते म्हणतात, ‘सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा कसल्याही दु:खाचा सल न बाळगता अथवा कुणाहीबद्दल तक्रारीचं किल्मिष मनात न ठेवता जा!’

आता सर्वात महत्त्वाचं म्हंजे आठवत नव्हते तेव्हा काहीच आठवत नव्हतं; पण आता आठवतं तर एवढं आठवत राह्य़लं की सल- खंत- दु:ख यांचा एक प्रचंड ‘उदासबोध’च लिहिता येईल आणि मला तर मनापास्नं जामच इच्छा आहे की मृत्यूनंतरही हे सल, हे खंत यांनी मला जिवंत मृत ठेवावं, म्हणजे भूत होऊन मी छळू इच्छिते ज्यांनी मला हे खंत दिलेत्! काही आयुष्यातल्या जखमा शिवू शकत नाही आपण. घाव अश्वत्थाम्याच्या जखमेगत चिरंजीव भळभळत राहतात.

सुंदर टुमदार घर – संसार हे माझं पहिलं स्वप्न तर दुसरं स्वप्न कलाक्षेत्रात वडिलांचं नाव दिगंत करण्याचं तर होतंच पण ते काय छंद किंवा पॅशन नव्हतं – नृत्य, गाणं, चित्रपट, नाटक हे आमच्या रक्तातच असल्याइतकं स्वाभाविक पण त्यात मी काहीच करू शकले नाही म्हणजेच मी आताच जिवंत भूतप्रेत झाल्यात जमाय्! न तरीही मी कुणाला छळू शकत नाही हा पण एक सल! आयुष्याची शेवटची, थर्ड इनिंग सुरू असतानाही पोटापाण्याच्या प्रश्नासाठी केविलवाणी धडपड करावी लागते – मुलासाठी इतर आयांसारखं मी काही केलं नाही ही खंत अक्षम्य मरेपर्यंत.. चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या इतर बायकांसारखीच माझीही ट्रॅजेडी होऊ नये इतकी मी खमकी कणखर असूनही एका प्रचंड चक्रव्यूहात अडकून आंधळी लढाई खेळत राहावी तसं.. एक आहे की लहानपणी इतकं समृद्ध जीवन जगल्यामुळे मला आता  काय फोलपटासारखं आयुष्य जगलोत आपण असं वाटत नाही; उलट प्रतिकूल परिस्थितीतही मी छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद घेते. तो क्षण उत्कटपणे जगते.

सुलभा देशपांडे म्हणजे माझ्या बाईंनी मला नृत्यनाटय़ात मुख्य नर्तिकेच्या रूपात उभं केलं तो क्षण संगीत, गायन, अभिनय आयुष्य प्रत्येक बाबतीत त्यांनी मला न शिकवता ‘शिकवलं’! त्यांच्या संगतीतला प्रत्येक क्षण समाधानाचा, आनंदाचा समृद्ध होत जाण्याचा! भाई-दीदी-आई या उबदार घरटय़ात मला एवढे समाधान निखळ सात्त्विक उच्च आनंदाचे प्रसंग दिले की तो एक आनंदयात्रेचा इतिहासच होईल. जेव्हा जेव्हा मी लिहिते, गाते, नाचते तेव्हा तेव्हा मला प्रत्येक वेळी समाधानच वाटत गेलंय् आणि माझंच नाही तर कुणाचंही चांगलं काव्य, चांगली फिल्म, चांगलं नाटय़, गायन, नृत्य यानं मी आनंदित, समाधानी होते. प्रत्येक वर्षांला पाळणा न् सती प्रथा या काळात मी जन्माला आले नाही याबद्दल मला समाधान वाटतं. स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या देशात मी जन्माला आले नाही याचंही समाधान.. तलाक दिला तर तीन वर्ष शिक्षा याचं विधेयक निदान लोकसभेत मंजूर झालं; याचं समाधान.

मी आता नाचू शकत नाही पण माझी भाची फुलवा विजेसारखी नाचते तेव्हाचं अपूर्व समाधान – तिच्या एका विजेरी पदन्यासात माझी बहीण प्रेरणा तर दुसऱ्यात मी आहे असं मानून समाधान पावते. मी आता गात नाही पेक्षा आनंदी असते तेव्हाच मी गाते तेव्हा मला वाटतं की केवळ कुटुंबाच्या भरणपोषण करण्यासाठी मनात नसतानाही जीव ओतून गाणाऱ्या लताबाई- आशाबाई खूप उंच – त्यांची गाणी ऐकणं हे एक तृप्तीचं समाधान..

एक एक गोष्टी मागं सुटत चालल्यात.. पण याची मला खंत नाही. मी कधीही दळभद्रय़ासारखं आयुष्य जगले नाही. माझ्या स्वत:च्या अटी आणि नियमांवर जगले. मनासारखं जगले याचं समाधान खूपच मोठंय्. ‘चित्रलेखा’मधला बीजगुप्त म्हणतो,

‘‘उतनाही उपकार समझ

कोई जितना साथ निभा दे

जनम मरण का मोह है

सपना वो सपना बिसरा दे

कोई ना संग मरे’’

आणि

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया

गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहाँ

मै दिल को उस मकाम पे लाता चला गया॥

तर असंही आजचा दिवस महत्त्वाचा आणि तो सगळं एकवटून असा जगायचा की जणू काय दिवाळीच! मग पोटात, घरात भूकेच्या दिव्याला तेल मिळो वा न मिळो.

सापेक्षतावादाचा खरा अर्थ आयुष्याच्या संध्याकाळीच जास्त समजतो..!

खरं तर या वैयक्तिक खंत समाधानाचा विचार करण्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात न् आयुष्याबाहेर. काहीवेळा आपल्या हातात काहीच राहात नाही. जे मिळवलं तेही गमावलं जातं. मग आपलं असं कायाय्! न् जर काहीच नसेल आपलं तर खंत तरी कशाची बाळगायची? न् सुख तरी कसलं साजरं करायचं?

खंत करत उसासे टाकत कण्हत बसणं माझ्या स्वभावात नाही. पण आपण आपलं नुकसान सहन करू शकतो. आपल्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं तर तो घाव फार खोल जिव्हारी लागतो. मग ती खंत खंत न राहता तो जीवघेणा वार होतो. इतरांची मुलं हासत, नाचत, बागडत संसार करत देशविदेश फिरतात. करिअर करतात, भरपूर पैसे मिळवतात. याबद्दल मी वाईट वाटून घेऊ की; माझं पोर मला हॉस्पिटलच्या किंवा वृद्धाश्रमाच्या दारात फेकून पळून न जाता माझी काळजी घेतो – हात धुतला की टॉवेल पुढं देतो – आणि आमचं दोघांचं आयुष्य एक नीरव असीम शांततेत चाललंय् याचं समाधान करू? कधी मी घाबरीघुबरी होते की आपण चांगली आई नाही आहोत. तर कधी मी मुलासाठी, घरासाठी, संसारासाठी माझ्यातल्या नृत्याला, गाण्याला; गावभर भटकंती करण्याच्या वेडाला ठार मारलंय्.. माझ्यातल्या कुणा एकीला मी गळा दाबून मारून टाकलंय् त्याची खंत करू की नको? कारण वेगवेगळे देश फिरताना, निसर्गसौंदर्य न्याहाळताना, करिअर करताना घरी माझ्या एकटय़ा मुलाला आईची जास्त जरूर आहे; मी हा आनंद घेऊ शकत नाही या अपराधी भावनेने अनेकवेळा माघारी फिरले. बरोबर काय? कर्तृत्वाचं समाधान मोठं? की करिअरमधलं सुख न मिळण्याची खंत?

व्यक्तिगत खंतांची लिस्ट खूप लांबलचक आहे. कॉटखाली पेपरमध्ये पिशवीत तोंडावर पट्टय़ा करकचून बांधलेल्या अनेक कविता – गाणी – फिल्मस्क्रिप्ट – नाटक – बतावणी – एकांकिका माझ्याकडे असहाय नजरेनं मिटीमिटी बघतायत् – ‘प्रेसिडेंट’ ही महत्त्वाकांक्षी फिल्म जी मी स्वत: दिग्दर्शित करणार होते पण त्याचा आवाका प्रचंड मोठा, त्याचं बजेट; त्याची व्याप्ती; त्याचा विषय.. आणि दुर्दैवानं या भारतात त्याचं शिवधनुष्य उचलणारा कुणी पुढं येईल असं वाटत नाही. ‘सिद्धान्त’ ही नक्षलग्रस्त आणि सद्य राजकारणावरचा चित्रपट, पण त्याला व्यावसायिक मूल्यं नसल्यानं तीही फिल्म कुणी करू धजणार नाही. आपली निर्मिती कचऱ्यागत पडून राहणार याचं दु:ख काय असतं ते एका लेखक-कलावंतालाच कळतं, ही खंत नाही, ही जीवघेणी जखमच!

मी कधीच टाकाऊ पाटय़ा टाकणारं लिहिलं नाही या खात्रीचं समाधान एवढंच श्रेयस. जरी नाही ते लोकांपर्यंत पोचू दिलं गेलं तरी ती माझ्या हातून निर्माण झालेली उत्कृष्ट कलाकृती आहे; त्यावर माझी मोहर आहे – सही आहे हे समाधान शेवटपर्यंत राहिलच.

खंत म्हणायची की हा शब्द खूप छोटा वाटतो की, या लोकशाही मिळालेल्या राष्ट्रात कॉम्रेड पानसरे, दाभोळकर यांच्या हत्या केल्या जातात न् खुनी सापडत नाही. एक कोवळा निष्पाप मुलगा, गाडीची धडक बसून रक्तबंबाळ झालेल्या त्याच्या देहाला, दुर्दैवी बाप डॉक्टरांच्या दवाखान्यातून रुग्णालयातून टोलवाटोलवी करण्यामुळे मृत्युमुखी पडतो – सत्येंद्र दुबेसारख्या माणसाचा भ्रष्टाचार उघड करण्याबद्दल खून पडतो – मातृत्वाचा गौरव करणाऱ्या या देशात ज्यामुळे मातृत्व प्राप्त होतं त्या नैसर्गिक प्रक्रियेला विटाळ समजला जातो एवढंच नव्हे तर अत्याधुनिक र्निजतुक असलेले सॅनिटरी नॅपकिन्सवर सरकारकडून कर लावू नये यासाठी स्त्रियांना आंदोलन छेडावी लागतात. स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी सांगावं लागतं! सॅनिटरी नॅपकिन्स चंगळ म्हणून स्त्रिया वापरत नाही. ती तिची आत्यंतिक गरज आहे. ‘भारताची भावी पिढी’ जी उदरात वाढवते तिच्या आरोग्याबद्दल इतकी अनास्था? दुर्दैवानं जेवढय़ा स्त्रिया पार्लमेंटमध्ये गेल्या त्यापैकी एकीनंही हा स्त्रियांचा नाजूक पण अत्यंत जीवनावश्यक विषय मांडून ‘सॅनिटरी नॅपकिन्स सरकारनं पूर्ण फ्री दिल्या गेल्या पाहिजेत’ असा आग्रह धरला नाही कधी. पुरुषांच्या चंगळ चैनीचं साधन कंडोम हे मला वाटतं पूर्वी २५ पैशांना मिळायचं आणि स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन्स २००-२५० रुपयाला?  मग तिनं काय त्या काळात अस्वच्छ राहावं जेणेकरून तिला गर्भाशयाचे आजार होणार.. या गोष्टीबद्दल कुणीच का बोलत नाही?

अम्मा जयललिताबाईंची राजकीय कारकीर्द वादग्रस्त होती तशीही आपल्याकडल्या राजकारणी लोकांची अतिभव्य ‘अतिबळशाली’ ‘अर्थ’पूर्ण कारकीर्द पाहिली तर तोंडच बंद होतं!! पण तरीही उद्देशानं का होईना अम्मा जयललिताबाईंनी सरकारकडून प्रत्येक स्त्रीला त्या वेळी सोन्याचं मंगळसूत्र, चोळीबांगडी, मिक्सर, संसारोपयोगी वस्तू दिल्या. एवढंच नाही तर पहिल्या बाळंतपणात शासनाकडून बाळंतविडा! गरिबाला कमी खर्चात पोटभर जेवण – पाणी – हे काय आपलं सरकार करू शकत नाही? शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी मिळत नाही – हजारो कोटी बुडवणारा मल्ल्या राजरोस फिरतो आणि इथला गरीब निष्पाप टाचा घासत मरतो ज्या वेळी देवाचे पाय कुणी सोन्याचे बनवून भेट देतो!

आणि आत्ता आयुष्याच्या संध्याकाळी मी तराजू घेऊन बसणं हास्यास्पदच ठरेल.. या तागडीत किती खंत? या तागडीत किती समाधान? न् यावर काही आयुष्याचे न् स्वत:च्या मीपणाचे निकष ठरत नाही ना? साधं आपलं माणूसपण सिद्ध होण्याचे निकष अजून वेगळेच असतात. कारण आपण मानलेलं समाधान नि खंत हे आपले समज असतात. समाजाचे नव्हे. त्यांच्या दृष्टीने चांगल्या यशस्वी मानण्याचे निकष अजून वेगळेच. न् ते आपण मानतोच असं नाही. तर असं हे सगळं जटिल गुंतागुंतीचं. त्याउलट पुढं पुढं चालणंच सोप्पय्.. फूटपट्टय़ा न् खतावणी घेतली की सगळे हिशोब चुकतात. कारण मानवी आयुष्य न् व्यक्तिमत्त्वच अतक्र्य असतात.

अजून एक छोटी खंत – पुनर्जन्मावर विश्वास नाहीय्. आपली मुलंच आपला पुनर्जन्म असतो पण मला परत जन्मायला खूप खूप आवडलं असतं कारण लॉरेल म्हणतो तसं, ‘‘माझं माझ्याबरोबर खूप छान पटतं!’’

आणि एक मोठं समाधान – सर्वगुणसंपन्नतेचा अहंकारी मुकुट अजून माझ्या डोक्यावर छान शोभतोय् आणि रूप, पैसा जाईल पण माझी बुद्धिमत्ता न् प्रतिभा कोणीच चोरू शकत नाही.. ती कायम माझ्याबरोबर झगझगीत कवचकुंडलागत राहील न् मी कर्ण नसल्याने कापून देणार पण नाहीय् कुणालाच!

मलिका अमरशेख

chaturang@expressindia.com